तुमची सून काय करते

Tumchi Sun Kay Krte


शिल्पा कुठे असते सध्या" ,मीना आत्या वहिनीला विचारत होत्या..

"आहो आत्याबाई तुम्ही आत्ताच आलात ना माहेरी,मग जरा आराम करा का इतकी घाई तुम्हाला, आहात ना अजून काही दिवस आमच्याकडे माहीत होईल की हळूहळू तुमची भाचे सून काय करते ते, कशी आहे ते..." सुमन ताई यांनी आत्याचा प्रश्नाला हसून उत्तर दिले..

आत्याने लगेच तोंड मुरडून त्यांचा हात झटकला..आणि लगोलग भावाच्या बाजूला जाऊन बसल्या...

"मी आपलं सहज विचारले तर बाई वहिनी तुला किती राग आला ग, शिल्पा सूनच आहे ,लेक नाही हो..इतकी बाजू घ्यायची काही एक गरज नाही..इतके लाड बरे नाही वेळीच समजून घे जग रीत..." आत्या खोचक बोलून गेली

"आहो आत्या तुम्ही नका मनाला लावून घेऊ मी आपली तुम्हाला राग यावा म्हणून नाही बोलले, तुम्ही अजून दोन तीन दिवस आहातच तर शिल्पा सोबत गप्पा मारा, तिच्या हातचे जेवण करा बघा तुम्हाला पडलेले प्रश्नांची उत्तरे ती नक्कीच सांगेन, तिला बोलायला खूप आवडते, तशी ती मन कवडी आहे खूप " सुमन वहिनी आत्याला शांत करण्यासाठी बोलून गेल्या..

आत्या तरी इकडे तिकडे डोकावत होत्या आणि त्यांची नजर शिल्पाला शोधत होती...

"शिल्पा कुठे दिसत नाही ,कुठे गेली...नौकरी करते ना ती की घरीच रिकाम टेकडी कामे करत असते, माझी कल्पना तर जॉब करते आणि चांगला गलेलठ्ठ पगार आणते..घरातली कामे तर ती नकोच म्हणते...ती भली आणि तिची नौकरी भली...हे असे घरी बसून दिवस ढकलत नाही, त्यात सासू सासऱ्यांच्या जीवावर आयते खाणे तिला मुळीच आवडत नाही.." आत्याने परत एकदा नको ते बोलणे सुरू केले..

सुमन वहिनी पुन्हा त्यांना काही ऐकवणार इतक्यात सुधीर भाऊ यांनी तिला चहा ठेवायला सांगितला..आणि त्या फण फण करत आत निघून गेल्या...दरवेळी ही आत्या आली की काही ना काही बोलून वाईट होऊन जातातच तर येतात कशाला असे मनात पुटपुटत होत्या.

तितक्यात सुधीर भाऊ एकदम आत्याला म्हणाले, "शांत रहा,उगाच जास्त बोलू नकोस, आली आहेस माहेरी तर गोड बोल आणि नसत्या चौकश्या करू नकोस.."

"बर बाबा तू ही आपल्या बायकोच्या रंगात रंगलास चांगला ,ती तर बाजू घेत आहेच त्या रिकाम टेकड्या सुनेची तू ही घे बाजू तुझ्या लाडवलेली बायकोची, कधी समजणार की घरात आयते खाणारी सून असल्या पेक्षा कमवणारी सून कधी ही बेहत्तर असते ते, हातभार लागतो घराला, घरपण काय तसे ही येतेच कामवालीच्या असण्याने, कशाला स्वयंपाक करून मन जिंकायची त्यापेक्षा चार पैसे कमवा म्हणावं..." आत्याला खूप राग होता शिल्पा बद्दल असे जाणवत होते...एकंदर घरी बसणाऱ्या सुनांबद्दल..

सुधीर भाऊ आत जातात आणि सुमन ताईला समजावून सांगतात, "जाऊदे आक्का जरा तुसड आहे, बोलणे ही योग्य वाटले नाही मला ही, आणि शिल्पा बद्दल कोणी बोलणे ते ही माझ्या बहिणीने तर अजिबात खपवून घेणार नाही, पण जाऊदे मी सांगितले तिला पुन्हा नाही बोलणार ती "

पुन्हा आत्या कोणाला तरी फोन वर बोलल्या,ते ही शिल्पा बद्दल होते आणि इकडे सुमन ताई आणि सुधीर ही ऐकत होते, आत्या म्हणत होत्या, "अग उगाच त्या रिकाम टेकडया सुनेचे फाजील कौतुक आहे, काय तर स्वयंपाक खाऊन पहा, फक्त आयते हवे असते कमावणे तर माहीत नाही, घराबाहेर चे जग माहीत नाही, कमी शिकलेली असणार म्हणूनच घर कामात दिवस ढकलत असणार ही दादाची सून.."

इतक्यात सुमन ताई तडक बाहेर आल्या,आणि आत्याला बोलू लागल्या," आत्या मी तुमचा मान राखण्याचा प्रयत्न करते केव्हापासून, तर तुम्ही हद्दच केली, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे , तुम्ही का उगाच माझ्या सुनेचा इतका तिरस्कार करत आहात, तुम्ही भेटलात का तिला ,तुम्ही पाहिलेत का तिला, मग का उगाच तिच्याबद्दल इतरांना नको त्या गोष्टी सांगत सुटलात, हो माझी सून रिकाम टेकडी आहे मान्य आहे, पण ती घर सांभाळते, घराला घरपण देते, उत्तम स्वयंपाक करून सगळ्यांना खाऊ घालणे तिची आवड आहे, आणि ते तिने स्वीकारले आहे, कारण तिने आधीच ठरवले होते की तिला जे बालपण मिळाले ते तिच्या मुलीला मिळू नये, तिचा पूर्ण वेळ तिच्या मुलीसाठीच द्यायचा आहे जो तिला तिच्या आई कडून हवा होता पण तो तिला मिळाला नाही...तीने ही चाईल्ड सायकॉलॉजी मध्ये मास्टर केले आहे,आणि तीने ही कधी काळी नौकरी केली आहे, ज्यात तिला महिन्याला 2 लाख पगार मिळत होता पण तिला सुख नव्हते, म्हणून ती आता घरीच लक्ष देते, तिने मुलीला सांभाळायला आया नाही ठेवली जे तुमच्या सुनेने ठेवली आहे हो , आता बास तुम्हाला समजायचे ते समजा, पण मी माझ्या सुनेचा ह्या निर्णयात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.."

आत्या सुमन कडे बघतच होत्या, खऱ्या अर्थाने त्यांना अद्दल घडवायची होती असे ही नव्हते पण एकदा कोणी त्याची हद्द विसरत असेल तर ती हद्द दाखवणे खूप गरजेचं होऊन जाते..हो ना
©®अनुराधा आंधळे पालवे