तुम देना साथ मेरा.. 16

प्रेम



"दादा.. तू ही आवरुन लवकर ये खाली.. मनू देवीला जायचंय.." सायली ने हसतच साई ला सांगितले..

  " श्याsss कसें बघत होतो आपणं त्यांच्याकडे.. काय म्हणतील त्या.. इतक्या वेळा रिक्षात बसल्या आपल्या..तेंव्हा नाही कधी असे नजर गाडून पाहिले आपण.. आणि आजचं.. पण का कोण जाणे.. काहीतरी वेगळं वाटतंय त्यांच्याकडे पाहिल्यावर.. "  तो विचार करूनच ओशाळला..

      साई, ईश्वरी, काकू, सायली आणि अनिश मनू देवीला आले होते.. अनिश हट्ट करून सोबत आला होता.. सायली ला काकू ने ईश्वरी ला सोबत होईल म्हणून कॉलेज ला सुट्टी टाकून यायला लावले होते..

   तशी तर ईश्वरी शी घरातले सगळेच मनमोकळ बोलतं होते.. पण ती मात्र अवघडायची बोलतांना..  त्यातल्या त्यात सायली सोबत गप्पा मारायची ती.. साई च्या आई शी मात्र एकदोन वाक्यापालिकडे बोलली नव्हती अजूनही.. आई अशी ही शांतच होती त्याची.. त्यात ईश्वरी कडे एकटक पाहत राहायची समोर असल्यावर.. काहीतरी शोधत असल्या सारखी..
  
    "अन्या जा.. गाडीतली ती पिशवी घेऊन ये सामानाची.."काकू ने अनिश ला सांगितले.

   " मी नाही जाणार.. ते माकड असतं ना इथे.. तो सम्या सांगत होता.. आल तर माझ्या मागे.." अनिश साई चा हात धरत इकडे तिकडे बघत म्हणाला..

   "चल मी येतो सोबत.. काय घाबरतोस माकडांना..?" साई ने त्याचा हात पकडला आणि तो डिकितून सामानाची पिशवी काढायला गेला..

    "चला.. आपण तो पर्यंत हार नारळ घेऊ.."

   " पण काकू तू तर घरूनच आणलंस ना सामान.." सायली ने काकूला विचारलें.. कारण तीने घरीच पाहिले होते, आज्जीने नारळ आणि तांदूळ असलेली पिशवी दिली होती.. साई आता तिच काढून आणत होता डिकीतून..

    "हां.. ते तोरण आहे नारळा चे.. देवीची ओटी इथूनच घेऊ.." काकू ने सांगितले तसे सायली आणि ईश्वरी त्यांच्या सोबत निघाले..

    ईश्वरी उतरल्या पासून त्या शांत परिसराचे निरीक्षण करतं होती.. एव्हढ्या भगभगत्या उन्हाच्या वेळेस इथले थंड, निसर्गरम्य वातावरण म्हणजे अगदी मनाला आनंद देणारे होतें.. त्यात लांबूनच खळखळणाऱ्या आवाजाने लक्ष वेधून घेणारा तो उंचावरून कोसळणारा धबधबा, सातपुड्यात पाऊस झाल्याने अगदीच जोरात कोसळत होता.. पूर्ण रस्त्यात दुतर्फा असलेल्या घनदाट झाडीमुळे तिथे अगदी गार वाटतं होतें.

     "काकू ही पिशवी.. " साई ने आणलेली पिशवी काकू कडे देत म्हटलें.. अनिश चे त्याचा शर्ट खेचणे चालू होते..

   " त्यातून नारळाचे तोरण आणि तांदूळ काढून घे त्या परातीत.. ईश्वरी ही ओटीची थाळी तू घे.. मंदिरात देवीची ओटी भरुन घेऊ.. नंतर दोघांनीही देवीला नमस्कार करुन प्रदक्षिणा घाला.. आपले कुलदैवत आहे हे.."

   "हो काकू.." त्याने परात आपल्या हातात घेतले.. ईश्वरी ने ही ओटी ची थाळी घेतली.. अनिश चेहरा पाडून बघत होता साई कडे..

