तुम देना साथ मेरा.. 10

प्रेम


   त्याच्या एका निर्णयाने,  जिद्दीने त्याला घरापासून दूर जावे लागले होते.. तसे तर बहुतेक काका लाही त्याच्या आई आणि बहिणीचे त्याच्याशी बोलणे माहीत होतें..पण आपल्या मोठया वहिनीचा आदर करायचे ते.. शिवाय एका आईला आपल्याच मुलाशी बोलण्या बद्दल कसा आक्षेप घेऊ शकणार होते ते..

    काका वाईट नव्हतेच.. फक्त इगो भयानक होता त्यांच्यात.. त्यामुळे आपले न ऐकल्यामुळे त्यांनी साई ला घरातून बाहेर काढले होते.. आणि तो ही मोठया तावाने निघून गेला होता.. एकदा ही काकांची मनधरणी करायचा प्रयत्न न करता.. स्वभाव शेवटीं.. दुसरे काय? दोघेही सारखेच हट्टी होतें.. पण यात बाकीचेही दुरावले गेले होते त्याच्या पासून.. आणि साई घरा बाहेर पडला, तेंव्हां पासून आजोबांनी ही बोलणे टाकले होते काकांशी.. फक्त कामा पुरते हो ला हो करायचे.. पण आधीसारखा मोकळे पणाचा संवाद राहिला नव्हता..


     "काकू..काकू..  ही ईश्वरी तुझी सून..  तिला भेटायला घेऊन आलोय..!" काकू तसेच त्याच्याकडे पाहत उभी राहिलेली पाहून त्यानेच शेवटी सांगितले..

    " हो.. हो..  पण साई.. ते .. म्हणजे.." काकूला प्रश्न पडला होता..  साईला आत ये असे तरी कसे म्हणावे..  त्याच्या काकांनी त्याला घरात येऊ नकोस म्हणून निक्षून सांगितलेले होते..

    काकूचा संभ्रम त्याने ओळखला होता..

   "साई.. बाळा ..एक एक मिनिट थांब.. मी आलेच.." असे म्हणत काकू पटकन आत गेली..  आणि साईने एक दीर्घ उसाचा सोडत ईश्वरी कडे पाहिले..  तिला आता कसे वाटत असेल हा विचार त्याला छळत होता..

   " साई.. माझा साई... आलास.."  काकू आतून आज्जीचा हात धरून घेऊन बाहेर आली.. आज्जी ने त्याला पाहिले, आणि दोघे ही रोखू शकले नाहीत स्वतःला.. साई आज्जी च्या गळ्यात पडला.. दोघांच्याही डोळ्यांना अश्रूंची धार लागली होती..

    "सीमा जा..  आरतीचे ताट घेऊन ये आणि तांदळाच्या माप पण.. नव्या सुनबाई चे पाय पहिल्यांदा घराला लागलेत..  गृहप्रवेश करून घे तिचा..  भावनांचा भर ओसरला , तसे आजीने सीमाला म्हणजेच साईच्या काकूंना सांगितले..

    साई आणि काकू दोघेही एकमेकांकडे पाहून लागले..

   " राहू दे आजी..  आम्ही थोडा वेळ थांबतो बाहेरच.. आजोबा आणि काकांना भेटलो की निघतो लगेच.. काकांना आवडणार नाही आमचे असे ओवाळून स्वागत केलेले.." साई म्हणाला तसे काकू ला वाईट वाटलें.. पण खरंच तर म्हणत होता साई, त्याच्या काकांना कदाचित आवडलेच नसते.. जरासे साई ला ही वाईट वाटले.. आपल्याला आत घ्यायला काकू ला एव्हढा विचार करावा लागतोय म्हणून..

    एक तर आधीच राग होता..  त्यात परस्पर न विचारता, न सांगता तो लग्न करून आला होता, म्हणजे काकांच्या मनाविरुद्ध नोकरीचे खूळ घेऊन शहरात गेला तो गेला, शिवाय नोकरी लागली नाही तरी लग्नही करून आला..

     काकाचे आणि साईचे त्याच्या नोकरी करण्या वरूनच, भांडण झाले होते..  काकाची इच्छा होती की साईने आपल्या सोबतच शेती पहावी..  कारण शेतीचा व्याप भयंकर वाढला होता.. कामाला येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी घरच्याच माणसाची आवश्यकता होती..  त्यात उत्पन्न आणि फायदाही भरपूर होत होता..  नोकरीत मिळणार नाही इतका पैसा सध्या त्यांना शेतीत मिळत होता..  म्हणून काका साईच्या नोकरी करण्या विरोधात होते.. पण साई होता की त्याला शेतीची आवड होती, पण नोकरीही करायची होती..  त्यात लहान पणापासून बँकेच्या अधिकाऱ्यांची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली होती त्याच्या मनात.. जेंव्हा जेंव्हा तो काकांसोबत बँकेत जायचा, तेंव्हा तेंव्हा तिथल्या मॅनेजर शी सर्वांचे अदबीने वागणे, कॅशिअर चे भरभर पैसे मोजणे  हिशेब करणे याचे अपुर्वाईने निरीक्षण करायचा.. आपणं ही एक दिवस बँकेत काम करायचे.. हे स्वप्न तेंव्हा पासूनच डोळ्यात तरळू लागलं होते..

     नोकरी करून शेती पाहायला त्याची काही हरकत नव्हती,  म्हणून त्याने जशी bsc com. ची फायनल एक्साम दिली, तसे काकाला न सांगताच बँकेच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता.. कॉम्प्युटरची आवड आणि ज्ञान दोन्हीही उत्तम होतें त्याच्याकडे...

