तुम देना साथ मेरा..34

प्रेम


"अग.. बायको एव्हढी सुंदर दिसत आहे.. मग नवरा दुसऱ्या कोणी तिच्या कडे पाहू नये म्हणून सोबत आलाय.. हो ना?"

 "  चल काही तरीच.. रोजच येतात ते सोडायला.." ईश्वरी ने जरा लाजतच सांगितले..

  " ओ हो.. पण हा गालावर चा ब्लश रोज चा नाहीये.. नक्की काहीतरी घडलेय आज तुमच्यात.. हम्म.."  मनाली ने तिच्या खांदयावर लाडाने मारत म्हटलें..

 " नाहीं ग बाई.. काही नाही घडलेय.. तू चल.. थंब करूया आणि जाऊया वर्गात.. बेल होईलच आता.." म्हणत ईश्वरी ऑफिस मध्ये शिरली.

   दिवसभर आज ईश्वरी शाळेची कामे आणि तीचे विद्यार्थी यातच बिझी होती.. इयत्ता 3री च्या त्या छोट्या छोट्या निरागस मुलांमध्ये ती रमून जायची.. शाळेत लागली तेंव्हा पासून हा वर्ग तिच्याकडेच होता.. त्यामुळे केवळ मुलांबद्दलच नाही तर त्यांच्या पालकांबद्दल, त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल सुध्दा तिला काही प्रमाणात माहिती होती..

    दिसायला सुंदर, विद्यार्थ्यांच्या अडचणी न रागावता सोडवणारी प्रेमळ आणि हुशार ईश्वरी टीचर सगळ्या मुलांची आवडती होती..

    सध्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती भरायचे काम चालू असल्याने शाळेत शिकवण्या बरोबरच ते काम सुद्धा सुरू होते.. शाळेच्या शिकवण्याच्या वेळात त्यांना वर्ग सोडून ऑनलाईन कामे करण्याची मुभा नव्हती.. त्यासाठी शाळा सुटल्यावर एक्सट्रा थांबून माहिती भरावी लागणार होती.. किंवा कॅटलॉग घरी आणून ते काम करावे लागणार होते..

    तसे तर माहिती भरतांना मोबाईल वर सुद्धा भरली जायची, पण लॅपटॉप किंवा कॉम्पुटर असेल तर अधिक बेटर असायचे.. लग्ना आधी ती शिवम च्या लॅपटॉप वर माहिती भरायची.. पण आता मात्र त्यासाठी तिला एकतर पप्पांकडे जावून राहावे लागणार होते.. कारणं अभ्यासाच्या कारणाने शिवम काही लॅपटॉप तिला इकडे देणार नव्हता..

   "काय ग? कसला विचार करतेस?" टिफीन खातांना स्वतः च्याच विचारात गुंग असणाऱ्या मनाली ला ईश्वरी ने विचारले..

  " काही नाहीं ग.. ही ऑनलाईन कामे.. अस वाटतं स्वतः चाच लॅपटॉप घेऊन टाकावा आता.."

  " का ग? जिजुंचा आहे की.."

  " आहे ग... पण ते वैतागतात. त्यांचा काही महत्वाचा डाटा माझ्या मुळे डिलीट झाला तर? भीती वाटते त्यांना.. त्यात घरी असे लॅपटॉप वर काम करत बसले की आईंना वाटते की घरातली कामे करायच्या धाकाने मी लॅपटॉप घेऊन टाईम पास करतेय... "

    "काय? पण असे कसे..?"

   " अग, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे एकच पालूपद असतें.. 'आमच्या वेळेस नव्हते बाई असे काही.. तुझे सासरे पण शिक्षक होतें..पण घरी कधी कामे आणली नाहीत त्यांनी..' आणि मग सुरू होतात त्यांच्या वेळच्या कहाण्या.. किती वेळा ऐकल्या तरी पुन्हा पुन्हा सांगत बसतात.."  मनाली अगदी सासू बाईंच्या टोनिंग मध्ये बोलली आणि ईश्वरी ला हसू आले..

  " जाऊ दे.. इथेच शाळा सुटल्यावर करायचे का काम, एक दिड तास थांबून.. नाहीतर मोबाईल वर करू.."

   "नको.. ते पण नाही जमणार.. मोबाईल वर त्रास होतो ग डोळ्यांना.. त्यात घरी मोबाईल घेऊन बसायला अजिबात वेळ नसतो.. आणि जरा वेळ घेतला तरी त्यांना वाटते मी इंस्टा वर टाईम पास करतेय.. इथे थांबले आणि उशिरा घरी गेले तरी, त्यांना वाटेल मी फिरतेय मैत्रीणी सोबत उगाच.. त्या पेक्षा भूषण लाच सांगते रात्री, जरा वेळ लॅपटॉप दे म्हणून.."

