तुला पाहते रे - भाग 20 ( अंतिम )

Love story

तुला पाहते रे - भाग 20 ( अंतिम )

पडत धडपडत सई खोलीपर्यंत आली. तिने खोलीचं दार उघडलं आणि तिच्या अंगावर गुलाबाची फुलं बरसू लागली. तशी ती हरखली. तसच दरवाज्याच्या कडांना धरून ती उभी राहिली आणि डोळे मिटून वरून बरसणाऱ्या फुलांचा आनंद लुटत होती. समोरच खिडकीला टेकून मिहीर उभा होता. तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. फुलांचा वर्षाव थांबला तसे तिने डोळे उघडले. समोर पाहिलं तर हाताची घडी घालून मिहीर तिच्याकडेच बघत होता. 

" काय बघतोस असा.....? " तिने विचारलं. त्यावर त्याने फक्त हसून मानेनंच नाही म्हटलं.

" मग.....?? " 

" काही नाही असंच....." 

" ये मला मदत कर ना जरा....." ती हळूहळू पावलं टाकत त्याच्याजवळ येऊ लागली. 

" नो.....तुझं तुलाच यायचंय माझ्या पर्यंत...." तो म्हणाला.

" असं रे काय.... इतकी चालत आले ना...." असं म्हणून तिनं पुढचं पाऊल टाकलं आणि पडली. पायात अजूनही ताकद नव्हती. पण उभं राहायचंच या इर्षेने ती हे सगळं करायची. ती पडली त्यावर तो हसला.

" तू हसतोयस मिहीर....?? जा मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी काही..." तिने गाल फुगवले आणि पडली होती तिथेच जरा सावरून बसली. तिच्या लक्षात आलं की मिहीर  आणि नीता मावशी दोघेही घरात नव्हते मग हा आला कसा अचानक याचं तिला आश्चर्य वाटलं.

" बघू कुठे लागलं आमच्या धडपड्या राणीला....." तो तिच्याजवळ येऊन म्हणाला.

" काही नको....मगाशी ये म्हणत होते तर आला नाहीस. आता कशाला. बाय द वे....तू आत कसा आलास. मी तर दरवाजा लॉक केला होता...." तिने विचारलं.

" जादूने......." तो हवेत हातवारे करत म्हणाला. त्यावर ती हसली.

" हो का.....मग जादूने गायब पण व्हा बघू परत. " सई

" आता कशाला गायब होऊ. आता मी माझ्या बायको जवळ आहे . एकुलती एक लाडाची बायको आहे माझी..." त्याने तिचे गाल ओढले. 

" आ आ......मिहीर. दुखतंय ना. सोड. " त्याने तिचे चिमटीत पकडलेले गाल सोडले आणि आपल्या ओंजळीत तिचा चेहरा पकडला. तो एकटक तिच्याकडे बघत राहिला.

" नको ना रे....बघू असा...." ती लाजली.

" का. माझी बायको आहे. मी बघणारचं..." तो हळुहळु तिच्या जवळ सरकू लागला. 

तिने त्याला बाजूला करायचा हलका प्रयन्त केला पण तिलाही तो जवळ राहावा असं वाटतं होतं. त्याने हलकेच तिचे नाजूक ओठ आपल्या ओठांनी बंद केले. थोडा वेळ असाच गेला आणि ते दोघेही बाजूला झाले. गेल्या आठ - नऊ महिन्यात खूप काही घडून गेलं होतं दोघांच्याही आयुष्यात...!!! त्यामुळे दोघांनाही आज एकमेकांजवळ शांत वाटतं होतं. सईच्या आजारपणात मिहिरने स्वतःला खूप सावरलं होतं. तिचा त्रास, तिला अशी दुबळी झालेली बघताना त्याला फार वाईट वाटायचं. रडायलाही यायचं. पण केवळ आपण रडलो तर तीही खचेल या विचाराने त्याने स्वतःवर कॅट्रोल ठेवला होता. तिच्या समोर तो छान हसत खेळत असायचा पण ती झोपल्यावर मात्र दिवसभराच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत तो पडून राहायचा. सगळ्या डॉक्टरांनी ती कधी उभी राहू शकत नाही हेच सांगितलं होतं तरीही मिहीर तिला वेड्यासारखा दरवेळी नवीन डॉक्टरांकडे न्यायचा. रात्र रात्र त्याला या सगळ्या टेन्शनमुळे झोप यायची नाही. पण तरीही त्याने सईला या गोष्टी जाणवू दिल्या नाहीत. एका चांगल्या जोडीदाराप्रमाणे तो तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता आणि त्याचंच आज फळ म्हणून सई स्वतःच्या पायावर उभी होती. पडत धडपडत का होईना पण थोडी तरी चालू लागली होती. दोघेही तसेच एकमेकांजवळ कितीतरी वेळ बसून होते. मिहिरला मात्र आता सगळ्या गोष्टी आठवून भरून आलं. त्याने तिच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं आणि तो जमिनीवर आडवा झाला. त्याच्या डोळ्यातून नकळत पाण्याचा ओघळ खाली आला आणि सईच्या ड्रेसवर पडला. 

