तुम देना साथ मेरा..18 पर्व दुसरे

प्रेम     ती मात्र ब्लॅंकेट पांघरून पलीकडे तोंड करून झोपली होती..  आपण असे विचारांनी तळमळतोय. आणि तिला मात्र शांत झोप लागली.. हे पाहून पुन्हा त्याला स्वतःची चिड आली..  त्याला काय माहित होते ? निश्चलपणे झोपल्याचे सोंग केलेली ती ही विचारांच्या गर्तेत जागीच होती.  भावनांचे युद्ध तिच्याही मनात चालूच होते..  आपण बोललो ते चूक होते की बरोबर?  या प्रश्नात तीही गुंतली होती..

    आता शांतपणे विचार करू लागल्यावर आपणं त्याच्यावर किती बालिश पणाचे आरोप केलें, हे लक्षात येतं होते तिच्या.. 'इतक्या महिन्यात अनुभवलेले त्याचे प्रेम  खरे आहे हे माहीत नाही का ? केवळ  आज अंजली च्या लग्नाचे कळल्यावर काय झाले मला? मी.. मी असे बिनबुडाचे आरोप करायला नको होते त्यांच्यावर.. पण काय करू? ती इकडे येणारं राहायला.. आणि कधी भेटली तर? मनातले लपलेले प्रेमाचे अंकुर पुन्हा फुटले तर...? हा विचार मनांत येऊनच भीती वाटायला लागली होती मला.. म्हणून मी असे बोलली त्यांना...

     असे म्हणतात की पहिले प्रेम कधीच विसरता येत नाही.. यांचे नव्हते तिच्यावर.. पण तीचे तर होते ना यांच्यावर प्रेम.. त्यासाठी आमचे लग्न झाल्या वरही किती तरी मुलांना नकार दिला तिने.. मग आता इतक्या लवकर विसरली ती? आणि ते ही गावाकडील जीवन पसंत असताना, तिकडच्या मुलाशी लग्न करायला तयार असताना, लग्न करून इतक्या लांब यायला तयार झाली.. आणि तिच्या घरच्यांना तर जवळपासच असणारे सासर पाहिजे होते..मग तरी ते तयार झाले?  हे सारे माहित असून ही ती लग्न करून इकडे येतेय, मग असेच वाटणार ना मला..? की हीनेच हट्टाने होकार दिला? माझे साई नाहीत असे.. त्यांचे प्रेम आहे माझ्यावर.. मी उगाचच संशय घेऊन बोलले त्यांना? अंजलीच्या लग्न करून इकडे येण्याचा राग मी त्यांच्यावर काढला..

      काय करू, जाऊ का त्यांच्याजवळ ? अशी ही झोप येत नाहीये मला त्यांच्याशिवाय.. पण त्यांनी झिडकारले तर मला..? रागावलेत ते माझ्यावर.. जवळ न घेता दूर लोटले तर..? सहन नाही होणारं मला.. ' तिने जरासे उठून त्याला पाहिले

   त्याला झोप लागलीये असे वाटत होते. तिनेही मग झोपण्याचा प्रयत्न केला. राग तर त्याच्यावरचा गेला होता तिचा.  आपणच चूक केली त्यांच्यावर संशय घेऊन, याची जाणीव ही झाली होती. आणि आता मात्र त्याच्या जवळ जाण्याची, त्याच्या मिठीत शिरण्याची, मनाला हुरहुर लागली होती. शरीरही त्याच्याकडे ओढ घेत होते. त्याच्या स्पर्शाच्या ओढीने पोटात खड्डा निर्माण होत होता.. कितीही इच्छा होत असली तरी तिने मनाला आवर घातला. सकाळी त्याचा राग रंग पाहून माफी मागूया.  हा विचार करत झोपायचा प्रयत्न करू लागले..

   रात्री कधीतरी दोघांचाही डोळा लागला. सकाळी दोघांनाही कामावर जायचे होतेच. रात्री नीट न झालेल्या झोपे ने दोघांचेही डोळे चुरचुर करत होते. उठायची अजिबात इच्छा नव्हती. पण तरीही ईश्वरी आधी उठली. तिने पाहिले तर साई अजून झोपलेला होता. तीने उठून अंथरुणाची घडी घातली. आणि हळूच बेडवर त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. कपाळावर पसरलेले त्याचे केस दूर करत अलगद गालावर होठ टेकवले. आणि आपल्या कामाला लागली. आताही खूप इच्छा होत होती एकदा तरी त्याच्या मिठीत शिरण्याची. पण नाही..  तो रागावलेलाच असला तर..? म्हणून थोडी भीतीही वाटली. तो जायच्या आधी त्याची माफी मागूया. असे ठरवत ती किचनमध्ये शिरली..

