तुम देना साथ मेरा.. 19

प्रेम
   शिवाय त्याच्या मित्र मंडळी मध्ये कुणाची वहिनी किंवा लेडीज नातेवाईक टीचर ते पण मुंबई च्या शाळेत नव्हते.(गावाकडे कल्याण असो की कर्जत खोपोली..तिकडे राहणाऱ्या सर्वांनाच मुंबईत राहतात, असे म्हटले जाते.) सर्वजणी शेतीची कामे करणाऱ्या होत्या.. त्या मुळे या वहिनी बद्दल त्याच्या साऱ्याच मित्रांना अप्रूप होते.. त्यात अनिश चे त्याच्या शाळेतल्या आणि ट्युशन टीचरांना पण वहिनी बद्दल सांगून झाले होतें.. आणि वहिनी शी त्यांना भेटवायचे पण होतें..

   दुपारी सायली पण कॉलेज मधून घरी आली आणि सर्व दुपार अशीच गप्पांमध्ये सरली..

  

आई आणि काकू घराच्या बाजूला शेतीची अवजारे ठेवण्यासाठी शेड केलेली होती,  तिथे बायकांच्या मदतीने लाडू आणि शेव करत होत्या.. दुपारी साई ने बॅग भरुन ठेवली होती. तिला तिकीट दाखवत रात्री आठ ला निघायचे आहे असे सांगितले.. आईं आणि काकू ने भरलेली सामानाची पिशवी अजून त्याला माहितीच नव्हती.. फक्त शेव आणि लाडू चे सायली कडून कळले होते.. नाही म्हटले तर आई आणि काकूला वाईट वाटेल म्हणून तो काही म्हणाला नव्हता..

    पण आता खरचं जो पर्यंत आपणं म्हटल्या प्रमाणे मानाची नोकरी मिळवून दाखवत नाही, तो पर्यंत त्याला घरून कोणत्याही प्रकारची मदत नको होती..  काका त्यांच्या जागी बरोबर असले तरी मी ही स्वतः च्या जोरावर आयुष्यात सेटल होऊ शकतो हे सिद्ध करायचे होतें.. त्यात काय? सगळ तर बापाने आणि काकाने आयत करून ठेवलेय, शेती तर वाडवडीलांचीच आहे.. हे जे लोकांचे टोमण्यातून बोलणें असतें, ते खोडून काढायचे होतें. त्यामुळे आता ही आपल्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी म्हणून तो गावी आला होता.. केवळ याच हेतूने थांबला होता.. त्यांच्याकडून कोणतीच मदत न घेता, अगदी धान्याची ही.. त्याला स्वतः यशस्वी व्हायचे होते.

    पण आई आणि काकू चा आग्रह पाहिला की स्वाभिमान सोडून द्यावा लागत होता, त्यांच्या प्रेमापुढे.. तरी अजून धान्याच्या बॅगेबद्दल त्याला माहीत झाल्यावर तो कसा नकार देणार होता?

   "आई हे काय आहे? एव्हढी मोठी बॅग?"  रात्री लवकरच जेवणे आटोपून, जरा वेळ सगळ्यांशी गापौ मारून झाल्या आणि आता साई आपली बॅग घेऊन बाहेर आला होता. तर आई ने त्याच्या समोर सामानाची एक भली मोठी बॅग ठेवली..

  " हां.. ते धान्य आणि डाळी आहेत त्यात घरच्या..."

   "अग पण कशाला? एवढं ओझ कसे नेणार मी?"

   " साई, रीजर्वेशन आहे ना तुमचे.. आणि स्टेशन पर्यंत सागर येणारं आहे ना गाडी घेऊन सोडायला.."

  " हो काकू.. इथला काही प्रश्र्न नाहीं.. पण तिकडे कसे नेणार.. ते प्लॅटफॉर्म वरून बाहेर रिक्षा स्टँड पर्यंत न्यायलाच नाकी नऊ येतात.. आणि हमाल केला तर तो एव्हढे पैसे सांगतो की, त्यात यातले अर्धे धान्य येईल.."

