तुला पाहते रे - भाग 5

Love story

तुला पाहते रे - भाग 5 


मिहिरला सई कुठेच दिसत नव्हती. तो आपल्या जागेवरून उठला. त्याने त्या क्लास मधल्या एअरहोस्टेटना विचारलं पण त्यांनी माहीत म्हणून सांगितलं. त्याने जाऊन वॉशरूम चेक केलं. पण तिथेही ती नव्हती. शेवटी तो शोधत शोधत दुसऱ्या क्लासमध्ये गेला. तिथे एका बाईजवळ सई उभी असलेली त्याला दिसली. तो तिच्याजवळ गेला. त्याने पाहिलं तर त्या बाईच्या मांडीवर एक ते दीड वर्षांची एक छोटीशी मुलगी बसली होती. गुलाबी कलरचा फरचा फ्रॉक , त्याच कलरचे पायात इवलुसे मोजे...खुप गोड होती ती....!!!! 

" सई अग कधीची शोधतोय तुला मी....सांगून जाता येत नाही का....? " तो आजूबाजूला माणसं होती हे बघून दबक्या आवाजात तिच्यावर जरा रागावला. 

" अरे सॉरी....तू झोपला होतास सो नाही उठवलं तुला. अरे हे बाळ आलेलं तिकडे आपल्या क्लासमध्ये चालत चालत. सोबत कोणीच नव्हतं. मी आपल्या क्लासमध्ये कोणाचं आहे का विचारलं पण कोणीच काही बोललं नाही..मग मी इकडे आले. या ताईंचा जरा डोळा लागला तेवढ्यात ते मांडीवरून उतरून खाली आलं होतं..मी त्या बाळाला घेऊन आले तोपर्यंत त्या जाग्या झाल्या होत्या.. मग त्यांनी बाळाला ओळखलं आणि त्यांच्याकडे बाळाला देऊन मी येतच होते...पण किती गोड आहे रे ही...!!!! पायच निघत नाहीये इथून.." सई म्हणाली

" छान...." त्याने फक्त मान डोलावली. " चल आता फ्लाईट लँड होईल...." मिहीर म्हणाला. खरंतर त्यालाही ते बाळ आवडलं होतं. पण आता ते कोचीनला पोहचणार होते सो सईला घेऊन तो त्यांच्या जागेवर आला. 


" किती गोड होतं ना ते बाळ.....!!!! " ती अजूनही त्याच विचारात होती.

मिहिरने फक्त तिच्याकडे हसून बघितलं. ती खूप खुश दिसत होती. थोड्याच वेळात ते कोचीन एअरपोर्टला पोहचले. सगळं चेकिंग झाल्यावर ते बाहेर आले. आता मुन्नारला जायला त्यांच्याकडे बस किंवा टॅक्सी असे दोन ऑप्शन होते.. पण बसने गेलो तर जवळजवळ नऊ ते दहा तासांचा प्रवास होता. त्यापेक्षा टॅक्सीने ते तीन तासात मुन्नारला पोहचले असते. मिहिरने मोबाईल वरून त्या एरियात असणाऱ्या टॅक्सी सर्व्हिसेस पहिल्या आणि त्यातल्या एका कंपनीला फोन करून टॅक्सी मागवली. त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. थोड्याच वेळात टॅक्सी आली . ड्रायव्हरने त्यांच्या बॅग्स गाडीच्या डिकीत ठेवल्या आणि त्यांना बसायला सांगून तो ही ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. गाडी हळुहळु पुढे सरकू लागली. तसा कोचीन एअरपोर्ट मागे पडू लागला. 


..................................


कोचीन ते मुन्नार हा रस्ता वळणावळणाचा होता त्यामुळे सईला जरा गरगरायला लागलं होतं..पण थोड्या वेळानंतर तिला बरं वाटलं आणि तिनंही बाहेरचं सौंदर्य बघायला सुरवात केली. नोव्हेंबर महिना नुकताच सुरू झाला होता तरीही या भागात इतर भागांपेक्षा जास्त थंडी होती. ड्रायव्हरने गाडीचा एसी बंद केला आणि खिडक्या उघडल्या तसा वाऱ्याचा एक थंड झोत आत आला. दोघही अंगावर आलेल्या वाऱ्याने शहारले. सई तर मिहिरला चिकटुनच बसली होती. वळणावळणाच्या रस्त्याला दोन्ही बाजूला असलेले चहाचे हिरवेगार मळे मुन्नारच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते. सगळा डोंगराळ भाग हिरवी शाल पांघरून उभा होता. मुन्नारच्या त्या डोंगरांमधून सूर्य हळुहळु वर सरकताना त्यांना दिसला. ड्रायव्हरला जरा गाडी थांबवायला सांगून त्या दोघांनी ते दृश्य आपल्या कॅमेरात टिपून घेतलं....!!! पोहचायला उशीर होईल म्हणून मग ड्रायव्हरने त्यांना जास्त वेळ थांबू दिल नाही. दोघेही गाडीत बसले.. गाडी पुढे सरकु लागली तशी सूर्याची कोवळी किरणंही त्या डोंगराच्या आडून डोकावू लागली. हिरव्या रंगावरती पिवळसर रंगांचे शेडिंग द्यावे तशी ती किरणं  डोंगरावर पसरत होती....!!!! सई आणि मिहीर दोघेही हे सगळं मनात साठवत होते कारण कोणत्याही कॅमेरापेक्षा अधिक छान गोष्टींचा आनंद आपल्या मनात टिपला जात असतो...!!! मधूनच कुठेतरी धबधब्याचा आवाज येत होता...गाडी पुढे पुढे जात होती तसं त्याचंही दर्शन झालं.. मनाला मोहवणारी हिरवळ...हवेतला हा गारवा सई आणि मिहिरला अजूनच जवळ आणत होता.. !!!


