तुम देना साथ मेरा..19 पर्व दुसरे

प्रेम


   "हो.. हो.. येतेय मी लग्नाला.. बर.. काय आणू म्हणालात? अच्छा.. मोत्यांचा ज्वेलरी सेट.. ओके आणते.. नाही.. माझ्या कडे नाहीये रेडिमेड नववारी.. आणि असे ही, मी हळदी ला थोडी असणारे ताई.. आम्ही लग्नाच्या दिवशी सकाळी पोहोचू.. मग लग्नाल येऊं संध्याकाळी.. बर.. हळद झाल्यावरच आहेराचा कार्यक्रम असतो का? बरं... मग येऊं आम्ही लवकर.. नाही ताई.. मी नाही घालणार नववारी.. तुम्ही घाला.. नको अपर्णा ताई.. सगळ्या मामी, वहिनी वगैरे सर्व नेसणार आहेत ना? पण त्या तुमच्या घरच्या आहेत ना? त्यांचे नवरी शी जवळ चे नाते आहे.. मी तर अनोळखी आहे ना? तुमच्या लग्नात नक्की नेसेन हं मी.. हो हो.. तुम्ही काळजी करू नका.. मी आणते तुम्हाला हवा असलेला सगळा सामान.. बर.. ठेवते.. निघायचे आहे मला.." ईश्वरी ने कॉल संपवला.. आणि दीर्घ श्वास घेतला..

    चला.. लग्नाला जायची तयारी करावी लागणार होती.. अपूर्वा मॅडमना मोत्यांची ज्वेलरी हवी होती लग्ना साठी.. परवाच्या रविवारी मार्केट मध्ये जावून अपर्णा सोबत सायली साठी ही ज्वेलरी खरेदी करायचे ठरवत ती शाळेत जायला निघाली..


     दिवसभर शाळेतही तिचे लक्ष लागत नव्हते.. कधी एकदा संध्याकाळ होते.. त्याच्या आवडीचे चिकन घेऊन घरी जातो, आणि त्याला हवी तसे झणझणीत भाजी बनवून स्वयंपाक तयार ठेवतो असे झाले होते तिला.. दिवसभरात कितीतरी वेळा व्हाट्सअप अकाउंट चेक करून झाले होते.. चुकून त्याचा मेसेज आलाय का ? हे पाहत होते ती..  एरवी बऱ्याच वेळेस तिला रिसेस च्या वेळेस कॉल करायचा तो.. आज अक्षरशः डोळे त्याच्या मेसेज, कॉल च्या, वाटेकडे लागले होते..  पण त्याने मात्र कॉल, मेसेज काहीही केला नव्हता.. आणि ईश्वरी ची स्वतःहून त्याला कॉल करायची हिंमत झाली नव्हती.. तो आपल्याला रागावेल, त्यापेक्षा आपल्याशी झिडकारल्या सारखे बोलेल, याचीच भीती तिला जास्त होती..

    इकडे साईला ही दिवसभरात अनेक वेळा ईश्वरी ची आठवण आली होती..  बऱ्याचदा मोबाईल हातात घेतला गेला..  व्हाट्सअप अकाउंट उघडले गेले..  बऱ्याचदा मेसेज टाईप झाला, आणि डिलीट ही झाला.. कॉल लॉग मधून तिचा नंबर बऱ्याचदा डायल करायला घेतला, पण पुन्हा डिलीट केला.

    दोघांचीही परिस्थिती सारखीच होती.. रागाची जागा आता आतुरतेने घेतली होती. कोण पुढाकार घेत सॉरी म्हणतोय. किंवा स्वतःहून गळ्यात पडते याची ओढ. दोघांनाही होती. प्रेमात सॉरी, थँक्यू असे काहीच नसते. बस आपल्या जिवलगाच्या मिठीत हक्काने शिरले, तरीही ती एक प्रकारची माफी किंवा आभारच असतात..  साई आणि ईश्वरी दोघांचेही तसेच तर होते. शब्दांची नव्हे, तर स्पर्शाची ओढ जास्त होती या घडीला.. स्पर्शाने समोरच्याने आपले प्रेम व्यक्त करावे या तळमळीत दिवस सरला. आणि नेहमी ईश्वरी च्या आधी जाणारा साई आज बराच वेळ झाला तरी बँकेत रेंगाळत राहिला. असे ही बँकेचे साहेब उशिरापर्यंत बँकेत असायचेच अकाउंट चेक करत.. त्यांच्या जोडीला साई ही थांबला..

   "अरे.. साई.. तू घरी नाही जात आहेस आज.. वेळ संपलीय.." साई ला अजून ही कागदपत्रांमध्ये डोके घातलेले पाहून त्याच्या सोबत काम करणाऱ्या दिघेंनी विचारलें..

