टर्निंग पॉईंट..

Benifit Of Education


क्लीनिक मध्ये आज खुप पेशन्ट असल्याने कांचनला बराच उशीर झाला होता.

तिची वाट पहावून पियू झोपली होती. ती पिऊ जवळ आली तिच्या अंगावर पांघरून टाकत म्हणाली एवढस ते माझं पिल्लू रडली का रे? " तिने अनुपला विचारलं.

" नाही ग! उलट मला म्हणत होती पप्पा, मम्माला उशीर होईल तु जेवून घे. तिला काही बोलू नको. "

तिने हात पाय धुतले, जेवण केलं रोजच्या सवयी नुसार तिने डायरी लिहायला घेतली.

प्रिय डायरी,
   
          रोजच्या पेक्षा आजचा दिवस खुप छान गेला होता. आज बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. मुख्य म्हणजे आज कितीतरी दिवसांनी अभिचा फोन आला होता. तो अमेरिकेत सेटल झाला होता. देव मॅडम पण तिकडेच गेल्या होत्या. त्या दोघाशी बोलून छान वाटलं होतं. वी कॉल केला होता कसला जाडजूड झाला होता. लहानपणी नुसता वाळका बाबू होता

मी आज जे काही आहे ते देव मॅडम मुळेच..... डायरीत एवढं लिहलं आणि ती थांबली. तिने डायरी बंद केली पांघरून घेऊन झोपायचा प्रयत्न केला. पण तिला झोप येत नव्हती. कारण तिला तीच सगळं लहानपण डोळ्या समोर दिसू लागलं

              *************
तिच्या गावची शाळा तशी टोलेजगं नव्हती तशी लहान पण नव्हती. त्यावेळेस कांचन धड लहान नव्हती आणि मोठीही नव्हती. नकळत्या वयाची उंच हडकुली तिला मैत्रिणी नव्हत्या. होते ते सगळे मुलच पाच जणाचा त्यांच टोळक होतं. तीच नाव पण मुला सारखंच होतं राजू, पप्पू, अभिजित, सच्या, कांचन कुठं ही सोबत असे, रविवारी तर दिवसभर धुडघूस घालत. तरी बरं शाळेत एकाच वर्गात नव्हते. कांचन सहावीला तर बाकीचे पाचवीला.

मधल्या सुट्टीत एकत्र डबा खायचे. धिगा मस्ती करायचे पकडा पकडी, लंगडी, खो खो  एवढेच काय तर कोणाची खोडी काढणे,कोणाचे केस ओढणे, एकमेकांत भांडण लावून देणे यात हे टोळक माहीर असायचं.

आजही पटकन डबा खाऊन कांचन मुलांना म्हणाली  " शाळेच्या मागच्या बाजूला बोरीच झाड आहे तिथले बोर खुप गोड आहे चला आपण जाऊ. "

" नको रे बाबा तिथं कुणी जात नाही." राजू म्हणाला

" कुणी जात नाही म्हणून तर आपण जायचं. " कांचन मोठया रुबाबात म्हणाली

" मी नाही येणार मला भूताची भीती वाटते."  अभि शाळेकडे जात म्हणाला

" भित्री भागुबाई, दिवसा कुठं भुत असतात का?आपल्याला थोडीच रात्री जायचं आहे. " कांचन मोठयाने हसू लागली.

नाही हो करत सगळे त्या पडक्या जागेत जायला निघाले..... दहा पंधरा मिनटात परत शाळेत जायचं होतं. त्या टोळक्यानी दगड मारून खुप बोर पाडली. सगळ्यांना समान वाटा मिळाला. प्रत्येकाने आपआपला बोराचा वाटा उचलला.

" मीच तुम्हाला इथं आणलं सगळयात जास्त मला बोर मिळायला हवी."  सगळ्यांना अडवत कांचन म्हणाली

" तु सांगितले पण आम्ही दगड मारलेत म्हणून तर बोर खाली पडली आम्ही नाही देणार. "अभि म्हणाला आणि तो शाळेच्या दिशेने धूम पळाला.

कांचन ने त्याच शर्ट ओढलं  " देतोस की नाही? " दरडावत ती म्हणाली.

