Login

तुम देना साथ मेरा.. 8

प्रेम


      ते लहान असताना दर दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचे..  सणांची खरी मजा गावातच असते, हे तिने लहानपणीच अनुभवले होते..  त्यामुळे आत्ता तिला गावी जायची खूपच एक्साईटमेंट होती.. तिथले वातावरण, आपल्या सोबतचे त्यांचें वागणे कसे असेल याची अनामिक भीती ही होती. पण कधी ना कधी तर तिला याचा सामना करावाच लागणार होता.. आणि साईश होताच सोबत.. का कुणास ठाऊक? पण तो असल्यावर आपल्याला कोणी बोलणार नाही हा विश्र्वास होता मनात.. कदाचित आपल्या पप्पांचा त्याच्यावर असलेला विश्र्वास कारणीभूत होता याला..

    "काही खायला घेऊन येऊ?"  साईश ने अचानक खिडकीबाहेर पाहत असणाऱ्या तिला  विचारलें, आणि ती भानावर आली...

    "नको.. "

    "कोल्ड्रिंक्स?"  त्याने पुन्हा विचारले..

      "नको.. झोपूया जरा वेळाने..." ती म्हणाली आणि पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली.

      एक मिडल आणि एक अप्पर असे दोन बर्थ रिझर्व केलेले होते. सध्या तरी ते दोघे खालच्या सीटवरच बसले होते.  हळूहळू गाडी सुटेपर्यंत बाकीचे पॅसेंजर ही आले. आणि मग सगळ्यांचीच आपापल्या सीटवर झोपायची लगबग सुरू झाली. असेही साडेदहा वाजले होते. साईशने तिला ती कुठल्या सीटवर झोपणार ते विचारले.  दोन्ही बाजूच्या खालच्या सीटवर वयस्कर महिला होत्या. तिने मिडल बर्थ वर झोपेल असे हातानेच इशारा करत सांगितले. त्याने बर्थ लावून दिला. बॅगेतून बेडशीट काढून त्यावर टाकली. आणि एक बेडशीट वरच्या बर्थ वर ही टाकली. रात्री थंडी वगैरे लागली तर म्हणून, पांघरायला शॉल ही दिली. तसा तर हवेत उकाडा होता, तरीही असावी सोबत.  ती मिडल बर्थ वर झोपली, तसं तोही वरच्या बर्थ वर जाऊन पडला..

      दोघांच्याही डोळ्यात झोप नव्हती..  तिला तर अशीही रात्री ट्रेनच्या आवाजाने झोप फारसी लागणारच नव्हती. आणि तोही उद्या घरी आपले कसे स्वागत होईल, याच विचारात होता. 'जाऊ दे बघू उद्याच्या उद्या.. नाही घरात घेतले तर सागर कडे जाईल.' सागर त्याचा अगदी खास मित्र होता. गावातच राहत होता. तसे त्याला, 'मी येतोय' अशी कल्पना दिलेलीच होती. लग्नाचे मात्र सांगितले नव्हते.

     ट्रेन सकाळी पाचच्या दरम्यान पोहोचणार होती. त्याने साडेचारचा अलार्म मोबाईल मध्ये सेट केला, आणि डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागला..

     ईश्वरीला मात्र बऱ्याच वेळे पर्यंत झोप येत नव्हती. गाडी कुठल्याशा स्टेशनवर थांबली, आणि तिने खाली वाकूनच खिडकीतून कोणत स्टेशन आले ते, पाहण्याचा प्रयत्न केला..  सगळीकडे अंधारच होता..  बाजूच्या कंपार्टमेंट मधला एक लाईट चालू होता. प्लॅटफॉर्मवर ही कोणी दिसत नव्हते..  दोन-चार प्रवासी उतरले, आणि दोन चार प्रवासी चढले, एवढाच काय तो आवाज..  स्टेशनचे नाव मात्र काही तिला दिसले नाही..  तिला वॉशरूमला जायचे होते, पण एकटीने कसे जायचे याची भीती वाटत होती..  आणि साईश ला तरी कसे उठवायचे हाही प्रश्न होता. अजूनही दोघे एकमेकांशी व्यवस्थित मनमोकळेपणे बोलले नव्हते..  तो तर त्याच्या सरांची मुलगी म्हणून आदरार्थी संबोधत होता तिला..  तिला थोडसं अवघडल्यासारखं वाटायचं , कारण घरात बाबा आईला नेहमी अग तुग करायचे,  आणि हा मात्र अहो जाहो करत होता.. 

      तसे त्यांची ओळख होतीच कुठे फारशी ? आधीही जेव्हा केव्हा रिक्षात बसयची तेव्हा,  सरांची मुलगी म्हणून तो आदरार्थीच बोलला होता एक दोन वाक्य. आणि आता अशा प्रकारे लग्न झालेले..  तिने मात्र एक्सेप्ट केले होते त्याला.  कितीही काही झाले, तो कसाही असला, फारशी ओळख नसली, त्याच्याबद्दल माहिती नसली, तरी त्याने तिची आणि तिच्या बाबांची इभ्रत सांभाळली होती.
आणि तिचे पप्पा म्हणाले होते, 'तो काय करतो याचा विचार करू नकोस..  पुढे जाऊन तो काय करणार आहे, याचा विचार कर..  आहे त्या परिस्थितीत तसाच राहणारा तो मुलगा नाही.  जिद्दी आहे, आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही चालू आहेत..  त्यामुळे तू फक्त त्याला सपोर्ट कर.  जाणून घे, सांभाळून घे,  घरातल्यांमुळे तो दुखावलेला आहे.  तुला शक्य झाले तर घरातल्यांच्या जवळ जायचा प्रयत्न कर.  त्यांच्याशी प्रेमाने वाग. त्याच्यातल्या आणि त्याच्या घरातल्या मधली दरी तुझ्या मुळे कमी झाली तर, त्या सारखे पुण्य नाही .' आई आणि पप्पा दोघांनीही घरातून निघताना त्याच्या नकळत तिला समजावले होते.