   ती गेल्याचे लक्षात आले, तसे साईने डोळे उघडले. तो जागीच होता. गालावर झालेला तिच्या ओठांचा अलवार स्पर्श, तिचा राग गेलाय हे सांगत होता. कदाचित तिच्या चुकीची जाणीवही तिला झालेली असावी. त्यालाही वाटले असेच जावे आणि मिठीत घट्ट कवटाळावे तिला. पण नाही... ती आधी माफी मागते का ते बघायचे होते..  तसे तर तिने माफी मागावी अशी काही इच्छा नव्हती त्याची.  पण निदान कशात काही नसताना ती आपल्याबद्दल चुकीचे बोलली आहे, हे तरी तिला कळावे. तिच्या अशा आरोपांनी आपल्याला त्रास झाला याची जाणीव व्हावी. आणि त्याचे फक्त तिच्यावरच प्रेम आहे, हे समजावे. म्हणून तो अजून वेळ घेणार होता. जरी त्याचा राग गेला असला तरीही तो अजून तसाच तिच्यावर रागावला आहे. याचे नाटक त्याला वठवावे लागणार होते. बघूया की, काय म्हणते ती?

    जरा वेळ तसाच पडून राहत शेवटी मग उठला तो. आणि किचन मधल्या तिच्याकडे दुर्लक्ष करत आपले आवरून दूध घ्यायला बाहेर पडला. आधीपासून असलेली गजरे आणायची सवय आता ही कायम होती त्याची. दूध घ्यायला गेला तसे तिथल्या हाराच्या गाडीवरून सवयीने एक गजरा घेऊन आला, आणि दुधा सोबतच तो किचन च्या ओट्यावर ठेवून दिला. तिच्याशी न बोलताच आपले कपडे घेतले, आणि आंघोळीला बाथरुम मध्ये शिरला.

     ईश्वरी पाहत होती त्याच्याकडे.. वाट पाहत होती तो बोलतोय का आपल्याशी.. लक्ष देतोय का आपल्याकडे.. त्याने स्वतःहून जवळ यावे.. नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत असताना पाठीमागून घट्ट मिठी मारावी. अशी तीव्र इच्छा होत होती.. पण तो मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत होता.. आणि आता याचा तिला खूप त्रास होत होता. आपल्याला राग येतो तेंव्हा दुर्लक्ष केल्यावर त्यालाही असाच त्रास होत असेल, हेही लक्षात येत होते.. आणि त्याचा अजून आपल्यावर कायम असलेला राग पाहून त्याची माफी मागायची ठरवलेली असली , तरी हिम्मत मात्र होत नव्हती.

      'आपण माफी मागूनही त्याने माफ न करता आपल्याला अजून रागावले तर? याची भीती वाटत होती. लहानपणी पासून पप्पांचा राग सहन केला होता. ओरडा खाल्ला होता. कधीतरी एक दुसरी चापट ही खाल्ली होती, चूक केली असेल तर.. पण लग्न झाल्यापासून साई कडून फक्त प्रेमच मिळाले होते. त्याने तिचे लाडच केले होते. त्यामुळे त्याचा राग झेलायची आता हिम्मत नव्हती.. त्याने कोणत्याही निमित्ताने एकदा तरी बोलावे. आणि मग मी त्याची माफी मागत त्याच्या मिठीत शिरेल. आणि सांगेन त्यांना, की माझ खूप प्रेम आहे तुमच्यावर.. मी चुकले.. मी उगाच संशय घेतला.. आता नाही असा विचार करणार.. पण? पण तो बोलेल ना स्वतःहून माझ्याशी नक्की?' स्वयंपाक करता करता विचार सुरू होते.