" मिहीर.... काय झालं ? ...तू रडतोयस....??? " तिला काळजी वाटली.

" नाही गं वेडे. हे आनंदाश्रू आहेत. माझी सई आता चालायला लागलेय त्याचा आनंद आहे हा. मला अजूनही हे सगळं स्वप्नच वाटतंय...." तो डोळे पुसत म्हणाला.

" नाही मिहीर. मी खरंच आता उभी राहिलेय. मनानेही आणि शरीरानेही....!!! पण हे सगळं शक्य झालं ते फक्त तुझ्यामुळे.....नाहीतर मी अजूनही त्या व्हीलचेअर वरती.............!!! " तिला पुढे बोलवेना. 

" खरं सांगू सई...? मी तुला डॉक्टरांकडे न्यायचो ना तेव्हा मला वाटायचं आज हे डॉक्टर तरी म्हणतील की तू यातून बरी होशील आणि चालू लागशील. पण सगळ्या डॉक्टरांनीच नकारघंटा वाजवली तेव्हा मात्र मी हरलो होतो ग.. वाटलं आता संपलं सगळं...!!! पण त्यानंतर माझ्या एका मित्राने मला डॉ. जोशींचा रेफरन्स दिला आणि आज जे काही घडलंय ते त्यांच्यामुळेचं...! असं नसतं झालं ना सई तर कदाचित मी डिप्रेशन मध्ये गेलो असतो. कारण अशा अवस्थेत मला तुला आयुष्यभर बघणं शक्य नव्हतं....!! " तो बोलला तसा तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला.

" काहीतरीच काय ....मिहीर... आज मी उभी आहे ती फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास परत आला. नाहीतर अजूनही मी त्याच विचारात कुढत राहिले असते. डॉक्टरांनी उपचार केलेच पण त्याही पेक्षा तुझ्या प्रेमामुळे आणि माझ्यावरच्या विश्वासामुळे आज तुझी सई उभी राहिली आहे...." बोलता बोलता तिचेही डोळे पाणावले होते. 

" तू एकटीच कुठेतरी तंद्री लावून बसलेली असायचीस. खूप त्रास व्हायचा गं तुला असं बघून. वाटायचं या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी जर गाडी नीट चालवली असती तर आज हे घडलंच नसतं..." 

" शांत हो मिहीर. अरे आपल्या नशिबात असतं तसं होतंच. आपण ते नाही बदलू शकत. पण आलेल्या अडचणींना सामोरं जाणं तरी आपण करू शकतो ना...?? या अशाच वेळा ठरवतात आपल्या नात्याची वीण किती घट्ट आहे ती....!!!! त्यामुळे लग्नानंतर असे प्रसंग आले तरच एकमेकांवरच प्रेम , विश्वास आपल्याला दिसतो...." ती म्हणाली.

" तू तर एकदम फिलॉसॉफर सारखी बोलायला लागलेयस....बाप रे....गप्प होती तेच बरं होतं..." तो तिच्या मांडीवरून उठत म्हणाला. 