..................................

मुन्नार हा डोंगराळ प्रदेश असल्यामुळे सगळे हॉटेल्स ही उंच भागात होती.त्यामुळे हॉटेलपर्यंत टॅक्सी जात नसे. त्यासाठी हॉटेलच्या वेगळ्या गाड्या तिथे होत्या. टॅक्सी ड्रायव्हरने हॉटेलच्या थोडं अलीकडेच गाडी थांबवली. त्याने मग मिहिर कडुन हॉटेलचा नंबर घेतला आणि  हॉटेलला फोन करून गाडी पाठवायला सांगितलं. मिहिरने टॅक्सीवाल्याचे पैसे दिले. तोपर्यंत हॉटेलची गाडी आली. त्यातल्या माणसाने टॅक्सीतुन त्यांच्या बॅगा काढून हॉटेलच्या गाडीत ठेवल्या. मग तो टॅक्सीवाला निघून गेला. सई आणि मिहिर दोघेही हॉटेलच्या गाडीत बसले. हॉटेल उंचावर असल्याने तिथपर्यंत जाणारा रस्ता हा बऱ्यापैकी खडकाळ होता.त्यामुळे गाडीला दचके बसत होते. आधीच कोचीन ते मुन्नार पर्यँतच्या प्रवासाने सई थकली होती. त्यात हा खडकाळ रस्ता तिला जीव नकोसा करत होता. थोड्याच वेळात ते हॉटेलला पोहचले. ते दोघेही खाली उतरले.  'ब्लँकेट हॉटेल अँड स्पा '  तिने हॉटेलचं नाव वाचलं. नावाप्रमाणेच हॉटेलचा परिसर बघून तिला छान वाटलं....!!! तिने गाडीतून उतरल्यावर हात वर करूनममोठा आळस दिला आणि तिच्या तोंडुन एक जांभई देखील आली...मिहीर मात्र छान फ्रेश दिसत होता...हॉटेलच्या सर्व्हिस बॉयने त्यांचं सामान गाडीतून काढलं आणि तो ते घेऊन आत गेला. सई आणि मिहीर दोघेही दोन मिनिटं तिथेच उभे होते. वरून दिसणारा व्ह्यू वेड लावणारा होता. तिकडे हवेत खूप गारवा होता. वरून सगळीकडे पसरलेली हिरवी शाल....मधूनच डोकावणारी तलावांची निळी किनार अजुनच भुरळ घालत होती. त्यातच एका बाजूने हळूहळू धुकं एखाद्या मऊ मऊ गालिच्या सारखं त्या हिरवळीवर पसरत होतं. सईला तिथून हलावसच वाटतं नव्हतं. तेवढ्यात आतून एक हॉटेलचा माणूस त्यांना बोलवायला आला.

" सर..प्लिज ........" त्याने मिहिरला हाक मारून त्याच्या मागून यायला सांगितलं. दोघेही मग त्या माणसाच्या मागून आत गेले.

त्यांच्या रूम आधीच बुक केल्या होत्या. त्यामुळे रिसेप्शनच्या इथून मिहिरने त्यांच्या रूमच्या कीज घेतल्या आणि ते दोघेही रूम मध्ये आले. पाठोपाठ रूम सर्व्हिसवाल्या मुलाने त्यांच्या बॅग्स सुद्धा आणून दिल्या. मिहिरने त्याला टीप दिली तसा तो खुश झाला. जाता जाता 'have a nice day sir ,madam ' असं म्हणून दार लावून निघून गेला. सई फार दमली होती ती जाऊन बेडवर बसली. मिहिरने तोपर्यंत घरी फोन करून दोघेही सुखरूप पोहचल्याच कळवलं..आणि सईच्या आई बाबांनाही त्याने फोन केला. त्यांनाही बरं वाटलं. त्यानं फोन ठेऊन बाजूला पाहिलं...

क्रमशः....

🎭 Series Post

View all