तुमचं काय जातं...?

This story based on the girl with her black skin tone

            नुकतीच  बारावी पास होऊन ग्रॅज्युएशनचा अभ्यास करणारी  रावी जरा झपाझप पाऊले टाकत फाटक उघडून तिच्या बंगलेवजा घरात आली. घरापुढील अंगणात अडकवलेल्या झुल्यावर बसून तिची आई आणि शेजारच्या जोशी काकू गप्पा मारत होत्या आणि सोबतीला चहाचा आस्वाद घेत होत्या..रावीने नेहमीप्रमाणे सोबत नेलेल्या बाटलीतले उरलेले थोडेसे पाणी छोट्या छोट्या रोपांना टाकले आणि आईने लावलेल्या फुलझाडं न्याहाळून रावी तिच्या घरात जात होती . ती आपल्याच धुंदीत "आवारा भॅवरे जब हौले हौले गाए...." हे गाणं गुणगुणत घरात येत होती.  क्लासहून परत आलेली रावी जोशी काकूंना दिसताच त्यांनी तिला हटकले आणि विचारले, "बाई बाई गं!! रावी अशी काय आहेस गं तू? चेहर्‍यावर बघ एक पिंपल आला आहे. आणि त्यात भर तुझ्या सावळ्या रंगाची!! बाजूलाच ब्युटी पार्लर आहे. दोन पावलं चाललीस की दिसेल. फेशियल तरी करायचंस ना? तू मुलगी आहेस ना.....? तुझा सख्खा मोठा  भाऊ बघ कसा गोरागोमटा आहे आणि तू...! " रावी एक कटाक्ष काकूंकडे टाकते आणि आईकडे बघते.   रावीचा कंटाळवाणा चेहरा बघून तिची आई जोशी काकूंना बोलली, "अहो जोशी वहिनी तिला नाही आवड नटण्याची! ती तिच्या अभ्यासात, चित्रकलेत  आणि पाककलेत थोडीफार  रमते. आणि रंग म्हणाल तर ती तिच्या बाबांची कार्बन काॅपी. जा बाळ जाऊन फ्रेश हो आणि थोडेसे खाऊन मगच अभ्यासाला बस." आणि रावी घरात जाते.  

      आईच्या सुचनेवरून रावी आईने बनवलेला नाष्टा  खोलीत अभ्यास करत बसते. काॅमर्सच्या  पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्रात ती पूर्ण काॅलेजमध्ये दुसरी आली होती त्यामुळे आत्ता आणखी गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावण्याची जिद्द तिने बाळगली होती. रंगाने सावळी असली तरी मृगनयनी डोळे लाभले होते तिला... सोबतीला चित्र रंगणवणारी ती कलाकारासारखी लांबसडक बोटं... आई बाबांनी वारंवार सांगूनही तिने चित्रकार न होता काॅमर्सचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या सालस आणि शांत स्वभावामुळे ती सोसायटीत सगळ्यांची लाडकी होती. तिच्या आई वडिलांनी तिच्या मोठ्या भावात आणि तिच्यात कधीच भेदभाव केला नाही. त्याउलट घरातलं शेंडेफळ म्हणून तीच जास्त लाडकी होती. आई आणि काकू जवळपास पंधरा वीस मिनिटे  गप्पा मारत होत्या अंगणाच्या बाजूलाच रावीच्या खोलीची खिडकी असल्याने त्यांच्या गप्पा तिला ओझरत्या ऐकू येत होत्या; पण त्याकडे दुर्लक्ष करत ती नेटाने अभ्यास करत होती. मध्येच जोशीकाकू बोलल्या, "अहो रावीची आई तुमची रावी मुलींसारखी वागत नाही ओ! नुसती अभ्यास करत असते. ना मेकअप,  ना पार्लर, ना छान कपडे बघावं तेव्हा टिशर्ट आणि जिन्स घालून असते. एकदा डाॅक्टरांना दाखवून बघा. काही भानगड तर नाही ना? " हे ऐकून रावीच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती काही बोलणार इतक्यात रावी आईला अडवत त्यांना बोलली, "जोशीकाकू तुम्ही तोंड सांभाळून बोला. काय बोलताय याचं काय तारतम्य आहे का तुम्हाला?  तुम्हाला काय वाटते तुम्ही जे काही बोलत आहात ते. मुलगी आहे ह्या गोष्टीची एकचं sign आहे का? कि तिने नटावं, मुरडावं ? कर्तृत्व नावाची गोष्ट माहित आहे का तुम्हाला?  आणि असे शब्द वापरताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली.... ! इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला येता ना तुम्ही. मग भलताच विषय कसा काढता तुम्ही माझ्याविषयी तेही माझ्या घरात येऊन? मी नाही दिसत सुंदर तर तो माझा आणि माझ्या आई बाबांचा प्रश्न आहे.  चालत्या व्हा इथून. पुन्हा कधीच येऊ नका." नेहमी अबोल राहणाऱ्या रावीचा असा पावित्रा बघून त्या हादरल्या आणि त्यांच्या घराकडे वळाल्या. शेजारच्या बायका कुतुहलाने तिच्या घराच्या फाटकापाशी येऊन तिचे बोलणे ऐकत होत्या. रावीसारखी शांत आणि सालस मुलगी पहिल्यांदा चढ्या आवाजात बोलते हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते.  जोशीकाकू  रावीच्या घराचे फाटक उघडून बाहेर गेल्या तेव्हा  मध्येच त्यांना अडवत रावी म्हणाली, " सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी मुलगी तुमच्यासारखा नट्टापट्टा करत नाही तिला तुच्छ लेखणं बंद करा आणि सोसायटीत जाऊन माझ्याविषयी भलतंसलतं बोललात तर गाठ माझ्याशी आहे...!!! आणि सारखं येता जाता तू खरंच मुलगी आहेस ना..? हे विचारणं बंद करा.... आणि नाही दिसत मी सुंदर... मग तुमचं काय जात..?" इतकं बोलून रावी तिच्या घरात येते तेव्हा तिचे आई  बाबा तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवतात आणि बोलतात, "We are proud of you Baby and you are the most beautiful girl in the world." 

©™ऋचा निलिमा