" गप रे......" डोळ्यात आलेलं पाणी पुसता पुसता तीही हसली....  " आता फिलॉसॉफर असुदे नाहीतर अजून काही.....तुझी बायको जशी आहे तशी तुला सांभाळावीच लागणारे....." ती म्हणाली.

" नको मग.....एवढं तत्वज्ञान कोण ऐकणार रोज. आधीच बॉस काय कमी पिडतो की तू आता रतीप घालणारेस....." तो तिच्या पासून लांब जात हसत म्हणाला.

" थांब तुला बघतेच......." असं म्हणून ती पटकन उठली आणि तिचा तोल गेला. 

पण यावेळी ती पडली नाही कारण तिला सांभाळायला त्याचे हात पुढे सरसावले होते. त्याने अलगद तिला आपल्या मिठीत घेतलं. मग दोन्ही हातांनी उचलून तिला बेडवर ठेवलं. 

" एए..... पण तू कधी आलास ते सांगितलंच नाहीस मला..?? " तिने विचारलं

" मगाशीच तू तेव्हा किचन मध्ये होतीस....लॉक उघडून आलो आत.. तुझं लक्ष नव्हतं..." तो म्हणाला. 

" हा. तरी मला वाटलंच कोणतरी आल्यासारखं वाटलं. मी हाक पण मारली. पण मग भास असेल सो लक्ष नाही दिलं." 

" हमम....... चला मला भूक लागलेय जेऊया का आपण ...? " तो पोटावरुन हात फिरवत म्हणाला.

" हो चल...." ती मग त्याला धरून हळूहळू चालत डायनींग टेबलजवल आली. त्याने तिला तिथेच बसवलं.

तो आत किनच मध्ये गेला आणि जेवणाची सगळी भांडी नेऊन डायनींग टेबलवर आणून ठेवली. दोघांचंही छान हसत खेळत जेवण झालं. सईने त्याच्यासाठी गुलाबजाम केले होते . ते त्याला भरवले. तो खूप खुश झाला. जेवुन झाल्यावर  मिहिरने मागचं सगळं आवरून ठेवलं आणि ते दोघेही खोलीत झोपायला गेले. सईला रूममध्ये सोडून त्याने दार खिडक्या नीट लावल्या आहेत की नाही ते चेक केले आणि तो आत आला. सई वोर्डरोबच्या इथे उभं राहुन काहीतरी करत होती. तोच त्याने मागून येऊन तिला मिठी मारली. 

" मिहीर.......काय करतोयस हे....सोड ना...." ती त्याचा हात सोडवत म्हणाली 

" अं.....हं... अजिबात नाही. आधीच तू आजारी पडल्यामुळे खूप वेळ वाया गेला आहे...." त्याने तिच्या खांद्यावर हळूच किस करत म्हटलं तशी ती शहारली. 

" इश्श........मिहीर सोड ना प्लिज....." तिला काय करावं कळेना.

त्याने मग तिला आपल्याकडे वळवलं आणि हसला. तिच्या हातावर हलकेच त्याने थोपटलं.

" रिलॅक्स डिअर..... " असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतलं. " तू आधी छान बरी हो.....मग बघ मी तुला कसा छळतो ते....." तो हसून म्हणाला. त्यावर तिने हळूच त्याच्या छातीवर चापटी मारली. 

मग त्याने तिला आणून बेडवरती बसवलं. दोघेही छान गप्पा मारत होते. मिहीर सईच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत होता. बोलता बोलता दोघेही कधी झोपी गेले त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

...............................

दुसऱ्या दिवशी सकाळी सईला जाग आली तेव्हा मिहीर तयार होत होता.. ती उठून बसली. बाजूला बघितलं तर दोन बॅग्स भरून ठेवल्या होत्या. 

" हे काय आहे......कुठे जातोयस तू..?? " तिने डोळे चोळत विचारलं.

" मी नाही.....आपण. आपण आपल्या घरी जातोय सई...." तो म्हणाला.

" घरी.......???? .....खरचं.....??? " तिला खूप आनंद झाला.

" हो. मी सकाळीच आईला फोन करून सांगितलंय आम्ही येतोय म्हणून.....चल उठ आवर आता..." तो बॅग्स चेक करत म्हणाला.

