तुम देना साथ मेरा...45

प्रेम





   " मंदिर आहे एक महादेवाचं छान.. नंतर गार्डन आहे,  आपण आलो तेव्हा कॉर्नरला दिसले ना आपल्याला ते.. तशी अजून आहेत दोन तीन आणि किल्ला आहे जवळच.."

   "आता काहीतरी खाऊन घेऊया ना आपण.. मला भूक लागलीय." ईश्वरी ने समोर असलेल्या खाण्याच्या पदार्थांच्या गाड्यांकडे पाहात म्हटलें..

   " ओके.चलं. भूक तर मला पण लागलीय.. उद्या  सकाळीच लेक गार्डन आहे इथे तिथे जाऊया आपणं, मग  रोझ गार्डन, स्टेप गार्डन आणि नंतर महादेव मंदिर ला जाऊया.. संध्याकाळी आपल्याला घरी जायला निघायचे पण आहे.."
रस्त्यावर फिरत फिरत शहराला लागून असलेल्या खाऊ गल्लीत आले होते ते..


"काय खाणार?  हॉटेलमध्ये खाऊया, की इथे खायचे तुला ?" समोर असलेल्या स्ट्रीट फूड च्या गाड्यांकडे इशारा करत साई ने विचारले.

   "मॅगी खाऊया का आपण गरम गरम..? " समोर अंडा भुर्जी , मॅगी आणि चायनीजच्या गाड्या होत्या.  तिकडे पहात ईश्वरीने विचारले.. सर्व पदार्थांचा सरमिसळ वास वातावरणात पसरला होता..

   वातावरणातील थंडीत या पदार्थांच्या वासाने भूक जास्तच तीव्र झाली होती..


     दोघांनी गरम गरम मॅगीचा आस्वाद घेतला.. बाजूच्या गाडीवरच्या भुर्जीपाव चा वास नाकात शिरून, ती खायची ही इच्छा झाली.  तसे साईने भुर्जी पाव घेतले.. खाऊन झाल्यावर तिथल्या दुकानातून ईश्वरी ने थोडीफार सजावटीच्या छोटया वस्तूंची खरेदी केली..

    रात्र वर चढत होती तसा हवेतील गारवा वाढत होता.. रात्रीचे साडे नऊ वाजले तसे ते हॉटेल मध्ये जायला निघाले.. थंडी वाजत असल्याने ईश्वरी ने हाताची घट्ट घडी घातली होती..
   
   "थंडी वाजते."  तिच्या हाताची घट्ट घडी पाहून साई ने विचारलें..

    "हम्म. आताच एवढा गार वाटतय तर हिवाळ्यात किती थंडी असेल ना इथे? "


    "हो.  आम्ही डिसेंबर मध्ये आलो होतो. तेव्हा तर खूपच थंडी होती. आता तर अजून पावसाळा संपतोय.  थंडीमध्ये लवकरच इकडे सामसूम होते..

  हाताची घडी घालून चालणाऱ्या ईश्वरीच्या खांद्या भोवतीने एक हात लपेटत साईने तिला जवळ घेतले, व चालू लागला.. त्याच्या निकटच्या स्पर्शाने ही तीला थोडी ऊब मिळाली..

   हॉटेलची रूम फारसी मोठी नव्हती. बस एक बेड होता.  बेड च्या बाजूला एक लाकडी कपाट, आणि एक स्टूल आणि दोन खुर्च्या ठेवलेल्या होत्या. बेडचा आकारही फारसा मोठा नव्हता. दोन व्यक्ती झोपू शकतील इतकाच..

     दोघांनीही चेंज करून झोपायची तयारी केली. सकाळी लवकर आवरून निघावे लागणार होते. तरच दोन्ही तिन्ही ठिकाणे त्यांना बघता येणार होती.. घरी जाण्यासाठी ही निघायचे होते. त्यामुळे दुपारपर्यंत गार्डन आणि मंदिर पाहून दुपारीच नाशिकला जायला निघायचे, म्हणजे रात्रीपर्यंत घरी पोहोचता येईल, असे साईने ठरवले होते. सोमवारी ईश्वरीला शाळा होती. सोमवारचा दिवस त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाचा होता. त्याच्या टेम्प्ररी का होईना, पण नोकरीचा पहिला दिवस होता..

   ईश्वरी ने अलार्म सेट केला आणि बेडवर झोपली.. साई मात्र मोबाईल मध्ये व्हाट्सअप चेक करत होता.. साईने मोबाईल ऑफ करत बाजूला ठेवला आणि पाहिले , तर ईश्वरी झोपून गेलेली होती.   त्याने ब्लॅंकेट तिच्या अंगावर ओढत बाजूला झोपून घेतले.. नेहमीच्या सवयीने तो बाजूला झोपल्याचे जाणवल्यावर ईश्वरी लगेच त्याच्या कुशीत शिरली होती.  तसे साईच्या गालात हसू फुलले. आणि त्यानेही तिला घट्ट मिठीत घेत झोपून घेतले..

