तुळशीचे रोप

This story based on the struggle of mother and daughter

    "आऽऽऽ...!" स्वयंपाकघरातून आईचा जोरात किंचाळण्याचा आवाज ऐकून अनन्या धावतच तिच्या खोलीतून स्वयंपाकघरात येते. समोर येऊन बघते तर आईच्या म्हणजे स्वातीच्या काॅटनच्या साडीला चुण पडली होती जी नेहमी कडक इस्त्री करून नीटस अशी नेसलेली असते आणि घट्ट बांधलेला तो पण जरासा सैल झाला होता.  हे वरकरणी काही विशेष वाटत नसले तरी आईचे पाणावलेले लालसर डोळे आणि भेदरलेली नजर वैदेहीला खूप काही सांगून गेली होती. स्वयंपाकघरात आईच्या समोर  अनन्याच्या आत्याचे पती दिवाकरराव स्तब्ध उभे होते. नुकतीच मोठी झालेली चौदा वर्षांची अनन्या न बोलताच आईसोबत काय घडले याचा अर्थ समजून गेली. दिवाकरकडे एक तिरपा कटाक्ष टाकून ती बोलली, "हे बघा आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. आल्या दिवसापासून मी तुमचे नाटक बघत आहे. पण आता बस्स झालं. तुम्ही एकही मिनिट इथं राहिलेलं मी खपवून घेणार नाही.."  इतक्यात मंदीरात गेलेले तिचे आजी- आजोबा आणि आत्या घरात दाखल होतात. 

   "अनन्या..! तोंड सांभाळून बोल. ते काका आहेत तुझे आणि त्यांना ह्या घरातून बाहेर काढणारी तू कोण गं..?  तू आणि तुझी आई आश्रित आहात माझ्या आई वडिलांकडे...! माझा भाऊ बिचारा गेला. त्याचं स्वर्ग सोपं झालं पण ह्या दोन ब्याद आमच्या माथी मारून गेला.. " अनन्याची आत्या आत्ताची दिपाली आणि लग्नापूर्वीची अमृता तिच्यावर कडाडली. "हे बघ आत्ती.. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मायलेकी काही स्वतःच्या मर्जीने इकडे रहात नाही. बाबाने आमच्या काळजीपोटी आजोबांकडून वचन घेतले आणि आजोबांनी आम्हाला इकडे रहायला यायला सांगितले. आणि दुसरी गोष्ट,  तुझे पती म्हणजे दिवाकर काका मुद्दाम आईला विनाकारण त्रास देत आहेत. काही दिवसांपूर्वी आईने आजीला पण सांगितले तर आजीने पण इग्नोर केले. आजोबांना तर त्यांचे मित्र परिवार यातून सवड मिळेल तर शपथ..! तू त्यांना समजावून सांग एकदाचं माझ्या आणि माझ्या आईच्या नादी लागू नका म्हणून.." अनन्याने आत्याला प्रत्युत्तर दिले. 

   "बघा बघा...! ही पोरगी किती वाईट बोलत आहे माझ्या जावायाला..! सोन्यासारखा जावई आहे माझा.. एकदम बावनकशी सोनं.. त्याला काही बोललीस तर याद राखा तुम्ही दोघी.. तुम्ही दोघी म्हणजे खायला काळ आणि भुईला भार आहात.. पुन्हा माझ्या जावायला काही म्हणालात तर माझ्याहून वाईट नाही." स्वातीची सासू कांगावा करत होती. अनन्याचे आजोबा सोडले तर बाकी सगळ्यांना त्या दोघींची अडचणच होती. अनन्याची आजी त्या दोघी मायलेकींना खूप बोल लावत होती. तोच स्वातीच्या डोळ्यासमोर मागल्या सतरा वर्षांचा काळात उभा राहिला. 


