तुम देना साथ मेरा.. 5

प्रेम      लहान पणापासून बाबांनी कडक वातावरणात वागवले असले तरी तिच्या इच्छेप्रमाणे शिक्षणं, हौस मौज ही केली होती.. फक्त उगाच पैसा खर्च करणं, नको ती फॅशन करणे हे त्यांना मान्य नव्हते.. भीत भीत एक दोन वेळा ईश्वरी ने त्यांना हेअर कट करण्याबद्दल, जीन्स वापरण्याबद्दल विचारलें होतें, त्यावर 'लग्न झाल्यावर तुमच्या नवऱ्याला चालेल तर हे शौक करा.. इथे माझ्या घरी असली थेर चालणार नाहीत,' अशा खणखणीत शब्दात तिला नकार मिळाला होता.. मुलीचे सौंदर्य साधे पणातच असतें.. ह्या मताचे ते हल्लीच्या मुलींच्या फॅशन च्या विरोधातच होतें.. नंतर पप्पांचा रोष बघून पुन्हा तीने कधीही त्या विषयी विचारलें नाही.. फक्त कॉलेज ट्रीप ला गेल्यावर मैत्रिणींची जीन्स टॉप घालून हौस भागवून घेतली होती..


      'साईश मुळे वेळेवर लग्न लागून बाबांची इभ्रत राखली गेली.. आपणं कित्ती वेळा यांच्या रिक्षात बसून गेलो.. पण आज अशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यात जाऊ, असे स्वप्नात ही वाटले नव्हते. बाबांचा त्यांच्यावर एव्हढा विश्र्वास आहे म्हणजे नक्कीच बाबांना आपल्या जोडीदारात अपेक्षित असलेले सारे गुण त्यांच्यात असतील.. हां फक्त आर्थिक दृष्ट्या थोडी तडजोड करावी लागेल.. असो.. असेही बाबांकडे असतांना आपल्याला सवय झाली आहे.. वायफळ खर्च न करता काटकसरीने राहायची.. आपणं सांभाळून घेऊ परिस्थिती... बास.. बाबांचा विश्र्वास सार्थ करायचा आहे..' ईश्वरी आपल्या बाबांकडे पाहत मनात विचार करत होती.

     इकडे विधी पार पाडता पाडता, साईश च्या मनात ही विविध विचार चालू होते.. एका नव्या जबाबदारीचे नाही म्हटलें तरी दडपण आले होतें.. अजून त्याच्या घरी काही माहीत नव्हते. लग्नात हजर असणारे परिचित मित्र इथलेच होतें.. त्यांच्या कडून त्याच्या गावी कळणे शक्य नव्हते.. पण जर कळाले तर त्याच्यासाठी चिंतेचा विषय होता.. पण दुसरीकडून वेगळ्या पद्धतीने कळून गैरसमज होण्यापेक्षा त्यानेच सांगितलेले बरे असणार होतें.. तसे तर जातीपातीचा काही प्रश्न नव्हता. कारण दिनकर रावांचे आणि त्याचे गाव लांब लांब असले तरी जाते एकच होते.. प्रश्न होता तो लग्न केल्याचा. कारण किती काही म्हटले तरी त्याने एवढ्यात लग्न करणे त्याच्या घरच्यांना मान्य होणार नव्हते..

    एकतर आधीच तो घरातल्यांशी भांडून इकडे निघून आलेला होता.. भांडण ही एवढे विकोपाचे की फक्त दोन वेळा आपल्या आईला आणि बहिणीला गुपचूप भेटायला गेला होता, तेही स्वतः च्या घरी न जाता मामा कडे... आणि आता पुन्हा चांगली नोकरी मिळवल्या शिवाय घरी परत येणार नाही, असे सांगून आलो असताना अचानक डायरेक्ट बायकोला घेऊन गावी जायचे.. पटत नसले तरी करावे लागणार होते.. त्याच्या आई साठी, बहिणी साठी.. दोघींनाही बाहेरुन कुठून कळून उगाच कोणी त्यांच्या मनात गैरसमज पसरवण्या पेक्षा आपणं च खरे काय ते सांगून द्यावे, असा विचार करतच त्याने रिझर्व्हेशन करायला सांगितले होते.. तसा तर त्याने बहिणीला एक कमी किमतीचा मोबाईल घेऊन दिला होता. त्यावर कॉल, मेसेज ही व्हायचे नेहमी.. पण ही बातमी फोन वर सांगण्यासारखी नव्हतीच..  ह्या विचारांबरोबरच इश्र्वरीचा ही विचार मनात घोळत होता..
     'ती आपल्या एवढ्याशा खोलीत राहू शकेल का? जी की तिच्याच बाबांच्या मालकीची आहे. तिच्यासाठी दुसरीकडे जरा चांगले घर घेणे शक्य होईल का?' हे कळीचे मुद्दे होतें..

     "साईशराव आमच्या ईशू ला सांभाळून घ्या.. तशी समजदार आहे ती.. पण एकटीने राहायची सवय नाही तिला.. जमले तर लवकरात लवकर तुमच्या गावी नेऊन घरच्यांच्या कानावर घाला.. तिला नेहमी कुणी ना सोबतीला हवं असतं.."

    "तुम्ही काळजी नका करू सर.. मी काळजी घेईन त्यांची.. त्यांना एकट नाही सोडणार कधीच.. फक्त तुम्ही मला अस राव वैगेरे नका म्हणू.." त्याने काहीसे अवघडत म्हटले.

   " अहो.. आता जावई आहात तुम्हीं आमचे.."

    "असू द्या.. पण मी तुमच्यासाठी पूर्वीचाच साई आहे.. तुम्ही त्याचं नावाने हाक मारा.."

