तुला पाहते रे - भाग 3

Love story

तुला पाहते रे - भाग 3

दुसऱ्या दिवशी सकाळी डायनींग टेबलवर सगळे नाश्त्याला जमले. मिहीर आवरून ऑफिसलाच निघत होता. नीता मावशींनी सगळ्यांना नाष्टा दिला. त्यांनी छान मटार घालून उपिट केलं होतं ते गरम गरमचं त्यांनी सगळ्यांना वाढलं.

" काय मग आई...काय म्हणतंय तुझं महिला मंडळ....??" मिहिरने खात खात बोलायला सुरुवात केली

"आत्ता आठवण झाली होय तुला आईची....म्हटलं आमच्याशी बोलायला तुला वेळ आहे की नाही काय माहीत..." नलिनीताई म्हणाल्या.

" असं काय म्हणतेस....काल नाही का तुमच्यासाठीच तर लवकर आलो...." तो म्हणाला.

" आता काय माहिती.....आमच्यासाठी आलास की लाडक्या बायको साठी आलास ते...." त्यांनी टोमणा मारला.... सईने मिहीरकडे बघितलं आणि तो काहीतरी बोलणार इतक्यात त्याला तिने डोळ्यांनीच शांत राहा म्हणून खुणावल. 

" असं काय ग म्हणतेस.....तुम्हाला मी बोलवुन थकलो तुम्हीच आता आलात..... आता आलेयस तर राहा आठ - दहा दिवस....आपण फिरायला जाऊ बाहेर..." तो आनंदाने म्हणाला.

" आठ दिवस कसली राहतेय.....माझी मुलं आहेत तिकडे.....माझी फुलझाडं वाट बघत असतील माझी...नातवंडांचं सुख नाही ....निदान फुलात तरी जीव रमवतो आम्ही...." त्या असं म्हणाल्या आणि सईच्या डोळ्यात पाणी तरळलं.

" नलु......अग काय चाललंय तुझं आल्यापासून.... कशाला असं तिरकस बोलतेस... तुला सगळी परिस्थिती माहितेय तरीही तू असं म्हणतेस....उद्या तिच्या जागी देव न करो पण आपल्या मिहीरला काही झालं असतं तरीही तू असच बोलली असतीस का....?? " बाब काहीसं चिडून म्हणाले.

" आता...?? मी बोलले का पण तिला काही...आणि स्वतःच्याच मुलाबद्दल अस बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला..??..... काही होणार नाही माझ्या मिहिरला......"  त्यांनी बाजूलाच बसलेल्या मिहिरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.


" जसा तो आपला मुलगा आहे तशी ती ही आपली मुलगीच आहे....पुन्हा असं बोललेलं मला चालणार नाही..." बाबा काहीसं रागाने म्हणाले.

" घ्या बाई.....मी बोलतच नाही आता काही....माझ्याच मुलाशी बोलायची चोरी झालेय मला..चालू दे तुमचं..." एवढं बोलून  त्या नाश्ता करू लागल्या. 

" आई तसं नाही गं म्हणायचं बाबांना....पण आपल्या सगळ्यांनाच सईची अवस्था माहितेय. त्यात आपण तिला मेंटली स्ट्रॉंग करायला हवं...आपल्या बोलण्याचा तिला त्रास होऊ नये म्हणून आपणच काळजी घ्यायला हवी ना...." तो आईच्या हातावर हात ठेवत म्हणाला. 

" हम्मम म्हणजे मी बोलतेय त्याचा त्रास होतो का हिला....?? काय गं सई..... मी काही बोलले का तुला ?? " त्यांनी असा थेट प्रश्न विचारल्यावर तिला काय बोलावं सुचेना...

" नाही आई.....काहीतरीच काय.... मी...मी काहीच म्हणत नाहिये...." ती जरा घाबरतच म्हणाली.

" हे बघ आई , सई माझी पत्नी आहे त्यामुळे तिला जर त्रास झाला तर तो त्रास मलाही होईल मग तो शारीरिक असो की मानसिक....अक्सिडेंट नंतर मी खूप प्रयन्त करून तिला सावरलंय आणि आता मला पुन्हा ती डिप्रेस झालेली नकोय...." मिहीर म्हणाला.


" राहता राहिला प्रश्न ती घरात काही करते की नाही याचा तर ती घरून तिचं ऑफिसचं काम करते... ती डिझाईन तयार करून तिच्या क्लाएंटना पाठवते...त्यामुळे ती जरी आज व्हीलचेअर वरती असली तरी या घरात ती ही कमावते. त्यामुळे तिला यावरून कोणीही काहीही बोललेलं मला चालणार नाही..." एवढं बोलून मिहीर बॅग घेऊन ऑफिसला निघून जातो.. नलिनीताई आपल्या मुलाकडे अवाक होऊन बघतच राहिल्या....


..............................

