तुलना

Don't compare your life with others. Everyone's life is different

दुपारची वेळ होती, शितल स्वयंपाक करत होती, तिचा मुलगा मल्हार झोपलेला असल्याने ती स्वयंपाक घरातील कामे पटपट आवरण्यात व्यस्त होती, तोच दरवाजा वरची बेल वाजली. हातातील काम बाजूला ठेवत शितल बडबडली, "आता यावेळी कोण आलं असेल बरं? मल्हार झोपलाय म्हणून पटपट कामे आवरुन घ्यावी म्हटलं तर आत्ताच कोणाला तरी यायचं होतं" 

शितल दरवाजा उघडून म्हणाली, " निर्मला काकू तुम्ही? आज माझ्या घरचा रस्ता कसा काय सापडला? एरवी खालीपर्यंत यायचात पण कधी वर आला नाहीत."

निर्मला काकू म्हणाल्या," मला घरात घेणारेस की दारातूनच काढून देणार आहेस?"

शितल हसून म्हणाली," अरे काकू या ना"

निर्मला काकू घरात येऊन सोप्यावर बसल्या. शितल पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली. पाणी पिऊन झाल्यावर निर्मला काकू म्हणाल्या," मल्हार झोपला आहे का?"

"हो काकू तो आत्ताच झोपला म्हणून तर मी पटकन स्वयंपाक करुन घेत होते, तो उठला की त्याच्या पासून हलता येत नाही" शितल उत्तरली.

निर्मला काकू म्हणाल्या," मी यावेळेला येऊन तुला डिस्टर्बच केलं म्हणायचं"

शितल म्हणाली," नाही काकू, माझ्या पोळ्या झाल्या होत्या, भाजी गॅसवर आहे, मी जाता येता लक्ष देतच आहे आणि काम काय रोजचंच आहे, तुम्ही थोडी रोज रोज येणार आहात. माझं राहूदेत तुम्ही माझ्या कडे कश्या काय आलात?"

निर्मला काकू म्हणाल्या," दोन दिवसांपूर्वी श्वेता आली आहे, ती आल्यापासून मी बघत आहे, ती आमच्यापैकी कोणाशीही जास्त बोलत नाहीये. जावई बापू म्हणाले की श्वेता हल्ली सतत चिडचिड करत असते. श्वेताला नेमकं काय झालंय हेच आम्हाला काही कळत नाहीये. श्वेता तुझ्या सोबत काही बोलली आहे का?"

शितल म्हणाली," काकू दोन महिने झाले असतील आमच्यात काही बोलणंच झालं नाहीये, मल्हार आजारी असल्याने मी स्वतःहून तिला फोन केला नाही म्हणजे मला जमलंच नाही. श्वेता इकडे आली आहे हेही मला तुमच्याकडूनच कळत आहे."

निर्मला काकू म्हणाल्या," मला श्वेताचे पप्पा म्हणाले की तुला काही माहीत असेल म्हणून मी तुझ्याकडे आलेय. पहिले तर तुला तीच सर्व माहिती असायचं ना?"

शितल म्हणाली," हो काकू पण आयुष्य जसं पुढं जात तसं आमच्या मैत्रीची समीकरणही बदलली आहेत."

निर्मला काकू म्हणाल्या," तु एकदा घरी येऊन श्वेता सोबत बोलशील का?"

शितल म्हणाली," ठीक आहे काकू संध्याकाळी मल्हारचे पप्पा घरी आले की मी येऊन जाईल."

निर्मला काकू एवढे बोलून निघून गेल्या. संध्याकाळी शितलने निर्मला काकूंना सांगितल्या प्रमाणे ती श्वेताला भेटण्यासाठी तिच्या घरी जाते. श्वेता तिच्या रुममध्ये बसलेली असते. शितल रुमच्या दरवाजावर नॉक करुन विचारते, "श्वेता आत येऊ का?"

