तुम देना साथ मेरा... 30

प्रेम





   त्याने तिला नीट पांघरून दिलें.. आणि उठला.. तिला लवकर उठवण्याची गरज नव्हती.. मुसळधार पाऊस आणि हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा, यामुळे शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली होती शासनाने..

    काल संध्याकाळी गेलेली लाईट सकाळी आलेली होती.. त्याने दोघांचे मोबाईल चार्जिंग ला लावले.. आणि स्वतः चे आवरू लागला.. आज तो ही जाणार नव्हताच सध्या तरी.. दुपारी तिला बरे वाटले तर बघता येईल.. दहा वाजे नंतर क्लिनिक उघडले की तिला घेऊन जाऊ डॉक्टरांकडे.. असे मनाशी म्हणतच त्याने एका बाजूला चहा करायला ठेवला..

    "ईश्वरी.. ईश्वरी.. उठते ना?"  अंघोळ वगैरे आटोपून साई ने ईश्वरी ला आवाज दिला..

 "  अं.. "

  "ईशू.. ईश्वरी.. उठा.  फ्रेश होऊन गरम गरम चहा केलाय,तो पिऊन घ्या.." त्याने तिच्या कपाळावर हात ठेवत ताप चेक केला.. अंग थोड गरम होतच..

   " हां.. तू.. तूम्ही... ?" ईश्वरी ने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले.. स्वतः ला खाली साई च्या अंथरूणावर पाहिले आणि अवघडून उठली ती..

    "सावकाश.. फ्रेश होऊन या.. मी चहा गरम करायला ठेवतो.. "

  " अं.. हो.. आलेच.." डोक्याला हात लावतच उठली ती.. सकाळीं सकाळीच डोकं दुखायला लागलं होतं.. नाक आणि घसा ही जाम झाला होता..

     फ्रेश वगैरे झाल्यावर गरम गरम आल्याचा चहा घेतला,  तसे जरा बरे वाटले तिला. डोके मात्र अजूनही दुखतच होते.

   " अहो गोळी आहे का डोकेदुखीची?"

   " आहे ना.. पण थांबा, एखाद्या तासाने क्लिनिक उघडेल कॉर्नर वरचे..  मग आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया."

   " अहो कशाला डॉक्टरांकडे?  साधा सर्दी ताप आहे. आणि नेहमीच होतो मला पावसात भिजल्यावर..  एक क्रोसिन ची गोळी घेतली की बरे वाटेल."

   " नको, नको, डायरेक्ट गोळी नका घेऊ. जाऊन येऊ  आपण.. तुम्ही एक काम करा,  तोपर्यंत जरा आराम करा अजून.."

"नाही, नको. मी नाश्ता बनवते काहीतरी."

   " नका बनवू.. ब्रेड आणला आहे मी.. जाम ब्रेड खाऊन घेऊया.. मग दुपारी डाळ भात लावतो.. हलक अन्न घ्यावं लागेल ना तुम्हाला.."  तो चार्जिंग ला लावलेले मोबाईल काढत म्हणाला..

   "आईना कॉल कर.. त्यांचे मिस कॉल आहेत बघ.." त्याने तिचा मोबाईल हातात दिला.. तसें तिला हसू आले..

    "का? हसू का आले?" त्याने तिला विचारलें..

    "काही नाही.. असेच.."

   "असेच कसें? सांगा ना,"

  " हेच.. कधी एकेरी तर कधी अस सांगा, वैगेरे.. आदरार्थी.."  तीने भुवया उंचावतच म्हटलें..

  "मग काय करू? अजून ही तोंडात एकेरी येतं नाही लवकर.."  तो तीच्याकडे हसून पाहतच म्हणाला..

  " होईल सवय.."  म्हणतच तिने तिच्या आईला कॉल केला..

   जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे माय लेकींचा गप्पा. चालू होत्या. बाबांपेक्षा आईशी तिची अटॅचमेंट जास्त होती दोन दिवसातून एकदा तरी आईचा कॉल असायचा.

     तिच्या आवाजावरूनच तिला सर्दी झाल्याचे आणि बरे नसल्याचे आईला कळले..  आईने लगेच मी दुपारी डबा घेऊन येते, तू काही करू नको. असे बजावत तिला काळजी घ्यायला सांगितली होती..

   अकरा वाजता दोघे ही क्लिनिक मध्ये जाऊन आले.. डॉक्टरांनी काही टॅबलेट आणि सिरप लिहून दिले होते. आणि दोन दिवस आराम करायला सांगितले.. ताप फारसा नव्हता, पण सर्दी भरपूर झाली होती.. त्यामुळे डोके ही दुखत होते..