अभि पळू लागला त्यामुळे तिला राग आला. तिने तिथंला दगड उचलला आणि त्याच्या दिशेने भिरकावला. नेमका तो दगड अभि च्या डोक्याला लागला आणि तो खाली पडला. रक्ताची धार लागली. सगळे पोर घाबरून गेली कांचन ही घाबरली ड्रेस मधले सगळे बोर टाकून त्याच्या डोक्याला धरून बसली.... " सच्या जा पळत सरांना बोलवून आण." कांचन काळजी च्या स्वरात म्हणाली.

आजू बाजूचे पोर पळत शाळेत गेले. पाटील सर पळत आले अभिला त्यांनी पटकन दवाखान्यात नेलं. रक्त बरंच गेलं होतं दगड तसा छोटा होता पण टोकदार असल्याने जखम खोल झाली होती. थोडक्यात डोळा बचावला होता.

सगळे पोरं भीतीने घाबरली होती. कारण अभि देव मॅडमचा मुलगा होता. आधीच सगळ्यांना पाटील सरांची भीती वाटतं असे. मोठया मिशा असलेले, अंगाने धिप्पाड असलेले सर जोरात ओरडले

" शाळेच्या पाठी मागे काय करत होता, कुणी दगड मारला समोर या. नाहीतर पाचही जणांना चाबकाने फोडून काढतो.

कांचन पुढे आली "सर....." पुढे तिला बोलताच आले नाही ती रडू लागली

" बास कर ते रडगाणं....शाळेत जो पर्यत तुझे आई वडील येणार नाही असंच बसून रहायचं. "

पोरांनी तिच्या आईला सगळी हकीकत सांगितली. तिच्या आईने तिला मारतच घरात नेलं. ती गुपचूप मार खात होती.

" घराच्या बाहेर पडायचं नाही, गेलीस तर तंगड मोडून ठेवीन. " निर्मला म्हणाली.

" आई मी कुठं जात नाही, फक्त अभिला बघून येऊ दे. " ती आईला विनवणी करत होती. तिच्या आईने तीच काहीच ऐकलं नाही. तिने बाहेरून दार लावल आणि ती बाहेर निघून गेली. खरं तर निर्मला मनातून घाबरली होती. सुरेश कामा निमित्त बाहेर गावी गेला होता. आणि पोरीनं हा कुटाणा केला.

           ..........................

" कांचे सगळं घर झाडून ठेव, नळाच पाणी भरून ठेव बाळ्या कड लक्ष दे मी चालले दुकानी. "

" हो "  असं म्हणुन ती खाली मान घालून काम करू लागली.....

तिची आई एका मोठ्या दुकानी पॅकिंगच काम करायची.

कांचनची छोटी बहीण शाळेत गेली होती तर लहान भाऊ पाळण्यात झोपला होता. कांचनने घरातल सगळं आवरलं. बाहेरच्या नळाच पाणी भरलं घरात तीच बिलकुल लक्ष लागत नव्हतं. एरवी घरी बस म्हंटल असत तर तिने ऐकलंही नसतं पण आजची चूक तिची होती. तिला रक्ताने भरलेला अभि सारखा समोर दिसत होता.

" देवा, माझी शाळा बंद झाली तरी चालेल. पण अभिला काही होऊ देऊ नको. " ती गणपतीच्या फोटो समोर हात जोडत म्हणाली.

आज तिची शाळा बंद होवून पंधरा दिवस झाले होते. तिची लहान बहीण शाळेत जायची.

" सोनू ,आज अभि आला होता का ग? " कांचनने काळजीच्या स्वरात म्हंटल.

" आला होता काय? बाहेर आलाय. "

" बाहेर.... " असं म्हणून ती पटकन बाहेर गेली.
अंगणात सच्या, राजू ,अभि, पप्पू  सगळीच चांडाळ चौकडी होती.

"अभि, तु का आला? आराम करायचा ना? "

त्याच्या डोक्याच्या पट्टी कडे बघत ती म्हणाली.

" मी एकदम ठणठणीत आहेत. मला काय झालं चार पाच दिवसात माझी जखम नीट झाली. आता बरं वाटतं. "

" म्हणे नीट झाली."  डोक्याला तर पट्टी आहे की.

