तुम देना साथ मेरा..42

Prem


    फक्त त्यांच्या आईसमोर ते काही बोलत नाहीत किंवा तिची बाजू घेत नाहीत.. पैशांबाबतीत थोडा स्वार्थी स्वभाव आहे त्यांचा.. तिच्या वडिलांकडून अपेक्षा असतात.. पण प्रेम मात्र मनाली वर खूप आहे,  हे तिच्या बोलण्यातून नेहमीच जाणवतं .. आणि भूषण भाऊजी ही कधी भेटले की, तिच्या बद्दल च्या बोलण्यातून, थट्टा मस्करीतून कळतच ते..

     भूषणचा विचार करता करताच साईच्या ही मनात आपल्याबद्दल असल्या काही भावना असतील का? हा विचार क्षणात चमकून गेला..  सकाळची त्याची ती मिश्किल नजर , तो मिश्किल स्वर आणि कपाळावर टेकवलेले होठ , पुन्हा एकदा अंगावर शहारा उमटवून गेले..  मनातले विचार झटकतच तीन पुन्हा वर्गात मुलांना शिकवायला सुरुवात केली...

    आता सध्या तिची प्रायोरिटी फक्त हीच बच्चे कंपनी होती..  आणि जोपर्यंत त्यांच्यासोबत ती आहे, तोपर्यंत आता घरातले वगैरे विचार काही तिच्या डोक्यात येणार नव्हते.. लहान मुलांमध्ये हीच तर शक्ती असते..
   जोपर्यंत आपण त्यांच्या सानिध्यात असतो, तोपर्यंत कुठलेही भलेभुरे विचार आपल्या मनाला शिवत नाहीत.  सगळं काही विसरून जातो आपण त्यांच्यासोबत.. मोठ्या मुलांना शिकवण्यापेक्षा लहान मुलांमध्ये रममाण होऊन शिकवणे, त्यांच्यासोबत मजा मस्ती करणे, त्यांना गोष्टी सांगणे, कविता, बडबड गीत म्हणून दाखवणे, त्यांच्यासोबत लहान होऊन मैदानावर खेळणे हे खूप आवडायचे तिला..

     म्हणूनच प्राथमिक शिक्षिका होण्याचं पूर्वीपासूनच तिच स्वप्न होतं, अगदी तिच्या पप्पांसारखंच..  लहानपणापासून तिच्या पप्पांना शाळेत शिकवताना,  त्यांच्यासोबत शाळेत गेले की त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळताना तिने पाहिलं होतं.. आपसूकच  तेव्हापासून तिच्याही मनात आपणही शिक्षिका व्हावं ही इच्छा मूळ धरू लागली होती..  तिच्या आई पप्पांना ही काही हरकत नव्हती..

    "आला का फोन नवऱ्याचा?" मनाली ने निघतांना ईश्वरी ला विचारलें..

    " नाही.. फोन पण नाही, नी मेसेज पण नाही.."

     "बर..  मग तू करून बघ.. "

    "हो.. तेच करते..  आता शाळा सुटली , कदाचित आले असतील घ्यायला...."

    "  हम्म, बरे होईल.. आज मला जरा पुढे जायचेय..त्यांना हक्काने सोडायला सांगता येईल.." बनकर मॅडम म्हणाल्या, तसें मनाली आणि ईश्वरी ला हसू आले..कोणाचे काय नी कोणाचे काय?

   बनकर मॅडम, मनाली आणि ईश्वरी तिघी ही बाहेर पडल्या..

"चल मी निघते.. " मनाली म्हणाली आणि विरुद्ध बाजूला जाणाऱ्या रिक्षात बसली..

  गेट बाहेर पडल्यावर साई समोर दिसला नाही, तसें तिने साईला फोन लावायला घेतला..
रिंग होत होती पण फोन मात्र उचलला जात नव्हता..  मनात काळजी दाटून आली होती.. कदाचित आल्यावर थकून झोपला असेल तो, असे म्हणून तिने मोबाईल पर्स मध्ये ठेवला आणि रिक्षात बसली..


  " हॅलो, हॅलो, मघाशी फोन केला होता मी..  तुम्ही उचलला नाहीत , मेसेज ही नाही काही..  कुठे आहात तुम्ही?" रिक्षात बसल्यावर साई चा फोन आला, तसें कॉल उचलत ती घाईत म्हणाली..

    "मी चौकात उभा आहे.. रिक्षातून उतरली की समोर साड्यांचे दुकान आहे बघ..  त्याच्या समोरच मी उभा आहे.."

    ' ओके, ओके.. पोहोचते मी दोन मिनिटात..  जवळच आहे आता.."

   " काय ग ? अहोंचा चा फोन होता का तुझ्या ?" बनकर मॅडम ने विचारले..

    "हो.."

