तुम देना साथ मेरा... 2

सामाजिक
      तूम देना साथ मेरा...2
   

   
    
    


    "असे कसे ते वागू शकतात ते? मुहूर्ताची वेळ टळून गेलीय तरी ही नवऱ्या मुलाचा पत्ता नाही.. या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी..!!"

    बाहेरची कुजबुज तिला ऐकायला आली तसे तीचे कान टवकारले गेले..
खरेच मुहूर्ताची वेळ टळून गेली होती.. केंव्हापासून असे एका स्थितीत बसून तीच्या पायांना रग लागली होती. पण आई ने इथून उठायचे नाही सांगितले होतें.. त्यामुळे ती बाहेर जाऊ शकत नव्हती..

   बाहेरचा आवाज जास्तच यायला लागला तसे तीने पुन्हा ऐकायचा प्रयत्न केला..

   "अग अजून नवरदेव इकडे यायला निघालाच नाही म्हणे!!"

  " काय?? अग पण का??"

   "माहित नाही.. तेच बघायला नवरीचा काका आणि त्यांचा मित्र गेला होता.. तर त्यांना अजून थोडा वेळ वाट बघा.. एखाद्या तासात आम्हीं पोहोचतो म्हणून निरोप दिला.. नवऱ्या मुलाला भेटू ही दिले नाही.. बाहेरच्या बाहेरूनच घालवून दिले.."

    "काय तरी लोक बाई.. मोठ्या लोकांची थेर पण अशीच.. मोठ्ठ्या कंपनीत मॅनेजर आहे म्हणे मुलगा.. गर्व तर असेलच.. जन्मभर बोटावर नाचवली नाही पोरीला म्हणजे बरं.. "

  बाहेरच चालू असलेली बायकांची कुजबूज ईश्वरी ला स्पष्ट ऐकायला येतं होती.. बसून बसून आता तिला कंटाळा आला होता.. पण इलाज नव्हता..

   "अग इशू... पाणी हवे का बाळा तुला?" आत्या ने विचारले तसे तिने मानेनेच होकार दिला.. आत्या इकडे आणि मामा नवरदेवाकडे असे लग्नाला हजर होते..

   "आत्या.. उठू का ग मी जरा वेळ.. पायाला मुंग्या आल्यात बसून बसून.."

   "नको ग बाळा.. असे गौरीहरा पुढून उठत नाहीत नवरा मुलगा आल्याशिवाय.. बास.. फक्त थोडाच वेळ.."

  " आत्या.. पण अजून.. म्हणजे इतका वेळ झाला तरी अजून आली नाही वरात..?"

     "हो ग.. उशीर च झालाय.. पण ठीक आहे.. दिवसाच्या लग्नात उशीर होतोच.. एव्हढी श्रीमंत लोक आहेत.. त्यात धनेश चे मित्र मैत्रिणी.. नाचत नाचत येतील.. अजून उशीर होईल.. तुला खायला आणू का काही..?"

   "नको आत्या.. आईं कुठेय?? "

   "आहे पाहुण्यांमध्ये.. अग बाई.. बँडचा आवाज येतोय.. आली वाटतं वरात.. तू बस हा बाळा.. मी येते.. भटजींनी बोलावले की तू ये.." आत्या म्हणाली आणि बाहेर निघून गेली..


    जरा वेळ झाला तसे बाहेरून खूपच गोंधळ ऐकू येऊ लागला.. मोठ मोठ्याने बोलण्याचे आवाज, जणू काही भांडण सुरू आहे..

   इकडे ईश्वरीच्या जीवाची मात्र घालमेल सुरु होती.. येणाऱ्या आवाजात अनोळखी आवजांसोबत तिच्या बाबांचा आणि आत्याच्या मिस्टरांचा ही आवाज होता.. तीचे बाबा तावा तावाने बोलत होते तर आत्याचे मिस्टर सुधीर मामा काहीतरी समजावत होतें..

    "बास... नाही द्यायची मला माझी मुलगी तुम्हाला.." तिच्या बाबांचे मोठ्याने ओरडणे ऐकू आले आणि मग मात्र अजून नाही थांबू शकली ती तिथे..

   रूम बाहेर आली तर सगळाच गोंधळ होता.. तीचे बाबा, सुधीर मामा, नवऱ्या मुलाचे आईबाबा इतर नातेवाईक यांची आपापसात बाचा बाची चाललेली होती.. कुणाचा कुणाशी ताळमेळ नव्हता.. तिची आई तिच्या बाबांना आवरायचा प्रयत्न करतं होती.. डोळ्यातून अश्रू वाहत होते.. तिचा भाऊ मात्र कूठे दिसत नव्हता.. आणि नवरा मुलगा? तो कुठे होता? तीची नजर बाजूला भिरभिरली... आणि क्षणात काय झाले असेल हे तिच्या लक्षात आले..

   तिचा काही क्षणात होणारा नवरा, आयुष्याचा जोडीदार, ज्याच्या सोबत सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती तिने.. तो चक्क खुर्चीवर डुलत होता.. आजूबाजूला असणारे त्याचे मित्र ही पिलेले होतें..

   " तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती दाजी.. तुम्ही आणलेले स्थळ म्हणून मी जास्त चौकशी नाही केली.. तुम्ही म्हणाला होतात ना मुलगा निर्व्यसनी आहे म्हणून..?"

    "हो.. हो.. पण नेहमी नाहीच घेतं तो.." सुधीर मामा अजून ही त्यांच्या नातेवाईकांचीच बाजू घेत होते..

