Login

तुम देना साथ मेरा..15

प्रेम


" सूनबाई.. तुझ्या नवऱ्याला सांग, माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करायचा नाही.. नाहीतर मी तुझ्याशी ही बोलणार नाही.. साई त्यांच्याशी बोलतं होताच की त्यांनी सुनावले.." आणि त्याचे तोंड पटकन मिटले.. ईश्वरी लाही काय बोलावे सुचले नाही.. ती खाली मान घालून उभी राहिली..

   "जा तू आत..  आणि कधी ही कुणाची बाजू घ्यायची काही गरज नाही.. हे लक्षात ठेव.." भरत दादांनी म्हटले आणि पडत्या फळाची आज्ञा दिल्याप्रमाणे ती आत गेली.. साई मात्र चेहरा पाडून पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.. आणि सागर ला फोन लावला..

      "चला झोपा आता.. सकाळीं लवकर उठून आवरायचं आहे.. दहा वाजेपर्यंत भटजी काकांनी तयार राहायला सांगितलय.." भरत दादांच्या सौभाग्यवती साधना काकू म्हणाल्या.. आणि घरातल्या बायकांची बैठक उठली.. सकाळीं पुन्हा लवकर हजर राहणे आवश्यक होते.. पुरुष मंडळी कधीच आपापल्या घरी निघून गेली होती.. बाहेर अंगणात आजोबा, मधू काका, भरत काका काहीतरी चर्चा करत होते.. थोड्या अंतरावर साई, सागर शी बोलतं होता.. साई ने फोन केल्यावर तो लगेच त्याला भेटायला आला होता..

   ईश्वरी ला घेऊन सायली झोपायला निघून गेली होती.. त्यांच्या मागोमाग बच्चेकंपनी ही सटकली होती.. त्यांचे या मोठ्यांमध्ये असेही काही काम नव्हते.. दोन दिवस शाळेला सुट्टी मिळेल हा आनंद मात्र चेहऱ्यावर दिसतं होता.. वाड्यातील मित्रांना उद्या आमच्याकडे पुजा आहे, तुम्ही लवकरच या, असे आमंत्रण ही घरच्यांनी न सांगताच देऊन झाले होते.. नव्या वहिनीची कधी एकदा मित्रांशी ओळख करून देतो असे झाले होते त्यांना..

   मनिष जरा शांत होता.. समजूतदार होता. पण अनिश मात्र एकदम खोडकर.. त्यात घरात लहान म्हणून शेंडेफळ.. बाबांनी कितीही रागावले तरी आजी आजोबांच्या मागे लपायच.. आणि त्यात ते ही त्याच्या खोड्यांनी वैतागले तर रजनी मोठी आईं होतीच.. ती कोणालाही त्याला रागावू द्यायची नाही.. आणि मोठ्या आईने बाजू घेतली म्हणजे बाबाना ही काही बोलता यायचे नाही.. घरात आणि बाहेर मधू काकांचा किती ही दरारा असला तरी ते मोठ्या वहिनी ला मात्र काही बोलत नसत..

    वहिनी आल्यापासून तीचे शांत आणि प्रेमळ वागणे, स्वतःच्या आवडी निवडी सोडून दुसऱ्यांच्या मना प्रमाणे राहणे हे त्यांनीं अनुभवले होते.. त्यात लवकरच मोठ्या भाऊचे अचानक जाणे, त्याने तर त्या अगदी खचूनच गेल्या होत्या.. आपले काम भले आणि आपणं भले, असे वागायच्या.. स्वतः च्या मुलांवर ही कधी रागवतांना त्यांना कुणी पाहिले नसेल.. सीमा काकूंना तर अगदी लहान बहिणी प्रमाणे जपायच्या..