   " हो, पण मेहनत आहे ना त्यांची पण त्यात..एव्हढे ओझे डोक्यावरून घेऊन जिने चढत जायचं.. मग दिले त्यांना तर ठीक आहे..आणि घरचे ते घरचे धान्य.. शुध्द एकदम.. ते काही नाही.. घेऊन जा तू.. तिथे कोण्या मित्राला बोलवून घे घ्यायला हवतर..." काकू आग्रहाने म्हणाल्या..

  " ते खरं काकू.. पण.. काका..?  नको.. काकांना..."

  "त्यात शोप,ओवा आणि तीळ ठेवलेत पॅक करून..ते काकाच घेवून आलेत त्यांच्या मित्राकडून.." काकू हळूच म्हणाली. आणि त्याला आश्चर्य वाटले.. काका त्याच्याशी बोलत नसले तरी जीव लावत होते.. अगदी नारळा सारखे होतें ते..वरून टणक पण आतून मुलायम.. त्यांच्या घरी काम करणाऱ्या सालदार, महिनदार (सालदार - वार्षिक वेतन ठरवून काम करणारे, महिनदार - मासिक वेतन ठरवून काम करणारे मजूर, जे शेती व घर दोन्ही कडचे काम करतात.) लोकांना कधी काही अडचण आली तर लगेच मदत करत.. काकू ने सांगितल्यावर तो काही बोलूच शकला नाही.. आता पुन्हा नकार दिला असता तर त्यांच्या या रागात अजूनच भर पडली असती..

     "दादा.. नक्की येशील ना गणपतीत..." अनिश त्याच्या हाताला खेचत विचारत होता..

   " हो.. जमले तर नक्की येईल.."

   ' जमले तर नाही.. नक्की येच.. नाहीतर वहिनी ला पाठव.. "

   "बरं.. बघू.. तू अभ्यास कर नीट.. शाळा नको बुडवत जाऊस.."  साई ने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले.

   "मनिष.. तू पण अभ्यासाकडे लक्ष दे.. पुढच्या वर्षी दहावी आहे.."

  " हो दादा.."

   साई आणि ईश्वरी ने आई, काकू, आजी आजोबा यांना नमस्कार केला.. ईश्वरी ला आजी ने साई ची काळजी घेण्याची गळ घातली होती.. तिच्या आई बाबांना घेऊन ये गावी, असे म्हणत तिचे लाड केले.. आजोबांनी आपल्या जवळची दोन हजाराची नोट दिली, तसे तिने साई कडे पाहिले..

   त्याच्या कडे काय पाहतेस.. माझ्याकडून देतोय तुला.. याची छान पैकी साडी घे.. आजी आणि आजोबांचा आशिर्वाद म्हणून. असे म्हणत जबरदस्ती तिच्या हातात कोंबली.. कारणं आजी, आजोबांनी  ईश्वरी ला दिलेले दागिने त्याने, आता नको, मला नोकरी लागल्यावर मी परत येईल तेंव्हा, हक्काने घेईन असे सांगत त्याने ते परत केले होते.. ईश्वरी ने ही मग खरच पुढच्या वेळीं येईन तेंव्हा घेईन म्हणत आजी ची माफी मागीतली होती.. आजोबांनी शेतीच्या नफ्यातून आपल्या नातीच्या लग्नासाठी आणि नातवांच्या बायकांसाठी सोन्याचे दागिने करून ठेवले होते.. त्यातलेच काही पूजेच्या वेळी ईश्वरी ला घातले होते.. पण आज संध्याकाळी साई च्या सांगण्यावरून तीने ते आजीला परत केले होते..

      तिच्या साठी ही साई चा स्वाभिमान जास्त महत्वाचा होता आता.. त्याने बांधलेल्या मंगळसुत्राची किंमत सगळ्यात मौल्यवान होती तिच्यासाठी.. त्याच्या बोलण्यावरून तो आता नोकरी लागल्याशिवाय गावी येणारं नाही हे पक्के झाले होते..