   "अं.. हो.. निघतो थोड्या वेळात.. उद्या फोर्थ सॅटर्डे आहे ना.. सुट्टी आहे.. मग आजच हे डॉक्युमेंट रेडी करून घेतो. सोमवारी येणारं ना ते कारखानीस सर लोन साठी.. तुम्ही निघा.. मी निघतो दहा पंधरा मिनिटात.." साई म्हणाला आणि दिघे ही आपली बॅग सावरत निघाले..

    काम हा तर बहाणा होता.. डॉक्युमेंट तर मघाशीच रेडी करून ठेवले होते त्याने.. घरी जायची ओढ असली तरी साहेबांना शुक्रवार शनिवार च्या सुट्टीचे ही सांगायचे होते..

   ईश्वरी मात्र कुठल्याशा अनावर ओढीने आज जरा लवकरच घरी आली होती. येताना साई च्या आवडीचे चिकन ही आणले होते. घरी येऊन पाहते तर साई आला नव्हता अजून.  ती फ्रेश झाली.. आज नेहमीप्रमाणे गाऊन न चढवता साडी च ठेवली.. आज त्यानेच आणलेली गुलाबी रंगाची साडी नेसली होती तीने.. जी त्याला खूप आवडायची.. या साडीचा गुलाबी रंग तुझ्या गालांवर उतरतो म्हणायचा तो नेहमीच.. आणि मग तिच्यावर गुलाबी प्रेम बरसायचे त्याचे..  आज ही त्याचे तेच प्रेम हवे होते तिला.. आपल्याला या साडीत पाहून तो भान हरपतो हे पाहिले होते तिने... आज ही तसेच आवेगाने जवळ घेईल का तो.. विसरून सारा राग विरघळेल आपल्या प्रेमात?

     तिने साडीचा पदर कमरेला खोचला.. आणि स्वयंपाक करायला लागली. त्याला आवडतो तसा जीरा राईस, सुक चिकन आणि थोडं रस्सा भाजी.. सोबत बाजरीची भाकरी.. अगदी साईला आवडते तशी बारीक आणि थोडी खरपूस भाजलेली.. साडेसात वाजता साई आला, तोपर्यंत तिचा बऱ्यापैकी स्वयंपाक तयार झाला होता..

    घरी आल्यावर साई फ्रेश झाला.. ईश्वरीने आणून दिलेला पाण्याचा ग्लास तिच्याकडे न पाहताच घेतला.. आणि पुन्हा आपला मोबाईल मध्ये डोकं घालून बसला.. ईश्वरी वाट पाहत होती त्याच्या बोलण्याची.. पण तो एक शब्दही बोलला नाही.. आणि दिवसभरात त्याचा राग कमी झाला असेल, तो कमीत कमी आपल्याकडे बघून हसेल तरी..  निदान पाहिल तरी.. या अपेक्षेत असणारी ती, सकाळ सारखेच त्याचे दुर्लक्ष करणे पाहून उदास झाली..  डोळे पुन्हा भरून आले.. भरलेले डोळे पुसत ती किचन मध्ये गेली.. आणि उरलेला स्वयंपाक करू लागली..

   साई थेट तिच्याकडे पाहत नसला तरी, तिच्या डोळ्यातले अश्रू साई पासून लपले नाहीत.. त्याला वाईट वाटले.. 'आपण जास्त ताणले का?  तिच्या डोळ्यातले अश्रू सांगतात की, तिला तिच्या चुकीची जाणीव झालीय.. आपल्या एका कटाक्षासाठी, आपल्या एका शब्दासाठी ती तळमळतेय.. आणि मी दुर्लक्ष करतोय तिच्याकडे.. आज माझी ही नजर हटत नाहीये तिच्यावरून..तिच्या नकळत ही का असेना.. पण डोळे तिलाच पाहतायत.. चेहरा उतरलेला असला तरी, आजही साडीचा रंग तिच्या चेहऱ्यावर उतरलाय.. असे वाटतेय की जावे आणि तसेच तिला मिठीत घ्यावे.. आज माझा राग घालवण्यासाठीच नेसलीय ही साडी तिने, हे कळतं नाहीये का मला? पण एव्हढे करायच्या ऐवजी फक्त मिठीत आली असती माझ्या स्वतः हून तरी चालले असतें.. नेहमी मीच पुढाकार घेऊन तिचा राग घालवतो.. तिच्याशी बोलतो.. आज तीने घेतला असता पुढाकार तर...जाऊ दे.. जेवण करताना मीच बोलतो तिच्याशी.. तिचे रडणे नाही सहन होत माझ्याने..  फार हळवी आहे माझी इशी.. '

      स्वयंपाक झाल्यावर ईश्वरीने जेवायला घेतले.. त्याचा राग बघता तिने शांत बसणेच ठीक समजले..  त्याच्याकडे तो बोलेल म्हणून आशेने पाहत असणारी ती आता शांतपणे जेवण वाढत होती.. त्याच्याकडे न पाहताच तिने ताटात जेवण वाढले..  चेहरा उतरला होता.. रडून डोळेही लालसर दिसत होते.. जेवण सोडून तीला घट्ट मिठीत घ्यावे.. ही इच्छा प्रबळ झाली..

