तुम देना साथ मेरा..26

प्रेम


" हं.. येतो.. काही आणायचेय का येताना.."

" नको.. तुम्ही.. तुम्ही लवकर या फक्त.. पाऊस खूप भरुन आलाय.."  तीने काळ्याकुट्ट झालेल्या आकाशाकडे पाहत म्हटलें..

" हो.. येतो लवकरच.." त्याने रिक्षा चालू केली. आणि वळवून निघाला.. ती मात्र पुढच्या वळणा पर्यंत तीथेच उभी राहून त्याला पाहत होती..

   अचानक आले असले तरी तिच्या आयुष्यातील हे साई नावाचे वळण अत्यंत सुखद होतें.. अगदी हवे हवेसे..


      ईश्वरी ही ओठातल्या ओठात गुणगुणतच घरात शिरली.
  पर्स ठेवून फ्रेश होऊन आईकडून आणलेले आपले घरी घालायच्या ड्रेस मधून सकाळीच घातलेला तो ड्रेस अंगावर चढवला, आणि स्वतःसाठी मस्तपैकी चहा ठेवला.

  मनात पटकन आले, 'म्हणायला हवे होते साईंना. घरी येऊन चहा घ्या आणि मग जा.  त्यांनाही आठवण येतच असेल ना चहाची.  आतापर्यंत ठीक होते बाहेरच घ्यायचे. पण आता मी घरी आहे तर त्यांना म्हणायला हवं. त्यांची खाण्या पिण्याची काळजी घ्यायला हवी. ठीक आहे, उद्यापासून सांगतेच.' गरम गरम चहा कपात ओतत ती खुर्चीवर बसली.

    बसल्या बसल्या घराचे निरीक्षण करू लागली. छोटे असले तरीही तिचे घर होते...  स्वतःचे.. भले तिच्या वडिलांचे असेल, पण साई शी लग्न केल्यामुळे ती त्याच्यासोबत या घरात आली होती. आणि या घराला तिच्यासाठी एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते..  लहानपणीचे फारसे काहीतरी आठवत नव्हते. पण आता मात्र या घराबद्दलची ओढ जरा जास्तच जाणवत होती..

    आजूबाजूचे शेजारी स्वभावाने छान होते. जास्त कोणी कोणाच्या घरात इंटरफेअर करत नव्हते. पण बाहेरून विचारपूस मात्र करायचे. घरी काही बनवलं तर एकमेकांना वाटीत घालून नक्की द्यायचे.
कोणी आजारी असेल, आनंदाचा प्रसंग असेल तर सहभागी व्हायचे. मदत करायचे. चाळीतली ही संस्कृती तिला अशीही आवडत होतीच.

   आईकडे त्यांचे रो हाऊस असले , तरीही शेजाऱ्यांशी छान संबंध होते . एकोपा होता.  सण वगैरे एकत्र साजरे केले जात होते. सणांचा खरं महत्व अशा चाळींमध्येच तर जाणवतं. आनंद आणि दुःख सारख्याच आत्मीयतेने वाटून घेतले जातात..

    "अरे साई,  आज लवकर आलास?"  अंगणात खुर्ची टाकून बसलेल्या दुर्गे काकांनी साईला विचारले.

   एरवी बऱ्याच वेळेस दहा साडेदहा वाजता बाहेरुन जेवूनच घरी येत असलेला साई, आता ईश्वरी घरी असल्यामुळे साडेआठलाच घरी आला होता. साईने हसतच होकार दिला. आणि घरात शिरला. काकांची मिश्किल नजर त्याला कळली होती.

    घरात आला तर घरात शांतता होती. खोली व्यवस्थित आवरून ठेवलेली होते . किचन मधून ईश्वरीच्या बांगड्यांची किणकिण तेव्हढी ऐकू येत होती. एखाद्या सुमधुर संगीतापेक्षाही गोड वाटली त्याला ती..  मधूनच तिच्या तोंडून हळुवार आवाजात गाण्यांच्या ओळी ही ऐकू आल्या..  उगाच तिला बावरल्यासारखं वाटू नये आपल्याला अचानक बघून, म्हणून त्याने दरवाजा वाजवला..

    "आले.. आले.."  ती किचन मधून ओढणीला हात पुसतच बाहेर आली.. त्याला पाहून चेहऱ्यावर आनंद पसरला.