    " ईशु... ऊठ.. सहा वाजलेत.. "

    "अं... पाच मिनिट फक्त.."  म्हणत ती अजूनच त्याच्या कुशीत शिरून झोपली.. साई ने डोके उचलून पाहिले तर बँकेत अर्धवट बेड बाहेर लोंबकळत होते.  त्यामुळे थंडी वाजत होती. आणि म्हणूनच ईश्वरी अजूनच त्याच्या जवळ सरकून त्याच्या मिठीतली ऊब मिळवण्याचा प्रयत्न करत होती..

    त्याने हळूच तिचा त्याच्या पायावर असलेला पाय बाजूला केला, कपाळावर , गालांवर ओठ टेकवले. आणि तीच्या अंगावर ब्लँकेट ओढून देत तो उठला.  त्याची आंघोळ वगैरे उरकेपर्यंत तिची अजून काही वेळ झोप होणार होती..

    "इशू..  ईश्वरी, ऊठ.. साडेसहा झालेत..  स्वतः  आवरून तयार झाल्यावर साईने पुन्हा एकदा तिला उठवले. आळस देतच ईश्वरी उठून बसली.. नेहमीप्रमाणे आपण घरी नाही, तर बाहेर फिरायला आलोय हे लक्षात आले, तसे पटकन ती बेड वरून खाली उतरली..

    "अहो, जरा लवकर उठवायचे ना मला.." डोळे चोळतच तिने म्हटले. आणि त्याला हसायला आले..
भरभर अर्ध्या पाऊण तासात तिनेही तिचे आवरले आणि आठ वाजता दोघेही बाहेर पडले होते हॉटेलमधून..  चेक आउट केल्याने बॅग सोबतच होती..


   "आधी महादेव मंदिरात जाऊया आपण आणि मग गार्डनला येऊ." साई ने चहा घेता घेता तिला सांगितले..
तिथले फेमस बटाटा पोहे खाऊन  टॅक्सी ने ते महादेव मंदिरात जायला निघाले. मंदिर तसे जवळच होते..
मंदिरात दर्शन घेऊन थोडा वेळ घालवून दोघेही तलावाच्या किनाऱ्यावर फिरले..  तिथून ते स्टेप गार्डनला आले..  लेक गार्डन, रोज गार्डन तिन्ही ठिकाणी फिरण्यात, फोटो काढण्यात दुपार झाली होती.. दोघांनी ही दुपारी प्रॉपर जेवण न करतां असेच सटरफटर खाल्ले..

सापुताऱ्याहून निघता निघता चार वाजले..
बस स्टँड वर आल्यानंतर साईने नाशिकला जाण्यासाठी टॅक्सी बुक केली होती..

    नाशिकला पोहोचल्यानंतर तिथे जेवण करून, मिळेल त्या एक्सप्रेसने रात्री दहा-साडेदहाच्या दरम्यान साई आणि ईश्वरी कल्याणला पोहोचले..

    ईश्वरी च्या आईचा रात्रीच्या जेवणासाठी व पोहोचले का? विचारण्यासाठी फोन येऊन गेला होता.. आईला आम्ही जेवण येतोय आणि उद्याची तयारी करायची त्यामुळे डायरेक्ट घरीच जातो. असे म्हणत एक दोन दिवसात भेटायला येतो असे ही सांगितले तिने..

    घरी आल्यावर परत दुसऱ्या दिवसाची तयारी करता करता झोपायला तसा उशीरच झाला.. उद्या साईच्या नोकरीचा पहिला दिवस. तसेच लवकरच निघायचे होते म्हणून साई सकाळी रिक्षा घेऊन जाणार नव्हता..  रविवार आणि सोमवार दोन दिवस त्याने आपले भाजीवाल्या मावशींचे व फुल वाल्याचे भाडे दीपकला ऍडजेस्ट करायला सांगितले होते..

  *"*"*"*"*"*"*


    "अहो,  हा तुमचा टिफिन. पाण्याची बॉटल या बॅगेत ठेवलेय ..पोहोचल्यावर कॉल करा.." ईश्वरीने साईच्या हातात त्याची बॅग देत म्हटले..

    आज नोकरीचा पहिला दिवस, म्हणून साई पेक्षा तीच जास्त एक्साईटेड होती..

    "संध्याकाळी मी घ्यायला येतो तुला." साई बॅग घेत म्हणाला..

