तुम देना साथ मेरा.. 18

प्रेम
  
  "सायली ताई.."

  " आले वहिनी..."

  " जेवायला बोलावतात काकू .."
सायली ने गप्पा आवरत्या घेतल्या.. आणि घरात आली..

   "सायली ताई.."
  " हां.."
   "तुमच्या दादांना कॉल करा ना... काकूंनी जेवायला बोलावलेय.. "

   "तू कर ना वहिनी.. दादा सागर दादा ला भेटायला गेलाय.. तू फोन केल्यावर लगेच येईल तो.." सायली म्हणाली आणि ईश्वरी विचारात पडली..
  
    तुम्ही लावा ना फोन.. हवं तर मी बोलते.. ईश्वरी म्हणाली.. तसे सायली ने तीच्याकडे पाहत भुवया उंचावतच का म्हणून विचारले..

    वहिनी.. खर सांग.. दादाचा नंबर नाहीये ना तुझ्याकडे..

  अं.. न.. नाही.. ते कधी कॉल करायचे कामच पडले नाही ना! सायली च्या विचरण्यावर खजील होऊन उत्तर दिले ईश्वरी ने..

  "मग तर आता तू करच कॉल... मी नंबर पाठवते व्हॉट्स अप वर.. सेव्ह करून ठेव...."
    सायलीने नंबर पाठवला, तसे ईश्वरीने तो सेव केला आणि लगेच त्याला कॉल लावला..  चार रिंग झाल्यानंतर त्याने कॉल उचलला, पण ईश्वरी च्या तोंडून मात्र शब्दच बाहेर पडत नव्हते.. ती तसाच फोन कानाला लावून उभी होती.. तिकडून तो मात्र हॅलो हॅलो, कोण बोलते, अस विचारत होता.

   " काय वहिनी? बोल ना पटकन!" सायलीने तिच्या कोपराला हलवत म्हटले..  तिकडून साईने सायलीचा आवाज ओळखला होता..

    "हॅलो.. हॅलो.. ईश्वरी?"

    " अं.. हो..  तुम्ही घरी केव्हा येताय?  काकू जेवायला वाट पाहतायत.."

   " ईश्वरी.. तुम्ही काकू आणि आईला सांगाल का, इथे सागर कडे आलो होतो. त्याच्या आईने खूप आग्रह केला म्हणून इथे जेवण झाले माझे.. तुम्ही सगळे जेवण करून घ्या." साईने म्हटले. तसे तिने हुंकार भरला आणि फोन कट केला..

   " काय म्हणाला दादा?" सायलीने विचारले.
" ते जेवलेत, सागर भाऊजींकडे..  आपल्याला जेवायला सांगितलय.."

    " अच्छा, चल मग. जेवून घेऊया आपण..  नंतर मला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत.. उद्या जाताय ना तुम्ही परत.."

    " तुम्हाला माहिती आहे सायली ताई!"

    " हो.. दादा म्हणाला मला. चार-पाच दिवसात  तुझी सुट्टी संपते, आणि दादालाही अभ्यास करायचाय..  दादाने क्लास लावलाय माहितीये ना तुला?" सायलीने विचारले तसे ईश्वरीने मानेनेच नाही म्हटले..

   "जाऊ दे.. आता तिकडे गेल्यावर हळूहळू, माहिती होईल सगळं दादा बद्दल.. चल आपण जेवून घेऊया.." दोघीही आत मध्ये आल्या.  साईचा निरोप काकूंना दिला आणि जेवायला बसल्या.. बाकी सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली होती..  काका शांतपणे जेवण करत होते.. साई जेवून येणार आहे, यावर काकांनी काहीही रिऍक्ट केलं नाही..

    जेवण झालं तसे दोघी ही साईच्या खोलीत जाऊन गप्पा मारू लागल्या. बराच उशीर झाला तरी अजून साई आला नव्हता. सायलीने त्याला कॉल केला तसे त्याने घराजवळच आहे, पाच मिनिटात पोहोचतो असे म्हटले. ईश्वरीला मात्र आता झोप अनावर होत होती.