   
     सेकण्ड इयर काॅमर्सला असताना स्वाती नाईक आणि अमेय जहागिरदार याच्याशी भेट झाली. हळूहळू मैत्री आणि नंतर मैत्रिचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांना कळले नाही. दोघांच्या मैत्रीमुळे त्यांच्या घरचे एकमेकांना ओळखत होते. अमेयच्या घरात त्याची आई बाबा आणि त्याची जुळी बहीण अमृता इतकाच परिवार होता. इकडे स्वातीला आई नसल्याने ती तिच्या बाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. तिच्या संगोपनात कोणतीही अडचण भासू नये म्हणून त्यांनी दुसरं लग्न करणंही टाळलं. जेव्हा दोघांनी आपापल्या घरी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा सारे नातेवाईक खुश होते. पण इकडे अमेयची आई मात्र नाखुश होती. तिला तिच्या चुलत भावाची लेक नंदिनी सुन म्हणून हवी होती. अमेयच्या आग्रहाखातर लग्न झाले पण तिच्या सासूबाई तिच्यावर खूष नव्हत्या. राहून राहून त्या स्वातीला घालून पाडून बोलत असत. याचा परिणाम तिची लग्न झालेली नणंद तिच्यावर हक्क गाजवत होती. रोज तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. अमेय एकटा किती भांडणार बिचारा..! तो सुद्धा त्यांच्या भांडणाला कंटाळला होता. याचा परिणाम म्हणजे स्वातीचं बाळ जन्माआधीच दगावलं. स्वातीची सासू तिला पुरेपूर छळत होती आणि नंतर वांझ म्म्हणून हिणवत होती. याचाच परिणाम स्वातीचा दोन वेळा गर्भपात झाला. यावेळी तिचे सासरे चिडले आणि त्या दोघांना दुसरीकडे घर बघा म्हणून सांगितले. तिच्या पुन्हा याचा दोष स्वातीवर आला. त्या दोघांनी मुंबई सोडली आणि पुण्यात स्थायिक झाले. असेच दिवस सरत होते.  स्वातीने एक दिवस एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या येण्याने स्वातीपेक्षा जास्त अमेय खुष होता. पहिली गोष्ट म्हणजे मुलगी एकदम त्याच्यासारखी पितृमुखी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचा जन्म त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी झाला होता. म्हणून त्याने हट्टाने मुलीचं नाव अनन्या ठेवले. मुलगी झाली म्हणून तिची सासू नाराज होती. अमेयला राहून राहून वाटत होतं की त्याच्या मुलीच्या वाटेला आजी आजोबांचं सुख यावं. तिला त्यांचे संस्कार आणि प्रेम मिळावं. तिघेही एकत्र खुप खुश होते. पण काळाचा घाव घातला आणि अघटीत घडले. एका कार अपघातात अमेयने त्याचा जीव गमावला.  अमेरिका दिलेल्या वचनामुळे स्वातीचे सासरे तिला आमि अनन्याला आपल्या घरी घेऊन आले होते. इकडे स्वातीच्या सासूने त्या दोघींना घरात घेतले पण कधीच आपले मानले नाही. आता दोन वर्षं झाली स्वाती इथेच राहत होती.
   

   "माझ्या पोराच्या गळ्याचा घोट घेतला आणि आता माझ्या पोरीच्या आयुष्यात खेळ घालतेय ही.. बॅन्केत नोकरी करते ना. तिथेच कोणीतरी असेल हिचा..." हे ऐकून स्वातीची तंद्री भंगली आणि ती भानावर आली. तिची सासू अनन्यावर हात उचलणार इतक्यात ती अडवते आणि बोलू लागते, "खूप झालं आई..! आजवर खूप बोललात मला.. पण माझ्या लेकीवर हात उचलण्याची हिंमत करू नका. विसरू नका तिच्यात तुमच्या मुलाचं रक्त आहे. केव्हापासून तुम्ही ज्या जावायाचे गुणगान गात आहात, विसरू नका त्याच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे दोन जणींनी.. पोलिस स्टेशनच्या चकरा मारल्या आहेत.  अनू बेटा बॅग भर आपली. आपण इथे क्षणभर थांबायचं नाही. आजच आपण आपल्या घरी पुण्याला जाऊ. आता इथे आपलं कुणीच नाही." आणि मुलीला घेऊन खोलीत जाते.


   
    दुपारी साडेतीनला स्वाती आणि अनन्या पुण्याला जायला निघतात. त्यांना अडवणारे फक्त तिचे सासरे होते. ती डोळ्यातले  पाणी अडवत बोलली,"मामंजी..! अमेय भोळे होते. त्यांना वाटले की सारं सुरळीत होईल. पण जाऊद्या. तुम्ही तुमची आणि आईंची काळजी घ्या. मला आईंचा निरोपही घ्यावासा वाटत नाहीये. मी निघते." 

