तुम देना साथ मेरा..21

प्रेम


" हां.. काकू म्हणाल्या होत्या यांना भरल वांग खूप आवडत म्हणून.. पण न विचारता भाजी केली तर रागावणार नाही ना? माझी आई तर रोज बाबांनाच विचारून करते भाजी.. आम्हाला आवडतं नसेल तर मग अजून एक दुसरी भाजी बनवते..

   पण चालेल ना? की फोन करून विचारून घेऊ? पण चिडतिल का कामावर असताना फोन केला तर? सायली ताई सांगत होत्या की, काम करत असताना विनाकारण फोन केला की हे चिडतात म्हणून.. काय करू? जाऊ दे.. आधी हा सामान नीट ठेवते आणि मग फोन करतेच.. चिडले तर पुन्हा कधी करायचाच नाही फोन.." ती स्वतः शीच बडबडत होती.



    गावाहून आणलेले सामान काढता काढता तीचे विचार चालूच होते.. कीचन च्या भिंतीत असलेल्या कपाटात दोन मोठे आणि चार छोटे स्टील चे डबे होतें. त्यातला खराब झालेला सामान काढून टाकत तीने त्यात गावाहून आणलेल्या डाळी आणि धान्य भरले. भाज्या निवडून नीट पेपर मध्ये गुंडाळून प्लास्टिक च्या टोपलीत ठेवल्या.. दोन दिवसात त्या कराव्या लागणार होत्या..
फ्रीज नसल्या मुळे वर फार फार तर दोन तीन दिवस चांगल्या राहू शकल्या असत्या.. त्यात पावसाळ्याचे दिवस.. आणि त्यात जून अखेरचा मुंबईचा पाऊस म्हणजे अगदी मुसळधार.. तरी बर सध्या विश्रांती घेतली होती त्याने.. पण कधी कोसळेल सांगता येणार नव्हते..
  
     काम आवरल्यावर तीने मोबाईल हातात घेतला.. करू की नको विचार करता करता लावलाच फोन त्याला.. बराच वेळ रिंग जात होती. शेवटी उचलला गेला कॉल..

   "हॅलो.. हॅलो.." तिकडून फोन उचलून तो म्हणत होता आणि ईश्वरी फोन कानाला लावून विचारच करत होती..

  " हॅलो...". शेवटीं कसें बसे शब्द बाहेर पडले तिच्या तोंडातून.

   "हां बोला ईश्वरी?"  त्याने हळू आवाजात विचारले.. रिक्षा चालवत होता बहुतेक.. गाड्यांच्या हॉर्न चा आवाज येत होता.. मागच्या पॅसेंजर च्या बोलण्याचा ही आवाज येत होता.

   "हॅलो.. काय झालं? ईश्वरी.. काही काम होत का? अजून एकतास तरी लागेल मला घरी यायला.. काही हवय का?"

  "न.. नाहीं नको.. ते.. ते मला विचारायच होत की.. की.. भाजी काय करू?" तीने विचारले आणि जीभ चावली दाताखाली.. काय विचार करेल तो आपल्या बद्दल.. भाजी काय करू विचारायसाठी फोन केला आपणं? घरीच विचारता येत नव्हत का?

   तिचा प्रश्र्न ऐकून पटकन रिक्षा थोडी साईड ला घेऊन ब्रेक लावला त्याने..

   "अहो.. भाऊ काय करताय..? रिक्षा का थांबवली..?" मागची लेडीज पॅसेंजर ओरडली तसें त्याने हाताने एक मिनिट म्हणत कानातले निसटलेले ब्ल्यू टूथ पुन्हा लावले..
    
   " हॅलो.. हॅलो.. काय म्हणालात तुम्ही?" त्याने रिक्षा चालू करत पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारलें.. अजून जास्त वेळ थांबला असता तर पॅसेंजर चिडले असतें..

   "भाजी.. भाजी काय करू?" तीने पुन्हा एकदा हिंमत करत विचारलें.

  " हे.. हे विचारण्यासाठी कॉल केलात तुम्ही..?" त्याने ओठातले हसू स्वरात न जाणवू देता विचारलें.

   "सॉरी.. पण.. मला .. मला कळतच नाहीये, काय बनवू ते.." ईश्वरी ने घाबरलेल्या आवाजात म्हटले.. तिला वाटले आपणं अचानक फोन केल्यामुळे तो आपल्यावर चिडलाय...