   "वहिनी, तू झोप दादा येईलच..  मी पण जाते झोपायला. उद्या कॉलेजमध्ये जावच लागेल." सायली तिचा निरोप घेत आपल्या खोलीकडे निघून गेली, आणि ईश्वरीने अंग टाकले.

    पाच मिनिटात तिला झोप लागून गेली, ते सकाळीच जाग आली. रात्री साई आला कधी, आणि झोपला कधी काहीही कळले नाही. सकाळी जाग आल्यावर उठून पाहिले तर तो खाली अंथरूण टाकून झोपलेला होता..

 
   " द्या काकू, मी बनवते जेवण आज.." अंघोळ करून ईश्वरी किचन मध्ये आली, तर काकू कणीक मळत होत्या..

    "राहू दे पोळ्या करते मी..  तुला चहा ठेवलाय बघ.. तो घे आधी.. आणि मग तू गोड म्हणून शिरा बनव.."

   " हो बनवते. पण बाकीचा ही करते ना स्वयंपाक.." ईश्वरी ला काही कामं न करतां बसून राहणे जड जातं होतें.. त्यातच काल तिच्या आई ने ही फोन वर घरी आहे, तर सर्व कामं कर, असे सांगितले होते.. आणि इथे तर कोणी तिला काम करूच देत नव्हते..

   " अग नको , भाजी झालीय.. पोळ्या पण होतील.. अनिश चे बाबा लवकरच डबा घेऊन जातात ना शेतात.. आज ताई घरीच आहेत, नाहीतर दोघे ही सकाळीच डबा घेऊन निघून जातात."

    "बरं.. मी शिरा करते पटकन..काका पण नेतील ना?"

  " हो.. नेतील नक्की.. तो सामान काढून ठेवलाय बघ शिऱ्याचा.. अनिश आणि मनिष ला पण आवडतो शिरा.."

   "काकू, सायली ताई? " रवा भाजता भाजता ईश्वरी ने विचारले..

   " अग ती गेली कॉलेज ला.. सकाळच्याच बस ने जाते.. येईल दुपार पर्यंत.."

   "आणि मग त्यांचा डबा?"

   "अग पोहे करून दिले तिला थोडे.. आली की जेवेल ती.. बरं चल, ते बदामाचे काप ठेवलेत बघ त्या वाटीत.. ते घाल वरुन.."

   "हो काकू.. "

   "सीमा..चहा दे मला.." काकांचा बाहेरुन आवाज आला..

 "  हो... हो ठेवतेय..  ईश्वरी तू घेशील ना.."

   "नको.. आताच घेतला ना.."

  " मग काय झालं? तुझ्या काकांनी आणि ताई ने एक तासापूर्वी घेतला होता.. सकाळीं साडेपाच लाच चहा लागतो त्यांना.. आणि तुला माहितीये का, सकाळचा चहा तुझे काका करतात..आणि मग इथचं किचन मध्ये गप्पा मारत घेतो आम्ही..बास.. आम्हाला एकमेकांशी बोलायला दिवसभरात हा खास वेळ असतो.." काकू डोळे मिचकावत एखादं सिक्रेट सांगावं तस म्हणाल्या.. आणि इश्वरी ला हसू आलं..
"आता गोठ्यातून आल्यावर पुन्हा एकदा चहा घेतात ते.. ताई पण देवपूजा करतायत.. ती झाल्यावर पुन्हा घेतील.. आईबाबा उठल्यावर परत होईल.. दिवसभरात पाच सहा वेळेस तर चहा होतोच आपल्या घरात.." काकू चहा कपात गाळत म्हणाली.. तेवढ्यात आई ही देवपूजा आटोपून आल्याच बाहेर..

    "गॅस बंद कर आता तो इश्वरी.. झाला असेल तो शिरा.. झाकण ठेवून दे.. वाफेवर उमलेल तो.. ही चहा कपात ओतून दे ताईला.. मी चहा देऊन येते तुझ्या काकांना.." काकू चहा चा कप उचलत म्हणाल्या...

