तुम देना साथ मेरा..28

प्रेम


   " अहो पण कमावतोय ना मी.. !"

   "अगं.. अग म्हणायचं..  आणि तुम्ही कमावताय,  पण माझं पण आहे ना हे घर.. मग मी थोडे पैसे खर्च केले घरासाठी , तर काय झालं?  तुम्ही प्रत्येक वेळेस असे माझे पैसे परत करणार आहात का? "

    "अगं पण ते तुझे पैसे आहेत ना..  राहू दे , तुला कामाला येतील..."

   "हां..अस्स..अगच म्हणायचं.. "


  " आहे ना माझ्याकडे सध्या पैसे.. मग .."

   " मग बीग काही नाहीं.. हे माझं तुझं फारच करताय तुम्ही..  ठीक आहे..  घरातल्या सगळ्या वस्तूंना तुम्हीच पैसे देतात ना..  आज पासून माझे खाण्या पिण्याचे पैसे मी देत जाईल.. तुम्हाला नकोत मी खर्च केलेले, तर मला पण नकोत तुमच्या पैश्यांचे काही.."

    "अहो असं काय करताय ?" तो पटकन म्हणाला. आणि तिने रोखून पाहिले. तसे परत तो तिला, आहोच म्हणाला हे लक्षात आले त्याच्या..

  
   " सॉरी .. सॉरी.   मी प्रयत्न करेल एकेरी म्हणण्याचा, बोलण्याचा पण प्लीज ते पैशांचे तेवढं राहू द्या..  मला लागले तर घेईन ना मी तुमच्याकडून.. " त्याच्या बोलण्यावर ती काहीच बोलली नाही..  चेहऱ्यावर राग मात्र दिसत होता.. तो कधीपासून तुझे पैसे तुझे पैसे करतोय हे मनाला लागलंच होतं तिच्या..

   आता पर्यंत दर महिन्याच्या पगारातून ठराविक रक्कम सोडली, तर सगळे पैसे ती आईकडे काढून देत होती.. आपण ही काहीतरी हातभार लावतोय घर खर्चाला..हे समाधान फार मोठे होतें...

    संसार दोघांचा असतो ना ? मग दोघांनीही पैसे खर्च केले तर काय हरकत आहे?  या मताची ती..  पण गेला महिनाभर मात्र तिने जरा काही आणलं, की लगेच साई तिला ते पैसे देऊन टाकत होता..  हे कधीपर्यंत चालणार?  तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, आणि  किचनमध्ये येऊन आपले कामे करू लागली.. तिला राग आलाय हे तिच्या हालचालींवरून साईला जाणवले..


    रात्रीचे जेवण आहे शांततेतच झाले..  ती त्याची सर्व कामे करत होती.   त्याला जेवायला वाढणे, ताट उचलणे,  पण बोलत मात्र नव्हती..  साईने एक दोन वेळा बोलण्याचा प्रयत्न केला..  पण तिने पाहिलेही नाही त्याच्याकडे.

   अंथरुणावर पडल्या पडल्या साई दिवसभराचा विचार करत होता. आणि त्याला तिच्या आईचे बोलणे आठवले.. ईश्वरीचा राग आल्यावरचा अबोला..  आणि मनात धस्स झाले त्याच्या..  'हिने खरंच अबोला धरलय का काय माझ्याशी? आधीच आम्ही फार कमी बोलतो.. त्यात जर ही बोललीच नाही तर.. त्यांना राग आलाय हे खरं!  पण तो घालवायचा कसा?  नाही नाही..  त्यांना नाही.. तिला.. तिला.. मनातल्या मनात सुद्धा एकेरी बोलायची सवय करावी लागेल..  नाही तर मॅडम अजूनच रागावतील..  बरोबर आहे..  त्या दिवशी काका ही मला मस्करी मध्ये म्हणाले होते,  तुमच्या अहोंना ईश्वरींना सांगा म्हणून.. पण मी तरी काय करू?  आधीपासूनच त्यांना असा आदरार्थी संबोधायची सवय झालीय.. ती अचानक कशी जाईल?  नाही, पण उद्यापासून प्रयत्न करायलाच हवा.. त्याने हळूच मान उचलून पाहिले, तर ब्लॅंकेट ओढून झोपलेली होती ती.. त्यानेही मग झोपून घेतले..


    आज दोन दिवस झाले, तरी ईश्वरीचा अबोला कायमच होता..  सकाळी आणि रात्री नेहमीचा स्वयंपाक, घरातली कामे, वगैरे सगळे ती करत होती..  साईला काय हवे नको, तेही पाहत होती.. पण बोलत मात्र अजिबात नव्हती.. एवढेच काय, साई ने तिला व्हाट्सअप वर सॉरी चे मेसेज पाठवले होते..  त्यालाही काही रिप्लाय नव्हता..  एरवी ही साई बोलायचा नाही जास्त..  पण ती मात्र काही ना काही विषय काढून त्याच्याशी बोलत असायची.. कामे करतांना गुणगुणत असायची.. या दोन दिवसात तिचे बोलणे, गुणगुणणे बंद असल्यामुळे साईला अगदी बेचैन झाल्यासारखं वाटत होतं..