   "अरे वा!  घ्यायला आलेत वाटत चौकात तुला.. करमत नाही नवऱ्याला तुझ्या शिवाय.. हम्म .." बनकर मॅडम हसतच म्हणाल्या.. तसें ईश्वरी लाजली..

    चौकात रिक्षा थांबली, तसे उतरल्यावर समोर पाहिले ईश्वरी ने, तर साडी शोरूमच्या पुढे साई उभाच होता..  बनकर मॅडम ना बाय करून ती रस्ता क्रॉस करून पलीकडे पोहोचली..

   "अहो, इथे काय करताय तुम्ही? आणि दुपारपासून फोन वगैरे काहीच नाही केलात ? कसा गेला पेपर?  केव्हा आलात घरी?"

   अग हो, हो. शांत हो जरा.. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो मी..  घरी दुपारीच आलो होतो.  पण एका ठिकाणी अर्जंट बोलावलं होतं, म्हणून तिथे गेलो..  आणि फोन स्विच ऑफ झाला होता.  त्यामुळे तुला कळवता ही आले नाही..
चल जरा माझ्यासोबत.."  त्याने तिचा हात पकडूनच समोर असलेल्या दुकानात तिला नेले..

    दुकान पाहून तिला आश्चर्यच वाटले..  आत मध्ये गेल्यावर त्याने तिथल्या काउंटरवर फ्रीज बघायचा आहे, म्हणून सांगितले..

   "आपण.. आपण फ्रिज घेतोय? " ईश्वरीच्या स्वरातला आनंद सहज दिसून येत होता..

    " हो. बघूया ना. आवडला तर घेऊया आपण...

     " अहो, पण पैसे."

    " तू पसंत कर ना.. पैशांचे बघूया आपण.."

     वेगवेगळ्या कंपन्यांचे दहा-बारा फ्रिजवर पाहिल्यावर त्यातला एक फ्रीज ईश्वरीला आवडला..  साईने त्याची किंमत काढली..
काही रक्कम आता भरून ई एम आय ठरवून घेत त्याने फ्रिज बुक केले.. ईश्वरीच्या चेहऱ्याकडे पाहिले ती खूपच खुश दिसत होती..

   "हाच फ्रिज फिक्स करायचा ना ईश्वरी?" साई ने पुन्हा एकदा ईश्वरी ला विचारून कन्फर्म केले..

   " हो हो.. छान आहे हाच..  आपल्याला जास्त मोठा नकोच आहे.."

   " बर..  एक दोन महिन्यांनी असंच टीव्ही पण घेऊया आपण.."  दुकानातल्या शोरूम मध्ये लावलेल्या टीव्ही कडे वारंवार वळत असलेली तिची नजर पाहून, त्याने हळूच तिच्या कानाजवळ म्हटले..

    "चालेल..  अहो..  एक बोलू का?" ईश्वरी ने थोडे दबकत विचारलें..

    " बोल ना.. काय झालं?"

    " तुम्हाला राग नाही ना येणार?"

    " नाही.. तू बोल ना.. अजून काही हवय का?"

    "नाहीं.. म्हणजे... माझ्याकडे आहेत पैसे.. मी देऊ का? एकदाच दिले पैसे तर .." तिने जरा भीत भीतच विचारले..

    त्याने क्षणभर तिच्याकडे रोखून पाहिले. आणि मग तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत , तो पुन्हा तिथल्या माणसाशी पुढच्या प्रोसिजर बद्दल बोलू लागला..

    आपले बोलणे त्याला आवडले नाही, हे ईश्वरीला जाणवले..  तीने ही मग पुन्हा काही विषय घेतला नाही..  उगाच त्याला कमीपणा दाखवायचा नव्हता तिला..  असो असू दे आपल्याकडे साठलेले..  कधीतरी कुठल्या तरी कामासाठी उपयोगी येतीलच .. हळूहळू साई ला ही हे पटवून देऊ आपण , या पैशांवर त्यांचाही हक्क आहे म्हणून..

    दोघेही घरी आले..  एका तासात फ्रिजची डिलिव्हरी येणार होती..  ईश्वरीने हातपाय धुवून पटकन चहा ठेवला..  तिने पैशांचा विषय काढल्यापासून साई जरा गप्पच होता.. आणि त्याचे ते गप्प असणे तिच्या मनाला खात होते...

    "अहो, सॉरी तुम्हाला वाईट वाटेल, म्हणून नाही बोलले मी..  पण खरंच थोडेफार माझे पैसे घेतले तर काय झाले?  आपल्यासाठीच आहेत ना ते.. "  चहा पिता पिता पुन्हा तिने विषय काढला..