   "बाप रे.. एव्हढा विचार करावा लागतो.." ईश्वरी ने डब्याचे झाकण बंद करत म्हटलें..

   "हो ग.. उगाच घरात किरकिर नको म्हणून खूप भावना मनातच दाबून ठेवाव्या लागतात.. तुझ छान आहे.. राजा राणी फक्त.. कोणाची लुडबुड नाही.. "

   "नाहीं ग.. पण माझे सासर कडचे तसें नाहीत.. खूप छान आहेत स्वभावाने.." ईश्वरी च्या डोळ्या समोर साई च्या आईचा शांत चेहरा आला लगेच..

    "नशीबवान आहेस मग.. चल.. मधली सुट्टी संपली बघ.. बघूया.. कॅटलॉग घेऊन जाते आज घरी.. नाहीतर मोबाईल मध्ये फोटो काढून घेते.. "

   "हम्म.. मी पण तेच करते.. बघते शिवम ला आजच्या रात्री लॅपटॉप मागून.." म्हणत ईश्वरी उठून आपल्या वर्गात गेली..

   मधल्या सुट्टीत डबा खायला समोरा समोर वर्ग असलेले दोघे दोघे जण एकाच्या वर्गात बसायचे.. जेणे करून दोन्हीं वर्गात लक्ष ठेवता येईल..  मुले लहान असल्याने, मधल्या सुट्टीत शिक्षक वर्गात नसतील तर त्यांच्या मस्तीला उधाण यायचे.. त्यासाठी हा उपाय..

     मनाली आणि ईश्वरी दोघी एकत्रच डबा खायच्या.. कधी कधी बनकर मॅडम जॉईन व्हायच्या.. त्यांच्या कडे सहावीचा वर्ग होता.. मुले मोठे होतें.. त्यामुळे मॉनिटर ला लक्ष ठेवायला सांगून त्या इतर वर्गात जायच्या डबा खाण्यासाठी..

   संध्याकाळी ईश्वरी कॅटलॉग घेऊन आली होती घरी.. आज साई आला नव्हता घ्यायला.. चौकात ही दिसला नाही..  दीपक पवार म्हणून त्याचाच मित्र असलेल्या च्या रिक्षात बसून ती आली होती.. तेंव्हा त्याच्या सोबत बोलतांना तिला त्याने, 'पुढच्या आठवड्यात त्याचे लग्न आहे, तुम्ही हळदीला आणि लग्नाला या.' म्हणून आमंत्रण दिले होते..

    घरी आल्यावर ईश्वरीने स्वयंपाक करून घेतला होता.. शाळेतून येता येताच, आईला कॉल करून शिवम ला एक दिवसा साठी लॅपटॉप द्यायला सांग म्हणून कॉल करून सांगितले होते..
   
  " अहो.. पोळी घ्या ना अजून.." साईच्या ताटात पोळी वाढत ती म्हणाली.. आज शेवग्याच्या शेंगा नी बटाट्याची भाजी केली होती तीने..

   लाल रस्याच्या भाज्या साई ला आवडतात हे माहीत होते तिला.. एरवी रोज सकाळी डब्याला म्हणून कोरडी भाजी करायची ती.. म्हणून संध्याकाळी मात्र त्याला आवडते तशी रस्सा भाजी बनवायची.. त्यात आज रिक्षात दीपक पवार शी बोलतांना त्याला नॉन वेज आवडते, त्यातही इकडच्या स्थानिक लोकांच्या तांदळाच्या भाकरी आणि सुकी मासळीच्या भाज्या जास्त, हे माहीत झाले होते..

   ईश्वरी च्या आईकडे मात्र नॉन वेज फारसे व्हायचे नाही.. कधीतरी चिकन किंवा मटण व्हायचे.. तेही पंधरा वीस दिवसातून कधीतरी.. आईं खायची नाही.. पप्पा आणि शिवम मात्र खायचे.. त्यामुळे ती बनवायची.. आईं त्या दिवशी स्वयंपाक घरात ही नाही यायची.. भांडी ही वेगळी होती नॉन व्हेज ची.. अंडी मात्र शिवम साठी रोजच असायची.. ती पण वेगळ्या पातेल्यात उकडलेली..

