तुला पाहते रे - भाग 9

Love story

तुला पाहते रे - भाग 9 

सई आणि मिहिरच्या पहिल्या अनिव्हर्सरीचा दिवस उजाडला. कामाच्या गडबडीत सईच्या हे लक्षात सुद्धा नव्हतं. त्यामुळे मुद्दामहून तिला कोणीच विश केलं नाही. खरंतर बऱ्याच दिवसांपासून कामाच्या व्यापात तिला निवांत असा मोकळा वेळच मिळाला नव्हता. म्हणून सगळ्यांनी मिळून तिच्यासाठी छान पार्टी ऑर्गनाईज करायचं ठरवलं.  सईच्या आई बाबांनाही मधुकररावांनी काल रात्रीच फोन करून त्यांना विश करू नका म्हणून कळवलं आणि त्यांना संध्याकाळच्या पार्टीच आमंत्रणही दिलं . मिहीर सकाळीच नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. पण संध्याकाळी पार्टी असल्यामुळे तो लवकर येणार होता. मधुकरराव आणि नलिनीताईं हॉलमध्येच बसून संध्याकाळच सगळं ठरवत होते. सई बाजूलाच किचन मध्येच काहीतरी काम करत होती.

" अहो मी काय म्हणते....आपण सईच्या मैत्रिणींना पण बोलवूया ना..." नलिनीताई हळू आवाजात म्हणाल्या. 

" बोलवायला काहीच हरकत नाही...पण आपल्याला कुठे माहितेय तिच्या मैत्रिणी....?? " बाबा म्हणाले.

" आपण पूजाला फोन करून सांगायचं का....सईच्या मैत्रिणींना बोलवायला...?? " त्या म्हणाल्या. त्यावर बाबांनी डोक्याला हात लावत...'काय डोकं आहे' अशी ऍक्शन केली.

नलिनीताईंनी पूजाला फोन करून सईच्या मैत्रिणींना बोलवायला सांगितलं. त्या बोलत असतानाच सई फडक्याला हात पुसत बाहेर आली.

" आई...पुजाचा फोन आलाय का...?? "  तिने विचारलं.

" हा हा......तू सगळं नीट कर मी सांगितलंय तसं..." त्या फोन वर बोलत होत्या. बोलता बोलता त्यांनी सईला हातानेच नाही म्हणून सांगितलं.. आणि जरा वेळ बोलून फोन ठेऊन दिला. 

" ok..... मला वाटलं तुम्ही पुजाच नाव घेतलंत. म्हणून मला वाटलं तिचाच फोन आलाय की काय.." एवढं बोलून ती आत जायला वळली. 

" नाही......ते माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं नाव पण पुजाच आहे..." असं त्या म्हणाल्या आणि हुश्श म्हणून एक सुस्कारा टाकला. 

" हा....असुदे..." असं म्हणून सई आत गेली. 

सकाळपासून तिला सगळ्याचं वागणं जरा वेगळं वाटत होतं. मिहिरसुद्धा आज नेहमीच्या वेळेपेक्षा ऑफिसला लवकर गेला. तिला साधं त्यानं बाय सुद्धा केलं नव्हतं म्हणून ती जरा रागातच होती. आई बाबाही काहीतरी हळू आवाजात बोलतायत असं तिला वाटलं. आपल्याला सांगावस वाटलं तर ते सांगतील असं वाटून तिनं त्यांना काहीच विचारलं नाही. दुपारीही जेवणाचा साधाच बेत केला होता. आई, बाबा आणि सई सगळे एकत्रच जेवले. जेवणानंतर सगळं आटपून ती आपल्या खोलीत गेली. लग्न करून आल्यानंतर आपण या घरात किती पटकन रुळलो  याचाच ती विचार करत होती. ' सासू सासरेही अगदी आई बाबांसारखी माया करतात आणि मिहीर तर काय आपल्यावर जीवापाड प्रेम करतो अजून काय हवं ' अशा विचारातच तिला कधी झोप लागली कळलं नाही. कितीतरी दिवसांनी तिला अशी शांत झोप लागली. कसल्यातरी आवाजाने तिला जाग आली. तिनं पाहिलं तर बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं. आपण एवढा वेळ कसं काय झोपलो हेच तिला कळेना. तिचा मोबाईल वाजत होता आणि त्याच आवाजाने तिला जाग आली. मधुकररावांचा फोन होता. तिने फोन उचलला.

