तुम देना साथ मेरा.. 7

प्रेम



      "वा साई!  चहा अगदी फक्कड केलाय बरं का,  सुनबाईंनी...  चला आता तुझी खायची , प्यायची आबाळ होणार नाही..  आयते मिळेल छान..  सुनबाई सुद्धा आपल्यासारख्याच मिळून मिसळून राहणाऱ्या आहेत वाटतं.." काका अगदी दिलखुलास हसत म्हणाले.
साई फक्त हसून मान बोलवत होता . आज कित्येक दिवसातून खरेच अगदी मस्त चहा मिळाला होता त्याला.. नाहीतर रोज घरी न बनवता नाक्यावरच्या टपरी वरचा चहा पिऊन दिवस सुरू व्हायचा त्याचा.. कधी कधी रात्री जेवण बनवायला कंटाळा आला की चहा खारी खावून भूक भागवायचा.. हॉटेल चे जेवणं कसें परवडणार?
आणि बाहेरचे खाऊन पोट बिघडायची धास्ती...

      तिने स्वतःहून स्वतःहून काकांसाठीही चहा ठेवला याचे त्याला अप्रूप वाटले, आणि थोडे दडपण कमी ही झाले.  कारण चाळीत राहायचे म्हटले तर, एकमेकांच्या घरी जाऊन चहा पिणे, भाज्यांची वाटी अदलाबदली करणे, काही सामान संपले असेल तर हक्काने मागणे हे तर करावेच लागते.  आणि पहिल्या दिवसापासूनच ईश्वरीचे हे वागणे पाहून त्याला हायसे वाटले.  म्हणजे ती चाळीतल्या लोकांशी छान जुळवून घेऊ शकणार होती.


     हे चाळीतील लोक म्हणजे, जणू काही त्याचे नातेवाईकच होते. आतापर्यंत त्यांनी त्याला सगळ्याच बाबतीत आधार दिला होता. कधी उशीर झाला तर जेवायला वाढले होते.  सणासुदीला गोडधोड खायला घातले होते. मोजून समोरासमोर असे दहाच घरे होते त्यांच्या चाळीत, पण सगळे अगदी मिळून मिसळून राहणारे होते.. त्यात साईश एकटाच बॅचलर होता.. ते ही दिनकर सरांमुळे त्याला ती खोली मिळाली होती.. आणि सरांना चाळीत मान होता.

     "साई..  आता दुपारी काही करत बसू नका. आज जेवायला आमच्याकडे या" चहा पिऊन झाला तसे काका साईश ला म्हणाले..

   "नको काका..  मी करेल ना स्वयंपाक.."  ईश्वरीने हळूच साईश कडे पाहून म्हटले.

    "असं कसं सुनबाई!  कालच लग्न झाले,  आणि आज लगेच स्वयंपाक करणार तू..  ते काही नाही,  दुपारचे जेवण आमच्याकडे.  रात्रीच  नंतर बघू..  काय  साई, सांग सुनबाईंना..  आपल्या चाळीत कोणी जेवायला वगैरे बोलवले तर, आढेवेढे घ्यायचे नाहीत.  अगदी हक्काने जायचे." काका म्हणाले आणि साईने तिच्याकडे पाहत मान हलवली..

    जरा वेळाने काका निघून गेले, तसे साईने तिला रात्रीच्या गाडीचे गावी जाण्याचे तिकीट असल्याचे सांगितले.  त्याआधी तो काव्याला दिनकर रावांकडे सोडायला जाणार होता..  तिथेच त्यांची भेट घेऊन मग तिथूनच ते ट्रेनसाठी स्टेशनला निघणार होते.. दुपारी तिघही जण शेजारच्या काकांकडे जेवायला गेले.  काका काकूंनी साग्रसंगीत भोजनाचा प्लॅन केला होता.. काकू ही बोलायला मनमोकळ्या होत्या.. काही गरज पडली तर हक्काने सांगायचे. असे त्यांनी मायेने सांगितले.. काकांची दोन्हीं मुले शिक्षणासाठी पुण्याला फ्लॅट रेंटवर घेवून राहत होती.. सुट्टी असली की घरी यायची.. काकांची शिफ्ट ड्युटी असल्यामुळे, आणि त्यांना बाहेरचे जेवणं आवडतं नसल्यामुळे काकूंना पुण्याला राहता यायचे नाही.. मुलेच भेटून जायची मग.. जेवण झाल्यावर काकूंनी ईश्वरी ची ओटी भरून तिला हळदीकुंकू लावले. आणि साईशच्या  हातात नारळ दिले..  ईश्वरीला त्यांचे प्रेम पाहून छान वाटत होते..  घरे छोटी असली तरी माणसांची मने मात्र मोठी होती..  चाळीतलं हे सुख काही वेगळंच होतं..

      जेवण झाल्यावर तिघेही घरी आले.. एवढ्यात तिच्या आईचा फोन आला.   फोनवर आई, बाबा, भाऊ सगळे बोलले..  रात्रीच्या जेवणाच आमंत्रणही दिले..  साईशकडे तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिले,  तसे त्याने मानेनेच होकार दिला.  असेही काव्याला सोडायला तो जाणारच होता..  संध्याकाळीच गावी जाण्यासाठी त्याने बॅग भरायला घेतली.   दोन दिवसांसाठीचे कपडे तिलाही घ्यायला सांगितले. काव्या मदत करत होती. तिथलं त्या दोघांच स्वागत कस असेल, तिथे ते राहतील की लगेच परत फिरावे लागेल. याची त्याला काहीही कल्पना नव्हती.  पण जावं तर लागणारच होते..