   आई स्वामी समर्थांच्या मठात जाणे, पारायण करणे , नित्य प्रार्थना करणे यामुळे आई ला नॉन व्हेज बनवलेले आवडायचे नाही.. त्यात लहानपणा पासून कधी खाल्लेले नव्हते.. पण आता शिवम साठी त्या काही म्हणायच्या नाहीत.. पण बनवून ही द्यायच्या नाहीत.. अंडी तेव्हढी उकडून द्यायच्या..

   ईश्वरी लहान असताना तीचे पप्पा बनवायचे कधीतरी चिकन किंवा मटण.. ती स्वयंपाक करू लागल्यावर मात्र ती बनवून द्यायची.. खायची ही.. तिच्या शाळेतील मैत्रीणी डब्याला कधी कधी अंडा भुर्जी, सुकी मच्छी आणायच्या म्हणून खाण्यात यायचे.. पण फक्त भुर्जी आणि चिकन.. सुक्या मच्छी ला वासानेच नाही म्हणायची ती..शिवम च्या सोबतीने कधी कधी चिकन च्या बाहेर मिळणाऱ्या ड्राय डिश खाल्ल्या होत्या तिने.. आणि आवडल्या ही होत्या.. तेंव्हा पासून दोघे बहीण भाऊ मार्केट मध्ये गेले की बाहेरुन खाऊन यायचे..

       आता ही साई ला मन लावून जेवतांना बघून त्याच्यासाठी आपणं नॉन वेज जेवण बनवत जाऊया मधून मधून, असे वाटले तिला..

   "अरे.. मी लेट झालो का जरासा.. ? "  शिवम च्या आवाजाने दोघांचे ही लक्ष दरवाज्याकडे गेले..

    "अरे शिवम.. ये.. बस जेवायला.."  साई ने लगेच त्याला जेवायला बसायला सांगितले..

     "नको नको.. घरी जावून जेवणारे मी.. हा घ्या डबा.." त्याने लॅपटॉप बॅग बेड वर ठेवली आणि डब्याची पिशवी ईश्वरी च्या हातात दिली..

   " काय आहे त्यात..?" ईश्वरी ने डबा हातात घेत विचारलें.. आईं काही ना काही पाठवायचीच भाजी..

   " चिकन करी.." त्याने सांगितले आणि साई आश्चर्याने पाहू लागला.. आता पर्यंत ईश्वरी च्या घरी नॉन व्हेज बनवले जाते, या विषयी कधी ऐकले नव्हते त्याने..

    "अरे वा! आज चक्क चिकन बनवलय.. आणि आईं काही म्हणाली नाही.." ईश्वरी ला आश्चर्य वाटले..

   "नाही ती बारस्याला गेली होती सोसायटी मध्ये.. तिथूनच जेवून आली.. मग काय, पप्पांनी आणि मी ठरवला प्लॅन.. खावून बघा जिजू.. पप्पा चिकन एक नंबर बनवतात.."  शिवम म्हणाला आणि साई ला हसायला आले..

   ईश्वरी ने साई ला चिकन वाढले आणि स्वतः साठी ही घेतलें..

   "ताई, आईला कॉल करायची काय गरज होती लॅपटॉप हवा होता तर.. डायरेक्ट मला सांगितलं असत तरी आणून दिला असता ना मी.." शिवम साई कडे पाहत हसतच म्हणाला तिला.. त्यावर तीने गालात हसतच भुवया उंचावल्या.. जणू काही नजरेनेच म्हणत होती, 'लग्ना आधी तर कधी दिला नाही. आता साई समोर म्हणतोय फक्त..'

   " हसू नकोस.. भाजी वाढ जिजुंना.. " तिच्या नजरे वरूनच तिला काय म्हणायचेय कळले त्याला..

   " तू पण जेव ना थोड.. इश्वरी, वाढ शिवम ला.." साई ने आग्रह केला, पण पुन्हा नकारार्थी मान हलवली त्याने..

  " नको..  तुम्ही जेवा.... पप्पा वाट बघत असतील जेवणा साठी.. येतो मी.. आणि लॅपटॉप राहू दे उद्या पर्यंत.. कॉलेज ला जाणार नाहीये मी उद्या.."

   "नको.. मी रात्रीच फिल अप करून टाकते माहिती.. रात्री अकरा नंतर साईट चांगली चालते.. तीन चार तासात होऊन जाईल.. सकाळीं येऊन घेऊन जा तुझा लॅपटॉप.. उगाच काही डिलीट झाले माझ्याकडून तर वैतागशिल.." ती हसून म्हणाली असली तरी, तिच्या स्वरातला टोमणा कळला शिवम ला.. गेल्या वेळेस त्याच्या असाईनमेंट च्या फाईल डिलीट झाल्या होत्या तिच्याकडून.. आणि वैतागला होता तो..

  
क्रमशः