तुम देना साथ मेरा..35

प्रेम

 
  " नको..  तुम्ही जेवा.... पप्पा वाट बघत असतील जेवणा साठी.. येतो मी.. आणि लॅपटॉप राहू दे उद्या पर्यंत.. कॉलेज ला जाणार नाहीये मी उद्या.."

   "नको.. मी रात्रीच फिल अप करून टाकते माहिती.. रात्री अकरा नंतर साईट चांगली चालते.. तीन चार तासात होऊन जाईल.. सकाळीं येऊन घेऊन जा तुझा लॅपटॉप.. उगाच काही डिलीट झाले माझ्याकडून तर वैतागशिल.." ती हसून म्हणाली असली तरी, तिच्या स्वरातला टोमणा कळला शिवम ला.. गेल्या वेळेस त्याच्या असाईनमेंट च्या फाईल डिलीट झाल्या होत्या तिच्याकडून.. आणि वैतागला होता तो..


    " काही डिलीट होणारं नाही.. मी लॉक केल्यात माझ्या फाईल्स.. बर बघू.. एव्हढी जागून करशील रात्री.. उद्या शाळा आहे ना?"

  " हो.. पण एकदाचे काम झाले की मोकळे.. असे ही दिवस भरात बऱ्याच वेळेस फक्त गोल गोल फिरतच असत साईट वर.. मी करते तुला सकाळी कॉल.."

  " ठीक आहे.. चल येतो.. बाय ताई.. बाय जिजू.. "  शिवम दोघांचा निरोप घेत लगेच निघाला..

   "तुला आवडत चिकन.." साई ने तिला चिकन खाताना बघून विचारलें..

  

   "हम्म..  थोडस... आधी नाही खायचे मी.. पण मैत्रीणी मुळे खायला लागली.. त्यात शिवम ला खूप आवडते.. मग दोघे कधी मार्केट ला गेलो की चिकन लॉलीपॉप खाऊन यायचो.  तुम्हाला सुकी मच्छी आवडते ना? ते दिपक भाऊजी सांगत होते.."

   "हो.. त्याची आई डबा पाठवायची माझ्यासाठी मच्छी चा.. तुला आवडते ?"

   "अंह.. मी अंडे, चिकन आणि मटण खाते.. मच्छी चे काटे बघूनच भीती वाटते.. आणि तो उग्र वास.. नको वाटतो.." तीने कसेतरी तोंड करतं सांगितले..

   "खाऊन बघ.. छान लागते.. काटे नसलेली मच्छी खाऊ घालेल मी तुला.. ताज्या मच्छीचा वास नाही येतं एव्हढा.. आणि तुला बाकी नॉन व्हेज खायचे असले तर सांगत जा.. आणून देत जाईन मी.. "

  " हां.. तुम्हाला आवडते ना? तुमच्यासाठी बनवत जाईन मी.. फक्त फिश नाही जमणार बनवायला.. का? हसलात का?" तो ती बोलत असताना मध्येच हसला तसें तीने जरा त्रासिक सुरात विचारलें..

  
   "काही नाही.. आधी दर बुधवारी आणि रविवारी शेजारच्या जाधव काकू नॉन व्हेज आणून द्यायच्या वाटीत.. पण आता तुला आवडेल की नाही म्हणून आणत नाहीत.. दीपक पण विचारत होता, वहिनींना चालेल का म्हणून? तुला सॉलिड घाबरतात सगळे.."

   "घाबरत वगैरे काही नाही.. ते आदर करतात मी शिक्षिका असल्याने.. आणि सांगा त्यांना, माझी काही हरकत नाहीये. त्यांनी डबा दिला तरी.. " ती लगेच नाक फुगवून म्हणाली..

    "अरे चिडतेस काय? मी सहज म्हणालो.." तिला चिडलेले पाहून लगेच नरमाईने म्हणाला तो..

   " हम्म.. तुम्हाला खायचे असल्यावर घेऊन येतं जा.. मी बनवत जाईन.."  म्हणतच ती जेवणाची भांडी उचलत म्हणाली..


    "ईश्वरी.. भांडी वगैरे राहू दे.. तू तुझे ऑनलाईन कामे करायला बस. म्हणजे लवकर होईल.. " त्याने तिला भांडी वगैरे किचन मध्ये ठेवायला मदत केली होती.. आणि आता ती भांडी घासायला घेईल तर म्हणाला..

  "नको.. थोडीशीच आहेत.. लगेच होतील घासून.. "

  ईश्वरी ची भांडी वगैरे घासून झाल्यावर ती आपले कॅटलॉग आणि शिवम चा लॅपटॉप घेऊन बसली.