शितलला दारात बघून श्वेता हसून म्हणाली, "शितल तु? अग ये ना"

शितल बेडवर जाऊन बसली व तिने विचारले, " श्वेता तु इकडे आलीस तरी मला कळवलं नाहीस? मला भेटण्याची इच्छा नव्हती वाटतं? तनु कुठे आहे?"

श्वेता म्हणाली," अग एकसाथ किती प्रश्न विचारशील? तनु माझ्या सोबत यायला नको म्हणाली, तिला आईंची सवय असल्याने मला कसलीच चिंता नाहीये. शितल मला ना हल्ली कोणाशीच बोलायची इच्छा होत नाहीये म्हणून मी तुला इकडे आल्या बद्दल सांगितलं नाही."

शितल म्हणाली, " आणि अस व्हायचं कारण काय आहे?"

श्वेता म्हणाली," माहीत नाही, माझी तिकडे एक मैत्रीण आहे ती म्हणाली की एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखव, यावर तनुचे पप्पा म्हणाले की तु थोडे दिवस माहेरी राहून ये, सगळं ठीक होईल."

शितल म्हणाली," तो विषय सध्या बाजूला राहूदेत, तु एरवी नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह रहायचीस, मी मॅसेज नाही केला तरी तु स्वतःहून किती मॅसेज करायचीस मग आता काय झालंय? तु आपल्या शाळेच्या ग्रुपमधून लेफ्ट का झालीस?"

श्वेता म्हणाली," नयना, पुजा आणि नीलम सतत बढाया मारत असायच्या. नयना तिच्या नवऱ्याचे कौतुक करायची तर पुजा किती श्रीमंत आहे हे दाखवत असे तर नीलम तिच्या एकत्र फॅमिलीचे गुणगान गात बसते. मला हे सर्व ऐकून, बघून बोअर झाले होते म्हणून मी त्या ग्रूप मधून लेफ्ट झाले."

शितल म्हणाली,"मग त्यात काय वेगळं केलं त्यांनी, तुला पाहिजे होतं तर तु ग्रुप mute करुन ठेवायचास ना, लेफ्ट व्हायची काय गरज होती?"

श्वेता म्हणाली," मला असला शो ऑफ केलेला आवडत नव्हता, नयना तर साधं नवऱ्याने आईस्क्रीम खायला घेऊन गेली तरी फोटो ग्रुपवर टाकायची व सर्व क्रेडीट नवऱ्याला देऊन मोकळी व्हायची, पुजा तर सतत काहीतरी खरेदी केल्याचे फोटो टाकत असायची आणि नीलम तर आज याचा बर्थडे, उद्या याच लग्न तर परवा फॅमिली ट्रीप अस टाकत असायची. कितीही नाही म्हटलं तरी या सर्वांनी माझा जीव जळून यायचा ग, काय करु माणूस आहे ना? कुणाला सांगू नकोस म्हणूनच मी ग्रुपमधून लेफ्ट झाले."

शितल डोक्याला हात मारत म्हणाली," श्वेता तु मॅड आहेस का?"

श्वेता म्हणाली," अग मागे एकदा अस झालं की नयनाने नवऱ्यासोबत आईस्क्रीम खातानाचे फोटो टाकले तर मी त्यादिवशी यांना म्हटली की आपण दोघे आईस्क्रीम खायला जाऊया तर हे फॅमिली पॅक घेऊन आले, मला आईस्क्रीम खायला भेटलं पण यांच्या सोबत फोटो काढता आला नाही, मग माझाच मूड खराब झाला, अस दोन तीन वेळेला घडलं मग मीच विचार केला की तो ग्रुपच नको म्हणजे अस काही आपल्या डोक्यात येणार नाही."

शितल म्हणाली," मला काकूंकडून कळालं की तु सध्या जास्त कोणाशी बोलत नाहीस आणि तुझी चिडचिड वाढली आहे. मला याचं कारण समजेल का?"