" ती तर रहाणारच ना. "

" दुखलं कारे जास्त "

" थोडं."

" अग कांचे काय अवतार केला. पक्की काकूबाई दिसते. " राजू म्हणाला.

तिने पटकन आरशात पाहिलं.... " काय झालं? सगळं तर छान आहे."

सगळे तिला हसत होते. सगळं छान आहे म्हणुन तर तु ओळखु येत नाही. सगळं कस जागेवर आहे ना!" नाहीतर केसाला रबल नसतं. हातात बांगडी नसते. आज तु कांची नाही तर कांचन वाटते."

कांचन काहीच बोलली नाही. पोरांना पाणी दिलं आणि विचारलं  "चहा टाकू का?

पोरं फिदी फिदी हसत होते....

" चाय बी काय नको तु आपली शाळेत ये, घरी राहून मोठया बायावानी बोलते. " पप्पू म्हणाला.


" मी शाळेत नाही येणार? " नाराजीच्या स्वरात ती म्हनाली.

" का बरं? " अभि म्हणाला

" आई नको म्हणाली. "

थोडया वेळ गप्पा मारून पोरं निघून गेली.

कांचनला आज खुप छान वाटतं होतं. अभि बरा आहे म्हणुन. दगड लागल्यावर तो चक्कर येऊन पडला. होता त्यामुळे ती खुप घाबरली होती.

त्या दिवसा पासुन ती शाळेत जात नव्हती. पाटील सरांनी सुद्धा पोरा मार्फत खुप निरोप केले होते. कांचन खोडकर होती पण हुशारही होती. तिची आई मात्र तिला शाळेत पाठवायला तयार नव्हती.

रोज घरातल काम करून. अंगणात ती बसून राहत शाळेतले येणारे जाणारे पोरं बघत.

" निर्मला, पोरगी बघ कोमेजून गेली. उद्या पासुन पाठव तिला शाळेत. " निवृत्ती म्हणाला.

अहो, मला काय चागलं वाटत का? मला या मोठया लोकांची भीती वाटते. ते पोरग एकुलत एक आहे त्याला मारलं म्हणून आपल्या कांचीला पोलिसात देतील.

" निर्मले, पोरीनं मारलं काय म्हणते त्याला दगड लागलाय. पोरं जात हाय. खेळत खेळत लागायचं त्याच काय एवढं मनावर घ्यायच. पोलिसात जायचं असत तर ते मागेच गेले असते.... तुझं आपलं काही तरी."

" मला भ्यावं वाटत. बास झालं शिक्षण स्वयंपाक पाणी शिकवते तिला "

" कांचे उद्या पासुन शाळेत जा. " कांचनला आवाज देत निवृत्ती म्हणाला.


निर्मला तशी शिकली नव्हती. पण आपल्या पोरीनं शिकावं म्हणून परवडत नसताना कांचनला चांगल्या शाळेत घातलं होतं. पण तिच्या अंगातल्या खोड्या मुळे ती वैतागली होती. तिला कुणीतरी सांगितलं होतं अभि चे वडील पोलीस आहे. आपल्या पोरीला पकडून नेतील याची भीती तिला वाटतं होती. म्हणून तिने कांचनची शाळा बंद केली होती.

दुपारच जेवण करून निर्मला अंगणात बसली होती.

" कांचन येथेच रहाते का? " बुटकीशी गोरीपान बाई तिला विचारत होती.

" व्हय...."

" मी अभिजितची आई, कांचन घरात आहे का? "

अभिजितची आई म्हंटल्यावर निर्मला घाबरली.

" नाही ती नाही घरात. "  गडबडीने ती म्हणाली.

तेवढ्यात कांचन घरातून बाहेर आली.

" कांचन तु शाळेत का नाही जात." अभि ची आई म्हणाली

" मॅडम मी तुमच्या मुलाला मुद्दाम मारलं नाही. चुकून लागलं." खाली बघत कांचन म्हणाली.

मला माहिती आहे. तू आणि अभि मित्र आहात ना. सध्या तू शाळेत का येत नाही.

ती काही बोलली नाही फक्त आईकडे पाहिलं.

निर्मलाताई कडे बघत त्या म्हणाल्या  " तुम्ही कांचनला का नाही शाळेत पाठवत. "

"......... अ... अ..."