   " झालाच स्वयंपाक माझा..  तुम्ही हात पाय धुऊन घ्या. गरम गरम घेते जेवायला" घड्याळाकडे पहात ईश्वरीने सांगितले..

   " हो आलोच.."  टॉवेल घेत तो बाथरूम मध्ये शिरला.

     "तुमचे कपडे बाथरूम मध्येच ठेवा..  मी नंतर धुऊन टाकेन.." ईश्वरीने बाहेरूनच त्याला सांगितले.

   " ईश्वरी..  ईश्वरी.. माझे कपडे कूठेत?"  नेहमी बाथरूम मध्ये असलेली टी-शर्ट आणि ट्रॅक पँट त्याला दिसले नाही. तसे त्याने आतूनच आवाज दिला.
   त्याचा आवाज ऐकून ताट वाढायला घेणारी ती पटकन आत आली... आणि किचनमध्ये तिथेच थांबली..

   तो फक्त टॉवेल गुंडाळून बाथरूम बाहेर आला होता..  ती तसेच एकटक त्याला पाहत राहिली.  लक्षात आले तसे पटकन नजर खाली वळवली..  त्याने ही स्वतःकडे पाहिले आणि पुन्हा बाथरूम मध्ये शिरला..


    "अहो..  हे घ्या तुमचे कपडे..  बाहेरून दरवाजावर टकटक करत तीने सांगितले.  तसे त्याने तिच्या हातातले कपडे घेतले..

     दोघेही आता झालेल्या प्रसंगाने अवघडले होते..  पहिल्यांदाच तो असा अचानक तिच्यासमोर फक्त टॉवेलवर आला होता..  एरवी त्याचे रोजचे घालायचे कपडे बाथरूम मध्येच असलेल्या रॉड वर ठेवलेले असायचे..  त्यामुळे आतूनच तो तयारी करून यायचा..

   आज नेमके ईश्वरी ने बाथरुम साफ करतांना ते घडी करून कपाटात ठेवले होते..

    खोली तशी लहानच होती.  फक्त बाहेरची रुम आणि आतली किचन..  त्यामुळे कपडे बदलायला सेपरेट अशी जागाच नव्हती..

    तिला साडी नेसायची असेल तेव्हा किचनला असलेला पडदा ओढून घ्यायची ती आणि किचन मध्ये साडी नेसायची..  बाथरूमही काही फारसे मोठे नव्हते..

    एवढ्याशा खोलीत एकाच छता खाली राहताना असे प्रसंग आता वारंवार येणारच होते..  त्यात आपण अवघडून जायला नको.  अशी मनाची समजूत घालतच ईश्वरी जेवणाची ताटे वाढू लागली.... साई ही काहीच झाले नाही असे दाखवत बाहेर येऊन बसला..  दोघांचेही जेवण शांतपणे झाले..  नजर एकमेकांकडे गेली की बावरून पुन्हा खाली वळत होती..

     बाहेर पावसाने चांगलाच जोर धरला होता आता..  रात्रीची वेळ, त्यात वरून पत्रांवर पडणाऱ्या थेंबांमुळे होणारा आवाज, आणि पावसामुळे अचानकच झालेले शांत वातावरण जेवण झाल्यावर ईश्वरी किचन आवरत होती आणि साई ही आपल्या नोट्स वाचायला बसला होता...

  ##########


    दिवस अगदी फुलपाखरासारखे उडत चालले होते..  लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला होता..  या एक महिन्यात दोघांमध्ये हळूहळू एकमेकांची विचारपूस, सहज गप्पा मारणे सुरू झाले होते..

     साई जास्त बोलत नव्हता, पण ईश्वरी मात्र त्याला बोलतं करायचा प्रयत्न करायची.. दोन-तीन वेळा आई पप्पांकडेही ती जाऊन आली होती..  हां अजून कोणी नातेवाईकांनी नवीन जोडपं म्हणून जेवायला बोलावलं तर, तिथे जायला मात्र ती कटाक्षाने टाळत होती. कारण कोणी कितीही बोलून दाखवलं नाही , तरी तिचे लग्न आणि साईचा व्यवसाय याबद्दलचे प्रश्न समोरच्याच्या डोळ्यात दिसायचे..  साईला वाईट वाटू नये म्हणून ती परस्परच सुट्टी नाही,  शाळेची कामे आहेत ,अशी कारणें देऊन सगळीकडे जाण्याचे टाळत होती..

