तुम देना साथ मेरा..20 पर्व दुसरे

प्रेम







      नवरा बायकोचं नातं हे फार निर्मळ असतं.. कोणी कितीही जवळच असलं..  मग ते आई-वडील असू दे, की स्वतःची मुले..  तरी शेवटी नवरा बायकोच एकमेकांसाठी असतात.  एकमेकांचा आधार असतात.. नवरा बायको एकमेकांना जी साथ देतात, ती कोणतेही नातं देत नाही.. तिने पाहिलं होतं, तिचे बाबा कितीही आईवर रागावले, ओरडले तरी तिच्या आईने तिच्या माहेरच्यां जवळ कधीच सांगितले नव्हते..  अचानक कधी मामा वगैरे कोणी आले, किंवा फोन आला तर सगळं छान सुरू आहे, असेच ते वागायचे..  तिच्या आई-बाबांचे भांडण तिसऱ्याला कधीच कळायचे नाही.. अगदी त्या दोघा बहिण भावांना ही नाही..


    आपणही असंच करायला हवं..  आमच्या दोघांतल हे भांडण , हे वाद घरी कळायला नकोत.. आई बऱ्याचदा म्हणते ना, हल्लीच्या मुली छोट्या छोट्या गोष्टी आपल्या माहेरी सांगतात फोन करून..  आणि मग त्यांच्या संसारातील गैरसमज वाढवून देतात..  कित्येकदा तर माहेरच्यांच्या हस्तक्षेपामुळे भांडणे विकोपाला जाऊन घटस्फोट ही होतात..  नाही नाही..  शिवमला कळायला नको काही.. नाहीतर तो आई ला नक्की सांगेल.. पण साई ? साईने शिवमला काही सांगितले तर..  मी त्यांच्यावर संशय घेते, त्यांच्याशी भांडते वगैरे तर..  घरी कळल्यावर पप्पांचा ओरडा मलाच खावा लागेल.. कारण त्यांचा आपल्या जावयावर पूर्ण विश्वास आहे ..साईंना सांगू का बोलावून आत? की शिवम ला काही सांगू नका..

   " इशू.. एक ताट घेऊन ये..  शिवमहि जेवण करून जाईल आता.."  साईचा आवाज आला. आणि तिने मोकळा श्वास घेतला.

    तिच्या मनावरचे मणा मणाचे ओझे झरझर उतरले.   त्याचे नॉर्मल बोलणे आणि इशू म्हणून मारलेली हाक.. एका थंडगार हवेच्या झुळुके सारखी तिच्या तप्त मनाला स्पर्शून गेली..  आणि विश्वास वाटला की मी खरंच किती चुकीचा विचार करते साई बद्दल.. मी फक्त विचारच करत राहिले आणि त्यांनी तर आमचा वाद शिवमला जाणवू नये, म्हणून मोकळेपणाने साद ही घातली मला..

    "हो हो..  आणते.." स्वतःचा आवाज नॉर्मल करत ती आतूनच म्हणाली. आणि टॉवेलला चेहरा पुसून ताट बाहेर घेऊन आली..

    "नको ताई.. अग मी घरी जाऊन जेवणारच आहे..."

    " असे कसे शिवम..  बघ तुझ्या आवडीचे चिकन बनवलेय तुझ्या ताईने.. आता जेवण करूनच जा .."

   "जीजू.. आई रागवेल मला.. घरी नाही जेवलो की माझ्या वाट्याचे तेच शिळं जेवण खायला लावते दुसऱ्या दिवशी.."  शिवम म्हणाला आणि साईला हसू आले..

    दोन दिवसात त्याचा तो उदास वाणा चेहरा पाहून तिच्या मनालाही वेदना होत होत्या.. आणि आता त्या चेहऱ्यावर हसू फुलल्याने तिच्याही गाली हसू उमटले..

    "बस शिवम.. बघ सुकं चिकन आणि ग्रेव्ही दोन्ही बनवलेत मी.. आवडते ना तुला.. तू बस.. मी पटकन गरम गरम भाकरी करते तुझ्यासाठी.. हवे तर आईला मी मेसेज टाकते तुला ओरडू नको असा.."  म्हणत ती आत मध्ये आली आणि नव्या उत्साहाने डब्यातले पीठ ताटात घेऊन भाकरी करायला घेतली..  शिवम ही निर्धास्त पणे  साई शी गप्पा मारत बसला.. ताई ने सांगितल्यावर आई काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता.. घरी शेवभाजी खाण्या पेक्षा ताईच्या हातचे चिकन खाणे जास्त आवडणार होते त्याला..