"अभिला दगड लागला म्हणूनच ती शाळेत जात नाही ना! अहो तिने त्याला मुद्दाम थोडीच मारलं होतं. चुकून लागलं  त्यात काय एवढं. लहान मुलं आहेत चालायचं."

" पण त्याला चक्कर आली होती ना. जास्त रक्त गेल्याने. म्हणून मी खुप घाबरले होते."

" तेच तर सांगायला आले मी त्याला दगड लागला म्हणून चक्कर आली नाही. त्याला  एएसडी चा प्रॉब्लेम आहे. थोडा रक्तस्राव झाला की चक्कर येते. "

"एएसडी सी म्हणजे काय?" कांचनने विचारलं

" त्याच्या हृदयाला एक छोटंसं छिद्र आहे. त्याच्या मुळे शुद्ध अशुद्ध रक्त एक होतं म्हणून तो अशक्त आहे.थोडं ही लागलं की त्याला चक्कर येते. "

" माहित नव्हत, आम्हाला! म्हणून तो वाळका बाबू आहे.... तिने अचानक जीभ चावली. "

" हो ना... त्याच ऑपरेशन असत पण ते आताच करायला नाही जमत. काही दिवसांनी करावं लागणार आहे. "

" तुम्ही पोलिस केस तर करणार नाही ना! त्याचे बाबा पोलिस आहे...... म्हणून "

"नाही वो.... त्याला लागलं हे आम्ही विसरून गेलो. तुम्हाला कोण म्हणलं केस करणार ते? कोणी काही म्हणत मनावर घेऊ नका. शाळेत कांचन नाही तर पोरांना करमत नाही.तिला शाळेत पाठवा." देव मॅडम म्हणाल्या.


त्याच्या बोलण्याने निर्मलाच टेन्शन गेलं.

" सगळेच तुमच्या सारखे मोठया मनाचे नसतात. माझ्या पोरीला माफ केलं खुप उपकार झाले " त्या हाथ जोडत म्हणाल्या. "

हाथ नका जोडू,  मला जसा माझा अभि तशीच कांचन.... लेकराच्या खोड्या मी नाही मनावर घेत. "
                 **********
कांचन, शाळेत आली किती तरी दिवसांनी. चार ही जणांना खुप आनंद झाला होता.
पण ही आलेली कांचन खुप बदलेली होती. त्या दिवसा पासुन तिच्या सगळ्या खोड्या बंद झाल्या होत्या. सगळा अभ्यास मना पासुन करायची. यावेळेस देव मॅडम त्याच्या क्लास टीचर होत्या. सगळ्यांशी त्या खुप छान वागत. प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत. कांचनला अभ्यासाची गोडी लावण्याच श्रेय देव मॅडमलाच जात. आयुष्यात स्वतःची ओळख स्वतःच बनवावी लागते. काही तरी ध्येय असल्याशिवाय जगण्याला काही अर्थ नाही त्या नेहमी सांगत. अभि तिचा मित्र असल्यामुळे देव मॅडमच्या घरी नेहमीच जाण होत असे.


त्यावर कांचन म्हणे, मॅडम मी डॉक्टर होणार आणि अभिला बरं करणार. (त्याला ह्रदयाला छिद्र होतं म्हणून )


अभि हसत म्हणायचा " मोठे पणी मी वकील बनणार आणि तुझ्या वर केस करणार."
           
                    **********

डायरी लिहीत असणाऱ्या कांचनला हे सगळं आठवलं.... ती पुढे लिहू लागली.... त्या छोटयाश्या   खोडीन माझं आयुष्य बदल ही शुल्लक घटना माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली. त्या दिवसा पासुन मी खुप मोठी झाले होते. पोरकटपणाची जागा पोक्त पणाने घेतली होती. देव मॅडम घरी आल्या नसत्या तर आज ही डॉ. कांचन कुठं तरी धुणे भांडे करत असती. देव मॅडम तुमचे उपकार मी आयुष्यात विसरणार नाही.....लिहिताना तिच्या डोळ्यात अश्रू तरारले. एवढं लिहून तिने डायरी ठेवून दिली.

© वर्षा लाड