तुला पाहते रे - भाग 4

Love story

तुला पाहते रे - भाग 4

मिहिरला दोन मिनिटं काही कळलंच नाही. त्याचं लक्ष कामातच होतं. पण नंतर त्याच्या लक्षात आलं आणि तो काम बाजूला ठेऊन आत खोलीत आला. खोलीतले लाईट तसेच चालू होते पण सई मात्र झोपली होती. झोपेतही तिच्या चेहऱ्यावर गोड हसू होतं. तो तसाच तिच्याकडे बघत बसला. आपल्याला वाटलं ते खरंच तसं झालं की उगीचच आपण स्वप्न पाहिलं असं त्याला वाटलं. म्हणून त्यानं स्वतःलाच छोटा चिमटा काढला. तरीही त्याच्या तोंडून " आ......" निघालच. ती उठेल म्हणून तोंड दाबून तो पुन्हा बाहेर गॅलरीत आला. त्याला खूप छान वाटत होतं. सईने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकलं होतं त्यामुळे तो खुश होता. गॅलरीतल सगळं कामाचं आटपून तो आत आला. सगळं सामान त्याने टेबलवरती आवाज न करता ठेऊन दिल आणि तिच्या बाजूला येऊन झोपला..तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजरच हटत नव्हती.. तिच्याकडे बघता बघता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सईला जाग आली तिच्या अंगावर पडणाऱ्या फुलांमुळे...!!!! ती काहीशी डोळे चोळतच उठली. तिने बघितलं तर मिहीर तिच्यावर मोगऱ्याच्या फुलांची उधळण करत होता. त्याच्या अशा वागण्याने ती छान लाजली.

" good morning......!!! " त्याच्या आवाजावरून तिला त्याचा फ्रेश मुड जाणवला.

" guo morninaaag......." ती अजूनही जांभया देत होती..." थॅंक्यू...... इतकं छान सरप्राईज दिल्याबदल..." आजूबाजूला पडलेली फुलं तिने गोळा करून ओंजळीत धरली आणि त्याचा वास घेतला.....

" चल मी आवरतो...." असं म्हणून तो उठला आणि काहीतरी लक्षात आल्यासारखं तो पुन्हा मागे वळला. " मला बोलायचं होतं तुझ्याशी जरा....." तो कसं बोलावं या विचारात होता.

" काय झालं....बोल ना. " सई म्हणाली.

" काल तू खरंच माझ्या गालावर.........की की मला भास झाला...." त्याने एका दमात विचारून टाकलं. त्यावर ती लाजली आणि मानेनेच हो म्हणाली. त्याला खूप आनंद झाला. 

" म्हणजे मी आता तुझा हक्काचा नवरा झालो तर....आत्तापर्यंत फक्त ऑफिशियल होतो आता तुझाही झालोय....." तो तिच्या खांद्याला पकडून छान हसून म्हणाला. तशी तिनं लाजून मान खाली घातली.

" हमम....." ती फक्त एवढंच म्हणाली. मान वर करून त्याच्याकडे बघायची तिची हिंमतच होईना. 

" बाप रे.....म्हणजे आता माझा बायकोवास चालू होणार तर ...." तो तिच्या खांद्यावरचे हात बाजूला करत एवढुस तोंड करत म्हणाला. 

" म्हणजे ???" तिला काहीच न कळून तिने त्याच्याकडे बघत विचारलं. 

" म्हणजे तुम्हाला कसा सासुरवास असतो तसा आम्हाला आता बायकोवास असणार...." तो रडवेला चेहरा करत तिला सांगत होता.

तिच्या लक्षात येईपर्यंत तो तिच्यापासून हळुहळु लांब सरकत होता. तिनं दोन मिनिटं विचार केला आणि त्याच्या म्हणण्या मागचा अर्थ लक्षात आल्यावर ती ओरडली. 

" म्हणजे....मी तुला छळते असं म्हणायचंय तुला ?? " तिने त्याला उशी फेकून मारली.

" छे छे......असं कसं म्हणेन मी....तुझ्यासमोर तसं बोलायची हिंमत आहे का माझी..." तो मोठ्याने हसत उशीचे वार चुकवत होता. ती मात्र जराशी चिडली होती.

