तुलना हवीचं का ?

About Family"शुभदा,काय झाले गं? पहिल्यासारखी तू आनंदी राहत नाही.छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवते,चिडते. काय झाले असे ? "

प्रमोदने शुभदाला म्हणजे त्याच्या पत्नीला विचारले.


"काही नाही हो, प्रिया आपल्या घरात आल्यापासून आईंचे वागणे बदलून गेले आहे. आता तुम्ही म्हणाल, ती या घरात नवी आहे. त्यामुळे आई तिच्याशी तशा वागत असतील . सुरूवातीला मलाही तेचं वाटत होतं. म्हणून मला काही वाईट वाटले नाही. पण आता जास्तचं व्हायला लागले त्यामुळे मला आता आईंच्या वागण्याचा राग येत आहे.

तुम्हांला मी आईंबद्दल काही सांगितले तर, तुम्ही मलाच चुकीचे ठरवणार. आई कुठे चुकतेय ? का चुकतेय? हे तुम्हांला मी सांगितल्याशिवाय कळणार नाही. कारण \"आपली आई कधीचं चुकत नाही.\" असे प्रत्येक मुलाला वाटत असते. आणि तुम्हांला ही असेचं वाटणार. "

शुभदा प्रमोदला म्हणाली.


"अगं, काय झाले ते स्पष्ट सांग ना . तू काय बोलते आणि आईबद्दल असे का बोलते आहे , ते काहीचं कळत नाही आहे. जे काही तुझ्या मनात असेल ते मनमोकळेपणाने सांग. तुझे मनही हलके होईल आणि जो काही प्रॉब्लेम असेल त्यावर उपायही शोधता येईल."

प्रमोद शुभदाला म्हणाला.


"अहो, मला आईंची तक्रार नाही करायची पण त्यांच्या वागण्यात जो बदल झाला आहे ना त्याचे मला वाईट वाटते आहे. आपले लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी कधी तुम्हांला त्यांच्याबद्दल काही बोलले का ? मी लग्न करून या घरात आले, तेव्हा आईंनी मला किती समजून घेतले,सांभाळून घेतले. आणि मी पण त्यांनी हक्काने मला सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली.त्यांनी दिलेल्या स्वयंपाकातील टिप्स मला खूप उपयोगाच्या ठरत आहे. आपल्या घरातील सणावाराच्या पद्धती त्यांनी समजून सांगितल्या आणि त्याप्रमाणे मी करू लागले. लग्नाअगोदर सासू नावाबद्दल जी भीती होती ,ती त्यांच्या बाबतीत कधी वाटली नाही. मी स्वतः ला खूप भाग्यवान समजत होते. पण माझे हे सुख विपुल भाऊजींचे लग्न होताच दुःखात रूपांतरित झाले. असेच वाटायला लागले आहे.

विपुल भाऊजींचे लग्न झाल्यावर सासूबाईंना अजून एक सून व मला जाऊ येईल यामुळे मी खूप खूश होते.पण प्रिया घरात आली आणि आईंचे माझ्याबद्दलचे मतपरिवर्तन सुरू झाले." शुभदा म्हणाली.

"मला तर तसे काही जाणवलेच नाही. उलट आई नेहमी आनंदात दिसते. आणि प्रियाही आपल्या घरात किती लवकर रमून गेली. हे पाहून खूप छान वाटते. "

प्रमोद शुभदाला म्हणाला.


"प्रियाशी आई चांगल्याच वागतात. चांगल्या वागतात म्हणजे तिच्या रूपाचं,रंगाच,शिक्षणाचं,

बोलण्या-वागण्याचं कौतुक त्यांच्या ओठांवर असतं. एका शब्दानेही तिला कधी रागवत नाही की कधी काही उलटसुलट बोलून तिचे मन दुखवत नाही. त्यामुळे ती तर नेहमी खूशचं राहिल ना! आणि आपल्यावर एवढ्या कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या सासूबाई भेटल्यावर ,सासूबाईंच्या हो ला हो म्हणणारी सूनबाई भेटली म्हणून सासूबाईही नेहमी खूशचं राहणार ना ? मला त्यांच्या आनंदाबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. उलट प्रियासारखी जाऊ मिळाल्याने मला आनंदच झाला आहे.

\"हाताची पाचही बोटे एकसारखी नसतात.\"त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्ती सारखा नसतोच. प्रत्येकात एक वेगळपणं असतंच. कमीजास्त गुण प्रत्येकात असतातचं.

प्रिया आपल्या घरात येण्यापूर्वी आईंना माझ्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. आमचे दोघींचे किती छान जमत होते. पण घरात प्रिया आली आणि आई तिच्याबरोबर माझी प्रत्येक गोष्टीत तुलना करू लागल्या.