      तिचा अबोला जाण्यासाठी काय करावे, हे काही सूचेनास झालं होतं..  एकेरी बोलण्याचा सराव तर करतच होता तो..  पण तिचे पैसे,  ते कसे घेऊ शकणार होता..  ती जे म्हणते आहे की, हे माझे घर आहे..  त्यामुळे मीही पैसे खर्च करेल,  हे कितीही बरोबर असले तरी त्याच्या मनाला मात्र ते पटत नव्हते..  ती आपली जबाबदारी आहे..  तिचे पालन पोषण, संरक्षण, सर्व इच्छा, आकांक्षा हौस पूर्ण करणे, हे आपले कर्तव्य आहे..  त्यामुळे ते सारे आपल्याच पैशातून झाले पाहिजे. हे त्याचे मत होते..  मग घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी देखील त्याचे पैसे तिने द्यावे असे त्याला वाटत नव्हते..  पण तिचा अबोला तोडायचा असेल तर हे मान्य करावेच लागणार होते..

     ईश्वरी च्या आईने सांगितलेले म्हणणे, मात्र मनोमन पटले होते त्याला..  ईश्वरी खूप समजूतदार आहे, रागावतही नाही फारसे..  पण राग आला कि अबोला धरते.  तो मात्र त्रासदायक असतो.. वाचनालयात बसलेला असला तरी डोक्यात विचार मात्र ईश्वरीचे चालू होते..  आज रात्री तिच्याशी बोलून तिचे म्हणणे, काही प्रमाणात का होईना, मान्य करून आपण तिला म्हणूया हे त्याने मनोमन ठरवले होते..  असेही अभ्यासात लक्ष लागतच नव्हते, म्हणून तो उठला आणि घरी जायला निघाला..

     पावसाने आज चांगलाच जोर धरला होता..  संध्याकाळचे साडेसहा वाजले होते.. रिक्षाला भर पावसात फारसे भाडे मिळत नव्हते.. त्यामुळे घरी जाऊया असा विचार करत साई घरी निघाला..  सात वाजायला आले तरी ईश्वरी घरी आलेली नव्हती.. त्याने तिचा काही मेसेज आहे का हे पाहिले मोबाईलवर..  तर उशिरा येईल वगैरे असा काही मेसेज नव्हता. तसे तर दोन दिवस झाले ती बोलतच नव्हती.. घरात आल्यावर दिवाबत्ती करून तो ईश्वरी ची वाट पाहू लागला..

     साडेसात वाजायला आले पण तरी देखील ईश्वरीचा काही पत्ता नव्हता.. साईचे मन धडधडायला लागले होते..  त्याने तिला कॉल लावला तर, तोही लागेना..  मोबाईल स्विच ऑफ झाला होता बहुतेक.. तिच्या शाळेतील इतर कोणाचा नंबरही नव्हता त्याच्याकडे.. दिनकर रावांना फोन करावा तर, ते काळजीत पडले असते.. म्हणून त्याने तोही विचार सोडून दिला. मोबाईलची रिंग वाजली तसे आतुरतेने त्याने कॉल उचलला. त्याला वाटले ईश्वरीचा आहे, पण त्याच्या एका रिक्षावाल्या मित्राचा फोन होता.

    त्या फोनवरून ईश्वरी ज्या शाळेत होती.. तिथे जाताना लागणारा नाला तुडुंब भरून रस्ता बंद झाला होता, हे त्याला कळले.. सकाळपासून पडणारा सततचा पाऊस, त्यामुळे कधी न भरणारा तो नाला आज ओसंडून भरून वाहत होता..  तरी नशीब मुलांना दुपारी सोडून देण्यात आले होते..  पण शिक्षक मात्र आपापली कामे करत बसली होती.  आणि नेमकी पाच वाजेनंतर नाल्यामुळे रस्ता बंद झाला होता... तसे काही येणारे लोक येऊ शकत होते गुडघ्याभर पाण्यातून चालत.. पण रिक्षाची वाहतूक मात्र पूर्णपणे बंद होती.

   साईचा मित्र ईश्वरी च्या शाळेतल्या मुलांना सोडणे, आणि आणण्याचे काम करायचा. ईश्वरी वहिनी या शाळेत टीचर आहे हेही त्याला माहिती होते.  म्हणूनच त्याने फोन करून कळवले होते.  जरा वेळाने पाणी ओसरले की रस्ता मोकळा होईल, आणि मग वहिनी घरी येतील असेही सांगून झाले..

