तुम देना साथ मेरा.. 13

प्रेम



    साई मात्र आजी आणि काकू सोबत गप्पा मारत बसला.. त्याचे शहरात रीक्षा चालवणे, ईश्वरी च्या बाबांची वेळोवेळी झालेली मदत, शेजाऱ्यांनी लावलेला जीव सगळ काही ऐकून आजीला आपल्या नातवा बद्दलचे प्रेम अधिकच दाटून आले..

   गाडीच्या हॉर्न चा आवाज आला आणि अनिश बाबा आले म्हणत दरवाज्याकडे धावला.. आणि काकू आणि आजीच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.. साईश च्या चेहऱ्यावरचे भाव ही काही वेगळे नव्हते..

    काका आजोबांना आत घेऊन आले..  त्या दोघांना पाहून साई पटकन उठून उभा राहिला.. काकांना पाहून थोडी भीती, तर आजोबांना पाहून भावना दाटून आल्या मनात.. तो अपेक्षेने दोघांकडे पाहत होता.. काका ही समोर उभ्या असलेल्या त्याला पाहून भाऊक झाले. पण क्षणभरच.. जसे त्याचे मागचे वागणे आठवले तसें चेहऱ्यावर पुन्हा निर्विकार भाव उमटले..

    "काका..". साई आवाज देत जवळ येतच होता की, काका ने त्याच्याकडे पाहिले आणि काही न बोलता आतल्या खोलीत निघून गेला.. आजोबा मात्र त्याला पाहून आनंदाने नाचायचेच बाकी होते..

    साई च्या मनाला वाईट वाटले.. काका एवढ्या सहजासहजी आपल्याला माफ करतील आणि घरात घेतील हे शक्य हे होणार नाहीं.. एवढे तर काकांच्या अशा समोरून निघून जाण्याने समजले साईला.. आजोबा मात्र खूप खुश होते.. त्यांनी त्याला अगदी घट्ट मिठी मारली..  साई ही, लहान मुलासारखा आजोबांच्या मिठी रडत होता.

   "आजोबा बसा तुम्ही येथे!  तुम्हाला बरं नाहीये ना!   साई ने आजोबांचा हात धरून त्यांना सोफ्यावर बसवले.. अश्रू भरल्या डोळ्यांनी आजोबा साईचा चेहरा निरखत होते..  त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरून, डोक्यावरून मायेने हात फिरवला..  आणि त्याचा चेहरा डोळ्यात साठवून घेऊन लागले..  जणू काही हे स्वप्नच होते आणि जरा वेळाने त्याचे असे प्रत्यक्ष भेटणे भासच ठरणार होते..

   "अहो.. आताच दवाखान्यातून आलात..  चला तुम्ही आत मध्ये..  आराम करा." आजीने आजोबांना सांगितले.

    "नको..  नको.. मला साईशी खूप बोलायचं आहे. आणि आता तो आला ना ! आता मी अगदी ठणठणीत बरा झालोय.. " आजोबांचा उत्साह मात्र सळसळत होता.

    "हां.. तो राहणार आहे.. नंतर बोला त्याच्याशी.. त्याला ही आराम करू द्या.. आणि मग तुमच्यासाठी त्याने एक भेट पण आणलीय... तिला पाहिले की उरला सुरला आजारही पळून जाईल.." आजोबांना आजीचे भेटी बद्दल चे म्हणणे कळले नाही. पण साई ला मात्र आता टेन्शन आले.. आजोबा मान्य करतील, पण काका? त्याने आजी कडे पाहिले. आजीने नजरेनेच धीर दिला त्याला..

    "सीमा.. जा. मधू साठी चहा घेऊन जा.. आणि त्याच्याशी बोल.." आजीने काकू ला सांगितले.

    "आई मी? "

    "हां.. जरा प्रेमाने समजावं त्याला.. पुढचे विधी तरी करावे लागणार.. सगळ्यांना सांगावे लागेल.नाहीतर गावातले आपल्यालाच बोल लावणार नंतर.. "

   "हो.. लोकं दोन्ही बाजूंनी बोलतात.. आपल्या खटल्यात पण सांगावं लागेल.. नाहीतर बोलायला टपलेलेच असतात सगळे.." काकूंनी ही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.. ( खटले म्हणजे एकाच कुटुंबातील विस्तारामुळे वाढलेली  कुटुंबे.. जे कुणाचेही लग्न, पूजा, किंवा मृत्यू चे कार्य वगैरे असो सर्व एकत्रित केलें जायचे. सर्व कामात सहभागी व्हायचे..)

   "काय झालंय? काय बोलतील लोकं? आणि खटल्यात काय सांगाल?" आजोबा त्या दोघींकडे पाहत विचारत होते.. अजूनही त्यांना काही माहीत नव्हते..

       "तू जा.. मी सांगते यांना.." असे म्हणत आजीने सीमा काकुला आत पाठवले.. आणि आजोबां जवळ बसत त्यांना साई च्या लग्ना बद्दल सर्व काही सांगितले.. सर्व ऐकून आधी तर आजोबांना न सांगता लग्न केल्याचा राग आला त्यांना पण त्याने आपल्या मदतकर्त्याचा मान ठेवून त्यांची लाज राखली, म्हणून अभिमान ही वाटला.. आता कधी एकदा नात सूनेला बघतो असे झाले त्यांना.. पण आजीने ती झोपलीय.. उठली की भेटा असे सांगत त्यांना आराम करायला सांगितले..

  इकडे काकू आत आल्या तर काका भिंतीवर लावलेल्या त्यांच्या भावाच्या, मोहन च्या फोटो समोर उभे होते.. डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या..

