तुझे नि माझे जमेना भाग १०

कथा प्रेमाची

तुझे नि माझे जमेना भाग १०




मागील भागात आपण पाहिले कि उंचीवर अडकलेल्या गौरीला सोडवायला प्रथम तिथे पोचतो.. तो तिला कसे सोडवतो बघू आता..



"निघायचे?" प्रथमने गौरीला विचारले..

" पण कसे? मला खाली बघून चक्कर येते आहे.." गौरीने अजूनही डोळ्यावर हात ठेवले होते.. 

" दोन मिनिटं थांब.. सांगतो.. " प्रथम त्या वॉटरपार्कच्या माणसांकडे जाऊन बोलून आला..

" चला निघूया?" प्रथमने गौरीला विचारले..

" पण कसे?" 

" या स्लाईडवरून.."

" नाही.. " गौरी जोरात ओरडली.. तोच खालून येणाऱ्या नवीन ग्रुपचा आवाज येऊ लागला..

" गौरी, खालून अजून माणसे येत आहेत.. पटापट ठरव.. काय करायचे ते.. उगाच सगळ्यांसमोर माझे हसू करू नकोस.." प्रथम चिडत म्हणाला.

" तुला काय होतंय बोलायला.. मला किती भिती वाटते आहे माझे मला माहित.." गौरी परत रडायला लागली..

" ओके.. नाही बोलत.. मग गौरी देवी इथून प्रस्थान करायचे का? इथे जर गर्दी झाली तर उतरणे मुश्किल होईल."

" हो.." गौरी रडू आवरत म्हणाली..

" मग डोळे बंद करा.. आणि मी सांगतो ते करा.. चालेल?" गौरीने मान हलवली..

"मग इथे खाली बसा.."

" पण मला खूप भिती वाटते ना.."

" आता परत हे वाक्य बोललीस तर फटके खाशील.. एकतर माझी इच्छा नसताना इथे आलो आहे आणि परत तीच कॅसेट.. चल बस पटकन.."

" नाही.. तू बस.. मी तुला धरून उतरते?"

" काय?" प्रथम जोरात ओरडला..

" तू पुढे बस.. मी पाठून तुला धरते.. प्लीज ना.."

" तुझा स्क्रू खाली पडला नाही ना?"

" आता मीच खाली पडायची वेळ आली आहे,स्क्रूचे काय धरून बसलास?"

हो नाही करता करता प्रथम आधी बसला.. त्याला अगदी खेटून गौरी बसली.. तिने त्याला पाठून मिठी मारली.. प्रथम दचकला.. पण तिने डोळे गच्च बंद केले होते हे पाहून काही बोलला नाही..

" ऐकतेस?"

" बोल.."

" जी गोष्ट करायचीच आहे ती जबरदस्ती करण्यापेक्षा प्रेमाने केली तर?"

" म्हणजे?"

" असेही आपण खाली जातच आहोत.. तर डोळे उघडून मजा घे ना. मला नाही वाटत परत तू हे सगळे अनुभवशील.." गौरीने हळूच डोळे उघडले तोच प्रथमने खाली यायला सुरुवात केली.. आधी ती खूप घाबरली. पण आता सोबत प्रथम होता त्यामुळे थोडा धीर आला होता तिला.. तो वेग, बाजूने उडणारे पाणी.. आणि गौरी चक्क हसायला लागली.. ती दोन मिनिटे संपली आणि दोघे जोरात पाण्यात पडले.. गौरीने डोळे उघडले.. तिला आजूबाजूला प्रथम दिसेना..

" प्रथम.. प्रथम.."

"काय झाले?" तो कधीच पाण्याच्या बाहेर पडला होता..

" काही नाही.. मला वाटले.. तू.."

" चल बाहेर ये.." 

तोवर राज आणि सुचेता पण तिथे आले होते..

" मज्जा आली ना गौरी.. मी सांगत होते तुला.." सुचेता उत्साहाने बोलत होती.. दोघांचेही आईबाबा, आजी आजोबा तिथे आले होते. राजने फोन करून त्यांना बोलावले होते.. भिजलेल्या गौरी आणि प्रथमला वरून एकत्र येताना सगळ्यांनी बघितले होते. दोन्ही आज्यांनी एकमेकींकडे बघून डोळे मिचकावले..

" कसली मजा? झेपत नाहीतर वर जायचे कशाला? दुसऱ्यांना त्रास? मग वर जाऊन रडायचे. मला भिती वाटते,मला भिती वाटते." प्रथम चिडवत म्हणाला..

"दादा ते माझे चुकले.. गौरी नको नको म्हणत असताना मीच तिला आग्रह केला.." सुचेता अपराधी स्वरात म्हणाली..

" काहिही असो.. प्रथमने गौरीला सुखरूप घरी आणले ना.. देव पावला. चला आता घरी जाऊया?" गायत्रीबाई म्हणाल्या.

" आता? लगेच? आता तर आलो ना?" सुचेता रडवेली झाली..

" सुचेता बाळा एका ठिकाणी एवढा प्रॉब्लेम झाला अजून नको ना.. तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर ये.." सविता तिची समजूत काढत म्हणाली..

" हो नाही तरी बघण्याचा कार्यक्रम झाला आहेच.." शालिनीताई पुटपुटल्या..

"आजकाल जो येतो तो तोंडातल्या तोंडात बोलत असतो.." राज म्हणाला.

" काय?"