     वाढलेल्या ताटाकडे लक्ष गेले आणि नकळत ओठांचा कोपरा वर झाला..  तिचा राग गेलाय याची पूर्णपणे खात्री पटली.. समोरच्या ताटात वाढलेले जेवण पाहूनच त्याला कळाले, त्याचा राग घालवण्यासाठी काय प्रयत्न केले तीने ते दिसत होते.. सारे जेवण त्याच्या आवडीचे होते.. जेवणाचा वास नाकात शिरून भूक जास्त चाळवली त्याची.. तिच्या विचारात असेही दुपारी नीट जेवण केले नव्हते.. त्याचा अर्धा अधिक डबा त्याने आपल्या सहकाऱ्याला देऊन टाकला होता..

    ईश्वरीने जेवायला वाढले आणि नुसत्याच लोटलेल्या दरवाज्यावर टकटक झाली.   तसे पटकन दोघांचे एकमेकांकडे लक्ष गेले.. आता या वेळेस कोण आले या विचाराने साईच्या कपाळावर आठ्या निर्माण झाल्या.. तर आपला असा उतरलेला आणि रडका चेहरा पाहून आलेल्या  माणसाला काय वाटेल हे टेन्शन ईश्वरी ला आले. आधीच साई बोलत नाही म्हणून तिचा चेहरा पुन्हा रडू रडू झाला होता.. साई उठून दरवाजा उघडायला गेला आणि ईश्वरी किचनमध्ये शिरली. आपले लालसर झालेले डोळे आणि चेहरा नॉर्मल व्हावा म्हणून चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारून घेतले. 

   " अरे शिवम तू?  येना आत.." साईचा आवाज आला आणि शिवमला पाहून तीला आश्चर्य वाटलं.. मनातल्या भावना पुन्हा उचंबळून यायला लागल्या.. घशात  हुंदका ही दाटून आला.. साईच्या रागाने अबोल्याने हळवी झालेली ती, आत्ता शिवमला पाहून अधिकच हळवी झाली..

   कसे असते ना बायकांचे मन..! रागात असेल, आजारी  असेल, घरातल्यांशी भांडण झाले असेल, आणि अशा वेळेस माहेरचं कुणी आलं की अजूनच मन जास्त भरून येतं.. हळवं होतं..  माहेरच्या मिठीत शिरून रडून मोकळं व्हावंसं वाटतं..

    पण आपला असा चेहरा पाहून, आणि आपण रडलो हे पाहून शिवम च्या लक्षात आले तर , तो घरी सांगेल.. आणि आई पप्पांना उगाच माझी काळजी वाटत राहील.. नाही नाही..  आमच्या भांडणा बद्दल माझ्या घरी काहीही कळायला नको.. आम्ही दोघे खूप सुखात आहोत, आनंदात आहोत हे आई पप्पांना माहिती आहे..  आणि तसेच तर आहे ना ? आमच्यातले आजचे भांडण, राग , माझ्या मनातल्या मूर्ख विचारांमुळे आहे..  आणि आई नेहमी सांगते ना..  दोघांमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, वाद कधीही दुसऱ्यांना सांगू नयेत..  त्यामुळे गैरसमज आणि अविश्वास दोघेही वाढत जातात..

    नवरा बायकोचं नातं हे फार निर्मळ असतं.. कोणी कितीही जवळच असलं..  मग ते आई-वडील असू दे, की स्वतःची मुले..  तरी शेवटी नवरा बायकोच एकमेकांसाठी असतात.  एकमेकांचा आधार असतात.. नवरा बायको एकमेकांना जी साथ देतात, ती कोणतेही नातं देत नाही.. तिने पाहिलं होतं, तिचे बाबा कितीही आईवर रागावले, ओरडले तरी तिच्या आईने तिच्या माहेरच्यां जवळ कधीच सांगितले नव्हते..  अचानक कधी मामा वगैरे कोणी आले, किंवा फोन आला तर सगळं छान सुरू आहे, असेच ते वागायचे..  तिच्या आई-बाबांचे भांडण तिसऱ्याला कधीच कळायचे नाही.. अगदी त्या दोघा बहिण भावांना ही नाही..


क्रमशः

कथा आवडली असेल तर रेटिंग नक्की द्या आणि त्या सोबतच दोन शब्दांची का होईना, अगदी ? अशी ईमोजी का होईना पण समिक्षा जरूर द्या...

तुमच्या समिक्षांमुळेच लिहायला उत्साह येतो..?

कथेचे नोटिफिकेशन मिळण्या साठी मला फॉलो नक्की करा