   शर्टची बाही खेचल्यासारखे वाटले, आणि साईश ने डोळे उघडून पाहिले..  तसे गाढ झोप त्याला लागलेली नव्हती.   पण नुकतेच डोळे मिटू पाहत होते.. त्याने पाहीले तर, ईश्वरी त्याच्या शर्ट ची बाही खेचून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती..

    "काय झालं काय? हवंय का काही ?"

    "मला.. मला वॉशरूमला जायचंय." ती थोड अवघडून म्हणाली...

    "दोन कंपार्टमेंट सोडले की पुढेच आहे.. "

    " तुम्ही चला ना सोबत प्लीज..  झोपलेत सगळे रस्त्यात.." तिने खाली पॅसेज मध्ये झोपलेल्या लोकांकडे इशारा करत म्हटलं.  तसा तो उठून बसला.

   " ठीक आहे, चला.. " असं म्हणत खाली उतरला... आणि ती ही उतरली.. चप्पल घालून वॉश रूम कडे निघाले..  तशी गाडीला बऱ्यापैकी गर्दी होती..  ज्यांच्या सीट कन्फर्म झाल्या नाही,  ते वेटिंग वाले रस्त्यातच  झोपलेले होते... त्यांना ओलांडत जावे लागत होते..

     तिला आत जाण्याचा इशारा करत तो तिथेच टिकून तो तिथेच कंपार्टमेंटला टेकून तो उभा राहिला.. 

    ईश्वरी वॉश रूम ला जाऊन आली तसे ,
    "पाणी हवं ?" त्याने बॉटल दाखवत विचारले..  तिने त्याच्या हातातली बॉटल घेतली.. दोन घोट पाणी पिले, आणि परत दिले.  आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली ..

   "काही लागले तर उठवा.."  तो हळूच म्हणाला आणि झोपला..  काही वेळानंतर मात्र दोघांनाही झोप लागून गेली..

      त्याच्या मोबाईलचा अलार्म वाजला आणि जागा झाला तो. पाहिलं तर गाडी स्टेशनवर थांबलेली होती..  आता येणारे पुढचे स्टेशन त्यांचेच होते..  त्याने उठून अंगाखालची बेडशीट काढली आणि तिची घडी घालून बॅग मध्ये ठेवली.. फ्रेश व्हायला जाऊन आला..  ईश्वरी ला उठवायचे होत, पण तिला मात्र छान झोप लागून गेली होती..

   "ईश्वरी.. ईश्वरी.. उठता ना?"  तो तिच्याजवळ उभा राहून आवाज देत होता.. 

   " ईश्वरी स्टेशन येईल आपल आता..  उठा .." त्याने हळूच तिच्या खांद्याजवळची चादर हलवत आवाज दिला. तशी तिला जाग आली.

   " आले स्टेशन..?" आजूबाजूला पाहत तीने विचारले..

   " नाही पण येईल लवकरच.. उतरता ना खाली..?"

    "हो." ती उठली आणि अंगावरच्या शाल ची घडी करू लागली .. त्याने मग तिच्या हातातली घडी घेऊन बॅगमध्ये ठेवली.. अंथरलेल्या चादरीची घडी ही ठेवून झाली..
आजूबाजूची लोक ही जागी झाली होती..  बहुतेक लोक त्या स्टेशनवर उतरणार होते..  त्यामुळे सगळ्यांचीच अंथरूण वगैरे बॅगेत ठेवायची गडबड सुरू होती . ईश्वरी व साईश दोघेही खाली उतरून खालच्या सीटवर कॉर्नरला बसले..

   " चला." गाडी स्टेशनला लागली तसे, बॅग उचलून घेत तो म्हणाला .. आणि ईश्वरीला आपल्या मागे येण्याची खूण केली..  दोघेही त्या गर्दीतून प्लॅटफॉर्मवर उतरले.. त्याने बॅग बाजूच्या बाकावर ठेवली.. आणि तिला बसायचा इशारा केला..


   "ब्रश करून चहा घेऊया.. आणि मग जाऊ या गावाला.." तो तिच्या बाजूला बाकावर बसत म्हणाला.

    "अजून पुढे जायचेय?"

    " हो.. बस फक्त पंधरा मिनिटे रिक्षाने.." प्रवासाने कंटाळलेल्या तीच्याकडे पाहत त्याने म्हटलें..

    "चालेल.. आपणं डायरेक्ट घरी जाणार..?"

    "का? असं का विचारताय?"

     " नाही.. ते पप्पा म्हणत होते, घरचे रागवलेत तुमच्यावर."

    " हो.. पण बघूया.. तुम्हाला पाहून कदाचित राग विसरतील जरासा.." तो एक उसासा सोडत म्हणाला..