    "काय झाले ताई, तुझा चेहरा का एवढा लाल दिसतोय? डोळेही लाल आहेत.. बरं नाहीये का?"  गरमागरम भाकरी घेऊन एक साई च्या आणि एक शिवम च्या ताटात वाढत असलेल्या ईश्वरीच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले तसेच शिवम ने विचारले..

    ती गोंधळली आणि पटकन साई कडे पाहिले. तो मात्र चेहरा नॉर्मल ठेवत शिवम च्या ताटात भाजी वाढत होता..

   " शिवम.. ते कालपासून सर्दी झाली ना थोडी.. म्हणून नाक गळतेय.. डोळ्यातूनही पाणी येते सारखे.. म्हणून चेहरा लाल झाला असेल.. "

    "अग ताई.. मग क्लिनिक मध्ये जाऊन यायचं ना..  तुला माहितीये ना, तुला सर्दीचा किती त्रास होतो ते.."

   " हो हो..  उद्या जाऊन येईन नक्की.." ती नाक वर ओढत म्हणाली..

   " घे.. कर सुरुवात..."  साई ने शिवम सोबत ईश्वरीच्या ताटातही भाजी वाढली..

   " छान झाली भाजी इशू.. " शिवम कडे पहात तो ईश्वरी शी बोलला..

    काही का असेना!  तात्पुरता स्वतःचा राग विसरून तो नॉर्मल बोलतोय हे पाहूनच तिला बरे वाटले.. 

     साई शिवम सोबत गप्पा मारत असला, तरी ईश्वरी कडे दुर्लक्षही करत नव्हता.. कदाचित शिवमला त्याला जाणवू द्यायचे नसेल.. आमचे वाद झालेत म्हणून..  म्हणून ते नॉर्मल वागतात..  पण शिवम गेल्यावर ? शिवम गेल्यावरही वागतील ना ते असेच..?  गेला असेल ना त्यांचा राग? भरपेट जेवण करतायतं , म्हणजे जेवण आवडले आहे.. देवा यांचा राग जाऊ दे.. शिवम गेल्यावरही हे असेच माझ्याशी नीट बोलू दे..  मनातल्या मनात तिने देवाचा धावा केला..
   
     जेवताना गप्पा मारता मारता शिवम ने त्याच्या अशा अचानक येण्याचे कारण सांगितले.. पाच वर्षांपूर्वी पप्पांनी काढलेली ईश्वरी च्या नावाची एफडी आता मॅच्युअर झाली होती.. आणि ती काढण्यासाठी बँकेच्या पेपरवर ईश्वरी चे साईन हवे होते.. म्हणून पप्पांनी शिवमला पाठवले होते..

     जेवण झाल्यावर ईश्वरीने पेपरवर साईन केली आणि शिवम ने पुन्हा एकदा दवाखान्यात जाऊन ये, म्हणत तिचा निरोप घेतला..

    शिवमला निरोप देऊन दोघेही आत आले. ईश्वरीने साई कडे पाहिले.. तो पुन्हा तिच्याकडे दुर्लक्ष करत आपला मोबाईल घेऊन बसला..  तिने एक दीर्घ उसाचा घेतला आणि किचन मधली भांडी वगैरे आवरू लागली..  म्हणजे आमच्या मधला वाद शिवमला कळू नये, म्हणून हे माझ्याशी मघाशी नॉर्मल बोलत होते..  त्यांचा राग अजून तसाच आहे.. नाही पण मलाच आता त्यांचा राग घालवावा लागेल.. आवरुन झाल्यावर मीच बोलते जाऊन.. विचारातच तिची भांडी घासून झाली..

   सर्व आवरून ती बाहेर आली..  साईने टीव्ही लावलेला होता..  कुठल्याशा गाण्यांच्या चैनल वर गाणं लागलेलं होतं..  आणि त्यावर साईचे आवडते गाणं..

    जब कोई बात बिगड जाये..
   जब कोई मुश्किल पड जाये...
    तुम देना साथ मेरा... ओ हमनवा..

     न कोई है...
     न कोई था..
     जिंदगी मे, तुम्हारे सिवा..
     तुम देना साथ मेरा.. ओ हमनवा...