   मित्राचे बोलणे ऐकून साई काळजीत पडला होता. आधीच ईश्वरी चा मोबाईल लागत नव्हता. त्यात ती रस्ता मोकळा होण्याची वाट बघत शाळेतच थांबली आहे की, गुडघाभर पाण्यातून पायी घरी यायला निघाली आहे, हे कळायला मार्ग नव्हता.

    तशा इतर शिक्षिका असतीलच तिच्याबरोबर, म्हणत त्याला जरा हायसे वाटले होते. पण तरीही ती घरी येत नाही तोपर्यंत जीवात जीव राहिला नसता. काय करावे, घराला कुलूप लावून निघावे का पायी, त्यांना शोधायला. पण मी गेलो आणि त्या घरी आल्या तर, तसे चावी आहे त्यांच्याकडे.. पण.. लाईट ही गेलीय आणि एव्हढ्या पावसाची लवकर येईल की नाही सांगता पण येतं नाही..

    ही मेणबत्ती पण कुठपर्यंत तग धरेल काय माहित?
साईने किचनमध्ये असलेले मेणबत्तीचे पॅकेट आणि माचीस तिथेच टेबलवर आणून ठेवली.  पेटलेली मेणबत्ती विझली, की पटकन दुसरी लावण्यासाठी.

     "आssच्छी " आवाजा सोबतच दरवाजा हलकेच ढकलला गेला. आणि पावसात चिंब भिजलेली ईश्वरी शिंकतच आत आली.

   " अहो ईश्वरी!  काय हे? किती भिजलात तुम्ही ? आणि छत्री कुठे आहे?" साई पटकन तीच्याकडे आला.

    ईश्वरीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपली पर्स कोपऱ्यात ठेवली. आणि सोबत हातात असलेली तारा तुटलेली छत्रीही ठेवली.

    जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे तिच्या नवीन छत्रीच्या तुटलेल्या तारांची अवस्था पाहता, ती कशी भिजली असेल हे त्याला कळले. ती तसेच आत जाऊन बाथरूम मध्ये शिरली.

   हात पाय धुवून सकाळचा ड्रेस अंगावर चढवला आणि टॉवेलने केस पुसत बाहेर आली..

   तोपर्यंत साईने तिच्यासाठी गरम चहा उकळायला ठेवला होता..

    "हा घ्या.. मस्त आल्याचा चहा केलाय कडक.. फ्रेश वाटेल तुम्हाला..  सॉरी तुला.."  ती कप न घेता आपल्याकडे तसेच रागात पाहतेय हे पाहून त्याला चूक कळली आणि त्याने शब्द सुधारला आपला.

     कितीही ठरवले तरीही एकेरी नाव आणि भाषा पटकन तोंडात येतच नव्हती तिच्यासाठी. आणि तिचा राग आणि अबोला मात्र कमी व्हायचं नाव घेत नव्हता त्यामुळे..

     साईने तिच्याकडे पाहत पुन्हा कप पुढे केला, तसे तिने तो घेतला आणि हळूहळू चहा पिऊ लागली..

   साई ही तिथेच बेडवर शांत बसला. स्वयंपाकाचेही बघावे लागणार होते. आठ वाजत आले होते, आणि नुकत्याच आलेल्या तिला कामाचा त्रास न देता आपणच खिचडीचे कुकर लावावे असा विचार करून तो उठला, आणि त्याचा फोन वाजला..

   ईश्वरी च्या आईचा कॉल येत होता त्याने मोबाईल तिच्याकडे दिला..

    चहा पिता पिताच तिने फोन उचलून कानाला लावला..

   " हा बोल आई!"

    ........

  " हो आत्ताच आले.."

     ........

    "हो ग.. मुलांना सोडले होते. पण मग आम्ही थांबलो काम करत, तर चाळींना लागून असलेला नाला अचानकच भरला.. आतापर्यंत एवढा भरल्याचे कधी पाहिले नाही. अचानकच संध्याकाळी त्याचे आणि पावसाचे पाणी रस्त्यावर आले, आणि मग रिक्षाच मिळेना..  त्यात पाऊस एवढा जोरात, मग हळूहळू पायीच निघालो..

  ......

   "अग हो आई, छत्री होती, पण वाऱ्याने उडून उलटी झाली.. त्यामुळे पूर्ण भिजले मी.."

   .....

   "नाही , नाही... चहा घेतला आताच.. झोपताना वाफ पण घेईल.. "

   .......

    "हो ग..  माहितीय, मला लगेच सर्दी होते पावसात भिजल्यावर,  पण मी काय मुद्दाम भिजली का ? हो काढा पण घेईल झोपताना..  बर ठेवू आता..  स्वयंपाक करायचाय.." आईचा निरोप घेतच तिने फोन कट करून टेबलवर ठेवला..

    साई किचनमध्ये होता..  तिचे फोनवरचे बोलणे ऐकता ऐकताच  त्याचा खिचडीचा कुकर लावून झाला होता..

    
क्रमशः