    ज्या दिवशी त्याचा पेपर होता,  नेमके त्याच दिवशी त्यांच्या शेतीतल्या केळीचे घड कापायला व्यापारी येणार होते..  आणि त्याच दिवशी काकांना मात्र सोसायटीच्या निवडणुकीसाठी हजर राहणे आवश्यक होते.. त्याचे काका केळी ग्रुप च्या सोसायटीचे सदस्य होतें, शिवाय या वेळेस चेअरमन पदासाठी उभे होते.. काकांनी जेव्हा साईला, तू उद्या दिवसभर केळीच्या बागेत थांबून नीट लक्ष ठेव.. कापलेला माल नीट मोजून घे,  असे सांगितले आणि साईने मात्र माझा उद्या बँकेचा पेपर आहे,  म्हणून मी पेपर देण्या साठी जाणार आहे.. मला बागेत जायला जमणार नाही..  यावरूनच काकांचे आणि त्याचे भांडण झाले होते..

      दोघेही आपापल्या जागी बरोबर होते.. काकांचे जसे सोसायटीची निवडणूक महत्त्वाची होती,  तसेच साईचा पेपरही महत्त्वाचा होता.. आणि बागेत लक्ष ठेवणेही गरजेचे होते.. काकांनी त्याला तू नोकरी करू नकोस..  आपल्या शेतीतच लक्ष घाल, एवढी मोठी शेती सोडून कशाला त्या नोकरीच्या फंदात पडतोस..  असे सांगितले..  पण साईने मात्र माझे स्वप्न आहे की, मी बँकेत नोकरी करावी आणि मी ते पूर्ण करणार..  असे म्हटले .. काका चे म्हणणे न ऐकता, पेपरला जाण्याचे ठरवले..  वाद वाढतच गेला.   आणि रागाच्या भरात काकांनी माझे ऐकायचे नसेल तर या घरातही राहायचे नाही, असे म्हटले.  आणि मागचा पुढचा विचार न करता साईने ही, मी नोकरी मिळवल्याशिवाय पुन्हा या घरात येणार नाही..  असे म्हणून घर सोडले. आज्जी आजोबा, काकू दोघांनी ही दोघांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला..  पण दोघेही हट्टाला पेटले होते.. 

    साईची आई तर फक्त रडतच होती.. असेही ती अत्यंत साधी बाई होती.. कुणाच्या अध्यात ना मध्यात.. शिवाय आता पर्यंत तीचे कधीही घरात काही चालले नव्हते.. नवरा असतांनाही आणि आता काकांच्या राज्यातही.. आयुष्यभर केवळ शेतीचे काम आणि घरच्यांची काळजी..  आधीच अबोल होती.. भांडणं तंटा न करता आपण आपल काम करावं, उरलेल्या वेळात देवाची पोथी वाचावी.. मंदिरात जावं.. यातच त्यांचं आयुष्य चाललं होतं.. साईच्या काकूने घरातले कामे व स्वयंपाक पाणी बघावे,  आणि आईने शेतीची काम करावे..   शेतात जाऊन कामाला असणाऱ्या बायकांवर लक्ष ठेवावे, अशी अलिखित त्यांच्या कामाची पूर्वीपासूनच वाटणे झालेली होती.. आणि सगळं काही गुण्यागोविंदाने सुरू होते..

      "तू नको सांगू मला तुझ्या काकाचं काह..  हे घर अजूनही माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे..  तेव्हा मी गप्प बसले, आणि तुला जाऊन दिले..  पण आता नाही..  तू स्वतःहून परत यायची वाट बघत होतो आजोबा आणि मी..  कारण रागाच्या भरात घर सोडून तू निघून गेला होतास.. बरं, ते नंतर बोलू आपणं ते आधी घरात ये.. नव्या नवरीला असे घराबाहेर उभे करणे चांगले नाही..

  काकूंनी औक्षण करून दोघांना आत यायला सांगितले.. तांदळाचे माप ओलांडून इश्वरीचा गृह प्रवेश करून घेतला..

  " देवघरात जाऊन नमस्कार करा दोघे.." आज्जी ने सांगितले तसे, साई तिला घेऊन देवघरात गेला.. दोघांनी जोडी ने देवाला नमस्कार केला.. आज्जीला आणि काकू लाही नमस्कार केला.. साई ने बाजूच्या बेड वर पाहिले. आजोबांना नजर शोधत होती.. आजोबा नेहमीच तिथल्या बेडवर बसून पुस्तके वाचत असायचे.. अध्यात्माचा अभ्यास दांडगा होता त्यांचा.. भगवद गीता, दासबोध याचे वाचन नेहमीच सूरू असायचे.. देवघर आज्जी आणि आजोबा यांच्या खोलीतच केलेले होतें..

   " हम्म.. बसा दोघे इथे.. " आजीने दोघांना सोफ्यावर बसवले. आणि ती साई च्या बाजूला बसली..

  " आज्जी.. आजोबा कुठे दिसतं नाहित..बाहेर गेलेत का? " साई ने आज्जी ला विचारलें आणि आज्जी पाणी घेऊन आलेल्या काकू कडे पाहू लागली..

   "साई, तुम्ही दोघे पाणी घ्या आधी.. चहा ठेवलाय.. तो घेतल्यावर निवांत बोलू."  आज्जी ऐवजी काकूंनी उत्तर दिलें.. ईश्वरी फक्त ऐकण्याचे आणि घराचे निरीक्षण करायचे काम करत होती.. तिच्या बद्दल अजून आज्जी किंवा काकू दोघींनीही काही विचारले नव्हते..

  
क्रमशः