Login

तुम देना साथ मेरा-भाग 2

दीर्घकथा
तुम देना साथ मेरा-- भाग 2


खिडकीतून येणाऱ्या गार मंद हवेने राज सुखावला होता.

शहरी वस्ती मागे पडून बस छोट्या छोट्या गावांतून जात होती.

हुल्लड करणारी पोरं, बसच्या मागे उगाच धावत येणारी, स्वतः च्या मस्तीत जगणारी लक्ष वेधून घेत होती.

राजच्या चेहऱ्यावर त्याच्याही नकळत स्मितहास्य फुलले होते.

"गाडी या स्टॉपवर 10 मिनिटे थांबणार आहे," कंडक्टर बेल वाजवीत म्हणाला.

"10 मिनिटे? कशासाठी साहेब उशीर?," कुणीतरी विचारले.

"अहो दादा, आज बिफोर टाईम पोचली गाडी.
या गावातले लोकं रोज जातात समोर कामाला.
त्यांची गाडी चुकलं नं, थांबलो नाहीतर.
चला तुम्ही पण उतरून घ्या पण 10 मिनिटात वापस या, गाडी कुणासाठी थांबणार नाही," इति कंडक्टर.

राज खाली उतरला.
छोट्याश्या गावाचा स्टॉप होता.
एक रस्ता गावाकडे जात होता, तिथे चहाची टपरी होती.

चहाचा कप घेऊन तो थोडं समोर जात एका झाडाखालच्या मोठ्या शिळेवर बसला.
तो आजूबाजूचे निरीक्षण करू लागला.
पोरांची शाळेत जायची गडबड, त्यासाठी गाडीची वाट बघत थांबणे.
बोरं, चिंचा विकायला बसलेल्या दोन आजीबाई, पोरांच्या घोळक्यात रमलेल्या.
सामान आपल्या बाईकवर लादून शहरात विकायला निघालेले छोटे व्यापारी, शेतमाल घेऊन जाणारे शेतकरी, रस्त्याच्या कडेने भाजीचा ठेला लावत असणारा भाजीवाला.
एखादी गाडी थांबली की कुणीतरी भाजी घेऊन बोहनी होईल याची वाट बघणारा.

राजला मस्त वाटत होते.
वेगळे दैनंदिन जीवन तो बघत होता.
चहाचा टपरीवाला येणाऱ्या प्रत्येकाशी मनमोकळं बोलत होता. काहीतरी जोक सांगून हसवत होता.
राजने सॅकमधून स्केचबुक काढले आणि तो आजूबाजूचे त्याचे निरीक्षण चितारु लागला.
तो अगदी गुंग होऊन गेला होता.
गावातून तालुक्याकडे जाणारा एक लोंढा आला आणि बसमध्ये चढला.
बस आता खचाखच भरून गेली होती.

कंडक्टरने सगळ्यांना हाळी दिली, "चला लवकर, बस निघणार आहे, सगळे प्रवासी चढून घ्या."

उतरलेले प्रवासी चढले.
कंडक्टरने बेल वाजवली आणि जोरदार हॉर्न देत बस धुरळा उडवत पुढे निघाली.

अरे पण राज कुठे होता? तो आपल्या स्केचबुक मध्ये मग्न होता.

फराटेदार चित्र काढण्यात गुंग होता.
इतका मग्न की बस निघून गेलेली त्याला कळलेदेखील नाही.

"अरे ओ पाव्हनं, गावात जायचं का ? कुणाकडचे पाव्हने म्हणायचं तुमी?," टपरीवाला निघाला होता आणि राज त्याला दिसला होता.

भानावर येत राज ओरडलाच, " अरे, बस कुठे गेली? मला समोर जायचे होते दादा, गावात नाही."

"बस तं 10 मिनिटे आधीच निघाली.कुटं जायाचं तुमाले?"

"शिरपूर....," इति राज.

"इचिबेन, शिरपूर? आता तं रातच्याला एक बस यिन डायरेक्ट, तोवर नाही...."

पण त्याचं बोलणं ऐकायला पण राज तिथे थांबला नव्हता.

तो आपली सॅक घेऊन बस गेली त्या दिशेला धावू लागला.

"ओ पाव्हनं, वैच दमानं, कुटवर पयसान? थांबा थांबा...."

पण राज पुढे निघाला.

रस्त्यात कुणीतरी लिफ्ट देईल ही आशा त्याला होती.

चालत चालत बरंच दूरपर्यंत तो गेला.
दमून रस्त्याच्या बाजूला त्याने बसकण मारली.
दोन कालीपिलीवाले शिरपूर म्हणताच नकारार्थी मान हलवत निघून गेले.

" काय हा अपशकुन पहिल्याच दिवशी.
शिरपूर ठिकाण योग्य आहे की नाही?
उगाच निवडलं असे झालंय...च्या," हताशोद्गार मनात पिंगा घालू लागले.

तेवढ्यात एक बाईक येतांना दिसली.
पटकन उभे राहत त्याने लिफ्टसाठी अंगठा खुणावला.
बाईक न थांबता पुढे निघाली.

"अरे यार..," तो वैतागत असतानाच त्याला दिसले की समोर बाईक थांबली आहे.

आनंदाने तो धावत गेला.

"दादा, लिफ्ट मिळेल का?"

"तालुक्याला चालले का? फाट्यापर्यंत सोडतो," बाईकवाला म्हणाला.

राजने विचार केला.
फाट्यापर्यंत तरी जाऊया आणि हो म्हणत तो पटकन बाईकवर बसला.

कुठून आलात तुम्ही? असे विचारताच राज त्याला बस कशी मिस झाली वगैरे सांगू लागला.

मुळातच राज बडबड्या होत्या.
आणि आपुलकीने बोलत विनोदाची झालर लावत समोरच्याला तो पटकन आपलेसे करून घेत असे.

गप्पांमध्ये फाटा आला देखील.

"धन्यवाद दादा, तुम्ही देवासारखे धावून आलात बघा माझ्यासाठी, खूप धन्यवाद," इति राज.

"अहो, काहीही काय, देव वगैरे काय म्हणताय.
मी इकडे माझ्या रस्त्याने जातंच होतो.
तुमच्यासाठी स्पेशल थोडी काही केले," बाईकवाला देखील सुस्वभावी होता.

"बरं, आता इतकं सांगा फक्त की शिरपूरला जाण्यासाठी मला इथूनच बस वगैरे मिळेल की तालुक्याच्या गावातील बस स्थानकावर जावे लागेल?," राज विचारू लागला.

"शिरपूर?, ते नदीकाठचं शिरपूर? तिथे जायचे आहे का तुम्हाला?," बाईकवाला आश्चर्याने बोलला.

क्रमशः

(बाईकवाला का असा विचारत असेल? राज पोचेल ना शिरपूरला? कशी जाणार त्याची सुट्टी, नक्की वाचा पुढील येणाऱ्या भागांमध्ये..)

© डॉ समृद्धी अनंत रायबागकर, अमरावती
#अष्टपैलू स्पर्धा2025

" सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा. "
0

🎭 Series Post

View all