     माहेरच्या लोकांचा तसा त्यांना आधार नव्हता.. म्हातारी आई , भाऊ वहिनी असा सगळा परिवार असला तरी ते रोजच्या जगण्यासाठीच संघर्ष करीत होते..   अगदीच थोडी शेती असल्याने भाऊ वहिनी आणि आई दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करायचे.. वडिल वारलेले होते.. बहीण होती, ती ही एका साध्या गरीब शेतकरी कुटुंबात दिलेली होती.. सणा सुदीला तेव्हढ त्या माहेरी जायच्या.. एरवी भाऊ भेटायला येऊन जायचा.. मधू काका मात्र दरवर्षी शेतात होणारे गहू, भुईमूग च्या शेंगा, डाळी, शिवाय मुलांचा शिक्षणाचा खर्च, अशी मदत करायचे.. त्यामुळे  साई च्या मामाच्या घरी आपल्या बहिणी च्या घरच्यांचे म्हणजे अगदी आदराचे स्थान होते..

     @#@#@#@#@#@#@


    सकाळी सकाळी साई च्या घरी गडबड गोंधळ सुरु होता.. साई ची मावशी, मामा मामी, आजी त्यांची मुले सर्व जण आले होते.. साई च्या चुलत आत्या, त्यांच्या घरचे, चुलत भाऊ बहिण, सगळेच जमले होते.. रात्रीतच काकांनी सगळ्यांना फोन करून आजच्या कार्याची कल्पना दिली होती..

    ईश्वरी लाही लवकरच उठून तयार राहायला सांगितले होते.. रात्री साई कडून नंबर घेऊन तिच्या बाबांना ही कॉल करून आजचे आमंत्रण दिले होते.. पलगेच नाही पोहोचता येणार असे म्हणून त्यांनी आपल्या गावाला राहत असलेल्या चुलत भावांना जायला सांगितले होते.. त्यामुळे ईश्वरीचे चुलत काका दुपारून येणार होते..

     दिनकर राव मात्र आपल्या मुलीला सासरी स्विकारले म्हणून जरासे निर्धास्त झाले होते..


   भटजी काका आले, आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे आधी साई आणि ईश्वरी च्या हातून लग्ना वेळी केली जाणारी देवपूजा करण्यात आली.. मग गावातल्या मंदिरात हार, तोरण देऊन झाले.. गावाबाहेर असलेल्या मुंजोबाच्या देवळात , मरी आई च्या देवळात साई च्या हातून दिवा लावून आले..

    
      " चला.. बसा दोघांनी पूजेला.." भटजी काकांनी सांगितल्याप्रमाणे दोघेही पूजेला बसले.. हिरव्या कच पैठणीत ईश्वरी खूप सुरेख दिसत होती साई ही अगदी राजबिंडा दिसत होता दोघांची पूजा आणि त्यांनी घरातल्या वडील धाऱ्या मंडळींना जोडीने नमस्कार केला ईश्वरीच्या चुलत काकांनाही नमस्कार केला पूजा आटोपल्यावर सर्वांचे जेवण झाले आणि तिचे दोन्ही चुलत काका त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी जायला

   साई आणि ईश्वरी चे लग्न गावात चर्चेचा विषय झाले होते शहरातून लग्न करून आणलेल्या नव्या नवरीला बघायला पूजेच्या प्रसादाच्या घ्यायच्या निमित्ताने जवळजवळ सगळं गाव लोटलं होत..

  " वहिनी चल.. काकू ने सांगितले की, तुला खोलीत घेऊन जा, आराम करायला.. सकाळ पासून तू उभीच आहेस..  असंही आता प्रसाद घ्यायला येणारी लोक संपली आहेत." सायलीने ईश्वरी ला म्हटले आणि वर साईच्या खोलीत घेऊन गेली..

    तिची बॅगही तिथेच ठेवलेली होती..  ईश्वरीने फ्रेश होऊन साडी चेंज केली..  आणि तिथल्या कॉटवर बसली..  दरवाजातून कोणीतरी डोकावताना दिसले तसे तिने सायलीला खुणावले..

   " अन्या काय करतोय तु इथे? आत ये.." अनिश डोकावून डोकावून बघत होता..

