Login

तुम देना साथ मेरा..25

प्रेम




     आता पर्यंत केवळ तीचे पप्पा होते, जे न सांगता तिच्या अडचणी समजून घेत तिची काळजी करत होते.. कधीही काही बोलून न दाखवता तिला आवश्यक असतील त्या वस्तू घेत होतें. उगाच महागाच्या नसल्या तरी तिच्या आवडी नुसारच घेऊन देत होतें.

   आणि आत्ता साई सुध्दा तसेच वागत होता ना?  तीने न सांगताच तिला छत्रीची आवश्यकता भासेल हे ओळखून तो दुकानात घेऊन आला होता. त्याची नजर गेली तर ती समोरच्या आरशात दिसणाऱ्या त्यालाच बघत होती.  दोघांचीही नजरानजर झाली तशी बावरून ती पटकन बाहेर बघू लागली.


   पुढच्या स्टॉप वर मात्र त्याच्या नेहमीच्या पॅसेंजर पैकी एकजण उभे होते.  तसे त्याने रिक्षा थांबवली. ईश्वरी एका साईडला सरकून बसली होती..

    "बसा काका.. सोडतो तुम्हाला.."

   " अरे वा! बरे झाले तूच भेटलास.." काका अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखे साई शी गप्पा मारू लागले..

    पुढच्या स्टॉप वर असलेल्या बँकेत ते कामाला होते. आणि कधीतरी बोलता बोलता साईने त्यांना बँके च्या परीक्षे बद्दलची माहिती विचारली असेल..  तेव्हापासून त्यांची ओळख झाली होती..  बँके च्या परीक्षे संबंधित काही माहिती  काका त्याला सांगत होते..  साई ही आपल्या प्रश्नांचे निरसन करून घेत होता. ईश्वरी नुसतीच दोघांच्या गप्पा ऐकत होती..

     "बरं काका, जरा फक्त पुढच्या वळणावर यांना सोडतो.  आणि मग तुमच्या बँकेकडे रिक्षा घेतो. चालेल ना?"

    " हो चालेल..  सोड तू यांना.. असेही आज मला उशीर झालेलाच आहे.."

   " तेच म्हणालो मी..  तुम्ही नेहमी नऊ वाजताच बँकेत जातात. आज एवढ्या उशिरा कसे?"

   " अरे! घरी अचानक काम निघाले. मग दोन तास लेट येईल असं साहेबांना सांगितलं, आणि निघालो..  बर, अभ्यास चालू आहे ना व्यवस्थित.."

    " हो काका..!"

    " कधी आहे परीक्षा?"

     " अजून दोन महिने आहेत..

     " अभ्यास कर पूर्ण वेळ...  गेल्या वेळेस जराशा मार्कांसाठी राहिला होता पेपर.. आता थोडे दिवस रिक्षाचे भाडे जरा कमी कर..  अभ्यासावर जास्त फोकस कर."

   " हो काका.. अभ्यास चालूच आहे."

     पुढच्या वळणावर ईश्वरी च्या शाळेसमोर त्याने रिक्षा थांबवली. ईश्वरी रिक्षातून उतरली आणि त्याच्याजवळ आली.

   "संध्याकाळी इथेच थांबतो मी येऊन.. तुम्ही या शाळा सुटल्यावर."

   "हो... अहो , जेवण करून घ्या."  तिने त्याला म्हटले आणि नजरेनेच निरोप घेत ती शाळेच्या गेटमध्ये शिरली.

   काका दोघांचा संवाद ऐकत होते.

   " काय रे ! बायको का तुझी?"

   " हो काका.." साई ने जरा लाजतच उत्तर दिले.

    " अरे वा! कधी झाले लग्न ?"

     " आताच काही दिवसांपूर्वी झाले.."

    " हो का!  छान आहे पण बायको तुझी.. आणि शिकलेली पण आहे."

   " हो.  या शाळेत टीचर आहेत त्या.."

    " नशीबवान आहेस..  आजच्या काळात सुंदर आणि गुणी बायको मिळणं म्हणजे नशीबच म्हणायला हवं.. त्यात तू रिक्षा चालवतो तरी लग्न केले तुझ्याशी, म्हणजे नवलच.. " काका हसतच म्हणाले. आणि साईने अगदी पटल्याप्रमाणे मान हलवली..


######


" अरे ईश्वरी मॅडम.. कशा आहात?" गावडे सरांनी ईश्वरी ला पाहिले तसें हसून चौकशी केली. बाकीच्या शिक्षिका ही हसून विचारू लागल्या...