    साई च्या आईचे आणि सायली चे डोळे वाहू लागले होते.. साई ने सायली ला घट्ट मिठीत घेतले.. त्याची लाडकी बहीण होती ती.. अनिश आणि मनिषलाही मीठी मारली.. काकांना नमस्कार करायचा होता. पण बराच वेळ झाला काका कुठे तरी गेले होते, ते अजून आले नव्हते.. आणि आता निघायला हवे होते.. रेल्वे स्टेशन ला जायला अर्धा तास लागणारं होता..
सागर कधीच येऊन थांबला होता.. गाडी साईच्या घरचीच होती. त्यामुळे हट्टाने अनिश आणि मनिष ही त्याला निरोप द्यायला स्टेशन वर जाणार होते.. सागर ड्रायव्हर म्हणून सोबत असल्याने एव्हढ्या रात्री बाहेर जायला काकांनी परवानगी दिली होती.. त्यामुळे दोघे ही खूश होतें..
   
    "काकू.. काका कुठे गेलेत..?"

   " माहीत नाही बाळा.. तसे तर रोज रात्री गावाबाहेर स्टँड वर त्यांचा ग्रुप असतो गप्पा मारत.. पण इतक्या उशिरा पर्यंत नाही थांबत कधी.. आता नऊ वाजायला आले.. निघा तुम्ही.. उशीर होईल.." काकू म्हणाल्या. आणि साई ने ईश्वरी कडे पाहिले.. तीने डोळ्यांनीच काकांचा निरोप घेऊन जाऊ म्हणून विनवणी केली..

     "सायु.. कॉल कर ना काकांना.." साई ने सायली ला म्हटले..

   "साई.. चल उशीर होतोय.. " बाहेरुन सागर ची हाक आली.. तसा नकारार्थी मान हलवत तो ईश्वरी ला चल म्हणून खुणावत बाहेर पडला.. सामान आधीच डिकीत ठेवून झाला होता.. अनिश आणि मनिष ने मागे बसून घेतले होते..

काकांना त्यांना भेटायचे नव्हते म्हणून ते घरात आले नव्हते, हे लक्षात आले त्याच्या.. 'माझा राग आहे ठिक आहे. पण ईश्वरी ला तरी भेटायचे होतें, त्या किती आशेने वाट पाहताय त्यांची..' त्याने तिच्या कडे पाहिले तर तिच्या नजरेत आनंद होता.. त्याने तिच्या नजरेच्या दिशेने पाहिले तर आश्चर्याने डोळे मोठे झाले त्याचे.. काका गाडीच्या डिकीत एक छोटा बॉक्स ठेवत होते..

   ईश्वरी पुढे आली.. साई लाही सोबत बोलावले आणि दोघेही काकांना नमस्कार करायला झुकले..

    "सुखी राहा.. सुखाचा संसार करा..." काकांनी याही वेळेस तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हटले. आणि चला ईश्वरी ला तरी आशिर्वाद दिला म्हणून साई खूश झाला.. पण वेड्याच्या लक्षात नाही आले की काका, सुखाचा संसार करा म्हणाले. म्हणजेच प्रत्यक्ष बोलले नाही तरी आशिर्वाद दोघांसाठी होता..

   निरोप घेतांना इतरांप्रमाणे हात हलवून बाय केलें नसले तरी, गाडी दिसेनाशी होईपर्यंत काका बघत होते.. आणि राग असला तरी काकांचे आपल्या वर प्रेम ही आहे. या भावनेने साई चे हृदय भरुन आले होते.. तो ही काका दिसत नाही तो पर्यंत मागे वळून पाहत होता.. अनिश ची मात्र वहिनी सोबत बडबड चालू होती.


   "  सॉरी.."

   "अं.. कशा साठी..?"

    "दागिने परत करावे लागले ना माझ्या मुळे.. " साई अपराधी भावनेने म्हणाला.. आपणं तर काही घेऊ शकत नाही.. आणि आजी ने दिले तेही आपल्या मुळे घेता आले नाही.. याची सल मनाला टोचत होती.. कोणत्याही स्त्रीला दागिन्यांचा किती सोस असतो हे तर जगजाहीर च आहे.

   "अं.. नाही.. तुम्ही सॉरी नका म्हणू प्लिज.." ईश्वरी ला अवघडल्या सारख वाटल त्याचं सॉरी ऐकून..

  " थोडे महिने थांबा.. मग मी करून देईन हळू हळू दागिने तुम्हाला.." त्याने बॅग मधून बेडशीट काढत म्हटलें...

    
   
क्रमशः