" हॅलो....सई , जरा बाहेर येतेस का...हिला जरा चक्कर आलेय..." बाबा म्हणाले

" हो हो....आले बाबा थांबा..." असं म्हणून ती घाई गडबडीत खाली आली. 

मेन डोअर उघडून ती बाहेर आली. त्यांच्या घरासमोरच्या मोकळया पॅसेज मध्ये चालत ती तशीच पुढे आली. तिने ' आई...... बाबा ....कुठे आहात तुम्ही....' अशा हाका मारल्या. पण कोणाचाच उत्तर येईना. बाजूला पसरलेल्या अंधारामुळे तिला भीती वाटत होती. आपली कोणीतरी मस्करी केली असेल असं वाटून ती मागे जायला वळली. तेवढ्यात तिला पाठीमागून प्रकाशाचा झोत दिसला. तिन मागे   वळुन पाहिलं तर थर्मोकोलच्या मोठ्या शिटवर   'Happy Anniversary ' असं मोठ्या अक्षरात लिहलं होतं. क्षणातच बाजूने एकेक लाईट्स लागत गेले. त्यासोबत सगळं ग्राउंड  उजळून निघालं. ती पाहतच राहिली. आश्चर्याने तिने तोंडावर हात घेतला. चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात पाणी ओसंडून वाहत होतं.....!!!!!  तिने पाहिलं समोर तर तिचे सासू सासरे, आई बाबा, पूजा ,तिच्या मैत्रिणी , बाजूच्या घरातील काका काकू सगळे पुढे आले.. पूजाने जाऊन सईला मिठी मारली. ' हॅपी अनिव्हर्सरी तायु..' असं म्हणून तिला विश केलं. सई खूप खुश झाली. तिला काय बोलावं सुचेना. तशीच चालत ती नलिनीताई आणि मधुकररावांजवळ आली. त्यांना तिने वाकून नमस्कार केला पण नलिनीताईंनी तिला उठवलं आणि मिठी मारून शुभेच्छा दिल्या. तिच्या सासऱ्यांनीही तिला आशीर्वाद दिले. मग ती आई बाबांजवळ आली. 

" तुझ्या सासूबाईंनीच आम्हाला बोलावून घेतलं..." सईचे बाबा म्हणाले तसं सईने अश्रू भरल्या डोळ्यांनी नलिनीताईंकडे पाहिलं. त्यांनी तिला डोळ्यांनीच आश्वस्त केलं. 

" आम्ही तुला सकाळीच फोन करणार होतो पण यांनी सांगितलं आधी तुला फोन करू नका म्हणून.. पण मग आम्ही मिहिररावांना फोन करून शुभेच्छा दिल्या..." तिची आई म्हणाली. 

सईने आई बाबांना नमस्कार केला.त्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या.  मगापासून या सगळ्या गडबडीत मिहीर इथे नाहीये हे तिच्या लक्षातच आलं नाही. आईने मिहिरचं नाव घेतल्यावर मात्र ती मिहिरला शोधु लागली. तेवढ्यात पूजा तिच्याजवळ आली. सईला थोडं बाजूला नेत ती तिच्याशी बोलायला लागली. 

" काय मग तायडे....जिजुने काय गिफ्ट दिलं तुला...? " तिनं सईच्या गळ्यात हात टाकत हळूच विचारलं. 