   " याला काय झाल.. ?"

    "काही नाही.. अन्या.. थांब जरा.. देवीला नमस्कार करू आधी, मग तुला पाहिजे ते घेऊन देतो.." साई ने हळू आवाजात दटावले, तसें तो त्याच्या आईकडे पाहत शांत बसला..
    नाहीतर तिथेच पाठीत धपाटा बसला असता.. आणि नव्या वहिनी समोर आईचा मार? इमेज खराब झाली असती ना! त्यामुळे आता दादाचे ऐकण्या शिवाय काही पर्याय नव्हता.. असे ही त्याच्या ऐकीव माहिती प्रमाणे लग्न झाले की माणसे सगळ आपल्या बायकोला विचारूनच करतात.. आता वहिनी ने काही घेऊन द्यायला नको नाही म्हणू दे.. नाहीतर आत पर्यंत दादा जसे लाड करत आलाय, तसें करणारंच नाही.. वहिनी ला तर फक्त सायू ताईच आवडलीय.. ती तिच्याशीच बोलत असते.. ती तिलाच काहीपण घेऊन देईल.. मला पण वहिनी शी फ्रेंडशिप करायला लागेल.. त्याच्या मनातील वारू चौफेर उधळू लागलेले, ते हात खेचला गेला तसे जागीच थांबले.. त्याने वैतागून पाहिले तर त्याची आईं,दादा आणि वहिनी पुढे निघालेले, हा मागेच राहिला म्हणून सायली त्याचा हात खेचत घेऊन निघालेली..

   
  देवीची ओटी भरून प्रदक्षिणा मारून झालेली.. तिथल्या पुजाऱ्यांना नमस्कार करून आशिर्वाद घेतला दोघांनी.. आणि ते देवीची मूर्ती डोळ्यात साठवत गाभाऱ्यात बसलेले काही वेळासाठी.. ईश्वरी ला प्रचंड भूक लागलेली.. आधीच कालचा उपवास त्यात रात्री ही तशीच झोपून गेलेली.. आज देवीला यायचे म्हणून दर्शन घेईपर्यंत उपवास करायला सांगितलेला आजीने... सकाळी साबुदाण्याची खिचडी खायला आणली होती सायली ने.. पण साबुदाण्याने तिची एसीडीटी वाढायची म्हणून तिने नकार दिलेला.. आणि आता मात्र तिला राहवत नव्हते.. त्यात बाहेर गरमागरम केळीचे वेफर्स तळले जात होते, त्याचा घमघमाट सुटलेला.. त्याने भूक अधिकच चाळवलेली तिची..

   " वहिनी चल.. कसला विचार करतेस.. " सायली ने तिला उठवले..

   " हं.. हे घ्या.." साई ने सर्वांसाठी केळीचे वेफर्स घेतलेले..

    "कशाला घेतलेस साई.. जेवूनच घेऊया आता.. तुम्हा दोघांना उपवास पण सोडायचाय.. ईश्वरी ने काहीच खाल्ले नाही सकाळी.." काकू ने सांगितले तसे त्याने चमकून पाहिले तीच्याकडे..

   मघापासून चे तिच्या अस्वस्थतेचे कारण लक्षात आले त्याच्या.. त्याने तर अनिश मागे लागला होता म्हणून केळीचे वेफर्स घेतलें होतें.. त्याला एकट्यालाच कशाला, सगळयांनाच घेऊया हा विचार केला ते बरेचं झाले असे वाटले त्याला.. काहीसे अपराधी ही वाटले.. सरांनी मोठया विश्वासाने त्यांच्या मुलीसाठी मांडवात इतर मुले असतांनाही आपल्याला निवडले आणि आपण मात्र तीने काही खाल्ले की नाही हे ही जाणून घेऊ शकलो नाही..

   "दादा.. पेढे.." अनिश ने त्याला हटकले, आणि काकूंच्या हाताचा एक फटका त्याच्या पाठीवर बसला..

  " चल गुपचूप.. जेवायचे आहे आता.. लहान आहेस का तू? असा हट्ट करतोस?" काकू ने मारलेले काही लागले नाही त्याला.. पण वहिनी समोर मारले म्हणून वाईट वाटले.. त्याने रागातच साई चा हात सोडला आणि पुढे गाडीच्या दिशेने चालू लागला..