   "अहो, नको..  घाई होत जाईल तुम्हाला..  घरी येऊन लगेच निघावे लागेल.  त्यापेक्षा मी येत जाईन रिक्षाने.. "

    " बघू आज किती वाजतात घरी यायला.  त्यावर डिपेंड आहे.. लवकर आलो तर येईल.. "

   "ठीक आहे.. तसें कळवा मला."

   " येऊ मी?"  त्याने तिचा निरोप घेतला..  अलगद एका बाजूने तिला मिठीत घेत कपाळावर ओठ टेकवले.. कपाळावर त्याच्या ओलसर ओठांचा स्पर्श होताच ईश्वरीचे डोळे बंद झाले..  निरोप घेण्याचा हा क्षण भलताच गोड वाटला तिला..

   
    दुपारी मधल्या सुट्टी मध्ये ईश्वरीने साईला फोन केला होता. पण त्याने मात्र उचलला नाही. कदाचित फोन अलाउड नसेल म्हणून तिने फक्त हाय चा मेसेज पाठवून मोबाईल ठेवून दिला. नंतर कामाच्या गडबडीत तिला ही मोबाईल पाहायला वेळ मिळाला नाही..

    संध्याकाळी शाळा सुटल्यावर तीने गेट बाहेर आल्यावर इकडे तिकडे नजर फिरवून पाहिले.  पण घ्यायला येतो  म्हणणारा साई मात्र काही तिला समोर दिसला नव्हता..  मोबाईल चेक केला तर तिच्या 'हाय ' च्या मेसेज वर त्याचा 'आधी बिझी आहे, नंतर करतो.' म्हणून व आता काही वेळापूर्वी 'आत्ताच काम संपलय, त्यामुळे घ्यायला यायला जमणार नाही. तू रिक्षाने निघून ये.' असा साई चा मेसेज होता. ती ही मग फार वेळ न घालवता घरी यायला निघाली..


     घरी आली तर दरवाजा फक्त लोटलेला होता.. म्हणजे साई घरी आलेला होता.. दरवाजा उघडून ती आत आली. बॅग ठेवली आणि किचनमध्ये शिरली..

    "तू? तू.. केव्हा आलीस?" ईश्वरी ला अचानक समोर पाहून साई गोंधळला..

    " मी ? ही.. ही.. काय आ.. आताच आले..." समोर फक्त टॉवेलवर असणाऱ्या साईला पाहून तिची बोबडी वळली होती..

    साई ही इकडे तिकडे अंगावर घेण्यासाठी काही दिसते का? ते पाहत होता. पण एकटेच तर आहोत घरी, अजून ईश्वरी ला यायला वेळ आहे , असे म्हणत त्याने बाथरूममध्ये जाताना आपले कपडे नेले नव्हते..  आणि याचाच आता त्याला पश्चाताप होत होता..

     तिच्यासमोर अशा अवस्थेत येण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती.. दोघेही अत्यंत अवघडलेल्या स्थितीत उभे होते..

     नुकताच आंघोळ करून आलेला साई ही तिला अचानक समोर पाहून स्तब्ध झाला होता.. भानावर येताच तो तिच्याकडे न पाहता पटकन बाहेर आला.. आणि आपला संडो बनियन घालू लागला..

    तिने पुन्हा दरवाज्यातून वाकून पाहिले...

     एरवी झुपकेदार असलेले त्याचे केस ओले झाल्यामुळे कपाळावर चिकटलेले होते.  केसातून , मानेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब त्याच्या केसाळ छातीवर येऊन केसांमध्ये अडकलेले पाहून आणि त्याचे ते बलदंड बाहू पाहूनच ईश्वरीचा श्वास घशात अडकला होता..

     आतापर्यंत साई ला ट्रॅक पँट , बर्मुडा, बनियन मध्ये पाहण्याची सवय झाली होती तिला..  पण असा फक्त टॉवेल गुंडाळलेला, वरती पूर्ण उघडाबंब असणारा साई मात्र आज पहिल्यांदाच पाहत होती.. कितीही वळवली तरी नजर त्याच्यावरच वळत होती..

     मानेपासून ते पाठीच्या मणक्यापर्यंत एक वेगळीच लहर शरीरात धावायला लागली होती.. पोटात फुलपाखरे नाचू लागली होती.. श्वास तर नियंत्रणा बाहेर चालले होते.. त्याला तसें पाहून गालांवर लाजेची लाली पसरली होती..

    स्वतः च्या छातीवर हात ठेवतच तीने वाढलेले श्वास आवरले.. पुन्हा एकदा किचन च्या दरवाज्यातून बाहेर पाहिले तर तो कपडे घालून तयार झालेला होता..


क्रमशः