 "  मी करू का मदत.. तू सांग मी टाइप करतो.."

  " नको.. तुम्ही तुमचा अभ्यास करा.. मी भरते माहिती.. असे ही विद्यार्थ्यांची नावे मला माहीत असल्याने पटकन शोधता येतील.. तुम्हाला वेळ लागेल. क्रमाने नाहीयेत ती.." ईश्वरी म्हणाली. तसें तो ही तिथे बाजूला आपला मोबाईल घेऊन बसला..


  " ईश्वरी, झोप आता.. एक वाजलाय.. बाकीचे उद्या कर.."  साई ने आपला मोबाईल बंद करत म्हटलें..

   "बास.. जराच वेळ.. फास्ट चालतेय साईट आता.. त्यामुळे पटापट होतय भरून.. तुम्ही झोपा.. मी झोपते अर्ध्या तासात.."  तीने लॅपटॉप वर बोटं चालवतच सांगितले..

   "हम्म.. जास्त जागू नको पण.. सकाळीं मी बाहेरुन लॉक करून जाईन.. तू उठू नकोस.... साडे सात पर्यंत येईन मी.. "

   "नको अहो.. तुम्ही पण नका ना जाऊ उद्या.. माझ्या मुळे एव्हढे जागत बसलात आज.. उद्याच्या दिवस झोपा आरामात.... "

   "नाही अग.. सकाळीं भाजी वाल्या मावशीच्या भाजी पोहोचवायचे , आणि फुलवाल्याचे भाडे असतें रोज चे.. ते  वाट बघतील.. मी आल्यावर झोप काढेन नंतर.. "

   "हम्म... ठिके.. झोपा तुम्ही.. मी झोपते जरा वेळात.. गूड नाईट.. " तीने गोड हसत म्हटले. आणि पुन्हा आपल्या कामात लक्ष घातले..

   "गुड नाईट.." म्हणत त्याने ही झोपून घेतलें.. लगेच पाच वाजता उठायचे होतें त्याला.. ईश्वरी ला सोबत म्हणून तो ही जागा होता आज उशिरा पर्यंत अभ्यास करत..
  
   रात्री जवळ जवळ पावणे दोन पर्यंत सगळी माहिती भरून झाली ईश्वरी ची.. लॅपटॉप बंद करून ठेवला आणि साई च्या बाजूला येऊन झोपली ती..

   ईश्वरी ने सांगितल्या पासून तो बेड वरच झोपत होता.. पण कुठेही ईश्वरी ला धक्का लागणार नाही याची काळजी घेत.. ईश्वरीच रात्री त्याच्या मिठीत शिरायची.. आणि तो सकाळी उठून विचार करत बसायचा, मी ईश्वरी ला मिठीत केंव्हा घेतले म्हणून..

    साई चा हाच इनोसंटपणा ईश्वरी ला अधिकाधिक त्याच्या जवळ खेचत होता.. हल्लीं तो आपल्याकडे आपल्या न कळत टक लावून बघतो.., आपण छान तयार झालो की हरवून जातो.. सकाळी उठल्यावर आपण झोपेत असताना आपल्या कपाळावर किस करतो. हे सगळे जाणवल्यावर अंगावर मोरपीस फिरल्याचा फिल यायचा तिला.. आता कपाळावरुन त्याच्या ओठांचा प्रवास, गालावर आणि त्या पुढे कधी होतो, याची प्रतिक्षा होती.. या विचारानेच रोमांचित झाली ती..

   तिने त्याच्या ब्लँकेट मध्ये शिरत, त्याला मिठी मारून झोपून घेतले..
  झोपेत तिच्या गलांचा मुलायम स्पर्श साई ला छातीशी जाणवला तसें चुळबुळत अधिकच जवळ खेचले त्याने तिला..

    'हम्म.. झोपेत घट्ट मिठीत घेतात आणि जागी असल्यावर मात्र चार हात लांब पळतात.' मनातच म्हणत ईश्वरीने ही आपल्या हातांची पकड घट्ट केली..

   

     सकाळी उठल्यावर रोज प्रमाणेच तिला त्याच्या मिठीत पाहून त्याला छान वाटले होते.  तो जरी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असला, तरी तिचे जवळ असणे मनाला सुखावत होते.. तिच्या जवळकीची त्यालाही सवय होत चालली होती. 