    "अहो..  रात्री रात्री बाहेर जाऊया का आपण?

    "बाहेर..?  कुठे..? काही काम आहे का?

    " नाही..  ते असंच सहजच..  जेवण झाल्यावर सहज फिरायला जाऊया.. किती दिवसातून आता पाऊस पण नाहीये ना.. वातावरण जरा कोरडेय म्हणून..."

   " ठीक आहे..  जाऊया."

     "मी येतो..  वाचनालयात जाऊन.. "

     "हो चालेल.. ". शनिवार असल्यामुळे ईश्वरी ची शाळा आज लवकरच सुटली होती.  आणि परीक्षा आता एक दीड महिन्यावर आली. म्हणून साईने संध्याकाळचे भाडे थोडे कमी करून वाचनालयातला वेळ वाढवला होता..  रात्री थोडे भाडे वगैरे करून मग तो घरी यायचा..

    रोजच्या घर संसारासाठी पैसे तर कमवावेच लागणार होते.. गेल्याच आठवड्यात ईश्वरीचाही पेमेंट झाला होता..  तिची खूप इच्छा होती, साईला म्हणावे की, तुम्ही फक्त अभ्यास करा आता..  माझ्या पगारात आपल भागून जाईल..  पण साईचा स्वाभिमानी स्वभाव बघता ,तो कदाचित चिडेल असे वाटून ती काही बोलू शकली नाही..

     या एक महिन्यात जितक्या ही वेळेस घरातल्या काही वस्तू आणायच्या होत्या, किंवा तिला काही हवं होतं तेव्हा साईच पैसे खर्च करत होता.. तिने काही परस्पर आणल तरी तेव्हा,  त्याने तिला मला सांगत जा मी घेऊन येत जाईल. असे सांगून तिचे पैसे खर्च करायला नकार दिला होता..

    आताही सकाळीच गॅस सिलेंडर संपले होते. म्हणून त्याने त्याचा नंबर लावलेला.. संध्याकाळी सिलेंडर आले तर साई घरात नव्हता..  म्हणून ईश्वरीने पैसे देऊन ते सोडवून घेतले.
साईला सांगायचं मात्र ती विसरली होती.. आणि असे ही नोंदवल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सिलेंडर ची डिलिवरी यायची.. त्यामुळे त्याला ते आजचं येणारं याची कल्पनाच नव्हती..

    "आज काही आहे का?"  वरण-भात भाजी आणि श्रीखंड असे जेवणाचे ताट पाहून साई ने तिला विचारले..
तिने फक्त हसून नकारार्थी मान हलवली..

    
    तो क्षणभर विचारात पडला आणि त्याला क्लिक झाले अरे आजची पाच तारीख..  आज आपल्या लग्नाला  एक महिना झाला.. म्हणून केले असेल का ईश्वरीने एव्हढे छान जेवण..?  म्हणूनच रात्री आपण बाहेर जाऊया असं ही म्हणत होत्या का?  शीट माझ्या लक्षातच आलं नाही.. हल्ली मंथली एनिवर्सरी साजरी करायचा ट्रेण्ड पडला आहे.. त्यांनाही बाहेर जेवायला जायचं असेल का? 

     आज माझ्यामुळे त्यांच्या या साध्या साध्या इच्छाही पूर्ण होत नाहीत..  त्या धनेश शी लग्न झाले असते तर फिरायलाही कुठेतरी बाहेर जाता आले असते..  जेवायला छान छान हॉटेलमध्ये गेल्या असत्या.. पण त्याच्या त्या एका चुकीने त्यांना माझ्याशी लग्न करावे लागले..  आणि हे असे टिचभर खोलीत राहावे लागते..  स्वतःच्या इच्छा आणि हौस मारून..  त्याने एक दीर्घ उसाचा घेतला..  मनातले गिल्ट डोळ्यात उतरले होते..  तसाच तो सावकाश जेवण करू लागला..

"अहो काय झालं?  चांगलं नाही झाले का जेवण?

    " नाही ईश्वरी..  जेवण खूप छान झालय..  ते.. .मी..  सॉरी.."

   " सॉरी?  कशासाठी?"

    " मी विसरलो..  आपल्या लग्नाला एक महिना झाला ना आज..  तुम्हाला मी बाहेर घेऊन जायला पाहिजे होतं जेवायला..  पण माझ्या लक्षातच नाही आलं.."

   क्रमशः