     आज पहिल्यांदाच तीचे आईं पप्पा घरी आले होते.. ते ही तिला बरे वाटत नाही म्हणून.. आईने तीच्यासाठी आधी काही पाठवले तेंव्हा दोन तीनदा शिवम च घेऊन आला होता..

     त्याला आपली बहीण एवढ्याशा खोलीत राहते ह्याचे वाईट वाटायचे.. घरी गेल्यावर तो त्यांच्या पप्पांना म्हणाला ही होता.. तेंव्हा त्याच्या पप्पांनी , आम्हीं पण तेवढ्याच भाड्याच्या घरात संसाराची सुरुवात केली होती.. घर लहान असू दे माणसाचा स्वभाव चांगला आहे ना.. तो घेईल मोठे घर अशी समजूत काढली होती.. बाकी साई ला तो आधीपासूनच ओळखत असल्याने त्याचा स्वभाव माहित होता त्याला..

    शिवम ला उलट आनंदच झाला होता, आपल्या ताईचे साई शी लग्न झाल्यामुळे.. कारणं धनेश कीतीही श्रीमंत असला तरी एक प्रकारची मग्रुरी जाणवायची त्याच्या वागण्या बोलण्यात.. त्याच्याशी कधी खुलून बोलणें झालेच नव्हते.. पण साई शी आधीच छान ओळख होती त्याची..

   तसा तर आधी साईचा काही प्रॉब्लेम नव्हता त्याला..  पण आता त्याची बहीण दिलेली होती, त्यामुळे बहिणीसाठी तरी त्याने चांगली नोकरी मिळवावी. चांगले घर घ्यावे, आपली बहीण आधी सारखेच चांगल्या घरात राहावी ही, इच्छा तर एका भावाची होणारच ना?

  "  ईशू, चल आपल्या घरी, दोन-तीन दिवस राहा, आराम कर.." आईने डब्यात आणलेले जेवण भांड्यात काढायला घेतले..

    "नको आई , मी राहते इथेच.. आणि काही काम नाही इथे पण.. साई सगळ्याच कामांना मदत करतात.."

    हो, पण, तुला सर्दीचा त्रास होतो..सकाळ संध्याकाळ काढा घेतला की लवकर आराम पडेल.. तो बनवायला सांगशील का त्यांना.. त्यापेक्षा घरी चल.. आणि नाही म्हणणार नाहीत साई, हवं तर पप्पा विचारतील त्यांना.."

    " नको..  पुन्हा त्यांचा स्वयंपाक वगैरे? काही करत नाहीत मग ते..  तसेच बाहेरून काहीतरी खाऊन येतात.."

   " अग, रात्री शिवम येईल तेव्हा त्याच्याकडे डबा पाठवू आपण.. "

   शिवम ? तो कुठे गेलाय? आज तर कॉलेज वगैरे बंद आहेत सगळे.."

    " हो..  पण तो त्याच्या मित्राकडे गेलाय.  ते काय ते ग्रुप स्टडी करायला.. रात्री परत येईल, तेंव्हा पाठवू डबा.. "

 "  नको आई, राहू दे. ते नाहीच म्हणतील डबा पण.. "

   "तू थांब बाळा..  मी पप्पांना सांगते." जेवण गरम करताना गप्पा चालू होत्या माय लेकीच्या..

    ईश्वरीचे आई आणि पप्पा इथेच डबा घेऊन आले होते. साई आणि पप्पा दोघेही बेडवर बसलेले होते.. पण फक्त औपचारिक थोडेफार बोलणे दोघांमध्ये चालू होते..

   आधी मोकळेपणे बोलणाऱ्या साईला, आता लग्नानंतर मात्र जरासे दडपणच जाणवायचे .  त्यात आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू की नाही ही भावना सतत मनात असायची..

    "अहो, मी काय म्हणते ?" ईश्र्वरीच्या आईने ईश्वरीच्या पप्पांना आवाज दिला, तसे त्यांनी त्यांच्याकडे पाहून नजरेनेच काय?  हे विचारले..

    "आपण इशूला दोन दिवस घेऊन जाऊया का आपल्या घरी? "  मीनाताई एक नजर साईकडे पाहतच म्हणाल्या.

   दिनकर रावांनाही अचानक काय उत्तर द्यावे हे सुचले नाही.  त्यांची मुलगी असली तरीही आता साईला विचारल्याशिवाय कसे ते डायरेक्ट तिला घरी येणार होते

    "चालेल ना साईश ? तिला सर्दी आणि ताप आहे.  आणि मला माहितीय सर्दी झाली की तिला त्रास होतो खूप.. दोन-तीन दिवस तिचे डोकेही दुखते.. असेही आता दोन दिवस सुट्टी मिळालीय .. एखाद्या दिवस रजा घेईल, बरे नाही वाटले तर..  दोन दिवस राहू द्या आमच्या घरी. मग परत आणून सोडते." मीनाताईंनी परस्पर सांगून टाकले. त्यावर साईने फक्त होकारात मान हलवली..