     "काकू... राहू दे.. लहान आहे तो.. असे पण प्रसादासाठी घ्यायचेच आहेत ना.. तुम्ही व्हा पुढे मी घेऊन येतो.."

  " दादा.. मला बांगड्या.." साई पेढे आणायला निघाला तसें सायली ही त्याच्या मागे गेली.. जातांना ईश्वरी लाही चल म्हणून खुणावले.. पण तिने नकार दिला.

  " ईश्वरी.. जा तू पण.. तू पण घे बांगड्या.." काकू ने ईश्वरी ला पण म्हटले..

   "न.. नको काकू.." तीने हातातले वेफर्स पर्स मध्ये ठेवत म्हटलें.. वेफर्स खाण्याची इच्छा मरून गेली होती..

   "अग.. घे ना.. जा.." तीने पाहिले तर सायली आणि साई दुकानाजवळ पोहोचले होते.. तीने पुन्हा मानेनेच नकार दिला.. मनात वाटून ही गेले, सायलीने खुणावले तरी पण साई ने विचारले ही नाही.. मन जरासे खट्टू झाले, पण आपण जास्तच अपेक्षा करतोय का त्याच्याकडून? हा विचार ही चमकून गेला.

   ती आणि काकू गाडीजवळ पोहोचल्या आणि आतून जेवणाचा डबा बाहेर काढला.. घरूनच जेवणं बांधून आणले होते त्यांनी..अनिश फुगा होवून झाडाखाली दगडावर बसला होता.. हातातले वेफर्स कधीच संपले होते..

    "अन्या.. इकडे ये.. इथली जागा साफ कर जरा.." काकूने बहावा च्या काड्या जमवून खराटा तयार केला होता. तो त्याच्या हातात दिला आणि आंब्याच्या झाडाखाली झाडायला सांगितले..

   ईश्वरी तशीच इकडे तिकडे बघत उभी होती.. गर्द झाडी होती सभोवती.. झाडांखाली दगडाच्या चुली मांडलेल्या दिसतं होत्या.. अर्धवट जळालेली लाकडे, राख, बाजूला पडलेल्या उष्ट्या पत्रावळी, तिथेच जेवणं बनवून खाल्ल्याच्या खुणा सांगत होत्या..

   " काकू हे.. ?" ईश्वरी ने चुली कडे निर्देश करत विचारलें.

    "अग, हे ना... बरेचं लोकं इथे येवून जेवण बनवतात.. आणि जेवतात.. काहींचा मान ही असतो.. ते पण मग इथेच स्वयंपाक बनवून देवीला नैवद्य दाखवतात.. आणि प्रसाद म्हणून वाटतात.. मोठ्ठी जत्रा भरते इथे.. जागृत देवस्थान आहे हे.. नवरात्रीत तर इतकी गर्दी असते ना... की बाप रे.. आपल्या खटल्यातले पण आपण सगळे मिळून येतो इथे.. वरण बट्टी चा स्वयंपाक केला जातो. आणि मग तो इथेच खाल्ला जातो.. आता पण आधी माहिती नव्हते म्हणून. नाहीतर सगळेच आलो असतो.."

    "आई... झालं.. " अनिश ने छान जागा स्वच्छ केली होती..

  " चल चटई टाकूया.." काकू ने चटई अंथरली. आणि दोघी त्यावर बसल्या..

    "अनिश भाऊजी, हे घ्या.." ईश्वरी ने तिच्या पर्स मध्ये ठेवलेले वेफर्स काढून अनिश च्या पुढ्यात धरले.. तो तर डोळे फाडून तीच्याकडे पाहत होता.. एव्हढी इज्जत आता पर्यन्त कोणी दिली नव्हती त्याला.. अंगावर मूठभर मांस चढले.. ही एवढा आदर देणारी वहिनी फारच आवडून गेली त्याला.. इतकी की त्याने आपले आवडते वेफर्स, हवे असताना पण नको म्हणून सांगितले..

   
क्रमशः