"मी छान आहे सर! मनाली मॅडम नाही आल्यात का आज?" ईश्वरी ने स्टाफ रूम मध्ये नजर फिरवत विचारले.

"अग ईश्वरी.. मनाली ने चार दिवस रजा घेतलीय.. तिच्या सासू बाईंना बर नाहीये.." नुकत्याच आत आलेल्या बनकर मॅडम ने उत्तर दिले.


    रजा संपवून आजच शाळेत आलेली ईश्वरी सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय होती..  तिचे लग्न कसे आणि कोणत्या परिस्थितीत झाले हे शाळेत सर्वांनाच ठाऊक होते.
ईश्वरीचा स्वभाव आणि मनमिळाऊपणा यामुळे ती सर्वांची लाडकी होती. 

    तिच्या पप्पांनाही सारेच ओळखत होते. त्यामुळे कोणाच्याही मनात तिच्याबद्दल आकस नव्हता. सगळ्यांनी तिचे अभिनंदन केले आणि नवीन संसाराबद्दल चौकशी केली. कितीही झाले तरी एका रिक्षा चालकाशी लग्न हा कुतूहलाचा विषय होता.  ईश्वरी सारख्या सुंदर सुशील आणि शिकलेल्या मुलीसाठी रिक्षा चालक पती मिळणे ही हळहळण्यासारखीच बाब होती सर्वांसाठी.. पण तिच्यासमोर मात्र कोणीही तसे बोलून दाखवले नाही..

   शाळेमध्ये कोणाचेही, कोणतेही काम असो. कधीही नकार न देणारे ईश्वरी तसेच, शाळेची सर्व ऑनलाईन कामे अगदी नीटनेटकेप्रमाणे पणाने करणारी ईश्वरी, तिच्या बद्दल सगळ्यांच्याच मनात प्रेम होते. विद्यार्थ्यांची तर ती आवडती शिक्षिका होतीच, पण सहकाऱ्यांमध्ये सुद्धा तिच्या स्वभावामुळे ती आवडती झाली होती.
त्यांच्या शाळेमध्ये सर्व स्टाफ हा लेडीजचाच होता. केवळ शिपाई पदावरील एक आणि शिक्षक म्हणून भरती झालेले दोन असे तीनच पुरुष मंडळी होती.  बाकी शाळेतील सफाई करणाऱ्या मावश्या धरून जवळजवळ वीस ते बावीस या स्त्रियाच होत्या.  एका कुटुंबाप्रमाणे सगळेजण शाळेत वावरत असायचे..

  
    "अच्छा..  चला ईश्वरी मॅडम पावणे सहा होऊन गेले.. निघूया आता.."  बनकर मॅडमने लॉकर बंद करत म्हटले. आणि ईश्वरी आणि त्या स्टाफ राम मधून बाहेर पडल्या. बाकीची मंडळी आधीच निघालेली होती.  ऑफिसमध्ये जोशी मॅडमला निघू का म्हणून विचारत त्यांनी थंब मशीन वर थंब केले आणि शाळेतून बाहेर पडल्या..  लोकलने जाणारे शिक्षक लोकल पकडण्यासाठी आधीच निघाले होते..

    बनकर मॅडम ह्या कल्याण मध्येच राहात होत्या. त्यामुळे दोघीही सोबतच निघायच्या.. त्या तशा जवळच राहत.. एकाच रिक्षात जाऊन आधीच्या स्टॉप वर त्या उतरायच्या आणि मग ईश्वरी पुढे जायची.  त्यानंतर पुन्हा तिला रिक्षा बदलून जावे लागायचे.

   "मॅडम मी या रिक्षात जाते.. येताय का?" ईश्वरीने गेट बाहेर उभे असलेल्या साईच्या रिक्षाकडे हात दाखवत म्हटले

     साईला पाहून बनकर मॅडमच्या तो तिचा नवरा असल्याचे लक्षात आले. लग्नाला बऱ्यापैकी शिक्षक आले होते. त्यामुळे साईला सर्वांनी पाहिले होते..

  "अग, इट्स ओके.. जाते मी दुसऱ्या रिक्षेत.. तुम्ही दोघे जा."

   "चला ना मॅडम..  रस्त्यात सोडते तुम्हाला."

   " नको, नको, जा तुम्ही दोघेच.." मॅडम नकोच म्हणत होत्या. पण ईश्वरीने खूपच आग्रह केला तशा त्या रिक्षात बसल्या. साईने हसून त्यांना ग्रिट केले.

