तुमचा नंबर...शंभरावा.

एक रहस्य कथा


तुमचा नंबर… शंभरावा .


नेहमी सारखी कावेरी आठवडी बाजारात गेली. बाजारात जातांना पायी जायचं आणि येताना रिक्षा करायचा हे तिचं ठरलेलं होतं. कारण येताना पिशव्यांचं ओझं पकडायचं तिला जीवावर यायचे. आजही भाजी घेतल्यावर ती थोडं अंतर चालून गेली पण तिला रिक्षा नाही मिळाला.तिनं विचार केला इथेच जरा थांबावं.रिक्षाची वाट बघावी.


तसे फार वाजले नव्हते साडेसातच झाले होते.कावेरी ऊभ्या उभ्या कोणत्यातरी विचारात दंग होती. एवढ्यात तिच्या अंगावर थंडगार वा-याची झुळूक आली आणि आपोआपच तिच्या तोंडून \"काय छान थंड वाटतय\"असे उद्गार निघाले.

तेवढ्यात तिच्या कानावर शब्द आले,


"बाई कुठे जायचंय?"

कावेरीनी समोर बघीतलं तर एक रिक्षेवाला होता. मनातून ती रिक्षा बघून आनंदली. तिने कुठे जायचं सांगीतलं आणि किती पैसे घेणार हे विचारलं पण रिक्षेवाल्याचा चेहरा कवेरीला दिसला नाही. चेहरा नाही दिसला तर काय बिघडत रिक्षा मिळाला हे महत्त्वाचं असं कावेरीच्या मनात आल.

कावेरीने पुन्हा विचारलं," पैसे किती घेणार सांगा?"

तशी तो रिक्षेवाला म्हणाला,

"पैशाचं काय ते नंतर बघू" रीक्षेवला

"अहो असं कसं? आधीच ठरवायला नको का?नंतर खूप पैसे सांगाल. मला माहिती आहे बाकीचे रिक्षेवाले कसे एकेक रुपयासाठी भांडतात" कावेरी

"मी त्या रिक्षेवाल्यांमधला नाही. तुम्ही काय ठरवणार सगळं आधीच ठरलेलं असतं.बसा रिक्षात" त्याच्या आवाजात एक जरब होती.


" पैसे सांगा किती घेणार? तुम्ही रिक्षेवाले नंतर पैशासाठी भांडता." कावेरी जरा वरच्या पट्टीतच पुन्हा तेच वाक्य बोलली.

" बाई बसा रिक्षात. मला उशीर होतो आहे." रिक्षेवला थंड पण जरबेच्या स्वरात म्हणाला.

"तुम्ही पैसे सांगा तरच तुमच्या रिक्षात बसीन. तुम्हाला उशीर होत असेल तर जा तुम्ही. मी दुसरा रिक्षा बघीन.

" मी एकदा सवारी घेतली की सोडत नाही.बसा."

" अरे..! ही कसली जबरदस्ती? "

" गप गुमान बसा." रिक्षेवाला आवाज चढवून बोलला.

कावेरी तिच्याही नकळत रिक्षात बसली.त्याचा वेशही तिला थोडा खटकला. तिनं रिक्षात बसल्यावर विचारलही,

"अहो एवढी गर्मी होतेय आणि तुम्ही स्वेटर माकड टोपी कसली घातली?"

तिच्या प्रश्नाला त्याने उत्तर न देता तो रिक्षा चालवत राहिला. तिनेही नाद सोडला. अचानक कावेरीला खूप थंडी वाजायला लागली. तिने आपल्या साडीचा पदर अंगाशी घट्ट गुंडाळून घेतला तरी तिची हुडहुडी थांबेना. बाहेर लक्ष जाताच ती चमकली.

त्या रिक्षेवल्याच्या पायाकडे कावेरीच लक्ष गेलं आणि ती खूप घाबरली…ती आणखी भर भर रामरक्षा म्हणायला लागली.

"तोंडाने काय पुटपुटण चालू आहे? बंद करा."

रिक्षेवल्याने असं म्हणताच कावेरी आणखी घाबरली.तिच्या मनात आलं कुठून या रिक्षात आपण बसलो.

" आज तुम्हाला याच रिक्षात बसायचं होतं "

याला कसं कळलं मी मनात काय बोलले. कावेरी अजून घाबरली. तिचे तळहात चांगलेच घामेजले.
याची रिक्षासुद्धा किती जुनी आहे, विचित्र चलतेय.