प्रिया माझ्यापेक्षा रंगाने थोडी उजळ आहे. नाकेडोळे तर तिच्यापेक्षा मी देखणी आहे. पण रंगावरून त्या आमची तुलना करू लागल्या.तिच्या पेक्षा मी थोडी सावळी आहे त्यात माझी काय चुक ? तुम्हीं पण तर विपुल भाऊजींपेक्षा सावळेच आहात ना ?


आपला मुलगा रंगाने सावळा असला तरी सून गोरीपानचं हवी. असे प्रत्येक सासूला का वाटत असते ?


तुमचे आणि माझेही पदवीपर्यंत शिक्षण झालेले. भाऊजी इंजिनिअर आणि प्रियाने पदव्युत्तर म्हणजे माझ्या पेक्षा दोन वर्षे जास्त शिक्षण घेतलेले.

तरीही आईंना वाटते प्रिया माझ्या पेक्षा खूप जास्त शिकलेली.

मी खेडेगावात वाढलेली त्यामुळे राहणीमान ही साधेच. फॅशनेबल कपडे, वेगवेगळ्या हेअर स्टाईल ,मेकअप वगैरे या गोष्टी कधी जमल्या नाही. आणि वडिलांचा शेती व्यवसाय त्यामुळे घरातील परिस्थिती पाहूनच वागत होते.

प्रिया शहरात वाढलेली. तिचे वडीलही चांगल्या नोकरीला. त्यामुळे साहजिकच सर्वच गोष्टीत फरक पडतो ना ?

प्रियाशी प्रत्येक गोष्टीत माझी तुलना करून , मला तिच्या पेक्षा वेगळी वागणूक देत असतील तर ..मला वाईट वाटणारचं ना? प्रिया माझ्यापेक्षा जास्त सुंदर, जास्त शिकलेली, चांगले राहणीमान, मगं यात माझी काय चुक?


प्रिया येण्यापूर्वी आईंना माझ्या रंगरूपाचा,शिक्षणाचा ,

राहणीमानाचा कधी त्रास झाला नाही.

आईंना माझा स्वभाव, माझे गुण कधी जाणवले नाही का?


मला आई व प्रियाच्या नात्यात अडचण निर्माण नाही करायची. फक्त आईंनी प्रियाशी माझी तुलना करून ,मला वाईट वाटेल असे काही बोलू नये,वागू नये.

त्यांना मला सांगावेसे वाटते,

\"सासूबाई प्रत्येक गोष्टीत तुलना केलीच पाहिजे का ? प्रियामध्ये जे गुण आहेत ते माझ्यात नाही व माझ्यात जे गुण आहेत ते प्रियात नाही. त्यामुळे आमची तुलना करणे थांबवा आणि घरात आनंद निर्माण करा. \"


शुभदाने प्रमोदला आपल्या मनातले सर्व सांगितले.


शुभदाचे हे सर्व ऐकून प्रमोदलाही वाईटच वाटले. शुभदाने लग्न झाल्यापासून आपल्या गुणांनी व स्वभावाने घराला छान सांभाळून घेतले. हे त्याने पाहिलेले होते. आईचे व तिचे प्नेमाचे नाते अनुभवलेले होते. प्रियाशी शुभदाची तुलना करुन आई खरचं चुकते आहे. असे त्यालाही वाटले. आणि या विषयावर आईशी बोलण्याचे ठरवले.


"आई, विपुल माझ्यापेक्षा रंगाने थोडा गोरा आहे ना ? तो इंजिनिअर आणि मी साधी खाजगी नोकरी करणारा. आई, तुला माझ्यापेक्षा विपुल जास्त आवडत असेल ना? "


प्रमोदने आईला विचारले.


प्रमोदचा प्रश्न ऐकताच आईला थोडे विचित्रच वाटले.


"प्रमोद, हे काय विचारतोस ? आईला आपली सर्व मुले एकसारखीच असतात. एक आवडता व दुसरा नावडता असे काही नसते. आणि रंग,रूप हे काय आपल्या हातात असते का! देवाने जसे दिले तसे स्विकारून आनंदात राहयचे असते. "

आई प्रमोदला म्हणाली.


आईच्या या बोलण्यावरून,प्रमोद आईला म्हणाला.


"मगं आई प्रिया व शुभदाची तुलना कशी होऊ शकते?"


प्रमोदच्या या प्रश्नाने आईला आपली चुक लक्षात आली. नव्या सुनेच्या आगमनाने खूश झालेल्या सासूबाई थोड्या भरकटून गेल्या होत्या, शुभदा व प्रियाची तुलना करत शुभदाविषयी त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले होते.पण आता त्यांना आपली चुक समजून आली होती. गुणी,सुस्वभावी शुभदाने आपल्याला कधी कोणत्या गोष्टीने दुखावले नाही. याची जाणीव होऊ लागली होती.

आता यापुढे त्यांनी आपल्या दोन्ही सुनांना समान वागणूक देवून घरात आनंदी राहण्याचे व आनंद देण्याचे ठरवले.


समाप्त

नलिनी बहाळकर