     "अं.. सॉरी नका म्हणू.. तुम्हाला काय आवडतं ते बनवा.. मी खाईल.."

   "वांग.. भरल वांग बनवू? "

   "हम्म.. बनवा.. ठेवू?" त्याने हळूच मिरर मधून बघत विचारलें.. आणि अवघडला..मागचे पॅसेंजर त्याचे बोलणें ऐकून गालात हसत होते..

   "हं..." म्हणत तिनेच कॉल कट केला.. जरा वेळ मोबाईल तसाच छातीशी धरून ठेवला.. हृदय अजुनही धडधडत होते.. ही भावना नवीनच होती. तशी घरी फारसी बोलण, खिदळून हसणं नव्हतच.. तिच्या बाबांना आवडायचं नाही.. कडक शिस्तीचे शिक्षक असल्यामुळे घरात ही एक प्रकारची आदर युक्त भीती होतीच.. मैत्रीणी होत्या. मित्र ही होतें. पण वायफळ बडबड, मित्र मैत्रीणी सोबत उगाच इकडे तिकडे फिरणे असे काही करायला तिला ही आवडायचे नाही.. खास अशा दोन तीन मैत्रीणी होत्या त्यांच्या सोबतच तीचे पप्पा तिला पाठवायचे..

     शिवम सोबत थोडीफार मस्ती चालायची.. कधीतरी आई पप्पा, शिवम सोबत टीटवाळा, शहाड च्या मंदीरात जाणे हे त्यांचे फिरायला जाणे असायचे.. कधी कधी गावचे जवळचे नातेवाईक आले की मात्र मुंबई फिरायला जायला मिळायचे.. नाहीतर कल्याण च्या बाहेर डी एड ला नंबर लागे पर्यंत काही ती गेली नव्हती.. लांब जायला लागू नये म्हणून तीचे शिक्षण पण जवळच्याच शाळेत झाले होते. जिथे बारावी पर्यंत शिक्षण होतें. डी एड ला डोंबिवली ला नंबर लागला आणि तिला मग कल्याण बाहेर जायला मिळाले. आणि लोकल ची ही सवय झाली.

  हां, सिनेमा पाहायला, जूनी गाणी ऐकत, गुणगुणत काम करायला आवडतं होतें तिला.. बऱ्याच वेळेस तर पप्पा घरात नसतांना अभ्यास करतांना पण गाणी लावायची ती.. पप्पा असताना मात्र अभ्यासाच्या वेळेस एकदम शांत वातावरण असायचे घरातले.. एरवी तीचे पप्पा पण जुन्या काळातली गाणी ऐकत असायचे.. तिच्या पप्पांमुळेच तिला ही जूनी गाणी ऐकायची आवड निर्माण झाली होती. तसे तर तिच्या आई वडिलांनी चांगल्या गोष्टींसाठी कधी नकार दिला नव्हता.. फक्त तिला एकटीला कुठे लांब पाठवायचे नाहीत..

    आता नोकरी ही कल्याण च्याच शाळेत लागली होती. त्यामुळे रिक्षा नेच जाणे येणे होते..   ती ज्या शाळेत सहशिक्षिका म्हणून लागली होती , ती शाळा अजून चाळीस टक्केच ग्रँट वर होती.. म्हणून पगार तसा इतर शिक्षकांपेक्षा कमीच होता. पण खूश होती ती... शिवाय मागें मुंबईला झालेल्या आंदोलनात पुढचा साठ टक्केचा टप्पा मिळणार असे आश्वासन मिळाले होते.. त्या दिशेने हालचाल ही सुरु होती.. ते मंजूर झाले तर अजून बारा तेरा हजारांनी पगार वाढला असता.. तशी तीची भरती पवित्र पोर्टल मधून झालेली होती. शाळेत सर्वात लहान तिचं होती.. बाकीचे काही शिक्षक तर अत्यंत कमी पगारावर नोकरी करत आता रिटायरमेंट ला आलेले होते..

   
      "हॅलो.. हॅलो.. हां मॅडम.. हो हो.. कपाटात ठेवलीय ती फाईल.. हो.. हो मी परवा पासून येणारे शाळेत.. तेंव्हां भरून टाकते माहिती.." ईश्वरी ने त्यांच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम चा कॉल कट केला. आणि पोळ्या करायला लागली..