  " अहो.."  काकू ने आवाज दिला, तसे पटकन मान वळवली त्यांनी.. कदाचित डोळ्यातले पाणी बघू नये म्हणून आटापिटा करत होते.. आपला भाऊ गेल्यापासून ते नेहमीच आपल्या कुटुंबासाठी भक्कम पणे ऊभे राहिले होते.. तोट्यात चाललेल्या शेतीत अपार कष्ट करुन इथवर आले होतें.. वेळ प्रसंगी अत्यंत कठोर वागले होते.. पण त्या मागे आपल्या मुलांना चांगले वळण लागावे, हीच अपेक्षा होती..

    अचानक घरातील कर्ता भाऊ ॲक्सिडेंट मध्ये गेल्यावर , शेतात होणाऱ्या नुकसानीला कमी करण्यासाठी त्यांनी झोकून दिले होते स्वतःला.. हल्लीच्या काळात जो तो स्वतंत्र राहायला बघतो. पण काका आणि काकू मुळे मात्र हे घर अजून ही एकत्र नांदत होते.. गावात त्यांच्या कुटुंबाचे दाखले द्यायचे लोकं..

   सायली वर तर भारी जीव होता सगळ्यांचा.. त्यांच्या कुटुंबात दोन पिढी नंतर झालेली मुलगी होती ती.. आजोबांना बहिण नव्हती.. लेक ही नव्हती.. त्यामुळे सायलीवर सर्वांचाच खूप जीव होता..

   "अहो.." काकू ने पुन्हा आवाज दिला. तसे काका एक उसासा सोडत बेडवर बसले.. काकू काय सांगायला आलीय, याची कल्पना होती त्यांना..

  " बोल.. " काका जरा तुटकपणेच म्हणाले.. काकू कशासाठी आलीय हे लक्षात आले होते त्यांच्या..

  " ते.. म्हणजे..?"

   "काळजी करू नको.. मी त्याला घरातून बाहेर काढणार नाहीये.. त्याचे पण घर आहे हे.. उशिरा का होईना.. पण तो स्वतः हून परत आला घरी.. यातच आनंद आहे.."

  " हम्म.. पण.." काकू जराशी रिलॅक्स झाली, पण अडखळली, पुढे सांगताना..

 " अजुन काही आहे का??" काकांनी रोखून पाहत विचारलें..

   "हां ते.. साई ने..." असं म्हणत काकू ने त्याच्या लग्ना बद्दल सर्व सांगितले.. आणि काका एक उसासा टाकत शांत बसून राहिले..

  " अहो.. बोला ना काहीतरी.."

  " काय बोलू? हा अधिकार पण नाय दिला त्यान मला. मी काय नाय बोललो असतो का? त्यानं सांगितलं असत मला या पोरीशी लग्न करायचंय.. तर लावून दिले असतें.. माझ्याशी बोलत नाही तर, तुला, त्याच्या आईला सांगितलं असतं.. लोकं काय म्हणतील आता.. बाप नाय तर काकाने पण करून नाही दिलं लग्न.. "

  " अहो.. लोकांचं काय? लोक पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण बसू नाही देत.. आणि त्याने स्वतः हून थोडी केलं लग्न? ते तर.."

  " हां.. ते सांगितलं तू.. बर झालं.. नाहीतरी आपल्याला काही त्याच्या मनाविरुद्ध लग्न करून द्यायचे नव्हते.."

  " हां.. आणि छान आहे सूनबाई.. शिकलेली आहे.. शाळेत आहे शिकवायला.." काकू ने सांगितले.

   "हम्म.. बरं आहे ते.. कोणी तरी एखादे कमावते असायला हवे.."

    "अहो.. पूजा घालायला लागेल ना... लग्न आपल्या समोर नाही झाले तरी पूजा आणि देवदर्शन व्हायलाच पाहिजे ना.. आपल्या घरातले पहिले लग्न आहे हे.."

  " हम्म.. उद्या करा पूजा.. आणि मग देवीला जाऊन या.."

   " खरच? म्हणजे.. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना..?"

    "सीमा.. मला काय प्रोब्लेम असणारे? मोठा मुलगा आहे तो या घरचा.. आईं बाबांशी बोलून घें आणि करा पूजा.. हां... मी सगळी सोय करतो.. खटल्याच्या ग्रुप वर पण मेसेज टाकून देऊ.. "

  " बरं.. मी सांगते आईना.." काकू लगेच उत्साहात आजीला सांगायला बाहेर गेली.. आणि काकांनी त्यांच्या भटजींना फोन लावला..

  दुपारी साईश ची आई आली तेंव्हा सायली ने उत्साहात तिला सर्व सांगितले होते. नंतर साई ही खाली आला, आणि त्याला पाहून आई रडत त्याच्या गळ्यातच पडली..

    आई आणि साईच्या गप्पा चालूच होत्या की आजोबा आज्जी बाहेर येऊन सोफ्यावर बसले..काका ही खाली आले चहा साठी.. चार वाजता त्यांचा चहा व्हायचा.. अनिश आणि मनिष टीव्ही बघत होते..

    "सायु.. जा.. वहिनी ला चहा साठी घेऊन ये.. " काकू ने सांगितले तसे ती आपल्या खोलीत गेली.. इकडे सर्व जण गप्पा मारत असले तरी, आजोबा, आईं आणि काकांची नजर आतल्या दरवाज्यावरच होती.. सुनेला पाहायची ओढ स्वस्थ बसू देईना.. अनिश आणि मनिष ही सावरून बसले.. वहिनी समोर इमेज सांभाळायची होती..

   
क्रमशः