   " ताई..  आईने विचारले की वहिनीला काही खायला आणू का?  अनिश दरवाज्यातून आत येत म्हणाला..  नजर वहिनी कडे टुकुर टूकुर बघत होती..  अजूनही तो तिच्याशी बोलला नव्हता..  सायलीने काही म्हणायच्या आधीच ईश्वरीने मानेनेच नकार दिला..  दुपारी उपवास सोडताना जेवण केले होते..  आणि आता ती सतत उभं राहून सगळ्यांना नमस्कार करून इतकी थकली होती की, कधी एकदा आपण झोपतोय असे तिला झाले होते.
   
  "अन्या, जा..  काकूला सांग वहिनीला नकोय काही खायला.. " सायली म्हणाली आणि अनिश पळतच खाली गेला..

   " वहिनी तू झोप..  मी जाते खाली..  उद्या मला कॉलेजला जायचंय..  दादा येईलच जरा वेळात.."  सायली म्हणाली आणि खाली निघून गेली..

     ईश्वरीला मात्र धडधडायला लागले.. लग्नाच्या दिवशी ती आणि साई एकाच खोलीत झोपले होते. पण सोबत काव्या होती.. आज मात्र ते दोघेच असणार होते.. आणि कायमच असणार होते.. दोघे ही नवरा बायको होतें.. त्यामुळे त्यांच्यात अजून प्रत्यक्षात काही नाते नसले, एकमेकांशी मनमोकळे बोलणें, वागणे नसले , तरी तसे दुसऱ्यांसमोर दाखवता येणार नव्हते.. असे ही त्यांचे लग्न ऍक्सप्ट केलें असले तरी, मोठ्यांचा साई वरचा राग कायम होता..  त्यानें तिच्याशी आयत्या वेळेस लग्न करून जी तिच्या बाबांची लाज राखली होती. त्या बदल्यात तीला, त्याच्या माणसांचा त्याच्याबद्दलचा राग जर कमी करता आला तर,  तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.. त्याच्यासाठी तिच्या बाबाचे जे आदराचे स्थान होते, तेच तिच्यासाठी त्याचे होतें.. पण या आदरात अजून एक भावना लपलेली होती, जी तिला कळायला कदाचित वेळ लागणार होता..

    
      रात्री लगेच झोप लागून गेली होती तिला.. सकाळी जाग आली तर साई खाली चटई टाकून झोपलेला होता.. ती उठून फ्रेश झाली..  केसांवरून पाणी घेऊन आंघोळ करून बाथरुम मधून बाहेर आली, तो पर्यंत साई ही उठला होता..

     "दादा.. वहिनी उठली?" दारावर टकटक झाल्यावर साई ने दार उघडले तसे सायली ने विचारले..

    "हां.. अंघोळीला... गे.. " तो सांगतच होता की शब्द ओठातच अडकले त्याचे.. धुतलेले केस टॉवेल ने पुसत होती ती.. गुलाबी रंगाची नाजूक फुलांची प्रिंट असलेली शिफॉन ची साडी, तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होती.. साडीचा गुलाबी रंग चेहऱ्यावर ही उतरला होता..

    "वहिनी.. झालं आवरुन..? आजी खाली बोलावतेय.." आपला दादा एकटक वहिनी कडेच पाहतोय, हे पाहून तीने हातानेच त्याला बाजूला केलें, आणि ती आत आली..

  " हां.. झाले.. बास, केसांना क्लिप लावते, थांबा.. " ईश्वरी ने केस क्लिप मध्ये बंदिस्त केलें आणि सायली सोबत खाली निघाली..

   "दादा.. तू ही आवरुन लवकर ये खाली.. मनू देवीला जायचंय.." सायली ने हसतच साई ला सांगितले..

  " श्याsss कसें बघत होतो आपणं त्यांच्याकडे.. काय म्हणतील त्या.. इतक्या वेळा रिक्षात बसल्या आपल्या..तेंव्हा नाही कधी असे नजर गाडून पाहिले आपण.. आणि आजचं.. पण का कोण जाणे.. काहीतरी वेगळं वाटतंय त्यांच्याकडे पाहिल्यावर.. " तो विचार करूनच ओशाळला..