" हो का.....थांब तुला बघतेच....." असं म्हणून तिने त्याला अजून एक उशी फेकून मारली..आणि मग त्याला मारायला बेड वरून उठून त्याच्या मागे पळाली. 

दोघांचीही मारामारी चालू झाली. दोघेही उशीने एकमेकांना मारत होते. शेवटी मिहिरने तिच्या हातातली उशी ओढून फेकून दिली आणि तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ ओढलं.. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट त्याने हलकेच कानामागे नेली. तशी ती शहारली. तो तिला मिठी मारणार इतक्यात त्याचं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं. 

" बाप रे....सव्वा आठ ....??? " त्याने तिला बाजूला केलं आणि पटापट आवरू लागला. 


त्याला ऑफिसला जायला उशीर होतं होता. त्याची चाललेली धावपळ बघून तिला हसू आलं. तीही मग आवरून सासूबाईंच्या मदतीला किचन मध्ये गेली. सई आणि मिहिरच्या लग्नाला जवळजवळ महिना होत आला. तरीही ते दोघे कुठेही बाहेर गेले नव्हते आणि स्वतःहून बाहेर जायचा विषयही काढत नव्हते ही गोष्ट सासू सासऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे आज त्यांनी त्या दोघांशी यावर बोलायचं ठरवलं. खरंतर मिहीरला ही वाटत होतं सईला घेऊन कुठेतरी बाहेर जावं पण ती घरात रुळेपर्यंत आणि त्यांचं नातं स्वीकारेपर्यंत तो थांबला होता. तिला तिचा वेळ दिला होता आणि म्हणूनच त्याने बाहेर जाण्याचा विषय आधी काढला नव्हता. मिहीर आवरून खाली आला. आईने त्याला नाश्त्याची प्लेट आणून दिली. बाबांनी मग सईला देखील हाक मारली. 

" मिहीर सई मला जरा बोलायचंय तुमच्याशी..." बाबा म्हणाले.

" काय झालं बाबा....काही प्रॉब्लेम आहे का ? " मिहिरने काळजीने विचारलं.

" अरे तेच तर मी तुम्हाला विचारतोय....काही प्रॉब्लेम आहे का....तुम्ही अजून बाहेर कुठे फिरायला गेला नाहीत...?? " त्यांनी सरळच विचारलं. मिहिरने सईकडे बघितलं. त्याला ती भांबावल्या सारखी वाटली. काय बोलावं तिला सुचेना.

"  बाबा ते कामं खुप आहेत ऑफिसला सो.....आत्ता रजा नाही मिळणार.....म्हणून मग नाही गेलो..." मिहीर म्हणाला.

" अरे पण हेच दिवस असतात....फिरायचे, एकमेकांना समजून घ्यायचे...." नलिनीताईंनी मिहिरच्या पाठीवर थोपटलं.

" कामं काय होतंच राहतील....जा जरा फिरून या....मी फोन करू का तुझ्या साहेबांना..? बघतो कशी रजा देत नाही ते...." बाबा म्हणाले

" नको नको....मी बघतो काय ते...." असं म्हणून तो घाईत जायला उठला. नाश्त्याची प्लेट त्याने आईच्या हातात दिली. बाबा नलिनीताईंना खुणेनेच ' देऊया ना ' असं विचारत होते. त्यावर त्यांनी मान डोलावली.

" मिहीर....हे घे.आमच्याकडून तुम्हाला दोघांना लग्नाचं गिफ्ट..." त्यांनी एक अनव्हलप त्याच्याकडे देत म्हटलं. 

" काय आहे यात...? "  त्याने अनव्हलप उघडता उघडता विचारलं. 

" केरळची तिकीट्स.....आणि हॉटेलच बुकिंग...." बाबा म्हणाले.

" बाबा .....अहो कशाला..?? आम्ही गेलो असतो ना नंतर..." मिहीर न राहवून म्हणाला.

" हो ना मग आत्ताच जा....तुम्ही गेलात की आम्हीही जाऊ जरा पिकनिकला....." बाबा हसत म्हणाले.

मिहिरला त्यावर काय बोलावं कळेना त्याने भुवया उंचावून सईला खुणेनेच चालेल का म्हणून विचारलं... त्यावर तिने फक्त मान डोलावली आणि लाजून ती किचन मध्ये पळाली. मिहिरने पण मग आईबाबांना ' आम्ही जाऊ ' सांगितलं आणि तो ऑफिसला निघून गेला. 