   भाजी झालेली होती.. पोळ्या ही झाल्या असत्या एव्हाना, पण सामान आणि भांडी शोधायला वेळ गेला तिचा.. तीने भरभर पोळ्या करायला घेतल्या.. साई जाऊन दोन तास होत आले होते.. तो आला की जेवायला घ्यायचे.. म्हणून ती सर्व आवरुन ठेवत होती..

  " ईश्वरी.."

   "आले.." तीने ओटा पुसायचे कापड झटकून बाजूला वाळत घातले आणि बाहेर आली..

  " हे काय?"

   "थोडा किराणा सामान आहे.. घरात काही नसेल ना? बघून घ्या.. आणि अजून काही घ्यायचे असल्यास सांगा.." त्याने पिशवी तीच्या हातात देत म्हटले.

   " हम्म.. मीठ.. मीठ नाहीये यात. बरणीत थोडेसेच आहे..  दोन तीन दिवस पुरेल इतके.." तीने पिशवतीला सामान चेक केला. आणि लक्षात आले तिच्या..

   "बरं.. आणतो संध्याकाळी.. हे घ्या.."

  " हे कशाला? त्याच्या हातातले पैसे पाहून गोंधळली ती.. दहा, वीस, पन्नास च्या काही नोटा होत्या त्या.. "

   "हे आता मिळालेले पैसे.. आज भाडे चांगले मिळाले.. आता ही एक संध्याकाळचे भाडे मिळालेय लांबचे.. त्याचे ही पैसे मिळतील.."

   "हो. पण माझ्या कडे कशाला?"

   "अं.. आईं ने सांगितलय.. जे काही पैसे कमावशिल ते तुमच्याकडे द्यायचे. तुम्ही लक्ष्मी आहात ना माझ्या.. म्हणजे माझ्या घरच्या.." त्याने ते पैसे तिच्या हातात ठेवले.. तिची नजर त्या पैशांवर असली तरी एका वेगळ्याच भावनेने मन भरून आले होतें.. तीचे बाबा पगार झाला की त्यातली काही रक्कम अशीच आईंच्या हातावर ठेवत..

    आणि त्याचे ते शब्द.. 'लक्ष्मी आहात तुम्ही माझ्या ' अखंड शरीरावर मोरपीस फिरवत गेले ते शब्द..

    तीने किचन मध्ये असलेल्या भिंतीवरील देवघरात ठेवले ते पैसे.. मनोभावे देवासमोर हात जोडले.. आणि नंतर बाहेरच्या खोलीत असलेल्या कपाटात ठेवून दिले.. तो तिची एकेक कृती पहात होता..

  " वाढू जेवायला?" साई हात पाय धुवून फ्रेश झालेला पाहून तीने हळूच विचारलें. आणि त्याचा माने नेचं होकार मिळताच तीने जेवायला घेतले..

    ताटात वाढलेले जेवण पाहूनच साई खूश झाला होता.. त्याच्या आवडीची भाजी होती ताटात.. शिवाय पोळी सोबत च कांदा, टोमॅटो, आणि गावाहून काकू ने दिलेले लोणचे ही होते.

     इथे असताना क्वचितच असे साग्रसंगीत जेवण मिळाले असेल त्याला.. शेजारचे कोणी भाजी आणून द्यायचे बऱ्याच वेळेस.. पण इतर वेळेस मात्र स्वतःच बनवून खायचा..  मग ते असेच पोटभरीसाठी पटकन बनवलेले असायचे काहीतरी..

     बऱ्याच वेळेला तर खिचडीच असायची. रात्रीच थोडी जास्त बनवायची.. सकाळीं उरलेली खाऊन निघायचे.. दुपारी भूक लागली तर वडा पाव नाहीतर समोसा खाऊन घ्यायचा.

   "पोळी घ्या ना अजून.." त्याच्या ताटातली संपलेली पोळी दिसली तसे तीने पोळी वाढत म्हटले..

   "मी येतो..." साई ने जेवण केल्यावर तिला सांगितले.. ईश्वरी ला आश्चर्य वाटले.. तिला वाटले होते की आताच आलाय घरी, तर आता जरा वेळ आराम करून संध्याकाळी जाईल..

   "परत? म्हणजे आता लगेच?"

  
क्रमशः