    साई ने तिच्या गालावर पसरलेले तीचे केस कानामागे सारले.. आणि कपाळावर ओठ टेकवले.. जरा वेळ झोपेत असलेल्या तिच्या चेहऱ्याकडे निरखुन पाहत राहिला.. नकळतच ओठ कपाळासोबत गालावर ही टेकले गेले आपसूकच.. आणि त्याच्या स्पर्शाने झोपेत असलेली ती आपला चेहरा त्याच्या मानेत घुसळत अधिकच बिलगली.. आणि शहारला तो.. तिच्या पासून दूर होणे अवघड होत होते.. पण लांब ही राहायचे होतें.. मन, बुध्दी आणि शरीर यात वेगळेच युद्ध सुरु होते..


     रात्री म्हटल्याप्रमाणे सकाळी साई खरच बाहेर कुलूप लावून निघून गेला होता..  ईश्वरीचा साडे सहाला होणारा अलार्मही त्याने बंद करून ठेवला..  जेणेकरून तिची झोप व्यवस्थित होईल.

    ती एवढी छान नोकरी करणारी आणि आपण मात्र केवळ रिक्षा ड्रायव्हर हा न्यूनगंड मनात अजूनही सलत होता. त्यामुळेच नात्यात पुढाकार घ्यायला त्याचे मन धजावत नव्हते.. 

    तिला पत्नी म्हणून स्वीकारण्या आधी,  वैवाहिक संबंध स्थापित करण्या आधी, त्याला स्वतःला तिच्या लायक बनवायचे होते.. म्हणूनच हल्ली तो झपाटल्या सारखा अभ्यासाच्या मागे लागला होता..  कोणत्याही परिस्थितीत यावेळेस ही एक्झाम त्याला पास करायचीच होती..

     रिक्षा चालवणे ही त्याने आता हळूहळू कमी केले होते..  फक्त हे सकाळचे त्याचे ठरलेले भाडे मात्र तो सोडू शकत नव्हता..

    रोज सकाळचे भाडे आणि संध्याकाळचा जरा वेळ एवढा वेळ जरी रिक्षा चालवली तरी, त्याच्या महिन्याचे रिक्षाचे भाडे आणि थोडाफार खर्च निघून जात होता. ईश्वरीने सांगितले असले तरीही, तिच्या पगारावर पूर्णपणे घर खर्चासाठी अवलंबून राहणे, त्याच्या मनाला पटत नव्हते..

   साडेसात वाजता साई परत आला तरीही, ईश्वरी गाढ झोपलेली होती. दरवाजा उघडण्याच्या आवाजाने तिला जाग आली. भिंतीवरच्या घड्याळाकडे लक्ष गेले आणि ती उठून बसली.. 

    रोज पेक्षा एक तास उशीर झाला होता आज उठायला.. रोजचा सकाळचा अर्धा तास चालणारा योगाचा कार्यक्रम आज तीने रद्द केला..  असेही साई समोर योगा करायला तिला जरा ऑकवर्डच वाटत होते..

     "कुलूप लावून गेला होतात तुम्ही?" तिने त्याला विचारले.

  " हम्म... "

  "अलार्म पण नाही झाला माझा..  जागच नाही आली मला.." खांदयावर उतरलेला गाऊन सरळ केला, आणि  केस वर बांधून रबर लावले तीने..

   " हो मीच बंद केला होता.  रात्री उशिरा झोपलीस तू,  म्हणून म्हटलं सकाळी तरी झोप पूर्ण होऊ द्यावी..  असेही दिवसभर शाळेत आराम करायला मिळणार नाही..  दूध ठेवलेय किचन ओट्यावर मी.."  तो तिच्या मोहक हालचाली न्याहाळत म्हणाला..

    अस्ताव्यस्त झालेले केस, चेहऱ्यावरचे झोपाळलेले भाव, आणि नेव्ही ब्लू रंगाच्या बाटिक गाऊन मधले तीचे बांधेसूद शरीर.. नजर हटवावी तरी कशी?

    गेल्या आठवड्यात जरा भीत भीतच रात्री गाऊन घातला तर चालेल का? म्हणून विचारल्यावर त्याने, तिला दुकानातून दोन गाऊन घेऊन दिले होते.. रात्री झोपेपर्यंत कुर्ती आणि लेगिज, नंतर झोपताना गाऊन कंफर्टेबल वाटायचा तिला..

   "मी फ्रेश होते आणि चहा ठेवते.. "  तिने आंघोळ वगैरे उरकली आणि नाश्त्यासाठी उपमा करायला घेतला. एका बाजूला चहाही उकळत ठेवला..

    उपमा झाला तसे दोन्हीं गॅस बंद करून, देवपूजा करायला घेतली तीने..

    "अहो, आज पण गजरा आणलाय तुम्ही? " विचारण्यात प्रश्न असला तरी, आवाजातला आनंद लपत नव्हता तिच्या..

   
क्रमशः