     " आई, तुमचा चहा..!" तीने चहा परत गरम करायला ठेवला..

      "हम्म.. तू नाही घेत..?"

      "आत्ता थोड्या वेळा पूर्वीच घेतला.. आता नको.. संध्याकाळीच घेईल आता.."

   "इशू.. अं.. चालेल ना तुला इशू म्हटल तर.. रजनी ताई जरा बिचकत म्हणाल्या..'तिला आवडते की नाही याची काळजी वाटली...

  " अहो आई, चालेल काय? आवडेल मलाही.. माझे आई पप्पा इशूच म्हणतात.." ती चहाचा कप त्यांच्या हातात देत पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली..

    दोघीं सासू सुनेमधले अवघडलेपण बरेचं कमी झाले होते.. काकू काकांच्या चहाचा रिकामा कप घेऊन आत आल्या.. आणि तिघींच्या छान गप्पा सुरु झाल्या.. साई ची आवड निवड, त्याचा स्वभाव, सगळेच आज ईश्वरी ला त्यांच्याकडून कळत होते..

    आज साई च्या आईं घरी थांबल्या होत्या.. दोघी जावा मिळून साई आणि ईश्वरी साठी काही खायचे पदार्थ करून देणार होत्या.. त्यांना देण्यासाठी घरच्या डाळी, शेंगदाणे, वेगवेगळी पिठ नीट पॅक करून भरून ठेवले होते.. साई ला आवडतात म्हणून आज दुपारी दराब्याचे ( सोजीचे) लाडू आणि तिखट शेव बनवणार होत्या.. त्यासाठी मदतीला शेतात काम करणाऱ्या दोन बायकांना ही दुपारी शेतातून आल्यावर बोलावले होते.

   जरा वेळात आणि मनिष, साई पण तयार होवून आले. त्यांचे नाश्ता पाणी टिफीन भरणे यात ईश्वरी चा वेळ कसा गेला ते कळलं नाही. कधी नव्हे ते मनिष ही स्वतः हून वहिनी शी बोलला.. अनिश चा तर, अजून काही दिवस रहा, नाहीतर मला पण आठ दिवसांसाठी तुमच्या सोबत घेवून जा असे वहिनीला म्हणून ही झाले.. त्यावर आता नको, तुला सुट्टी असली की घ्यायला येतो असे सांगत साई ने त्याची समजूत काढली..

      आजी आजोबा ही नात सुने सोबत गप्पा मारत होते.. तुमच्याकडे गणपतीची शाळेला सुट्टी असते, तेंव्हा ईश्वरी ला इकडे पाठवून दे, असे आज्जीने ठणकावून सांगितले. त्यावर त्याने ईश्वरी कडे पाहत हुंकार भरला.. ते पाहून अनिश मात्र भलताच खूश झाला होता.. नवी वहिनी त्याला खूपच आवडली होती.. त्यांच्या पूर्ण वाड्यात तिच्या इतकी सुंदर दिसणारी कुणी नव्हती..

     शिवाय त्याच्या मित्र मंडळी मध्ये कुणाची वहिनी किंवा लेडीज नातेवाईक टीचर ते पण मुंबई च्या शाळेत नव्हते.(गावाकडे कल्याण असो की कर्जत खोपोली..तिकडे राहणाऱ्या सर्वांनाच मुंबईत राहतात, असे म्हटले जाते.) सर्वजणी शेतीची कामे करणाऱ्या होत्या.. त्या मुळे या वहिनी बद्दल त्याच्या साऱ्याच मित्रांना अप्रूप होते.. त्यात अनिश चे त्याच्या शाळेतल्या आणि ट्युशन टीचरांना पण वहिनी बद्दल सांगून झाले होतें.. आणि वहिनी शी त्यांना भेटवायचे पण होतें..

   दुपारी सायली पण कॉलेज मधून घरी आली आणि सर्व दुपार अशीच गप्पांमध्ये सरली..

  

क्रमशः