" गिफ्ट द्यायला भेटायला हवा ना....तो अजून आलाच नाहीये वाटत ऑफिस मधून..." सई जरा तोंड वाकडं करत म्हणाली. 

" म्हणजे.....??? अजून आलाच नाहीये तो....चांगली झाप त्याला आल्यावर...." पूजा म्हणाली.

" हो....येऊदे घरी मग बघच.... तुझ्या जिजूचं आज काही खरं नाही..." सई म्हणाली. 

तेवढ्यात नलिनीताईंनी सईला हाक मारली आणि बोलवलं. ती त्यांच्या जवळ गेली.

" काय आई...." तिनं विचारलं

" अग पाहुणे आलेत आपल्याकडे....जा जरा फ्रेश हो. छान  तयार होऊन ये..." त्या म्हणाल्या. या सगळ्या गडबडीत आपण झोपेतून उठून तसेच आलोय हे सईच्या लक्षात आलं तशी ती ओशाळली. 

" काय ग....जा तयार होऊन ये पटकन..." त्यांनी परत सईला जाग केलं

" अं.... हो हो...आलेच...येते पटकन.." असं म्हणून ती घरात आली. 

दार उघडून सई आत आली आणि तिला जोरात कोणतरी ओढलं तशी ती घाबरली. मग दार बंद झाल्याचाही आवाज आला. ती ओरडणार इतक्यात मिहिरने तिच्या तोंडावर आपला हात ठेवून तिला गप्प केलं. त्याला बघून ती शांत झाली. सकाळचा तिचा राग पुन्हा उफाळून आला त्यात त्याने साधं विशही केलं नव्हतं त्यामुळे त्या रागात अजूनच भर पडली होती. ती अजूनही त्याच्या जवळच उभी होती. 

" काय चाललंय....सोड मला....." सई त्याच्या मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न करू लागली.

" सोडण्यासाठी थोडीच पकडलंय.....'Happy Anniversary My Love ' ..." तो हळूच तिच्या कानात पुटपुटला. त्यावर ती गोड लाजली. पण तरीही तिचा त्याच्यावरचा राग गेला नव्हता.

" हं.... लवकर आठवण झाली याची...." तिने जरा गाल फुगवले. 

" अग माझ्या लक्षात होतं.... पण आई बाबांनी तुझ्यासाठी सगळं प्लॅनिंग केलं. एवढ्या दिवसात तुला मोकळा वेळच मिळाला नाही ना म्हणून....त्यांनी नसत दिलं तर मी दिलंच असत तुला सरप्राईज.... आता ते नेक्स्ट टाइम..." तो छान हसून म्हणाला.

" हो का....तुला वेळ कुठे असतो माझ्यासाठी...बिझी माणसं बा तुम्ही...." ती उगीचच नखरे करत म्हणाली. 

" कोण बोलतंय बघा.... तूच कामात होतीस एक झालं की दुसरं...." तोही जरासा चिडला.

" हं.... काय करणार. असो...' happy anniversary  dear ' ..." असं म्हणून तिने त्याला मिठी मारली. त्यालाही बरं वाटलं. 

त्यानेही मिठी जरा घट्ट केली. दोन क्षण असेच गेले...!!! मग त्याने तिला जरा लांब करत मागच्या टेबलवर ठेवलेलं गिफ्ट तिच्या समोर धरलं आणि तिला लवकर तयार होऊन यायला सांगितलं. ती खूप खुश झाली....आणि वरती रूममध्ये जाऊ लागली. थोडी पुढे जाऊन ती पळतच मागे आली आणि मिहीरचं लक्ष नसताना त्याच्या गालावर हळूच आपले ओठ टेकवून तिथून पळाली. मिहिरच्या ते लक्षात आलं तसा तोही तिच्या मागून रूम मध्ये पळाला. 

........................................