" येस......... थॅंक्यू नवरोबा...." असं म्हणून तिने त्याच्या गालावर आपले ओठ हळुच टेकवले आणि ती उठली. 

आवरून मग दोघेही घरी जायला निघाले. निघताना त्यांनी दुसऱ्या दिवशी पासून नीता मावशींना तिकडच्या घरी येण्याचं सांगितलं. त्याही आनंदाने हो म्हणाल्या. कारण आता नलिनीताईंचं देखील वय झालं होतं त्यामुळे त्यांना घरातली कामं फारशी झेपतही नव्हती. म्हणून मग मिहिरने नीता मावशींना तिकडे कामाला बोलवायचं ठरवलं. सई आणि मिहीर जवळजवळ वर्षभराने आपल्या घरी येत होते. हळूहळू त्यांचं नवीन घर मागे पडू लागलं तसं सईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. थोड्याच वेळात ते दोघेही घरी पोहचले. दारात नलिनीताई आणि मधुकरराव स्वागताला उभे होते. नलिनीताईंनी उंबरठ्यावर तांदळाने भरलेलं माप ठेवलं.

" आई.....हे कशाला......?? " सईने विचारलं.

" असंच.... आज तू माझी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून या घरात येणार आहेस...." त्या म्हणाल्या. 

तसें सईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने माप ओलांडलं आणि दोघांनीही घरात प्रवेश केला. तिने बाजूला पाहिलं तर मिहिरच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहणाऱ्या आणि आपल्याला नव्या उमेदीने जगायला शिकवणाऱ्या आपल्या जोडीदाराला सई डोळे भरून पाहत राहिली......!!!! 

लग्नानंतरचं प्रेम हे फक्त नवरा बायकोतंच असतं असं नाही तर नव्याने तयार झालेल्या बाकीच्या नात्यांकडुनही ते प्रेम मिळायला हवं. कोणाची तरी असलेली आई सासू होते , कोणाचे तरी असलेले बाबा सासरे होतात....ही नाती लग्नानंतर मिळत जातात. त्यामुळे घरातल्या माणसांचं प्रेमही घरातल्या नव्या मेम्बरला मिळालं पाहिजे तरंच संसार छान फुलतो. आलेल्या अडचणींतून मार्ग काढताना एकमेकांना दिलेली साथ , प्रेम आणि स्वतापेक्षाही समोरच्यावर असणारा विश्वासच कामी येतो. त्यामुळे लग्नानंतर बदललेल्या नात्यांमध्ये आपुलकीची ऊब आणि आपल्या जोडीदाराचं प्रेम असेल तरचं त्यातला गोडवा कायम राहतो.....!!!!

समाप्त....

' हे बंध रेशमाचे '  नंतर ' तुला पाहते रे ' या कथेलाही तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्व वाचकांचे मनापासून आभार. काहींना कथा थोडी अर्धवट वाटेल तर काहींना याचा शेवट नक्कीच आवडेल. वाचकांना मी सांगू इच्छिते की आत्ता चालू असलेल्या कथा या आम्ही सगळे लेखक ' लग्नानंतरचे प्रेम ' या विषयांतर्गत  कथालेखन स्पर्धेसाठी लिहत होतो. त्यामुळे तुम्हाला त्या कथा एकाच टाईपच्या आहेत असं वाटलं असेल. पण तरीही प्रत्येकाची विषय मांडणी आणि लेखन हे वेगळं होतं. त्यामुळे तुम्हाला इतर विषयांच्या कथा देखील नक्कीच वाचायला मिळतील. सई आणि मिहीर सगळ्यांनाच आवडले आहेत. ही कथा जरी इथे संपली असली तरी या कथेचे दुसरे पर्व तुम्हाला वाचायला आवडेल का....?  सध्या दोन्ही कथांच्या दुसऱ्या पर्वाबद्दल लिहण्याचा विचार नाही. तरीही तुमच्या येणाऱ्या प्रतिसादावरून पुढील कथेचा विषय ठरवणं सोपं जाईल.. त्यामुळे नक्की कंमेंट करा. नवीन कथेसह लवकरच भेटू...!!! धन्यवाद. 

🎭 Series Post

View all