   दोघी मायलेकी घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडतात. दोघींच्या डोळ्यात पाणी आले होते. तिकडे स्वातीचे सासरे हळहळ व्यक्त करत होते. तितक्यात अनन्याची नजर तुळशी वृंदावनात तिने हौशेने लावलेल्या तुळशीच्या रोपट्यावर गेले. कुंडीत लावलेलं रोपटं बघून ती धावतच त्याच्यापाशी गेली. तिचे आजोबा तिच्याजवळ उभे होते. "आबा ही कुंडी नेऊ का सोबत..? आपण गावदेवीच्या इथून आणलेली होती..प्लीज..! नाहीतर नुसत्या मंजिरी बांधून नेऊ..? रोपं नेलं तर आजी ओरडेल. ती मला काही दिवस झाले यात पाणीही घालू देत नाहीये. " अनन्याने निरागसपणे आजोबांना विचारले. आजोबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. ते काही बोलणार इतक्यात तिची आजी बाहेर आली. "ए अवदसे.. खबरदार माझ्या घरच्या तुळशीला हात लावलास तर.. चालती हो इथून." आजीचं वाक्य ऐकून अनन्या आईला जाऊन बिलगली. दोघीही त्या टुमदार घराबाहेर निघून गेल्या. 

  स्वातीने पुण्याच्या बॅन्केत ट्रान्स्फर करून घेतली. दोघी मायलेकी एकमेकींना सांभाळून घेत होत्या. इथले घर मुंबईच्या घरापेक्षा लहानच होते. पण हे त्या दोघींच्या हक्काचे होते. एक दिवस असंच स्वातीच्या दारावरची बेल वाजली. अनू पटकन जाऊन दार उघडते तोच पोस्टमन काका आले होते. त्यांच्या हातातील पत्र घेऊन अनू आईपाशी येते. "आई विशेष आहे ना. आजकालच्या जमान्यात पत्र येणं. " अनन्या बोलते. "हो ना बाळ..! पण पत्र आहे की नोटीस... एल. आय. सी. ची असेल. कुठून आली..? वाचले का काही..?" स्वाती विचारते. "अरे बघ विसरली. बघते हं. आई हे पत्र मुंबईहून आले आहे तुझ्या नावाने..! आणि ही बघ कसली तरी पुरचुंडी आहे. आजीने पाठवले आहे. बघ नाव आहे. कुंदाबाई जहागिरदार...!" अनन्या अचंबित होऊन बोलते. "थांब मी वाचते पत्र..." असे बोलून अनू पत्र वाचायला सुरुवात करते. 

प्रिय स्वाती, 
    माफ कर तुला आणि अनूला प्रिय म्हणण्याचा मला काहीच अधिकार नाही. मी नेहमी तुझा तिरस्कार केला आणि तू माझ्यावर भरभरून प्रेम केले. मी नेहमी तुला चंद्राला लागलेलं ग्रहण समजत होते, पण तू तर चांदण्यांचा लख्ख प्रकाश आहेस हे आत्ता मला उमगले. जेव्हा जावईबापूंनी तुझ्याकडे वाईट नजरेने पाहिले तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती म्हणा.. पण मुलीवरचं आंधळं प्रेम आणि तुझ्यावरचा तिटकारा यामुळे माझे डोळे बंद होते. पण काही दिवसांपूर्वी दिवाकररावांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांनी त्यात स्वतःचे दोन्ही पाय गमावले. तेव्हा त्यांनी स्वतःचा गुन्हा कबुल केला  म्हणतात ना माणूस त्याच्या कर्माचे फळ भोगतोच. ते पण भोगत आहेत. त्या दिवशी मी माझ्या नातीला तुळशीच्या रोपाला हात लावू दिला नाही. तुम्ही सायंकाळी गेल्या आणि पुढल्या दिवशी सकाळी झाडांना पाणी घालते तर बाकी रोपं नीट होती, पण तुळस मात्र जळाली होती. तेव्हापासून आजपर्यंत घरात सुख समाधान ही नाहीये. किती वेळा तुळशीचे नवे रोप लावले, मंजिरी टाकली पण तुळस टिकलीच नाही. तू आहेस तिथे सुखी रहा. अनूला जप. आणि सोबत मंजिरी दिली आहे थोडीशी. आपल्या घरातली नाही. शेजारच्या राणे काकूंच्या रोपातली आहे. अनूला लावायला सांग. काळजी घे.
 तुझीच आई
सौ. कुंदाबाई मुकुंदराव जहागिरदार

  पत्र वाचून दोघींचे डोळे पाणावले. अनूने आईच्या हातात पत्र दिले आणि तिच्या हातातली पुरचुंडी घेऊन अंगणात गेली. दोन महिन्यांनी दोघी मायलेकी अंगणात गप्पा मारत बसल्या होत्या. वर प्रतिपदेची चंद्रकोर आणि थोडेसे चांदणे होते. अनू आईच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकत होती. या सोनेरी क्षणांची साक्ष द्यायला अंगणातले तुळशीचे रोप हवेच्या झुळुकेसोबत मस्तपैकी डुलत होते...

~ऋचा निलिमा