    ईश्वरी आणि बनकर मॅडमच्या शाळेविषयी गप्पा सुरू होत्या.  साई रिक्षा चालवता चालवता त्यांच्या गप्पा ऐकत होता.  रिक्षात बसवलेल्या एफ एम वर छान जुनी गाणी लागलेली होती.

   " बस, बस, इथेच थांबवा.."  बनकर मॅडमचा स्टॉप आला , तसा त्यांनी रिक्षा थांबवायला सांगितली.

    " अहो, नको राहू द्या मॅडम.."  मॅडमने पर्स मधून पैसे काढले, तसे साईने घेण्यास नकार दिला.

   " अहो असं काय करताय? तुमचं नुकसान कशाला? घ्या की.."

    " नाही नको, मॅडम. राहू द्या."

    " ईश्वरी, सांग तूच त्यांना.. ओळख एका बाजूला आणि व्यवहार एका बाजूला..  अस प्रत्येक ओळखी वाल्या कडून जर पैसे नाही घेतले तर कसं व्हायचं ?" बनकर मॅडम हसत म्हणाल्या.

   "नको मॅडम, राहू द्या.  पहिल्यांदा बसल्या तुम्ही माझ्या रिक्षात..  पुढच्या वेळेस नक्की घेईन पैसे..पण प्लिज आज नको.."

   " ठीक आहे..  आजच्या दिवस नाहीं देत.. पुढच्या वेळेस मात्र पैसे नाही घेतलेत तर मी कधीच बसणार नाही  तुमच्या रिक्षेत.. आणि हो छान दिसताय तुम्ही दोघे सोबत..  ईश्वरी घरी घेऊन ये यांना चहासाठी.."मॅडम ने त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले.

    "हो मॅडम!  नक्की येऊ.."

    " ओके..  चल बाय, येते.."  असं म्हणत मॅडम त्यांचा निरोप घेऊन निघाल्या. आणि साईने रिक्षा पुढे घेतली.

    आताही तो तिला एकटीलाच घेऊन निघाला होता.. सीट होते तरी घेत नव्हता, हे पाहून तिने त्याला सीट घ्या म्हणून सांगितले..पण आता सुद्धा त्याने , 'नको असू द्या तुम्हाला घरी सोडतो आणि मग मी पुन्हा निघेल.' असे म्हटले .

    "आज गेला नाही तुम्ही वाचनालयात? "

     " गेलो होतो ना!  लवकरच गेलो होतो आज, आता तुम्हाला सोडलं की मग पुन्हा जाईन थोडा वेळ.."  त्याने सांगितले.

     पुन्हा जरा लक्षात शांतता पसरली..  काय बोलावे दोघांनाही पटकन सुचत नव्हते. बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला होता..  ईश्वरीने पर्स मधली छत्री बाहेर काढली.  साईने घेऊन दिलेली ही पहिलीच वस्तू होती..  तिने हळुवार त्या छत्री वरून हात फिरवला.  समोर पाहिले तर साईची नजर आरशातून तिच्याकडेच होती. तिने पटकन नजर वळवली. तोही बावरला..

   " ईश्वरी , काही भाजी वगैरे घ्यायची का तुम्हाला?" बाजूला असलेल्या भाज्यांच्या गाडीकडे निर्देश करत त्याने विचारले, तसे तिने मानेनेच नकार दिला..

   जरा वेळात चाळीसमोर त्याने तिला उतरवले. आणि तो जायला निघाला.

" अहो ... रात्री लवकर या घरी.."  ती म्हणाली .आणि क्षणात थबकला तो रिक्षा सुरू करता करता..
हृदयात एक गोड संवेदना उमटली.. तिच्या या वाक्याने गाली हसूही खुलले... असे कोणीतरी आपण लवकर घरी यावं या अपेक्षेने आपली वाट बघतय, ही भावनाच किती छान होती..

  " हं.. येतो.. काही आणायचेय का येताना.."

" नको.. तुम्ही.. तुम्ही लवकर या फक्त.. पाऊस खूप भरुन आलाय.."  तीने काळ्याकुट्ट झालेल्या आकाशाकडे पाहत म्हटलें..

" हो.. येतो लवकरच.." त्याने रिक्षा चालू केली. आणि वळवून निघाला.. ती मात्र पुढच्या वळणा पर्यंत तीथेच उभी राहून त्याला पाहत होती..

   अचानक आले असले तरी तिच्या आयुष्यातील हे साई नावाचे वळण अत्यंत सुखद होतें.. अगदी हवे हवेसे..