   "ठीक आहे.. पण आता अहो जाओ तर घालणारच आम्हीं तुम्हाला.. तुम्ही जावई आहात आता.. आणि  जावयाला मान द्यायलाच पाहिजे.."

   "पण सर??"

    "अंह.. पण बीन काही नाही.. आणि आता तुमच्याही तोंडून सर नको.. ईश्वरी आणि शिवम प्रमाणेच पप्पा म्हणा.."

  " ठीक आहे.. येऊ आम्हीं.." त्याने हात जोडत त्यांची परवानगी मागितली.. ईश्वरी आईंच्या कुशीत शिरून मुसमुसत होती.. कुठे जाणार होती.. आणि कुठे निघाली होती..

   "हो.. निघा.. अंधार पडत चाललाय.. बरं.. उद्या नाही जमणार तुम्हाला, पण लवकरात लवकर पूजा मात्र घालून घ्या.. देवदर्शनाला ही जाऊन या.. ईश्वरीची अजून पंधरा दिवस सुट्टी आहे.. त्यात तुमच्या गावी ही जावून या.."

  " हो सर.. उद्या आधी गावीच जाऊन येतो.. मग पूजा घालू.."

   "ठीक आहे.. काळजी घ्या..."

    अत्यंत भावूक वातावरणात इश्र्वरीची पाठवणी झाली.. दिनकर रावांचे क्लर्क मोहिते सर आणि त्यांची बायको, साईश च्या मित्रा सोबत आधीच त्याच्या घरी ईश्वरी च्या गृह प्रवेशाच्या तयारी साठी पुढे गेले होते..

    ईश्वरी ला सोबत म्हणून तिची चुलत बहीण काव्या ला पाठवले होते.. असे ही उदया रात्री च्या ट्रेन ने साईश  ईश्वरी ला घेऊन गावी जाणार होता.. लग्न लागल्यावर लगेच त्याने मित्राला तात्काळ तिकीट ऑनलाइन काढायला सांगितले होते..

   ईश्वरी आणि साईश चाळीत  पोहोचले तेव्हा साडेसात वाजलेले होते..  त्याच्या मित्रांनी व मोहिते काका व त्यांच्या बायकोने ईश्वरी च्या गृहप्रवेशाची तयारी करून ठेवली होती..  जसे दोघे पोहोचले तसे त्यांनी ओवाळून ईश्वरी ला आत घेतले.. ईश्वरी फार अवघडली होती.. ज्या चाळीत तिचे बालपण गेले होते, आज तिथेच ती लग्न करून आली होती. हा आता हे खरे आहे की, तिला तेव्हाचे फारसे काही आठवत नव्हते.. चाळीत  राहणारी माणसे ही इतक्या वर्षात बदलली होती..  फक्त दोन घरे अशी होती,  की ते तिचे बाबा राहत होते तेव्हापासून अजूनही तिथेच होते..

     घरात आल्यावर मोहीते काकूने  तिला जरा वेळ आराम करायला सांगितला.  घरचे कोणी नसल्यामुळे लग्नानंतरचे खेळ वगैरे असे काही झालेच नाही.. पण तरीही शेजाऱ्यांनी मात्र थोडक्यात लग्नानंतरचे विधी म्हणून त्या दोघांची एकत्रित आंघोळ घातली. त्यानंतर साईश ला तिचे नाव बदलायचे आहे का? असेही विचारले पण त्याने नकार दिला, आहे तेच नाव छान आहे असे म्हणत.. साईशने आत जाऊन लग्नाचे कपडे चेंज केले.. ईश्वरीला मात्र आपण साडी कुठे बदलायची हा प्रश्न पडला होता..  कारण बाहेरची बैठक रूम आणि किचन, किचनला जोडून टॉयलेट आणि बाथरूम एवढेच घर होते आणि घरात सध्या शेजारची बरीच लोक होती..

     साईश ने बरीच माणसे जोडून ठेवलेली दिसत होती.. तो लग्न करून आला, कळल्यावर लगेच मदतीला शेजारचे आले होते..काय हवे नको ते बघत होते.. किचनमध्ये साडी बदलावी तर मोहिते काकू शेजारच्या दोन-चार बायका यांच्यासमोर कसे बदलायची, हा तिला प्रश्न पडला.. तिच  अवघडले पण,  लक्षात घेऊन मोहिते काकूंनीच मग सगळ्यांना बाहेरच्या खोलीत काढले. आणि तिला साडी चेंज करायला सांगितले.

      ईश्वरी घराचे निरीक्षण करत होती . जसे का बॅचलर मुलाचे घर असते , तसेच ते होते.  किचन ओट्यावर गॅसची शेगडी, वरच्या रॅकमध्ये दोन-चार भांडी , भिंतीतल्या कपाटात चार-पाच स्टीलचे डबे, विविध डाळी आणि कडधान्य भरलेल्या बरण्या आणि तिथेच लावलेल्या स्टील हुकांना साईशचे लटकवलेले कपडे.. स्टीलच्या रॅक जवळ भिंतीला असलेले छोटेसे देवघर, आणि त्या देवघरात विठ्ठल रुक्मिणी, गणपती आणि सप्तशृंगी मातेचा फोटो.  बाहेरही फक्त एक छोटा बेड होता.. आणि दोन बॅग होत्या ठेवलेल्या कोपऱ्यात..  एक टेबल आणि दोन खुर्च्या बस एवढेच सामान .. आता आपल्या बॅग रिकाम्या करून आपले कपडे वगैरे कुठे ठेवायचे हा तिच्या समोर मोठा प्रश्न होता.


    

क्रमशः