तुम देना साथ मेरा.. 4

प्रेम
    

    

    "  हो..का नाही चालणार... तुझ्याबद्दल माहिती आहे मला.. खात्री आहे.. आणि तू रिक्षा ड्रायव्हर आहे असे म्हणशील तर.. मला काहीच हरकत नाही.. ती ही नाही म्हणणार नाही.. आणि श्रीमंत, मोठ्या पदावर असलेल्या माणसाचे वागणे पाहिले मी.. डोळ्यावरची पट्टी उतरली माझ्या.. माझी मुलगी एक वेळेस कमी पैशात खूश राहिलं, पण एका व्यसनी माणसाबरोबर सुखी नाही होणारं.. आणि तू प्रामाणिक आहेस.. जिद्दी आहेस.. आज ना उद्या या परिस्थिती तून वर येशीलच.. खात्री आहे मला.."

   "हो.. सर.. पण.. पण.. म्हणजे.. एकदा विचारून घ्या.. तुमच्या मुलीला मान्य आहे हे?"

    "ती माझ्या शब्दा बाहेर नाही.. आणि सध्या ती इतकी खचलीय की विचार करण्याच्या मनःस्थितीत नाहीये.. हवं तर तिला विचारतो मी.. पण तू तयार आहेस का ?"

   

    " सर.. तुम्हाला मी नाही म्हणू शकत नाही.. मला माहितीय, तुमचे खूप उपकार आहेत माझ्या वर.. तुमच्या या काळात मी तुमच्या कामी आलो हे भाग्य आहे माझे.." तो त्यांच्या समोर मान झुकवत म्हणाला.

    "उपकार म्हणून नकोय बाळा.. तुला मी मदत केली, कारण तुझे वागणे पटले होते मला.. तुझी कळकळ कळली होती.. पण जर मी तुझ्यावर उपकार केलेत आणि त्या उपकारांची परडफेड म्हणून तू लग्नाला होकार दिला.. तर तू आयुष्यभर निभावशील हे लग्न? माझ्या मुलीकडे उपकारांची परतफेड नव्हे तर आयुष्याचा जोडीदार म्हणून पाहशील? म्हणून जे काही उत्तर देशील ते पूर्ण विचार करून दे.." दिनकर राव त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.

    " मी.. मी तयार आहे सर लग्नाला.. फक्त तुम्ही त्यांची सुध्दा परवानगी घ्या.. त्यांना माझ्याशी लग्न केलेले चालेल का? "

   " तू तीची काळजी नको करुस! असे ही जीचे लग्न मांडवात मोडले जाते.. तीचे पुन्हा लग्न जमणे अवघड असते.. भले ही त्यात मुलीची काही ही चूक नसली तरी.. आणि माझ्या ईश्वरी ला भल्या बुऱ्याची जाण आहे.. तिला  एखाद्या श्रीमंत व्यसनी मुलापेक्षा, निर्व्यसनी होतकरू मुलासोबत लग्न करायला आवडेल.. एवढे तर मी माझ्या मुलीला ओळखतो.. "

    "हो.. तरी पण सर, एकदा विचारा.. कारणं आधी त्यांनी स्वप्न बघितलेल्या आयुष्या पेक्षा माझ्या सोबतचे आयुष्य वेगळे असेल.." आपल्या सोबत आपल्या मुलीचे लग्न करून ते काही चुकीचे तर करत नाहित ना, याचा विचार त्यांनी पुन्हा करावा असे वाटतं होतें त्याला. शिवाय तीला मान्य असेल का हे लग्न? आपणं तर सरांनी विचारलें, त्यांना आयुष्यात काहीतरी कामाला येतोय आपणं , असे म्हणून लग्न करतोय , आपला तिच्याशी काहीही मेळ नसतांना, पुढे तिला हे नाते हवे असेल की नाहीं, याचा विचार न करता.. कदाचीत आता सरांच्या दबावा खाली ती हो म्हणेल ही.. पण तरीही सरांनी तिला एकदा तरी विचारून घ्यावें असे वाटून तो त्यांना सांगत होता.

    " ठीक आहे.. विचारतो मी तिला.. तू पण तुला कोणाला बोलवायचे असेल तर बोलवून घे.. आणि हो.. शिवम एक ड्रेस आणून देईल तो घालून तयार हो.."

  " हो.. सर..." असे म्हणत त्याने फोन काढला आणि दोघा तिघांना कॉल केला.. तसे इथे त्याचे नातेवाईक कोणी नव्हते.. दिनकर रावांच्या शाळेतील क्लर्क त्याच्या पुढच्या चाळीत राहायचे.. त्यांच्या शी घरोब्याचे संबंध होते.. ते ही इथेच हजर होते लग्नाला..

      साधारण एका तासात साईश ने कॉल केलेले त्याच्या ओळखीचे दोघेजण आपल्या कुटुंबासहित लग्नाला हजर झाले. तेवढ्या वेळात दिनकर रावांनी ईश्वरीला त्याच्याशी लग्न करण्याबद्दल विचारून घेतले. ती तर सुन्न अवस्थेत होती. आपले बाबा जे करतील ते योग्यच.. असाच पूर्वीपासून विश्वास असणारी तिने, 'तुम्हाला योग्य वाटेल ते करा बाबा,' असे म्हणत होकार दिला. तिची अवस्था पाहून दिनकर राव व मीनाताई दोघांनाही गलबलून आले. दोघांनीही तिला, 'जे होते ते चांगल्यासाठीच होते.' अशी समजूत घालून, 'हे लग्न मनापासून एन्जॉय कर. चेहरा पाडून राहू नकोस. आपली यात काही चूक नाहीये, जे झाले ते छानच झाले. पुढचं पूर्ण आयुष्य पश्चाताप करण्यापेक्षा आता घेतलेला निर्णय हा योग्यच आहे.' दोघेही जण तिची समजूत घालत होते. ती ही समजदार होती . तिने त्यांना हसून, 'मी मनापासून हे लग्न निभावेल.' असा विश्वास दिला. दिनकरराव व मीनाताई दोघांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला आशीर्वाद दिला. आणि पुन्हा लग्नवेदी जवळ आले.