मिहीर आवरून बाहेर आला. त्याने आई बाबांना आणि सईच्या आई बाबांना देखील नमस्कार केला. त्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. तोपर्यंत मिहीरचा ऑफिसचा स्टाफही आला. त्यामुळे तो त्यांना भेटायला तिकडे गेला. सगळेजण पार्टी एन्जॉय करू लागले. सगळ्यांना कोल्ड्रिंक्स दिले गेले.   सगळेजण आपापल्या ग्रुप सोबत गप्पा मारत होते. इतक्यात मिहिरचं लक्ष दरवाज्याकडे गेलं. रेड कलरचा...गळ्यापासून फुल हॅन्ड नेटेड वेलवेटचा लॉंग वन पिस.....त्यावर गोल गळ्यालगत डायमंड नेकलेस...लॉंग एअररिग्स..... चेहऱ्यावर हलकासा मेकअप...ओठांवर डार्क रेड लिपस्टिक....ड्रेसवर साजेशी हेअरस्टाईल.... पायात हाय हिल्स सँडल..... घालून सई वनपिस सांभाळत मिहीरकडेच येत होती. तो भान हरपून तिच्याकडेच बघत होता. त्याच्या मित्राने त्याला कोपराने टोकलं तसा तो जागा झाला. मग कोणतरी जाऊन म्युझिक चालू केलं आणि सगळ्यांचीच पावलं थिरकायला लागली. मिहिरने सईकडे डान्ससाठी हात पुढे केला. त्यावर अलगद हात ठेवून ती त्याच्या जवळ सरकली आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत हरवून गेले...!!!!! थोड्या वेळाने त्या दोघांनी केक कापला.सगळ्यांनी त्यांना विश केलं आणि गिफ्ट्स दिले. सगळेजण छान एन्जॉय करत होते. मग सई आणि मिहिरने सगळ्यांना जेवायची विनंती केली. नलिनीताई आणि मधूकररावांनी सगळी व्यवस्था छान ठेवली होती. जेऊन झाल्यावर सगळे एक एक करून आपल्या घरी निघून गेले....या अचानक मिळालेल्या सरप्राईजमुळे आणि आपल्या माणसांच्या प्रेमाने सई हरखली होती....!!!!!

.............................

नलिनीताई आता बऱ्यापैकी हिंडायला लागल्या होत्या. घरातली कामंही त्या अधूनमधून करत. त्यामुळे सईला देखील आता जरा रिलॅक्स वाटतं होतं. अनिव्हर्सरी नंतरही तिने लगेच तिच्या जॉबचा विषय काढला नाही. पण जरा दोन तीन महिने गेल्यावर सगळी परिस्थिती बघून तिने सगळ्यांसमोर जॉबचा विषय काढला. त्याला कोणीच नकार दिला नाही. उलट तिनं स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी सगळ्यानी तिला प्रोत्साहनच दिल. दोन दिवसांनी ती एके ठिकाणी जॉब इंटरव्ह्यूसाठी गेली. पिस्ता कलरचा लॉंग कुर्ता, व्हाईट कलरचा पायजमा... त्यावर स्कार्फ हलकासा मेकअप करून ती इंटरव्ह्यू साठी गेली. त्या ऑफिसला अजूनही बरेच जण इंटरव्ह्यू साठी आले होते. त्यामुळे सईची अजूनच धाकधूक वाढत होती. एकेक करत सगळे आत जाऊन आले. शेवटी सईचा नंबर आला. आत जाताना तिने केबिनच्या बाहेर असलेलं नावं वाचलं त्यावर  मिलिंद जोगळेकर असं लिहलं होतं. क्षणभर हे नाव आपल्या ओळखीचं आहे असं तिला वाटलं. परमिशन घेऊन ती आत गेली. समोरच्या खुर्चीत एक हँडसम तरुण बसलेला सईला दिसला. 

" मिसेस सई लिमये..... राईट..." त्याने मान वर करून न बघताच तिला विचारलं.