    साई गाणं बघण्यात अगदीं तल्लीन झाला होता.. ते गाणं ऐकून ईश्वरी ला मागे अपर्णा आल्यावर त्याने तिच्याकडे बघत म्हटलेलं हे गाणं आठवलं.. 'गाण्यातूनच सुचवू पाहत होता का तो त्याच वेळेस आपल्याला ? की त्याच्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणीच नाहीये.. 

    आणि मी? मी वेडी..  ती अंजली फंजली लग्न करते, ती खुश असेल,  आणि मी मात्र संशय होऊन यांना काय काय बोलले.. आणि स्वतःच्याच आनंदात खडा टाकला..  पण आता नाही..  आता नाही मी कधी असा विचार करणार..  आणि तिच्या लग्नाला तर जाणारच आता.. दाखवून देईल तिला.. ती कशासाठी ही लग्न करत असू दे.. तिला तो मुलगा आवडला म्हणून.. की साई तिथे आहे म्हणून..  पण साई साठी मीच बेस्ट आहे..  आणि साई चे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे.. ' मनातच बोलत नाक मुरडत ती हात कोरडे करून ती त्याच्याजवळ उभी राहिली..

  अचानक  आल्याने तो तिच्याकडे पाहू लागला..

   त्याने तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा नजर वळवून हातातला रिमोट समोर करून चैनल चेंज करू लागला.. तसा ईश्वरीने त्याच्या हातातला रिमोट खेचून घेतला आणि बाजूला टाकला..  पुन्हा त्याची नजर तिच्याकडे गेली.. त्याने , काय?  म्हणून नजरेनेच विचारलं..  तसे ती  त्याच्या मांडीवर बसत चेहरा ही मानेत खुपसत त्याला बिलगली.. त्याचे दोन्ही हात तसेच बाजूला ठेवलेले राहिले.. पण गाली मात्र हसू फुलू लागले..

 
    तिचे मुसमुसणे जाणवले आणि गळ्याजवळ ओलसरपणा वाटू लागला..  तसे ती रडतेय हे लक्षात आले..  त्याचेही हात मग तिच्या पाठीवर विसावले गेले.. दोघांचीही मिठी घट्ट होत गेली.. दोन दिवसाचा राग अबोला, दुरावा सारे काही अश्रूं मध्ये वाहून गेले.. शेवटी शब्दांची गरज पडलीच नाही..  तिच्या स्पर्शानेच ते काम केलं.. ती त्याच्या मानेत चेहरा खूपसून रडत होती..  आणि तो पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत होता..

    "हेय राणी.. बस बस.. रडू नकोस..  इशु.. शांत हो बघू..".  त्याने तिचा चेहरा दूर केला.. अंगठ्याने तिचे डोळे पुसले..

    अजूनही घशात हुंदका दाटून येत होता तिच्या..

   "सॉरी.. रडवले ना मी तुला?" तिचे डोळे पुसत तो म्हणाला.. आणि ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली..

    सॉरी तर तिने म्हणायला हवे होते..
   " सॉं... सॉरी मी पण..! पण..  पण तुम्ही का सॉरी म्हणताय?  चूक माझी होती..  मी उगाच काहीबाही बोलले तुम्हाला.. संशय घेतला तुमच्यावर.."

    "इट्स ओके इशू.. तुला कळले ना आता...  माझे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे राणी..  पुन्हा असा संशय कधीही घेऊ नकोस.. खूप वाईट वाटते मला.. " तिच्या गालावर चिकटलेले केस मागे सारत तो म्हणाला.. आणि तिने वरून खाली मान हलवत होकार दर्शवला..

    "सॉरी.. आता नाही घेणार संशय.." ती पुन्हा त्याच्या कुशीत शिरत म्हणाली..


   " दोन दिवस.. दोन दिवस.. तू बोलत नव्हतीस माझ्याशी.. जीव घशात आला होता ग माझा.. तुला मी मागेही बोललो होतो, तू चिड, रागव, पण अबोला धरू नकोस.."


क्रमशः

कथा आवडली असेल तर रेटिंग नक्की द्या आणि त्या सोबतच दोन शब्दांची का होईना, अगदी ? अशी ईमोजी का होईना पण समिक्षा जरूर द्या...

तुमच्या समिक्षांमुळेच लिहायला उत्साह येतो..?

कथेचे नोटिफिकेशन मिळण्या साठी मला फॉलो नक्की करा