तुम देना साथ मेरा..6e

प्रेम




   " अगं शेतात खूप छान वाटते.. काका मला जाऊ देत नाहीत. आता तू आलीस तर नाही म्हणणार नाहीत. मस्त जेवणाचा डबा घेऊन जाऊ या शेतात.. केळीच्या बागेत बसून जेवायला मज्जा येते.. शेकोटी करून छान केळीही भाजू त्यात कच्ची.. गरम गरम काळी झालेली भाजलेली केळी खूप मस्त लागतात.. तुरीच्या शेंगा ही आहेत भरपूर लागलेल्या.. त्या पण तोडू या.. चल ना प्लीज..!"

   " बर जाऊया ! पण तुमचे दादा हो म्हणतील का?"

" तू विचार ना! तू विचारलं तर नाही म्हणणार नाही दादा..! तिने अगदी लाडिक पणे गळ घातली.

  "अच्छा म्हणजे ते पण मीच विचारू?" ईश्वरीने तिचा गाल पकडत म्हटले. तसे सायली तिला बिलगली..

  आजचा दिवस खुपच छान गेला होता ईश्वरीचा.. दुपारी साई जवळ जरा हट्ट केल्यावर तो स्वतः च त्यांना घेऊन गेला होता शेतात.. काकूंनी डबा भरुन दिला होता.. अनिश आणि मनिष पण सोबत गेले होते.. मग काय? शेतातली अंगत पंगत, दोन तीन प्रकारच्या भाज्या, मिरचीचा ठेचा, शेतातलीच मेथीची भाजी, मुळा उपटून त्याची कोशिंबीर, जेवणं अगदी फुल्ल झाले सगळ्यांचे.. त्यानंतर दादा वहिनीचे शेतात वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो काढून झाले. वहिनी सोबत त्यांचें ही फोटो काढले गेले... सेल्फी ही काढल्या गेल्या.. आणि संध्याकाळी साई आणि ईश्वरी च्या हातून शेतात दिवा लावला. आणि सगळे परत घरी यायला निघाले..

    जाताना जीप मध्ये गेलेले ते सर्व येताना मात्र बैल गाडीतून आले होते.. त्यासाठी अनिश ने ईश्वरी वहिनी ला त्याच्या बाबांना म्हणजे काकांना फोन करायला सांगितले. आणि मग सुने ची बैलं गाडीत बसण्याची इच्छा कशी पूर्ण करणार नव्हते काका.. त्यांनी लगेच आपल्या सालदाराला बैलगाडी घेऊन पाठवून दिले होते शेतात..

    साई ने मग जीप त्याला घेऊन जायला सांगत, स्वतः बैल गाडीतून त्यांना घरी आणले... ईश्वरी ला खूप मज्जा वाटतं होती.. बैलगाडीत बसण्याचा, बैलांचा कासरा हातात घेऊन बैलगाडी चालवण्याचा फोटो काढून लगेच शिवम ला पाठवून ही दिला होता..

    संध्याकाळी घरी येईपर्यंत आई आणि काकू ने स्वयंपाक करून ठेवला होता.. ईश्वरी ने ही मग आजी सोबत दिवाबत्ती करून सर्वांना नमस्कार केला होता.. आजोबा आजी तर आपल्या नातसूने वर बेहद्द खुश होते..

   काका ही ते दोघे आल्यापासून खूप खुश होते.. ईश्वरी ला काय हवे नको ते पाहायला काकूंना स्त्रिक्टली सांगून ठेवले होते त्यांनी.. साई आणि ते अजून बोलले नसले तरी  त्यांनी दुर्लक्ष ही केले नव्हते..

   "आई, आज आम्ही मामाकडे जाऊन येतो दोघेही.. सायलीला पण घेऊन जातो. बऱ्याच वेळेस मामांचा फोन येऊन गेला.."साई सकाळी सकाळीच आईला म्हणाला..

  ' आज ? नको आज .. उद्या जा.."

  "उद्या.. अग आज घरीच आहोत ना! मग जाऊन येतो.."

  उद्या जा बाळा.. " आईंनी काकू कडे पाहत म्हटलें..

  "अग पण आज का नको ? दोन दिवसात आम्हाला निघायचेय परत.."

   'अरे धनतेरस ची पूजा आहे ना संध्याकाळी.. "

  "अग आई, संध्याकाळच्या आतच येतो आम्ही घरी.. "

  "बर! काकांना सांगून जा.." आईं ने म्हटले तसें त्यानें तिथेच बसून लसूण सोलत असलेल्या काकू कडे पाहिले..

  "काकूला सांगितले मी.. ती हो म्हणाली.."