.............................

दोन दिवसांनी त्यांची फ्लाईट होती. त्यामुळे जाण्याआधी थोडंस शॉपिंग करायला हवं होतं. तसं तिनं ते मिहिरला सांगितलं. तोही चालेल म्हणाला. सई मग आई बाबांना भेटायला म्हणून माहेरी आली. सईचे आई बाबा देखील त्याच शहरात राहात होते. मध्ये एकदा पूजा वगरे झाल्यानंतर ती येऊन गेली होती पण लगेच एकच दिवसात परत गेली. सासरी ती चांगली रुळली होती हे तिच्या बोलण्यावरुन आणि वागण्यावरून  कळत होतं. त्यामुळे आई बाबाही समाधानी होते. आल्या आल्याच सईने आई बाबांना ती आणि मिहीर  केरळला जाणार असल्याचं सांगितलं. त्यांनाही ऐकून बरं वाटलं. पूजाने तर लगेचच तिची हे आण ते आण लिस्ट द्यायला सुरुवात केली. त्यावर सई आणि आई दोघीही हसायला लागल्या. थोडा वेळ गप्पा मारून सई मग जायला निघाली. कारण ती आणि मिहीर दोघेही शॉपिंगला जाणार होते. उगाचच त्याला ताटकळत थांबावे लागेल त्यापेक्षा आपणच वेळेत गेलेलं बरं म्हणून ती आई कडून लगेचच बाहेर पडली. मिहिरही तिची वाट बघत होता. ठरलेल्या ठिकाणी दोघेही भेटले. दोघांनीही आवश्यक होती ती सगळी शॉपिंग केली. आणि दोघेही घरी परतले.


..........................


दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांची फ्लाईट होती. मुंबईतच राहत असल्याने त्यांच्या फ्लाईटच बुकिंग मुंबई ते कोचीन असं केलेलं होतं. केरळ मधल्या मुन्नार मध्ये त्याच्या हॉटेलचं बुकिंग होतं. त्यामुळे आधी फ्लाईट आणि नंतर तिथून टॅक्सी करून त्यांना मुन्नारला जावं लागणार होतं. दोघेही खूप खुश होते. मिहीर कामानिमित्त अनेकदा विमानाने परदेशी जाऊन आला होता. पण सईचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे तिला थोढीशी धाकधूक वाटतं होती. पण मिहीर सोबत असल्यामुळे जरा रिलॅक्सही वाटतं होतं तिला. दोघेही वेळेत एअरपोर्टला पोहचले. सगळं चेकिंग झाल्यानंतर ते दोघेही त्यांच्या विमानात जाऊन बसले. थोड्याच वेळात विमानाने आकाशात झेप घेतली तसे सईने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. मिहिरचा हात तिने जोरात दाबून घट्ट पकडला होता. तिच्या अशा वागण्याचं त्याला हसू आलं. थोड्या वेळाने सगळं नीट झाल्यावर मिहिरने सईला हलकेच डोळे उघडायला सांगितले. तिने आपले डोळे उघडले. त्याने मग तिला खिडकीतून बाहेरचं दृश्य दाखवलं. तो व्ह्यू खरच नयनरम्य होता....!!!!! तिला खूप भारी वाटलं. आपण इतक्या उंचीवरून उडतोय याच एक वेगळंच फिलिंग तिला होतं....!!!! रात्री उशिरापर्यंत बॅग पॅकिंग करणं आणि ऑफिसच्या कामामुळे मिहीर थकला होता..थोडया वेळाने बोलता बोलताच मिहिरला झोप लागली....सई मात्र झोपणं शक्यचं नव्हतं...ती अजूनही खाली डोकावून सगळं डोळ्यात साठवुन घेत होती...!!! प्रवास तसा दोन तासांचाच होता पण तो तिला वेड लावणारा होता..!!! थोड्या वेळाने मिहिरला जाग आली. बाजूच्या सीटवर त्याने पाहिलं पण ती सीट रिकामी होती. त्याने आजूबाजूला पाहिलं पण त्याला सई कुठेच दिसत नव्हती...

क्रमशः....

🎭 Series Post

View all