Login

तुटलेली साखळी...भाग 2

स्वतःला सावरण हेच खूप मोठ साहस असत
तुटलेली साखळी...भाग 2

तीन वर्ष उलटून गेले होते...

माधुरी आता केवळ स्वयंपाक करणारी बाई नव्हती. तिचं नाव एका स्थानिक वृत्तपत्रात झळकलं –
“जिनं झगडून स्वतःसाठी आयुष्य उभं केलं.”

आश्रयगृहातून निघाल्यावर तिनं एक छोटं घर भाड्याने घेतलं होतं. प्रत्येक रुपयाची किंमत तिला माहीत होती. पण आता ती फक्त स्वतःसाठी नव्हती लढत – तिच्यासारख्या इतर महिलांसाठी एक नवा आश्रय तयार करत होती.

तिनं स्वतःचं एक छोटं “माधुरी आधार केंद्र” सुरू केलं, जिथे संकटात असलेल्या महिलांना मानसिक, कायदेशीर आणि आर्थिक मदत मिळायची. तिच्यासोबत काम करणाऱ्या काही महिला त्या आश्रयगृहातूनच होत्या – ज्यांनी तिच्यामुळे पुन्हा जगायचं बळ मिळवलं होतं.

एक दिवस…

दारावर टकटक झाली.

समोर एक ओळखीचा चेहरा.

महादेव.

दाढी वाढलेली, डोळ्यांत पश्चाताप. काही क्षण दोघांचं शांत नजरेनं निरीक्षण झालं. एकेकाळचा भयंकर छळकर्ता, आणि तीच माधुरी – आता पूर्णपणे स्वतंत्र.

“माफ कर गं… खूप चुका झाल्या माझ्याकडून,” तो फक्त एवढंच बोलू शकला.

माधुरीच्या मनात न हलणारी शांतता होती. ती म्हणाली,
“माफ केलं मी तुला... पण परत नाही फिरणार. कारण मी जे शोधलंय ना – स्वतःचं अस्तित्व, त्याच्या बदल्यात मी कुणालाही परत येऊ देणार नाही.”

महादेव गप्प झाला. डोळ्यांतून पाणी आलं. तो गेला.

त्या रात्री…

माधुरी बाल्कनीत उभी होती. हातात एक गरम चहा, आकाशात तारे चमकत होते. तिचं अंतर्मन म्हणत होतं —

"मी खूप काही गमावलं, पण मी स्वतःला सापडलं... आणि आता माझ्या जीवाला शांत झोप मिळते."

ती रात्र माधुरीसाठी फार काही बदलून गेली होती. महादेव समोर येऊन माफी मागून गेला, पण माधुरीच्या मनात कोणतीही द्वेषाची जागा नव्हती.
तिला समजून गेलं होतं… माफ करणं म्हणजे परत तुटलेल्या गोष्टी सांधणं नव्हे, तर स्वतःच्या वेदनांवर मरहम घालणं असतं.

दुसऱ्या दिवशी…

माधुरीच्या ‘आधार केंद्रा’त एक नवी तरुणी आली — स्वरा.
रडक्या डोळ्यांनी, ओठांवर पुटपुटलेलं एकच वाक्य –
"मी थकल्येय... मी संपलेय..."

माधुरीने तिला शांतपणे जवळ घेतलं, तिला पाणी दिलं, आणि म्हणाली,
"स्वरा, संपलेली नाहीस… तू फक्त थकलेली आहेस आणि थकलेल्या माणसाला विश्रांती हवी असते, मरण नाही."

स्वराचं डोळ्यांतलं पाणी ओघळलं, पण पहिल्यांदा तिनं कुणावरतरी विश्वास ठेवून त्या हातात हात दिला.

त्या दिवसापासून स्वरा माधुरी आधार केंद्रात राहू लागली. हळूहळू तिनं बोलायला सुरुवात केली. तिच्यावर तिच्या नवऱ्याने केलेल्या मानसिक छळाचं जळजळीत वास्तव उलगडत गेलं. पण त्याचबरोबर, स्वराने इथे पुन्हा स्वतःला ओळखायला सुरुवात केली.

काही महिन्यांनी...

स्वरा आता संस्थेतील इतर महिलांना कॉम्प्युटर शिकवू लागली होती. तिचा आत्मविश्वास, तिचं हास्य पुन्हा जिवंत झालं होतं.

एक संध्याकाळी माधुरी आणि स्वरा दोघी छतावर चहा घेत बसल्या होत्या.

स्वरा म्हणाली,
“ताई, तुम्ही नसतात तर मी जिवंतच राहिले नसते. आता वाटतं, मी कुणीतरी आहे… माझं अस्तित्व आहे.”

माधुरी शांतपणे म्हणाली,
“स्वतःला सावरणं हेच सगळ्यात मोठं साहस असतं स्वरा. तू ते केलंस.”