    "ईश्वरी जसे माझे पैसे तुझे आहेत , तसे तुला वाटते तुझे पैसे माझे आहेत, हे मला मान्य आहे.. पण सध्या मी करतोय ना प्रयत्न.. होतील हळूहळू आपल्या सगळ्या वस्तू.. आता फ्रीज घेतला.. एका ओळखीच्या मित्राकडे टीव्ही आहे. दोनच वर्षे झालेत त्याला.  अजून मोठा घ्यायचा म्हणून त्यांनी विकायला काढलाय. किंमत कमी आहे म्हणून विचार करून तो पण घेऊन टाकू..  त्याला पैसे हळू हळू दिले तरी चालणार आहे.   बाकीच्या वस्तू नंतर बघू.. आणि तुझ्या पगाराचे पैसे राहू दे तसेच..  साठव ते. कधीतरी उपयोगी येतील आपल्यालाच.."

    " पण..  म्हणजे तुम्ही घेणार ना पुढे ते पैसे , आपल्याला काही काम पडले तर ?"

    "हो. का नाही..  नक्की घेणार... पण खरंच खूप आवश्यकता असली तर. जोपर्यंत मला शक्य आहे आपले घर, घरातील वस्तू, हे सगळे मलाच घेऊ दे..  तुझ्या पगाराचे पैसे राहू दे बँकेत..  अचानक कधीतरी काम पडेल आणि नाहीच पडले तर त्याच्या तू तुझ्यासाठी काही दागिने घेऊ शकतेस.. " त्याने असे म्हटल्यावर तिला हायसं वाटलं. चला पुढे कधीतरी, काहीतरी कारणासाठी आपले पैसे तो घेईल. याचा एक दिलासा वाटला होता..

    थोड्यावेळाने फ्रीज आला तसे, तिने त्याची पूजा करून आत मध्ये घेतला.. शेजारच्या काकू काका नवलाईने नवा फ्रिज बघायला आले होते..  त्यांच्यासाठी चहाही ठेवल्या गेला..  दोघांचाही प्रेमळ आणि लाघवी, स्वभाव यामुळे शेजारच्यांशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते..

    फोन करून आईला ही नवीन फ्रिज घेतल्याचे कळवून झाले..  हळूच फोटो सायलीलाही पाठवला गेला..  आपला आनंद आपल्या हक्काच्या माणसात वाटल्याने तो
अजूनच वाढतो, नाही का?  ईश्वरीचे ही तसेच झाले होते..

   तिचा आनंद अजूनच द्विगुणित झाला.  जेव्हा साईने तिला रात्रीचा स्वयंपाक न करू देता, बाहेरून तिच्या आवडीच्या जेवणाचे पार्सल मागवले.


   " ईश्वरी, आपल्यासाठी अजून एक आनंदाची गोष्ट आहे.." रात्री जेवण झाल्यानंतर दोघेही झोपायची तयारी करत होते..

   "काय?"

   " दुपारी तुला फोन नाही करता आला , मेसेज ही केला नाहीं ..कारण ही न्यूज मला तुला अशी समोरा समोर सांगायची होती.." त्याने बेडवर लेटत म्हटलें..

  " न्यूज? कसली?" ती ही झोपली बाजूला..

  " इथे एक पतपेढी आहे..  तिथे अकाउंट च्या नोकरीसाठी मला विचारले होते.."

   " काय, खरंच ?"  ती त्याच्या कडे तोंड करत एका कुशीवर वळली होती..

     "हो..  तिथेच गेलो होतो.  पगार थोडा कमी आहे, पण महिनाभर रिक्षा चालवून तेवढेच मिळतात.. त्यात सकाळी दहा ते पाच पर्यंत वेळ आहे पतपेढी चा.. त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर रिक्षाही चालवता येईल.."

    " मग तुम्ही काय सांगितले?"

    " नाही अजून सांगितले नाही..  त्यांनी उद्यापर्यंत सांगायला सांगितलेय.. त्यांना अर्जंट जागा भरायची आहे.. "

   " मग द्या ना होकार.. तेवढाच तुम्हाला अनुभव येईल.  आणि पुढे असेही तुम्हाला बँकेतच नोकरी करायची आहे ना,  त्या दृष्टीने बरं पडेल.."

   " तोच विचार करत होतो.. पण तुला विचारण्या साठी थांबलो होतो.. उद्याच होकार देऊन येतो.."

   "अहो, आता तुमची एक्झाम संपली..  उद्या जर तुम्ही या नोकरीसाठी हो सांगाल, तर तिथेही तुम्हाला लगेच जॉईन व्हावे लागेल..  त्याआधी आपण वनीला जाऊन येऊया का?  पुन्हा तुम्हाला सुट्टी नाही घेता येणार लगेच.." त्याच्या कडे आशेने पाहतच तिने त्याला विचारले.. तेव्हढेच देवकार्या सोबत त्याच्या बरोबर फिरणे ही होणारं होतें..


क्रमशः