     एका बाजूला चहाही उकळत होता. साईची आंघोळ होऊन त्याने दिवाबत्ती केली. आणि ईश्वरी ला न मागताच उकळलेल्या चहात दूध घालत स्वतःचा चहा गाळून घेतला. आणि कप घेऊन बाहेर येऊन बसला. नेहमीप्रमाणे तिला नाश्ता ही मागितला नाही. आणि त्याचे असे दुर्लक्ष करणे पाहून आता मात्र तिला रडू फुटले. चहात खाण्यासाठी केलेली खारी पोळी तिने प्लेट मध्ये घेतली.. आणि बाहेर जाऊन त्याच्या जवळ ती प्लेट ठेवून आली. साईने ही मग काही न बोलता ती पोळी चहात बुडवून खायला सुरुवात केली.

   ईश्वरीनेही किचन मध्येच आपला चहा प्यायला. खाण्याची इच्छा नव्हतीच..  विचारांनी आणि अपुऱ्या झोपेमुळे डोके जड झाले होते.. तिने खायची इच्छा नसली तरी दोन बिस्किटे तोंडात टाकली. कारण काहीच नाही खाल्ले तर पुन्हा साई चिडणार होता.. भुकेले राहिलेले त्याला आवडायचे नाही.. कितीही राग आला, काही झाले, आजारी असलो, तरीही पोटभर खाऊन घ्यावे हे त्याचे म्हणणे होते. मधल्या काळात अन्नासाठी स्ट्रगल केला होता त्याने. आणि तेव्हापासून जे काही असेल. ते , आवडीचे असो की नसो पण खाऊन घ्यायचे.. अन्नाचा अपमान करायचा नाही हे शिकला होता तो..
     
    स्वयंपाक झाल्यावर तिने त्याचा डबा भरला. तसे तयारी करून डबा घेऊन तिच्याशी काही न बोलताच निघून गेला तो.. आणि ती मात्र बोलायची संधी शोधत असून ही तसेच पाहत राहिली..  पहिल्यांदाच त्याचा इतका राग पाहिला होता तिने. तसे या आधी ही तो रागावला होता. पण इतके दुर्लक्ष नव्हते केले तिच्याकडे.. आता तो दुखावला गेला होता जास्त.. म्हणून तिला काळजी वाटू लागली होती.. संध्याकाळी त्याचा राग काढायचाच हा विचार मनाशी पक्का करत तिनेही आपले आवरले..  त्याने आणलेल्या गजऱ्याचा सुगंध श्वासात भरून घेतला आणि वेणी वर माळला..

     "हॅलो.. हा अपर्णा ताई... अपर्णा चा कॉल आला आणि ईश्वरी तिच्याशी बोलू लागली..

     "हो.. हो.. येतेय मी लग्नाला.. बर.. काय आणू म्हणालात? अच्छा.. मोत्यांचा ज्वेलरी सेट.. ओके आणते.. नाही.. माझ्या कडे नाहीये रेडिमेड नववारी.. आणि असे ही, मी हळदी ला थोडी असणारे ताई.. आम्ही लग्नाच्या दिवशी सकाळी पोहोचू.. मग लग्नाल येऊं संध्याकाळी.. बर.. हळद झाल्यावरच आहेराचा कार्यक्रम असतो का? बरं... मग येऊं आम्ही लवकर.. नाही ताई.. मी नाही घालणार नववारी.. तुम्ही घाला.. नको अपर्णा ताई.. सगळ्या मामी, वहिनी वगैरे सर्व नेसणार आहेत ना? पण त्या तुमच्या घरच्या आहेत ना? त्यांचे नवरी शी जवळ चे नाते आहे.. मी तर अनोळखी आहे ना? तुमच्या लग्नात नक्की नेसेन हं मी.. हो हो.. तुम्ही काळजी करू नका.. मी आणते तुम्हाला हवा असलेला सगळा सामान.. बर.. ठेवते.. निघायचे आहे मला.." ईश्वरी ने कॉल संपवला.. आणि दीर्घ श्वास घेतला..


क्रमशः

कथा आवडली असेल तर रेटिंग नक्की द्या आणि त्या सोबतच दोन शब्दांची का होईना, अगदी ? अशी ईमोजी का होईना पण समिक्षा जरूर द्या...

तुमच्या समिक्षांमुळेच लिहायला उत्साह येतो..?

कथेचे नोटिफिकेशन मिळण्या साठी मला फॉलो नक्की करा