Feb 23, 2024
नारीवादी

तुझा वनवास गं 2

Read Later
तुझा वनवास गं 2


एके दिवशी सुमन कामावर गेल्यानंतर तिथल्या एका बाईने तिला प्रश्न केला.

"अगं सुमन, तुझा चेहरा इतका का उतरला आहे? काही अडचण आहे का?" इतकी वर्ष झाले सुमन त्यांच्याकडे धुनी भांडी करत असल्यामुळे त्यांना ते लगेच ओळखून आले. नेहमी हसतमुख असलेली सुमन अलीकडे थोडी नाराज दिसत आहे यावरून त्यांनी ओळखले.

"होय मावशी, आमच्या अंजलीचं बाळंतपण होणार आहे ना तेव्हा डॉक्टरांनी तिला सिझर करायला सांगितले आहे आणि चाळीस हजार रुपये खर्च सांगितला आहे. त्याचीच काळजी मी करत आहे. एवढे पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न मला सतावत आहे." असे सुमन म्हणाली.

"तू एक काम कर, तुझा बचत गट आहे तिथून तू थोडे कर्ज काढ. पूर्ण चाळीस हजार तुला मिळतील की नाही माहित नाही पण थोडीफार तरी मदत होईल. बाकी तू जिथे काम करतेस तिथल्या बायका तुला पैसे देत असतील तर ते मिळून असे पैसे तुझ्याकडे जमा होतील ना? इतकं का टेन्शन घेतेस?" ती बाई म्हणाली

"अरे हो की, हे तर मला माहीतच नव्हते. एकदम लक्षात करून दिला बरं झालं मावशी." असे म्हणून सुमनने बचत गटातून थोडी पैशांची जुळवाजवळ होते ते पाहिले. तिला तेथे पंचवीस हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यानंतर तिने कामावर असलेल्या बायकांना थोडी थोडी मदत मागितली. तेव्हा कुणी दोन हजार कुणी चार हजार करत उरलेले पंधरा हजार रुपये तिला मिळाले. या सर्वांची नोंद तिने स्वतः वहीमध्ये ठेवली आणि आपल्या मुलीची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित पार पाडली.

सुमनच्या मुलीला म्हणजेच अंजलीला गोड मुलगी झाली. पहिलेच आपत्य असल्यामुळे सगळेजण आनंदात होते पण कुणीच काही तिला खर्चाबद्दल विचारले नाही. सुमनने देखील लहान गोड परीला पाहून खर्चाचा विषय बाजूला ठेवली आणि तिने आणखी जास्तीची धुणीनी भांडीची कामे करून कर्ज फेडायचे असे तिने मनाशी ठाम ठरवले.

"आता तुला पुन्हा मूल जन्माला घालता येणार नाही. घातलेच तर किमान पाच ते सात वर्षाचा गॅप असावा. नाहीतर तुझ्या जीवाला धोका आहे." डिस्चार्ज देतेवेळी डॉक्टरांनी तिला सक्त ताकीद दिली होती. त्यावेळी सगळे होकार दिले आणि अंजली थोडे दिवस आईकडे राहून तिच्या सासरी गेली.

सगळे काही सुरळीत, व्यवस्थित पार पडत होते. सुमनने देखील जास्तीची धुनी भांडी आणि काम करून सगळे कर्ज फेडले. आणि घेतलेले पैसे सर्वांना परत दिले. आता थोडीशी तिला उसंत मिळते न मिळते तोपर्यंत पहिल्या मुलीला तीन वर्षे झाल्यानंतर पुन्हा लेक पोटुशी आहे हे तिला समजले आणि ती पूर्ण गळून पडली. डॉक्टरांनी किमान पाच ते सात वर्षाचा गॅप असावा असे सांगितले होते. आता तीन वर्षातच आपली लेक पोटुशी आहे. तिच्या जीवाला धोका तर होणार नाही ना? असे वाटून सुमनचा जीव वर खाली होत होता. अंजलीच्या सासरचे लोक तिला माहेरी पाठवायला तयार होते त्यामुळे सुमन काहीही करू शकत नव्हती.

शेवटी नवव्या महिन्यात सासरच्यांनी अंजलीला माहेरी सोडले तिची डिलिव्हरी करून पुन्हा तिला घेऊन जाण्यासाठी. त्यांनी एका गोष्टीनेही खर्चाचा विषय काढला नाही. आता मात्र सुमनला काही समजेना. डॉक्टरांसमोर कसे जावे? हा प्रश्न तिच्यासमोर पडला होता. मॅडम काही बोलल्या तर? काही म्हणाल्या तर? त्यांनी सांगितलेले काही ऐकले नाही. तिच्या सासरी सर्वकाही माहिती दिली होती पण त्यांना लवकरच मुलगा हवा होता असे एक ना अनेक प्रश्न तिच्या डोक्यामध्ये सुरू होते. मुलीची डिलिव्हरी तर करावी लागणारच शिवाय आधीच्या डॉक्टरांना सर्व काही माहिती आहे त्यामुळे तिथेच न्यावे असा विचार तिने केला आणि ती त्या दवाखान्यात घेऊन गेली. शेवटी तिच्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न होता.

अंजलीची डिलिवरी व्यवस्थित होईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//