     तो तरी काय म्हणणार होता त्यांच्यासमोर..  त्याला वाटले,' ईश्वरी ने च आपल्या आईला सांगितले असेल, घरी जायचे असे. आणि म्हणून आईने परस्पर विचारले..  जरासे वाईटही वाटले, की आपण तिची काळजी घेऊ शकणार नाहीत का?
म्हणूनच त्या आई कडे जायचं म्हणाल्या असतील,  ठीक आहे .. त्यांनाही वाटत असेल, माहेरी जावे, आराम करावा..
असेही दिवसभर मी वाचनालयात अभ्यासासाठी थांबलो तर,  तिच्यासोबत कसा राहणार होतो.. तेवढेच ती तिच्या आईच्या घरी सेफ आणि मोकळ फील करेल.. पण मी दोन दिवस नोट्स वर केला असता घरीच अभ्यास.. सांगू का नका जाऊ म्हणून.. पण असे कसे म्हणू? त्यांची आई आहेत त्या.. त्यांना काय वाटेल? असू दे.. इथल्या पेक्षा तिथे चांगला आराम होईल त्यांचा.. ' विचारांच्या तंद्रीतच
जेवण झाले. आणि तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान ईश्वरी आई पप्पांसोबत दोन दिवसांसाठी तिकडे राहायला गेली..

    जाताना ईश्वरी साईकडे पाहत होती.. जणू काही त्याला काही विचारायचं होतं तिला, सांगायचं होतं त्याला.. पण आई पप्पांच्या समोर मोकळेपणे बोलू नाही शकली ती...

   रात्री शिवम साई साठी डबा देऊन गेला होता. त्यावेळेस साई ने तिच्या तब्येतीची चौकशी केली,  तेव्हा ताप पुन्हा आल्याने ती झोपूनच राहिली असल्याचे त्याला कळले..

     शिवम गेल्यानंतर मग त्याने ईश्वरीला फोनही केला होता..  दोघेही जरा वेळ बोलले.. त्याला तिला भेटावेसे वाटत होते, परत बोलवावेसे वाटतं होते, पण आजच तर गेली आणि लगेच काय सांगून तो जाणार होता भेटायला ? म्हणून तो काही म्हणाला नाही तिला.. तिचा आजूबाजूला असणारा वावर मात्र मिस् करत होता तो.. दोघांना ही एकमेकांची सवय झाली होती आता..


  तिकडे ईश्वरी च्या ही मनात येत होते की, साईने एकदा तरी तिला म्हणायला हवे होते की तुम्ही नका जाऊ इथेच थांबा म्हणून.. किंवा पप्पांकडे भेटायला तरी यायला हवे होते.. आठवण फक्त मलाच येतेय का त्यांची? मलाच फक्त प्रेम वाटतंय का त्यांच्याबद्दल?? इतक्या दिवसांच्या सोबतीने ही त्यांना काही वाटतं नाहीये का माझ्याबद्दल?

    तसे तर आठ दहा दिवस एकत्र राहिल्याने ही जवळीक वाटते एखादया बद्दल.. अगदी मुका प्राणी असला तरी त्याची आठवण दाटून येते मनात... मग आम्हीं तर लग्न केलेय, ते कोणत्याही परिस्थितीत का असेना? पण जेंव्हा पासून त्यांनीं माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलेय, तेंव्हा पासूनच मी त्यांच्याबद्दल फील करते.. फक्त आदर नाही तर प्रेम ही वाटते त्यांच्याबद्दल..

    पण त्यांचे काय? काय आहे त्यांच्या मनात..? मला जाणून घ्यावे लागेल.. आईं म्हणते तसे त्यांच्या मनात प्रेम निर्माण कराव लागेल.. आईं लाही कळले आमचे वागणे बघून, की आमचे नाते अजून ही नवरा बायको म्हणून निर्माण झालं नाहीये.. आडून आडून विचारत असते ती... आणि दरवेळेस काहीतरी बोलून विषय बदलते मी.. काय आणि कसे सांगणार तिला?

     मला ही वाटते इतर कपल सारखे आम्ही वागावं, हातात हात घालून फिरावे.. पण माझा नवरा आहे की हात हातात घेणे तर दूर.. चार हात लांब पळतो माझ्या पासून.. जसे काय हात लावला की पप्पा रागावतीलच... माझ्या मुलीचा हात का धरला म्हणून... साई चा तिच्या पप्पां समोर, अगदी शिस्तीत बसलेल्या विद्यार्थ्या प्रमाणे बसलेला प्रसंग आठवून हसू आले तिला..

  
   क्रमशः