रिक्षेवाला म्हणाला,

"माझी रीक्षा अशीच चालते"

रिक्षेवल्याच बोलणं ऐकून कावेरी चमकली. मागे वळून न बघताही याला कसं कळलं की आपण कशाला घाबरलो ते! या रीक्षेवल्याचा आवाज इतका खोल का येतो आहे? अगदी दुस-या ग्रहावरून आल्यासारखा वाटतोय.ती घाबरली म्हणाली ,

"थांबवा रिक्षा.मी उतरते "

"नाही ही रिक्षा आता थांबणार नाही तुम्हाला तुमच्या घराजवळ सोडूनच थांबेल."

"रिक्षा पुढे जातच नाही. माझं घर येणार कधी? मघापासून हीच घरं आणि झाडं दिसताहेत.कोण आहात तुम्ही?" एवढं बोलुन कवेरीच बाहेर लक्ष गेलं

रिक्षा तर चालतेय पण आजूबाजूची घरं झाडं तीच होती. नवी घरं दिसली नाहीत. कावेरीचं रस्त्याकडे लक्ष गेलं, ती जरा बाहेर डोकिवली तर तिला रिक्षा रस्त्याच्या वरून अधांतरी चाललेली दिसली.आता तर तिला दरदरून घाम फुटला.

"जास्त प्रश्न विचारू नका. तुम्हाल रिक्षा चालत नाही असं वाटतंय बाहेर बघा." रिक्षेवाला.

तिने बाहेर बघीतले तर मघाची घर झाडं भरभर मागे गेली आणि तिचं घर जवळ आलं.तिला रिक्षातून उडी माराविशी वाटली. तेवढ्यात तो रिक्षेवाला बोलला.

"रिक्षातून उडी मारू नका. मी अशीच उडी मारली होती आणि..."

"आणि काय?" कावेरीचा आवाज रडकुंडीला आल्यासारखा झाला

तिने घाबरून विचारलं तो काहीच बोलला नाही. तिने भीतीने गच्च डोळे मिटून घेतले आणि देवाचा जप करू लागली थोड्या वेळानी तिच्या लक्षात आलं आपल्याला थंडी वाजणं कमी झालं.

तिने डोळे कीलकीले करून बघीतल तो अजूनही समोर बघूनच रिक्षा चालवत होता.याचा चेहरा एकदा तरी दिसायल हवा हे कावेरी मनात म्हणतेय आहे तोच त्याचा आवाज आला

" माझा चेहरा बघण्याचा विचारही मनात आणू नका." रिक्षेवाला

\"\" का…?" घाबरत कावेरीने विचारलं.

" तुम्ही माझा चेहेरा बघू शकणार नाही."

" विद्रूप आहे का?" कावेरी

यावर तो गूढ हसला.तो हसला असं कावेरीला वाटलं पण त्याच्या हसण्याचा आवाज आला नाही.

याचा हसण्याचा आवाज का आला नाही. हा कावेरीला प्रश्न पडला.

"असे वेडेविद्रे प्रश्न मनात आणू नका.मी हसलो तरी हसण्याचा आवाज येत नाही." रिक्षेवाला

"तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळतं?" कावेरीने घाबरतच त्याला विचारलं. पुन्हा तो गूढ हसला आताही त्याच्या हसण्याचा आवाज आला नाही पण तो हसला असं कावेरीला जाणवलं.

"तुम्ही खरंच रिक्षेवाले आहे का की नाही?"

" मी कुणीच नाही."

" म्हणजे…तुम्ही…?" कावेरी बेशुद्धच व्हायची बाकी होती.

" घाबरु नका. तुम्हाला मी काही करणार नाही."

" कशावरून?"

" मी दर आठवड्याला बाजारातून भाजी घेऊन जाणाऱ्या म्हाताऱ्या लोकांना रिक्षेने त्यांच्या घरी पोचवतो."

" का…?"

"शंभर लोकांना मी सुखरूप त्यांच्या घरी पोचवले की मला मुक्ती मिळणार आहे."

" मुक्ती? म्हणजे काय केलं होतं तुम्ही?"

"एका म्हाताऱ्या आजींना रीक्षात बसवलं. त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नाही म्हणाल्या.माझी खूप गयावया केली त्यांनी पण मी ऐकलं नाही. त्यांना जड पिशव्या घेऊन अर्ध्या रस्त्यात उतरवून पुढे गेलो. मी जसा पुढे गेलो तसच हातातील जड पिशव्या सांभाळता न आल्याने त्या एका ट्रकसमोर आल्या आणि जागेवरच गेल्या. आवाज आला म्हणून मी रिक्षातून खाली उतरून मागे वळून बघीतल आणि मीही ट्रक खाली येऊन मेलो.