" काही नाही.. निघूया मग?" हे बोलणे होईपर्यंत गौरी भोवळ येऊन पडली.. बाजूला असलेल्या प्रथमने पटकन तिला सावरले.. राज आणि सुनील पुढे जाणार तर शालिनीताईंनी त्यांना पाठी खेचले..

" प्रथम आता तूच हिला उचलून घेशील का?" 

" अग पण आजी.. मी " राज बोलायला जात होता.. आजीने जोरात त्याच्या पायावर पाय दिला..

"अरे या राजचे हात फ्रॅक्चर आहेत. तो कसला हिला उचलतो.. म्हणून म्हटले. बाकी काही नाही.."

आपले हात कधी फ्रॅक्चर झाले होते याचा राज विचार करत होता.

" अग त्यात काय एवढे? उचलेल कि तो.. हि गौरी काय आपल्याला उचलेल काय?" गायत्रीबाई म्हणाल्या..

आपली आजी पण अशी का बोलते आहे हा सुचेता विचार करायला लागली..

" ठिक.. मी सोडतो हिला गाडीत.. चल राज.." प्रथम खांदे उडवत म्हणाला.

प्रथम गौरीला घेऊन जाताना आज्यांनी आनंदाने एकमेकिंना टाळ्या दिल्या..

" आता परत कधी भेटायचे ग?"

" आता काय, भेटायलाच लागणार.." 

सगळे घरी आले.. नंदिनीने गौरीचे कपडे बदलून तिला औषध दिले..

" आता वाटते का बरे तुला?"

" हो आई.."

" कशाला ग त्या मुलीच्या मागे एवढ्या उंचीवर गेलीस? काही झाले असते तर तुला?" नंदिनी काळजीने बोलली..

" अग आई, ती एवढे निरागसपणे बोलत होती. मला तिला नकार देताच आला नाही.. खूप गोड आहे ग ती.. अगदी लहान बहिणीसारखी.."

" हो का? आता आराम कर.. उद्या बोलू.."

" आजी तू दादाला त्या गौरीला उचलायला का सांगितलेस?" सुचेता कंबरेवर हात ठेवून आजीला विचारत होती.

" मी कुठे बोलले? तिचीच आजी म्हणाली.."

" तू मला उल्लू बनवू नकोस.. तुझे ना आजकाल काही भलतेच चालू असते. मला नाही सांगणार?" सुचेताने दरडावणीच्या सुरात विचारले..

" सांगते ग.. तू ना माझ्या सासूबाईंचा पुनर्जन्म आहेस हो.. तीच बोलायची पद्धत.. पण वचन दे.. प्रथमला काही सांगायचे नाही म्हणून.."

" दिले वचन.. पटकन सांग.. सस्पेन्स सहन होत नाही.." सुचेता म्हणाली..

" ती गौरी तुला वहिनी म्हणून कशी वाटते?"

" गौरी??? आणि वहिनी???? एक नंबर.." सुचेता ओरडत म्हणाली.

" अग हळू ओरड ना.. त्याला ऐकू जाईल.." आजी तिला दटावत म्हणाल्या..

" सॉरी आजी.. पण मला ना खूप आवडलं आहे हे.. मी आईबाबांना सांगू?" 

" त्यांना माहीत आहे.."

" म्हणजे फक्त मलाच माहीत नव्हते?" सुचेता चिडून म्हणाली..

" अग.. तुझी बोर्डाची परिक्षा आहे म्हणून नाही सांगितले..नाहीतर तू अभ्यास सोडून तेच करत बसली असतीस.. आता कळले ना? पण काही बोलू नकोस हो त्याला लगेच.. नाहीतर डोक्यात राख घालून घ्यायचा."

" डोन्ट वरी आजी.. आता एक मोठा सपोर्ट तुम्हाला मिळाला आहे.. मी बघ काय काय करते ते.." सुचेता हसत म्हणाली..

" काही नको करूस.. तू फक्त अभ्यास कर सध्या.. नाहीतर तुझे आईबाबा तुझे काय काय करतील.." आजीने सुचेताला झापले..


सुचेता तिथून निघाली.. पाण्यात खेळून ती खूप दमली होती.. पण एवढी मोठी गोष्ट कळल्यावर सुद्धा दादाला चिडवायचे नाही हि बात तिला हजम होत नव्हती.. ती हळूच त्याच्या खोलीत गेली.. नेहमीप्रमाणे त्याने दार ओढून घेतले होते.. प्रथम बेडवर झोपला होता.. ती त्याच्याजवळ गेली.

ती काही बोलणार तोच त्याचा चेहरा वेडावाकडा झाला आणि तो ओरडायला लागला..

" मी मुद्दाम नाही केले.. प्लीज.. मी खरेच मुद्दाम नाही केले.. मी फक्त ते हातात घेतले.. मला माफ करा.." आणि प्रथम चक्क रडायला लागला.

" आई, बाबा लवकर या.." सुचेता जोरात ओरडली..

" दादा, ए दादा.. उठ ना.." सुचेता त्याच्या तोंडावर पाणी मारत म्हणाली.

त्यांचे आईबाबा तिथे आले.. प्रथम जागा झाला होता.. समोर आईला बघून त्याने तिला मिठी मारली..

" आई मी मुद्दाम नाही केले.. चुकून झाले ते.." तो अजूनही रडत होता.

" हो रे.." त्याची आई त्याच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली.. आईबाबांनी एकमेकांकडे बघितले..




प्रथम नक्की कशाला घाबरला आहे? परदेशात जाण्यामागे हेच कारण आहे का? बघू पुढील भागात..



हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

🎭 Series Post

View all