" हो...." ती हळू आवाजात म्हणाली. 

कारण तिचा हा पहिलाच इंटरव्ह्यू होता. ती  कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच तिचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या आधी काही दिवसच तिची फायनल एक्साम पार पडली होती. त्यामुळे इंटरव्ह्यूला कुठे जायचा प्रश्नच नव्हता. ती जराशी घाबरली होती.

" please be seated...." समोरच्या व्यक्तीने तिला खुर्चीत बसायला सांगितलं. ती खुर्चीत बसली पण हृदय मात्र धडधडत होतं. काय विचारतील काय नाही याचाच ती विचार करत होती. तेवढ्यात तिच्या समोर बसलेल्या सरांनी मान वर करून तिच्याकडे पाहिलं. ती खाली मान घालून बसली होती.

" सई...... सई तू....??? " समोरच्या व्यक्तीने तिला विचारलं. तसं तिने मान वर करून पाहिलं तर चेहरा ओळखीचा वाटला. 

" सॉरी पण मी ओळखलं नाही तुम्हाला....." ती न कळून म्हणाली. 

" तू सई म्हणजे सई देशपांडेच ना....?? " समोर बसलेल्या मिलिंद सरांनी विचारलं.

" हो....आता सई लिमये...माझं लग्न झालं वर्षभरापूर्वी..." सईने सांगितलं.

" ओ. आय सी.....अगं तू मला ओळखलं नाहीस का...मी तुझ्याच कॉलेजला होतो. आपण NSS च्या वेळी भेटलो होतो. कॅम्पला आठवतंय..तुझ्यापेक्षा एकच वर्षाने मी सिनिअर होतो..." मिलिंद

" हो ....आठवतंय. मगाशी येताना नाव वाचलं तेव्हा वाटलं नाव ओळखीचं आहे.. पण लक्षात नाही आलं..कसे आहात तुम्ही...?? " तिने विचारलं

" सई.... कॉल मी मिलींद....एवढा काही मोठा नाहीये मी. तू इकडे कशी काय...?? "  त्यांनी विचारलं.

" मी ते जॉब इंटरव्ह्यू साठी आलेय...." ती म्हणाली. 

" अरे हो....विसरलोच... हा जॉब तुझाच म्हणून समज.." मिलींद सर हसत म्हणाले.

" नाही तसं नको....तुम्ही माझा रीतसर इंटरव्ह्यू घ्या...उद्या तुमच्या कंपनीला माझ्यापेक्षाही चांगला एम्प्लॉयी मिळू शकतो..." ती म्हणाली.

" ओ हो...I am impressed..." ते म्हणाले. 

 मग त्यांनी सईला त्या जॉबशी रिलेटेड सगळे प्रश्न विचारले. सईने सगळ्याची व्यवस्थित उत्तरं दिली. त्यांचा इंटरव्ह्यू झाल्यावर मात्र त्या दोघांनी गप्पा मारल्या आणि थोड्या वेळाने सई घरी निघून गेली. घरी आल्यावर सईने इंटरव्ह्यू बद्दल आई बाबांना सगळं सांगितलं. तोपर्यंत मिहीर देखील घरी आला. तोपर्यंत ती आई बाबांशीच बोलत बसली होती. 

" आई तुम्हाला माहितेय ते सर म्हणजे तो मिलींद आमच्याच कॉलेजला होता...आधी माझ्या लक्षातच आलं नाही मग त्यांनीच आठवण करून दिली. " सई उत्साहात सांगत होती. 

" अरे वा..... छानच झालं. म्हणजे काय हा जॉब तुला लागल्यातच जमा आहे..." बाबा देखील खुश होत म्हणाले.

बूट काढता काढता मिहीर त्यांचं बोलणं ऐकत होता. पण बाबांचं बोलणं ऐकल्यावर त्याने सईकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि तो रागाने तिथून निघून गेला. 

क्रमशः....

🎭 Series Post

View all