श्वेता म्हणाली," अग मलाच कळत नाहीये, छोट्या छोट्या गोष्टींमुळे माझी चिडचिड होत असते, आता कालची गोष्ट घे मी आईला म्हणाले की आई गुळाचा शिरा कर तर दादाला साखरेचा शिरा आवडतो हे मला माहीत होते, घरातील गूळ संपल्याने आईने साखरेचा शिरा केला तर माझा असा गैरसमज झाला की दादाला आवडतो म्हणून आईने साखरेचा शिरा केला असेल, मला या गोष्टीचा खूप राग आला आणि रागाच्या भरात माझ्या तोंडून काही निघायला नको म्हणून मी शांत रहाण्याचा निर्णय घेतला तर आईला वाटते की ही काहीच बोलत नाही. सध्या ना एक पण गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाहीये. कोणाला मी बोललेलं कळतही नाहीये.तनुच्या पप्पांना म्हणाले की आपण कुठेतरी फिरुन येऊया म्हणजे मी फ्रेश होईल पण तेही हे ऐकत नाही. आईंचा वाढदिवस मोठा साजरा करु तर त्यालाही नाही म्हणतात. शॉपिंग करायला जाऊ तर तुझं तु जा अस म्हणतात. मग माझी चिडचिड होईल की नाही."

यावर शितल म्हणाली," तुझं दुखणं माझ्या लक्षात आलं आहे. तुझ्या मुलीला तुझ्या सासूबाई सांभाळत असल्याने तुझ्याकडे मोकळा वेळ भरपूर आहे, तो वेळ तु सोशल मीडियावर घालवतेस बरोबर, आता माझेही फोटो, पोस्ट्स तु बघत असशील पण तुला माझ्याबद्दल सर्व माहीत असल्याने तुला माझा हेवा वाटत नाही. नयना, पुजा व नीलम च्या आयुष्यात प्रत्यक्षात काय चालू आहे हे तुला माहीत नाहीये म्हणून तुला त्यांच्या बद्दल जळजळ वाटत आहे आणि तुझ्या चिडचिडेपणा मागे हेच मूळ कारण आहे. अग त्या तिघी त्यांच्या आयुष्यातील काही क्षण सोशल मीडियावर टाकतात, डेली रुटीन नाही. तुझ्याही आयुष्यात असे क्षण असतीलच ना. तु हळूहळू तुझ्या आयुष्याची तुलना नयना, पुजा व नीलमच्या आयुष्यासोबत करु लागली आहेस. दुरुन डोंगर साजरे ही म्हण तुला माहीत असेलच ना? नयना सतत तिच्या नवऱ्याचं कौतुक करत असते किंवा ती त्याच्या सोबत फोटो टाकत असते बरोबर पण तुला तिच्या आयुष्यातील सत्य माहीतच नाहीये, नयनाचा नवरा अतिसंशयी माणूस आहे, तो तिला माहेरी दोन दिवस सुद्धा पाठवत नाही, त्याचा तिच्यावर विश्वास नाही म्हणून तो कुठेही तिला एकटी जाऊ देत नाही. नयना सोशल मीडियावर तिचा एकटीचा फोटो कधीच टाकत नाही कारण तिच्या नवऱ्याला तस केलेलं आवडत नाही. नयनाचा नवरा रोज तिचा फोन चेक करतो. 

पुजा तिच्या श्रीमंतीचा माज दाखवते अस तुला म्हणायचं आहे तर पुजा एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे, बारा तासाची तिची शिफ्ट असते. नवरा मरीन इंजिनिअर आहे, तो सहा महिने जहाजावर गेला की परत येत नाही, पुजा कडे तिच्या मुलीला भेटायला सुद्धा वेळ नाहीये, सहा महिने नवरा घरी नसताना सर्व जबाबदाऱ्या तिला एकटीला पार पाडाव्या लागतात.

