तुझा वनवास ग 1

एक सत्यकथा


"सोनोग्राफीमध्ये मुलीच्या किडन्या वर खाली आहेत असे दिसून आले आहे. तेव्हा ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. बाहेरच्या डॉक्टरांनाही बोलवावं लागेल. आपण लवकरच ऑपरेशन करू सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही काळजी करू नका. आता मुलीचे सिझर करावे लागणार आहे तेव्हा काळजी घ्या." असे डॉक्टर म्हणाले.

"मॅडम खर्च किती येईल?" सिझर हा प्रश्न ऐकताच सुमनच्या अंगाला दरदरून घाम फुटला. सर्वात पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यासमोर खर्च उभा राहिला. सिझर म्हटलं की खर्च हा मोठा असणारच म्हणून तिने पहिल्यांदा खर्च विचारले.

"तसा सगळा मिळून अंदाजे चाळीस हजार रुपये खर्च येईल. मॅडम म्हणाल्या.

"काहीतरी कमी करा की मॅडम." सुमन दबकतच म्हणाले.

"मी माझी फी काहीच घेतले नाही. बाकी बाहेरचे डॉक्टर्स बोलवायचे आहेत. त्यांची फी मात्र तुला द्यावी लागणार. भुलीचे इंजेक्शन आणि ऑपरेशनचा पैसे मिळूनच मी तुला सांगितले आहेत. ते तेवढे द्यायला हवे. बाकी मी माझा कोणताही खर्च तुझ्याकडून घेणार नाही." असे मॅडम म्हणाल्या. कारण त्या मॅडमना सुमनची परिस्थिती माहीत होती.

"बरं मॅडम. कधी ऍडमिट करू?" असे म्हणून तारीख वेळ सगळे काही घेऊन सुमन मुलीसह बाहेर पडली. मुलीला घरामध्ये सोडले आणि ती कामावर गेली. सुमन धुणी भांडीचे काम करत होती घरखर्चाला जेमतेम पैसे मिळत होते तर ती मुलीला शिक्षण कुठून करणार? नवरा दारुडा असल्यामुळे घरात एकही पैसा येत नव्हता म्हणून तिने मुलीचे दहावीपर्यंत शिक्षण केले आणि तिचे लग्न लावून दिले. वर्षाच्या आत मुलगी पोटुशी राहिली म्हणून तिला बाळंतपणासाठी माहेरी आणले होते पण तिचा हा प्रॉब्लेम किडनी वर-खाली असण्याचा कोणालाच माहीत नव्हता त्यामुळे बाळांतपणासाठी इतका खर्च येईल याचा स्वप्नात देखील तिने विचार केला नव्हता.

आता लेकीचे ऑपरेशन तर करावेच लागणार शिवाय मदतीला कोणीही येणार नाही हा एकच प्रश्न तिच्या डोक्यामध्ये चालला होता. ती एका झाडाखाली जाऊन बसली आणि हुंदके देऊन रडू लागली. मुळात हे ती मुद्दामहून करत नव्हती तर ते आपोआप घडून येत होते. मुलीसमोर रडावे तर मुलगी घाबरून जाईल म्हणून तिने दवाखान्यामध्ये बांधून ठेवलेला हुंदका आता फोडला. ती मनसोक्त रडली आणि मग पदर खोचून पुन्हा कामाला लागली. दिवसभर तिच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न सुरू होता तो म्हणजे चाळीस हजार रुपये आपण कुठून आणि कसे गोळा करायचे?

तिला तिचे माहेरही नव्हते कारण माहेराहून ती पळून येऊन लग्न केली होती. पण हा नवरा असा निघेल असे तिला अजिबात वाटले नव्हते. तिच्या नशिबात हे सारे वाढून ठेवले होते. संसार कसातरी पुढे ढकलायचा म्हणून ती ढकलत होती. आपल्या मुलांसाठी ती जगत होती पण आजचा हा सिझरचा इतका मोठा खर्च पाहून तिच्या डोक्यावर खर्चाचा डोंगर उभा राहिला. इतके पैसे कसे गोळा करायचे? याचा विचार ती दिवसभर करत होती.

सुमनची परिस्थिती बेताचीच होती पण तिने जिद्दीने तिचा संसार उभा केला होता. प्रत्येक खर्च ती मोजून मापून करायची. घरात पैसा शिल्लक राहत नव्हता. कसेबसे मुलीचे लग्न बिनखर्चात तिने केले म्हणजेच मुलाकडच्या लोकांनी अगदी साधेपणाने फक्त मणीमंगळसूत्र घालून लग्न लावले होते. डिलीवरी नाॅर्मल होईल आणि तेव्हा जास्त खर्च येणार नाही असे तिला वाटले होते, पण आता हे मोठे संकट पाहून तिला खूप वाईट वाटत होते. याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता.

सुमन पैसे जमा करेल का? मुलीची डिलीवरी व्यवस्थित होईल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all