तीन वर्षांपूर्वी सई आणि मिहिरचं लग्न झालं. अरेंज मॅरेज असल्यामुळे दोघांमध्येही सुरवातीला थोडं अवघडलेपणा होता. पण मिहिरच्या बोलण्याने आणि त्याच्या स्वभावामुळे त्यांचं नातं हळूहळू फुलायला सुरवात झाली. मिहीर एका आयटी कंपनीत जॉबला होता. सई इंटिरिअर डिझायनर होती. लग्नानंतर थोडे दिवस ती घरातच होती. त्यामुळे कधी कधी तिला घरात कंटाळा यायचा. नलिनीताई आणि मधुकरराव तिला सांभाळून घ्यायचे. मग त्यांच्याशी गप्पा मारण्यात तिचा वेळ जायचा. लग्नाआधी तिला बऱ्यापैकी जेवण येत होतं. पण सासरी आल्यावर ती नलिनीताईंच्या हाताखाली सगळं शिकली. त्याही कौतुकाने तिला नवीन नवीन पदार्थ शिकवायच्या. एकदा ती अशीच सगळ्यांसाठी घरातल्या घरात केक करत होती. नलिनीताई आणि मधुकरराव दोघेही देवळात गेले होते आणि नंतर ते त्यांच्या मित्राकडे जाणार होते. त्यामुळे ते येईपर्यंत छान केक करायचा तिनं ठरवलं. तिनं मोबाईवर बघून सगळं मिश्रण तयार केलं आणि गॅस ऑन करून त्यावर तवा ठेवला. मिश्रण केकच्या भांड्यात ओतून तिने ते भांड तव्यावर ठेवलं आणि केक व्हायची वाट बघू लागली.पंधरा वीस मिनिटं होऊन गेली तरी तो केक काही होईना...मग ती वैतागली. तिच्या चेहऱ्याला , हाताला सगळीकडे केकच बॅटर लागलं होतं... हे सगळं लांबूनच मिहीर बघत होता. तिचा चाललेला खटाटोप पाहून त्याला हसू आलं. 

" काय मॅडम काय चाललंय ...." तो किचन मध्ये तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. तेव्हा तो आल्याच तिच्या लक्षात आलं..

" अरे , तू कधी आलास...?? बस मी तुला चहा देते...." ती म्हणाली.

" मगाशीच आलो....तुझा केक करायचा अट्टाहास बघत होतो.." ..तो हसून म्हणाला

" हसतोस काय.... सगळं नीट केलंय मी पण मेला हा केक होतच नाहीये..." तिने चेक करायला घेतलेली हातातली सूरी फेकत म्हटलं. त्यावर त्याला अजूनच हसू आलं.

" अग पण आपल्याकडे ओव्हन आहे. तू गॅसवर का करतेस.....? " त्याने विचारलं.

" आहे पण मला ओव्हन ऑपरेट नाही करता येत...." ती एवढुसं तोंड करत म्हणाली.

" wait....मी दाखवतो..." असं म्हणून त्याने तिला टेम्प्रेचर कसं सेट करायचं किती मिनिट्स साठी ठेवायचा ते दाखवलं आणि केकच गॅसवरच भांड उचलून ओव्हन मध्ये ठेवलं..तिचा अवतार बघून त्याला हसू येत होतं म्हणून त्याने तिला चेहरा क्लीन करून यायला सांगितलं. तोपर्यंत ओट्यावर तिने घातलेला पसारा त्याने बऱ्यापैकी आवरला.. थोड्या वेळातच ओव्हन मध्ये केक रेडी होता..तिला खूप भारी वाटलं....तिने त्याला आनंदाने मिठीच मारली.. त्यालाही बरं वाटलं. तिच्या लक्षात आल्यावर ती लाजुनच बाजूला झाली. मिहीर मग फ्रेश होऊन खाली हॉल मध्ये आला..थोड्या वेळाने आई बाबा देखील आले. तिने मग सगळ्यांना केक दिला. सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. रात्रीचं जेवण वगरे सगळं आटपल आणि ती खोलीत आली. खरंतर त्याच्या याच समजून घेण्याच्या स्वभावामुळे ती त्याच्या नव्याने प्रेमात पडली होती. तो ऑफिस वरून दमून आला होता तरीही आपल्या मदतीसाठी तो आला याचंच तिला किती अप्रूप वाटतं होतं...!!! ती खोलीचं दार ढकलून आत आली. मिहीर गॅलरीत बसून काहीतरी काम करत होता. ती त्याच्या जवळ येऊन उभी राहिली.

" मिहीर....काय करतोस...आहे का माझ्याशी बोलायला वेळ...? " ती त्याला उगीचच चिडवत म्हणाली.  

" हम्मम......नाही खरंतर... पण आता बायकोसाठी म्हणून जरा काढायला हवा वेळ ...." तो हातातलं काम संपवत म्हणाला. 

" हो म काय.... करायलाच हवं बायको साठी एवढं...." ती गोड हसून म्हणाली.

" काय म्हणताय मग राणी साहेब.....काय सेवा करू आपली...." तो कमरेत किंचित वाकुन म्हणाला.

" गप रे.....मी तुला थँक्स म्हणायला आलेय....केक करताना मला मदत केल्याबद्दल खूप खूप थॅंक्यू...." ती म्हणाली.

" हो का......ठीक आहे ठीक आहे.....म्हटलं गरीब बिचारी बापडी करतेय काम तर जरा मदत करू तिला.....म्हणून मग आलो....तुझी हालत बघवत नव्हती...." तो हसून म्हणाला.

" गप ए......होतं असं कधीकधी....मी काही शेफ नाही..." तिनं गाल फुगवले. 

" अग मस्करी केली मी.... छान झाला होता केक....अगदी तुझ्यासारखा....!!! " तो तिला आपलीकडे वळवत म्हणाला. तसं ती छान हसली. 

" थॅंक्यू......" असं म्हणून ती जायला वळली. मिहिरही पुन्हा काम करू लागला. तशी ती पुन्हा त्याच्या जवळ आली आणि तिने हळूच त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले आणि आत रूम मध्ये पळाली...


क्रमशः....

🎭 Series Post

View all