नीलम एकत्र फॅमिलीत राहते पण तिला किती compromise करावं लागतं याची तुला कल्पनाही नाहीये. सासूच्या परवानगी शिवाय तिला घरात काहीच करण्याची मुभा नाहीये, साधी एखादी साडी घ्यायची असेल तरी तिला सासूला विचारावं लागतं, आपल्या मुलासाठी काही घ्यायचं असेल तर पहिले जावेच्या मुलासाठीही तीच वस्तू घ्यावी लागते. जाऊबाई जितक्या दिवस माहेरी राहील तितक्याच दिवस नीलमला पण रहावे लागते. नीलमला नोकरी करायची होती पण तिची जाव नोकरी करत नाही म्हणून तिला नोकरी करायला परवानगी भेटली नाही.

आता याउलट तु तुझ्या आयुष्याकडे बघ ना, तुझ्या नवऱ्याने तुला भरपूर मोकळीक दिलेली आहे, तु कधीही माहेरी येऊ शकतेस, कितीही दिवस राहू शकतेस बरोबर ना. तुझ्या सासूबाई तनुला सांभाळतात पण त्या तुला नोकरी करण्यापासून अडवतात का? नाही ना, उलट त्या तनुला सांभाळतात म्हणून तु घराबाहेर कितीही वेळ राहू शकतेस. तुला तनुसोबत हवा तेवढा वेळ घालवता येतो. तुझा नवरा तुझ्या सोबत राहतो. मला मान्य आहे की आपल्या सगळया इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं नाही पण थोड्याफार प्रमाणात तर होत असतील. आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे? यावर लक्ष केंद्रीत कर ना. आता ज्यादिवशी तुला आईस्क्रीम खायची इच्छा होती तेव्हा तुझा नवरा फॅमिली पॅक घेऊन आला यात महत्त्वाचे काय आहे की त्याने तुझी आईस्क्रीम खायची इच्छा पूर्ण केली, तुला तुझ्या सासूबाईंचा वाढदिवस मोठा साजरा करायचा असेल पण तुझ्या नवऱ्याचं तेवढं मोठं बजेट नसेल म्हणून तो नाही म्हणाला असेल आता हेच शॉपिंगच्या बाबतीतही झालं असेल. आपण पण थोडं समजून घ्यायच ग. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ही म्हण काही खोटी नाहीये. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला हवे. प्रत्येकाचं आयुष्य, नशीब वेगवेगळे असते, त्याची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही आणि आपल्या आयुष्याची तुलना आपण इतरांसोबत करुन आपण आपलेच नुकसान करुन घेतो."

श्वेता म्हणाली," शितल तु अगदी बरोबर बोलत आहेस, मी कळत नकळतपणे का होईना माझ्या आयुष्याची तुलना नयना, पुजा व नीलमच्या आयुष्यासोबत केली म्हणून माझी चिडचिड वाढली होती. माझी चूक झाली, मी इथून पुढे असं वागणार नाही. उद्याच घरी जाऊन सर्वांची माफी मागते. आधीच जर मी तुझ्या सोबत बोलले असते तर मला माझी चूक आधीच कळाली असते. मी कधीच कोणासोबत तुलना करणार नाही. सोशल मीडिया हे एक आभासी जग आहे, इथे लोकं फक्त आपला आनंदच दाखवतात त्या मागील दुःख ते कोणालाच दाखवत नाही आणि माझ्या सारखे लोक त्या आनंदाच्या दोन क्षणांचा हेवा करत बसतात."

श्वेताचे वेळीच शितलने कान टोचल्यामुळे तिला आपली चूक उमगली. आपल्या आयुष्याची तुलना कधीच कोणासोबत करु नये, त्याने आपल्यालाच त्रास होईल. प्रत्येकाचे नशीब वेगवेगळे असते, कोणाला यश लवकर भेटते तर काही दिवसांतच ते संपुष्टात येते तर कोणाला यश उशिरा भेटते तर ते भरपूर काळ टिकते.

Everyone has there own destiny. 

©®Dr Supriya Dighe