   संध्याकाळी साईश, काव्या आणि ईश्वरी सोबत ईश्वरी च्या माहेरी आला. पहिल्यांदा घरी आलेल्या लेक आणि जावयाचे दिनकर रावांनी आणि मीनाताईंनी स्वागत केले. लग्न कशाही परिस्थितीत झाले असले तरी, आपल्या लेकीची ओढ तिच्या लग्नाची नवलाई साऱ्यांनाच असते. पाहुणेमंडळी सगळी निघून गेलेली होती. साईच्या घरी सत्या नारायण पूजा वगैरे काही नसल्यामुळे थांबायचे काही प्रयोजनच नव्हते.. त्यामुळे ईश्वरी चे काका काकू, मामा मावशी वगैरे नातेवाईक आज सकाळीच आपापल्या घरी निघून गेली होती..

    दिनकर रावांनी आणि मिनाताईंनी आग्रह करून करून दोघांना  जेवण जेवू घातले. आणि मग रात्री आई-बाबांना पप्पांना नमस्कार करून दोघे स्टेशनवर जायला निघाले.. आजपर्यंत साईश या घरात एक भाडेकरू म्हणून, तर कधी सरांचा सल्ला घ्यायला म्हणून आला होता.. आणि आज त्यालाच जावयाचा मान मिळत होता.. लाड होत होतें..

    "साईश, व्यवस्थित जा.. तुमच्या घरातल्यांना, कोणत्या परिस्थितीत तुम्हाला लग्न करावे लागले हे समजावून सांगा.. सत्यनारायणाची पूजा ही तिथे करा.. कारण तुमचे खरे घर तिथेच आहे.. " दिनकर राव निघतांना साईश ला म्हणाले.

   "हो सर.. समजावतो.. पण.. माहित नाही, समजून घेतील की नाहीं ? अजून आम्हाला प्रवेश मिळेल की नाही घरात,  हेच टेन्शन आहे.. बघू.. फक्त आई माझ्या पाठीशी आहे. पण तुम्हाला तर माहितीय, तीचे काही चालत नाही घरात..? घरातले सर्व निर्णय काकाच घेतात आणि त्यांच आणि माझं पटत नाही..  आजी-आजोबाही त्यांच्यासमोर काही बोलू शकत नाहीत."

     " हो माहितीये मला.. तुम्ही सांगितल होत..पण तरी बोलावं लागेलच ना तुम्हाला.. कसें ही वागले तरी तुमचे बाबा गेल्यावर त्यांचाचं अधिकार आहे घरात.."

    "बोलतो मी..  पण काका कितपत माझा ऐकतील माहित नाही..  आधीच त्यांच्याशी भांडून घर सोडून निघून आलोय मी.."

     "ठीक आहे प्रयत्न करून बघा..आणि हो..सर नाहीं, आता पप्पा म्हणायची सवय करा.." दिनकर राव हसत म्हणाले..

    "हो..येतो आम्ही.."साईश आणि ईश्वरी पुन्हा एकदा काव्या, शिवमआणि आईपप्पांचा निरोप घेवून घराबाहेर पडले..
   काव्या दोन-तीन दिवस तिथेच राहणार होती काकांकडे.

 
@#@#@#@#@


   "सावकाश.. सावकाश चढा.. गर्दी आहे आज ट्रेनला..." साईश ने बॅग आपल्या हातात घेतली होती , आणि ईश्वरीला पुढे केले..

     ट्रेन नुकतीच प्लॅटफॉर्मला लागलेली होती.. उतरणारे उतरल्यावर दोघेही ट्रेनमध्ये चढले.. साईश ने आपली सीट पाहून तिथे बॅग ठेवली.. आणि ईश्वरीला बसायला सांगितले..  खिडकीत सरकून ती ही बसली. अजून बाकीचे पॅसेंजर यायचे होते..

     ईश्वरी लहान असताना आई-पप्पा सोबत नेहमी गावी जायची.. पण आजी आजोबा वारल्यानंतर त्यांच्या गावाला कोणी राहिले नाही..  सगळे जवळचे काका, आत्या वगैरे नातेवाईक शहरातच होते.. त्यात गावची शेती आणि घर विकून बाबांनी इथेच शहरात रो हाऊस घेतले होते..  त्यामुळे गावी जायचा प्रसंग यायचा नाही..  लग्नकार्य, देवाचं किंवा कोणी आजारी वगैरे असे काही असले तर, आई आणि पप्पाच जाऊन यायचे गावी... चुलत काकांकडे राहायचे एखादा दिवस..

     तिच्या लहानपणी तिला आणि शिवमला, दोघांनाही गावी जायला फार आवडायचे..  गावचे ते मोकळ आणि निसर्गरम्य वातावरण, मोकळी वागणारी लोक, ताजा भाजीपाला, शेतात जाऊन छान झाडाखाली जेवणं करणे, ही एक वेगळीच मजा होती..

     ते लहान असताना दर दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचे..  सणांची खरी मजा गावातच असते, हे तिने लहानपणीच अनुभवले होते..  त्यामुळे आत्ता तिला गावी जायची खूपच एक्साईटमेंट होती.. तिथले वातावरण, आपल्या सोबतचे त्यांचें वागणे कसे असेल याची अनामिक भीती ही होती. पण कधी ना कधी तर तिला याचा सामना करावाच लागणार होता.. आणि साईश होताच सोबत.. का कुणास ठाऊक? पण तो असल्यावर आपल्याला कोणी बोलणार नाही हा विश्र्वास होता मनात.. कदाचित आपल्या पप्पांचा त्याच्यावर असलेला विश्र्वास कारणीभूत होता याला..

    "काही खायला घेऊन येऊ?"  साईश ने अचानक खिडकीबाहेर पाहत असणाऱ्या तिला  विचारलें, आणि ती भानावर आली...


क्रमशः