   "अहो दाजी.. जो मुलगा स्वतः च्या लग्नात एव्हढा पिऊन आलाय की त्याला शुद्ध नाहीये.. त्याच्याकडून नंतर काय अपेक्षा करायची.. नाही नाही.. अशा मुलाशी मी नाही माझ्या मुलीचे लग्न लावू शकतं.."

  " अहो दिनकर राव.. हल्ली सगळीच मुले ड्रिंक करतात.. आणि त्यासाठी लग्न मोडताय तुम्ही? आमच्या मुलाचे लग्न मोडले तर लगेच जमेल.. पण तुमची मुलीची बाजू.. लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार?" नवऱ्या मुलाचे बाबा ही इमोशनल ब्लॅक मेल करतं होतें..

   " चालेल माझ्या मुलीचे लग्न नाही झाले तर.. पण अशा दारुड्या मुलाशी नाही लग्न लावून देणार.. आणि असेल तिच्या नशिबात कोणी.. तर इथे.. या क्षणी ही लग्न होईल तीचे.."

   "हट.. आमच्या मुला सारखा श्रीमंत मुलगा मिळणार आहे का तिला.. साधे मास्तर तुम्ही.. त्यात विना हुंड्याने काही न घेता लग्न करतोय आम्ही तुमच्या मुलीशी.. असा श्रीमंत जावई शोधून ही सापडणार नाही तुम्हाला.."

    "ए.. ए.. माssझ.. लss ग्न.." तिकडे धनेश च्या तोंडातून नीट शब्द बाहेर पडत नव्हते.. तो बोलतच होता की त्याच्या मित्रांनी आणि चुलत भावांनी त्याला आवरले..

    "चालेल नाहीं मिळाला श्रीमंत तरी.. दोन वेळच्या जेवणाची तरतूद करणारा असला तरी चालेल.. एखादा गरीब होतकरू, हातगाडीवर काम करणारा ही चालेल.. पण व्यसनी नको.. माझ्या मुलीच्या नशिबात असेल तर त्याला ही ती आहे त्या परिस्थिती तून वर काढेल.."

   "बघा मग.. तसाच कोणीतरी.. त्या आधी आम्ही जे जे दिलय ते परत करा.." नवऱ्या मुलाचे बाबा बोलले तसे दिनकर रावांनी आपल्या बायको कडे बघितले.. नवऱ्या मुलाची आई मात्र आपल्या नवऱ्याला आवरायचा प्रयत्न करत होती.. पण तीच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते..

    "मीना.. जा.. जे जे यांनी दिलेय ते सगळं घेऊन ये.. हे लग्न होणारं नाही.." बाबांचे शब्द ऐकून तीच्या आईला अजूनच हुंदका फुटला.. ती तर स्तब्ध होती..

  
 " ईशू.. बाळा.. काढ ते दागिने.."

   "वहिनी. अग.. तू दादाला समजवायचे सोडून दागिने काय परत करतेस?" आई ने ईश्वरी कडे दागिने मागितले तसे आत्या म्हणाली.

   "ताई.. तुम्हाला अजुन ही वाटतंय की त्या मुलासोबत इशु चे लग्न व्हावे.. अहो भाची आहे ती तुमची..?"

  " हो वहिनी.. पण.."

  "पण बीन काही नाहीं.. ईशु चे लग्न त्या मुलाशी होणारं नाही.."

   ईश्वरी ने चूपचाप आपल्या अंगावरील नवऱ्या मुलाकडून घातले गेलेले दागिने काढून दिले.. आता अंगावर फक्तं तिच्या बाबांनी घातलेली बोरमाळ आणि सोन्याच्या दोन बांगड्या होत्या..

    "हे घ्या तुमचे दागिने.. कपड्यांचा खर्च आपला आपला होता.. आणि लग्नाचाही खर्च आम्हींच केलेला होता.. तसे तर काही नको म्हणता म्हणता मुलाला, मुलाच्या आईला सोन्याच्या अंगठ्या, मानपानाचा सामान असं बरच काही आमच्याकडून घेतलय तुम्ही..त्यामुळे तुम्ही जेवढे दिले होते त्यापेक्षा जास्त तुम्हाला परत मिळालेय.. या आता तुम्ही.." दिनकर रावांनी हात जोडून म्हटलें.. आणि ते सरळ सरळ आपल्याला जायला सांगून आपला अपमान करताय याने नवऱ्या मुलाच्या आईवडिलांना अजून च राग आला..

     धनेश ला तर काही पडलेले नव्हते.. तो असंबंध काहीबाही बरळत होता.. त्याचे जे दोन चार मित्र शुध्दीवर होते ते आणि त्याचे चुलत भाऊ त्याला सांभाळत होतें.. धनेश च्या बाबांनी आणि त्याच्या काकांनी त्यांना चांगलेच सुनावले होते.. कारण त्याला इतकी प्यायला लावायचे काम त्यांचेच होतें.. त्यामुळे आता ते निमूटपणे जे होईल ते पाहत होते..


    " भर मांडवातून तुम्ही आम्हाला हाकलताय.. दिनकर राव.. हे बरं नाही करतं तुम्ही.. आम्ही पण बघतो कोण लग्न करत तुमच्या मुलीशी.." धनेश च्या बाबांचा ताठा अजून ही कमी होत नव्हता..
 

 " तुमच्या इतका श्रीमंत नसला, तरी तुमच्या दारुड्या मुला पेक्षा चांगलाच मुलगा मिळेल माझ्या मुलीला.."

  


क्रमशः
     
    
    कथा आवडत असल्यास दोन शब्दांची का होईना पण समिक्षा नक्की लिहा..