Login

तुमच्यामुळेच सक्षम झाले...

सक्षम स्त्री

नितीन आणि नेहा एक आनंदी जोडी... त्यांची दोन मुले आणि सासूबाई अगदी हसते-खेळते कुटुंब... घरचा बिझनेस खूप छान वाढवला होता... सुरेशराव गेल्यावर त्या दोघांनी सुधाताईंना कधी एकटे पाडले नव्हते... नेहा सुद्धा अगदी आईप्रमाणे त्यांचे सर्व करायची...आणि त्या सुद्धा नेहाला लेकीप्रमाणे मानत होत्या... अगदी माय-लेकीच वाटायच्या....

सर्व काही चांगले असताना दॄष्ट लागावी असेच झाले... नेहा आणि नितीनच्या गाडीला अपघात झाला आणि नितीनचा स्मृतीभ्रंश झाला.... त्याला काहीच आठवत नव्हते... नेहाला पण बरेच लागले होते... अशा वेळेस सक्षम झाल्या त्या सुधाताई... ह्या उतरत्या वयात देखील त्या आपल्या नातवंडासांठी खंबीरपणे उभ्या राहील्या... त्यांनी सर्वांना सक्त ताकीद दिली की, नेहाला ह्या नितीनच्या परिस्थिती बाबत कॊणी काही सांगायचं नाही...

नेहा हळू हळू बरी झाली... चालू लागली.. तसे सुधाताईंनी स्वतःहून तिला सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली... आणि तिच्या मनाची पूर्ण तयारी करून घेतली... सुरवातीला तिला हा धक्का पचवताना कोलमडून पडायला होत होते.. परंतु सुधाताईंचा खंबीरपणा बघून तिने स्वतःला सावरले...

हळू हळू नेहा ऑफिसला जाऊ लागली... नितीन मध्ये पण सुधारणा होत होती पण त्यासाठी काळ हेच औषध आहे असे डॉक्टरांचे म्हणणे होते.... वर्षामागून दोन वर्षे गेली... ह्या मधल्या काळात नेहाने खूप मोठी प्रगती केली होती... आणि म्हणूनच तिचा सत्कार करण्यात येणार होता...

सुधाताई आणि नेहा आज छान तयार होऊन ह्या कार्यक्रमासाठी निघाल्या पण मन मात्र नितीनच्या तब्बेतीमुळे तयार होत नव्हते... शेवटी हो नाही करत मुलांनीच आई आणि आजीला पाठवले... आणि बाबांची पूर्ण जबाबदारी घेतली... ह्या विचारात असताना गाडी कार्यक्रम होता त्या ठिकाणी आली... ड्राइवरच्या आवाजाने ती भानावर आली...

खूप छान सजावट होती, कार्यक्रमाचा हॉल हा अगदी खचाखच भरला होता... सगळ्या बाजूने नेहावर कौतुकाचा वर्षाव होत होता... सुधाताईंचा ऊर अभिमानाने भरून आला होता...

"द सक्सेसफूल बिझनेस वुमन" हा या वर्षीचा पुरस्कार घेण्यासाठी नेहाला सन्मानाने स्टेजवर बोलावण्यात आले...तो घेतल्यावर, नेहा भाषण देताना बोलत होती... हा बिझनेस खरतर माझे मिस्टर बघतात, पण अचानक झालेल्या अपघातात त्यांची स्मरणशक्ती कमी झाली आणि मी यात लक्ष घातले.

पण माझ्या सासूबाईंच्या पाठींब्याशिवाय हे कधीच शक्य नव्हते, कितीही कठीण परिस्थिती आली तरी, सक्षम होऊन खंबीरपणे कसा सामना करायचा हे त्यांनीच मला शिकवलं.

आमच्या लग्नाला अवघे १५ दिवस असताना माझे सासरे अॅटॅक येऊन गेले, दुसऱ्या कोणीही मला पांढर्यापायाची ठरवून हे लग्न मोडले असते, पण त्यांनी सर्वांना सांगितलं ठरल्यादिवशी ठरल्यावेळी लग्न धूमधडाक्यात होणार...कारण नितीनच्या बाबांची शेवटची इच्छा म्हणून मी सक्षम आहे हे लग्न लावुन द्यायला.

आई,खरच मी तुमच्याकडूनच शिकले आणि सक्षम झाले. माझ्या या पुरस्कारावर तुमचा हक्क आहे आई....
प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुधाताईंचे डोळे भरून आले......

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all