  " पण साई, राजा , तू काकांशी बोलणारच नाहीस का?" आई ने थोडया दबक्या आवाजात विचारले..

  "अग आई, असं नाहीये काही..." साई ने मात्र नजर चोरली.. काकू चे लक्ष आपल्याकडे आहे हे कळत होते त्याला.. काकू ने ही आडून आडून काकांशी बोल म्हणून सुचवले होते त्याला..

   "काय नाही.. पण तू आल्यापासून पाहते मी.. काका किती आशेने बघत असतात तुझ्याकडे.. साई ते बोलत नसले तरी वाईट वाटते ना त्यांना.. त्यांची चूक नव्हती, पण तरीसुद्धा ते माझ्याकडे म्हणाले ,की मी साई ला अडवायला नको पाहिजे होतं ..पोरगा तुटला माझ्यापासून.. चक्क डोळ्यात पाणी होते राजा त्यांच्या.." आईचे ते बोल ऐकून साईला कसंसच वाटलं..

   आपण जास्तच ताणून धरतोय का स्वाभिमान स्वाभिमान म्हणत? लहान पणापासून एवढा जीव लावलेल्या काकांशी न बोलण खरंच इतक्या गरजेच आहे का ? नाही, नाही ..ठरवल्या प्रमाणे कुठे काय झालं?  नोकरी मिळाली नाही तरीसुद्धा आलो ना मी घरी परत?  निमित्त ईश्वरीचे असले तरी काय झालं ? एखादा खरंच वाईट स्वभावाचा माणूस असता तर , काकांनी दारातूनच हाकलून दिलं असतं आपल्याला.. पण बाबा नंतर खरंच किती धीराने सगळं सांभाळून घेतलं त्यांनी.. ठीक आहे. त्यांची इच्छा होती, मी शहरात जाऊ नये गाव सोडून. मला ते मान्य नव्हतं, पण म्हणून इतके दिवस माझा राग करणं बरं आहे का? 
    शेवटी मी गेलोच ना शहरात.. आणि आता तर नोकरीही मिळण्याची ही शक्यता आहेच..  या एक-दोन दिवसात कदाचित येईलच मेल.. ऑलरेडी दिवाळीच्या आधीच कळवू असे त्यांनी सांगितलं होतं.. पण साईट चा प्रॉब्लेम झाल्यामुळे अजूनही मेल आला नाही..  आणि आता तर त्यांच्या नजरेत ही मला ती ओढ जास्तच जाणवते..माझ्याशी बोलण्याची ,पूर्वीसारखे माझ्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारण्याची, एकत्र शेतात जाताना शेतीच्या विषयावर किती भरभरून बोलायचो आम्ही.. 

   ते सारे क्षण पुन्हा जगावेसे वाटतात..  नाही, नाही..  खूप झाले आता..  मलाही किती वाईट वाटतं?  त्यांना समोर पाहूनही काकांशी न बोलण्याचे.. पुरे झाले आता..  हा अबोला कायमचा मिटवून टाकूया आजच.. आजच बोलतो मी त्यांच्याशी.. रागावले तरी चालतील, माझा कान धरला तरी चालेल त्यांनी. किंवा दोन कानाखाली खायला ही तयार आहे मी त्यांच्या.. पण खरंच मारतील का ते कानाखाली माझ्या?  तेही ईश्वरी समोर ? विचार करतानाच त्याचे हात आपल्या गालांवर गेले..

    काकांची ही सवय माहित होती त्याला.. काकांना लहानपणी कधी सॉरी बोलायला गेलं की काका आधी गालात मारायचे चूक केली म्हणून...आणि मग मिठीत घ्यायचे...


    सायली ला घेऊन साई आणि ईश्वरी दोघे ही मामांकडे जाऊन आले.. दोन्ही तिन्ही मामांच्या घरी फराळ खाऊन संध्याकाळी लवकरच घरी निघून आले.. ईश्वरी ने अपर्णा ला अंजली बद्दल विचारलें ही होते. पण ती साई आपल्या बायको सोबत आल्याचे कळल्यावर ही घराच्या बाहेर निघालीच नाही.. त्यामुळे ईश्वरी ची तिच्याशी प्रत्यक्ष भेट झालीच नाही..

   संध्याकाळी धन्वंतरी पूजन केले नव्या जोडप्याच्या हातून.. घोडा धुळ्याचे जेवण आणि रात्री मोठ्यांच्या गप्पा आणि छोट्या सोबतच ईश्वरी चे फटाके फोडणे.. सुनबाई येणार म्हणून काकांनी दरवर्षीपेक्षा जरा जास्तच फटाके आणले होते यावेळेस..