     साईश तयार होऊन आलाच होता. पाहुण्यांमध्ये कुजबुज असली, तरीही खेळकर वातावरण होते. कारण सगळे दिनकर रावांना एक चांगला व प्रामाणिक व्यक्ती म्हणून ओळखत होते. त्यांनी घेतलेला निर्णय न पटण्यासारखा नव्हताच. त्यात ते स्वभावाने कडक असले तरी नेहमीच खऱ्याच्या बाजूने उभे राहणारे आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे होतें.. नातेवाईकांमध्ये त्यांच्या मताला, शब्दाला किंमत होती.

    दिनकर रावांच्या शाळेतील कर्मचारी आणि ईश्वरी च्या शाळेतील सहकारी सगळे लग्नाला हजर होते.. सगळ्यांच्या लक्षात सारीच परिस्थिती आली होती..  त्यामुळे त्यांच्या निर्णयाबद्दल कोणालाच काही वावगे वाटले नाही. लहानपणा पासूनच इश्र्वरीला सगळे नातेवाईक, एक सुंदर, सुशील, शांत आणि हुशार मुलगी म्हणून ओळखत होते.. सगळ्यांनी मनातच तीचे चांगले होवो,अशी सदिच्छा दिली..

     ईश्वरीच्या चुलत बहिणी तिला लग्नवेदी जवळ घेऊन आल्या. साईशला भटजी काकांनी आधीच तिथल्या पाटावर उभे राहायला सांगितले होते. ईश्वरीच्या मामाने आणि नवऱ्या मुलाचा लग्न पुरता मामा म्हणून साईश च्या एका मित्रा ने अंतरपाट पकडला होता. ईश्वरी ही येऊन विरुद्ध बाजूला पाटावर उभी राहिली.भटजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. जरा वेळात लग्नही लागले. दोघांच्याही मनात विचारांचा गुंता होता.   
    

    भटजी काकांनी टाळी वाजवत सावधान म्हटले, आणि दोघांमधला अंतरपाट दूर झाला.. भटजी काकांनी सांगितल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांना हार घातले, आणि पहिल्यांदा त्यांची नजरा नजर झाली. आतापर्यंत दोघेही एकमेकांना गुरुजींची मुलगी आणि एक रिक्षावाला असेच ओळखत होते. ईश्वरी अनेकदा त्याच्या रिक्षातून शाळेत गेली होती. त्यांच्या घरी कोणालाही कुठेही जायचे असेल, किंवा काही वस्तू आणायच्या असतील तर साईश लाच कॉल करून बोलवले जायचे. तोही आपली सगळी कामे टाकून धावत यायचा. दिनकर रावांमुळेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती. आणि त्यांनी केलेल्या मदतीने तो आयुष्यभर त्यांचा ऋणी राहणार होता..

      ज्या वेळेस त्याच्याकडे राहायला जागा नव्हती, खोलीचे डीपोजिट द्यायला पैसे नव्हते. त्या वेळेस दिनकर रावांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला, आपले जूने चाळीतले वन रूम किचन चे घर भाड्याने राहायला दिले होते.. शिवाय त्यांच्या ओळखीच्या रिक्षा वाल्याकडे, त्याला रिक्षा भाड्याने चालवायला देण्या साठी शब्द टाकला होता. एव्हढेच नव्हे तर, त्याच्या घरच्यांनी त्याची साथ सोडली आहे, हे समजल्यावर वेळोवेळी त्याच्या पाठीशी वडीलधाऱ्या व्यक्ती प्रमाणे उभे राहिले होते.. स्वतः हून कधीही खोलीचे भाडे मागितले नव्हते. उलट भाडे द्यायला आल्यावर तुला अडचण असेल तर नंतर दे, म्हणाले होते..आणि तेंव्हापासून दिनकर राव साईश साठी अगदी देव माणूस झाले होते. आणि आज त्यांची मुलगी त्याच्याशी लग्न करून त्याच्या सोबत, त्याचं चाळीतल्या जून्या घरी जाणार होती.. जिथे ती लहान असताना वयाच्या पाचव्या वर्षा पर्यंत राहिली होती.


    
    लहान पणापासून बाबांनी कडक वातावरणात वागवले असले तरी तिच्या इच्छेप्रमाणे शिक्षणं, हौस मौज ही केली होती.. फक्त उगाच पैसा खर्च करणं, नको ती फॅशन करणे हे त्यांना मान्य नव्हते.. भीत भीत एक दोन वेळा ईश्वरी ने त्यांना हेअर कट करण्याबद्दल, जीन्स वापरण्याबद्दल विचारलें होतें, त्यावर 'लग्न झाल्यावर तुमच्या नवऱ्याला चालेल तर हे शौक करा.. इथे माझ्या घरी असली थेर चालणार नाहीत,' अशा खणखणीत शब्दात तिला नकार मिळाला होता.. मुलीचे सौंदर्य साधे पणातच असतें.. ह्या मताचे ते हल्लीच्या मुलींच्या फॅशन च्या विरोधातच होतें.. नंतर पप्पांचा रोष बघून पुन्हा तीने कधीही त्या विषयी विचारलें नाही.. फक्त कॉलेज ट्रीप ला गेल्यावर मैत्रिणींची जीन्स टॉप घालून हौस भागवून घेतली होती.

  क्रमशः

कथा कशी वाटतेय नक्की सांगा..