वरती मी जाऊच शकलो नाही. भुतयोनीतच अडकलो आहे. मी जेव्हा शंभर म्हाताऱ्या लोकांना भाजी घेऊन जाताना त्यांच्या घरी सुखरूप पोचवीन तेव्हा माझी भूत योनीतून सुटका होईल.

तुमचा नंबर शंभरावा. तुम्हाला सोडल की मी मुक्त होणार."

हे सगळं ऐकताना कावेरीची बोबडीच वळली.तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले.


ती अजूनच घाबरली आणि रामरक्षा जोरजोरात म्हणायला लागली. त्याच वेळी तिच्या दंडाला कोणीतरी धरून हलवलं. ती घाबरून किंचाळली आणि रडायला लागली.तेवढ्यात तिच्या कानावर शब्द पडले.

"आई...अगं काय झालं? अशी का किंचाळतेय? रडतेय? जोरजोरात रामरक्षा काय म्हणतेय?" मीरा

"मला सोडा हो मी काहीच केलं नाही. मी नुसतीच बसून राहीन. पण मला तुमची भीती वाटतेय." कावेरीच सगळं आंग थरथर कापत होतं.

यावेळी तिला तिच्या मुलीने मिराने जोरात हलवलं तशी कावेरीने डोळे ऊघडले तर समोर तिची मुलगी मीरा उभी होती.

"तू तू कशी इथे?"कावेरीचा आवाज अजून भेदरलेला होता.


"कशी म्हणजे मागे बघ हे आपलंच घर आहे नं?"मीरा

कावेरीनी मागे वळून बघीतली तर खरच तिचच घर होतं मग ती रिक्षा तो रिक्षेवाला कुठे गेले? बाजुलाच तिची भाजीची पिशवी होती.कावेरीच्या अंगाला सुटलेली थरथर अजून थांबली नव्हती.


मागच्याच महिन्यात शेजारच्या चिणे काकूंनी त्यांच्या नातलगांना आलेला अनुभव आपल्याला सांगीतला होता हे तिला आठवलं. तिने त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं पण आज आपल्यालाच हा अनुभव आला. काकूंच ऐकलं असतं तर…

तेवढ्यात चिणे काकू तिथे आल्या. कावेरीला असं थरथर कापताना बघून आणि जवळच भाजीच्या पिशव्या बघून म्हणाल्या

" काय तू थरथर कापते आहे म्हणजे तुलापण आला वाटत त्या रिक्षेवल्याचा अनुभव" चिणे काकू अर्ध्या कुचक्या आणि अर्ध्या कावेरीला वेड्यात काढण्याच्या सूरात म्हणाल्या.

" काकू प्लीज आता काही बोलू नका आईची मनस्थिती ठीक नाही. आई चल घरात" मीरा

"अग मीरा काकू मला मागेच म्हणाल्या तुम्ही आजकालच्या मुली या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही.पण हे घडतं. त्यांचही एक जग असतं. भला माणूस होता बहुदा म्हणूनच दर अमावस्येला म्हाता-यांना बाजारापासून घरापर्यंत सोडतो."

हे सांगताना कावेरीला पुन्हा थरथर सुटली.आणि तिचं डोकं खूप दुखायला लागलं.

"आई शांत हो. घरात चल."

"अं..."कावेरीनं दचकून मुलीकडे बघीतली. ती म्हणाली

"चल आत".मीरा

मीरा कावेरीला असं पकडून का आणतेय हे कावेरीच्या नव-याला जयंतला कळलं नाही, त्यानं विचारलं,

"कायग काय झालं?" जयंतने विचारलं.


"काही नाही बाबा दमलीय ती" मीरा म्हणाली

कावेरी खरच थकली होती. तिला मुलीने सावकाश सोफ्यावर बसवलं.पाणी दिलं आणि म्हणाली

"आई हे एक वाईट स्वप्नं होतं समजून विसरून जा.शांत झोप. झोप झाली की तुला बरं वाटेल."कावेरीत उत्तर द्यायचं त्राण नव्हतं.नवरा गोंधळून दोघींकडे फक्त बघत होता.


-------------------------------------------------
लेखिका… मीनाक्षी वैद्य