    अनिश, मनिष ,सायली सोबत ईश्वरी ही लहान होऊन फटाके फोडत होती..  ओट्यावर बाजूला असलेल्या तुळशी वृंदावन जवळ दिवे लावले होते.. आकर्षक रांगोळी काढून त्याच्या भोवतीही दिव्यांची आरास केली होती.. काका काकू आणि आई तिघेही ओट्या वर बसून यांची मजा पाहत होते.. साई मात्र उभा राहून बॉक्स मधील फटाके काढून अनिश च्या हातात देत होता.. सायली आणि मनिष थोडे लांब उभे राहून लक्ष्मी बॉम्ब सारखे मोठे फटाके फोडत होते.. आणि अनिश ईश्वरी सोबत फुलबाजी, भुईनळे, आणि चक्र फोडत होते.. सायली ने ईश्वरी ला ही आपल्या सोबत बोलवले पण ईश्वरी ला मोठे फटाके फोडताना भीती वाटायची त्यामुळे ती अनिश सोबत च थांबली..

  " दादा.. ये ना तू पण फटाके फोडायला.." अनिश ने त्याचा हात पकडतच म्हटले..

  "नको, नको.. फोडा तुम्ही.."

  "अनिश , तिकडे कोपऱ्यात नको जाऊस.. इकडे मध्ये फोड फटाके.. गाड्या उभे आहेत ना आपल्या तिथे.."

  " दादा पाऊस..." अनिश ने आवाज दिला आणि बॉक्स मधले भुईनळ्या चे झाड काढून साईने त्याच्या हातात ठेवले...

   "वहिनी, ये ना इकडे.. हे घे झाड पेटवायला.." अनिश ने त्याच्या हातातल्या फुलबाजी वहिनी कडे दिली..

   "ईश्वरी, सांभाळून.. लक्ष कुठेय तुझे..?
अगं काय करतेस तू ? पदर खोच आधी साडीचा..." तिच्या कोपराला खेचत पटकन मागे घेतले साई ने..

   साई तिला ओरडला , तसे ती कावरी बावरी होत आजूबाजूला पाहू लागली.. अनिश ही एकदम शांत उभा राहिला होता.. बऱ्याच दिवसांनी साईदादा च्या चेहऱ्यावर हा राग दिसला होता.. 

   एरवी ही दिवाळीत फटाके फोडताना, जरा कुठे निष्काळजीपणा झाला, की साईचा ओरडा खावा लागायचा.. फटाके फोडताना कोणीतरी मोठे असायचेच त्यांच्याजवळ.. आता ही भुईनळ्याचे झाड पेटवताना ईश्वरी खाली वाकली, तेव्हा तिचा पदर हेलकावे खात पेटलेल्या झाडा जवळ गेला आणि साई ने पटकन ओरडत तिला मागे घेतले..
 
"तो खोच आधी साडीचा पदर.." आपला आवाज नियंत्रित करत आजूबाजूला पाहत त्याने सांगितले..  आपण अचानक तिच्यावर ओरडलो. आणि तिचा चेहरा उतरला हे लक्षात आले, तसे आजूबाजूला इतरही असल्याचे त्याच्या लक्षात आले..

    साईने पाहिले तर काका काकू त्याच्याकडे रोखून पाहत असल्याचे दिसले.. आईचे मात्र लक्ष नव्हते.. एक हात कपाळावर चोळत त्याने ईश्वरी कडे पाहिले.. हातातली फुलबाजी विझून ती तार तिने कधीच बाजूला ठेवून दिली होती.. आणि एका बाजूला जाऊन उभी राहिली होती.

    मनीष आणि सायलीचे ही लक्ष नव्हते वाटतं.. त्यामुळे ते त्यांच्याच धुंदीत , आता पुढे कोणता फटाका फोडायचा याबद्दल चर्चा करत होते..

   "हा.. हे घे. हे फोड आता.." साई ने भुई चक्र च्या बॉक्स मधून एक चक्र काढून अनिश कडे दिले.. आणि वहिनीला द्यायला खुणावले..  तो मात्र आमच्या वहिनीला का रागवले? असा लूक देत उभा होता..  शेवटी चक्र खाली जमिनीवर ठेवत, साईने स्वतःच फुलबाजी पेटवली आणि ईश्वरी समोर पकडली..

   " घे पेटव ते.."

   "नाही.. नको.. मी.. मी नाही पेटवत.. अनिश भाऊजींना द्या तुम्ही... " ईश्वरी जरा मागेच सरकली..


क्रमशः

कथा आवडत असेल तर रेटिंग नक्की द्या आणि त्या सोबतच दोन शब्दांची का होईना, अगदी ? अशी ईमोजी का होईना पण समिक्षा जरूर द्या...

तुमच्या समिक्षांमुळेच लिहायला उत्साह येतो..?