तुला पाहते रे - भाग 2
दारावरची बेल वाजली तसं नीता मावशींनी हातातलं काम पटपट आवरलं. लादी पुसायचं फडकं आणि बादली त्यांनी आत बाथरूम मध्ये नेऊन ठेवली.सई मटार सोलत होती ते भांड उचलून आत ओट्यावर नेऊन ठेवलं.. तोपर्यंत दुसऱ्यांदा बेल वाजली. 'आले आले.....' म्हणत त्यांनी जाऊन दार उघडलं. बाहेर मिहिरचे आई बाबा उभे होते. नलिनीताई आणि मधुकरराव आत आले. नॅलिनीताईंनी आत येताच सईकडे एक कटाक्ष टाकला...ती व्हीलचेअर घेऊन त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे सरसावली. तिने वाकून त्यांना नमस्कार केला.... पण त्या फक्त ' असुदे....असुदे....' म्हणून चेहऱ्यावर काहीच न दाखवता त्या तशाच सोफ्यावर येऊन बसल्या..सईला जरा वाईट वाटलं.... मागोमाग मधुकरराव ही आले. त्यांनी व्हीलचेअर वरती बसलेल्या सईच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.
" कशी आहेस बाळा....?? " त्यांनी विचारलं
" मी छान आहे बाबा.....तुम्ही कसे आहात...?? " ती छान हसून म्हणाली. खुर्चीवरूनच वाकून तिने त्यांना नमस्कार केला.
" अग.....अग ...असुदे.. सुखी राहा. " त्यांनी म्हटलं आणि सोफ्यावर येऊन बसले.
मिहिरने घर घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते दोघे आज त्यांच्या घरी आले होते. दोघांनीही चौफेर नजर फिरवली.. मोठा प्रशस्त हॉल.... खिडक्यांना लाईट ब्ल्यू कलरचे डिझाईनचे पडदे.....एका बाजूला सोफा आणि दोन खुर्च्या , त्यासमोर छोटंसं टीपॉय...... मध्ये थोडी मोकळी जागा सोडलेली... समोरच्याच खिडकीजवळ टीव्ही...एखादं स्टडी टेबल...त्यावर पेन स्टँड , बाकी कागद व्यवस्थित ठेवलेले होते..हॉलच्या कोपऱ्यात छोटे छोटे शोपिसेस ठेवलेले दिसत होते. हॉलला लागूनच दोन मोठ्या रूम होत्या. डाव्या बाजूला समोरच दोन पायऱ्या खाली जाऊन किचन होतं.. मध्ये मोठा पडदा लावलेला होता. सोफ्याच्या मागेही दोन खिडक्या होत्या... त्यामुळे घरात छान उजेड होता..खुर्च्यांच्या मागे काचेचं गोल डायनींग टेबल होत...त्या भोवती चार खुर्च्या मांडल्या होत्या....खोल्यांच्या जवळूनच वरती जायला जिना होता... ते दोघे बघत असतानाच नीता ताई त्या दोघांसाठी पाणी घेऊन आल्या. दोघेही पाणी प्याले.
" दोघांसाठी हे घर जरा जास्तच मोठं आहे नाही...." हातातला पाण्याचा ग्लास समोरच्या टेबलवर ठेवत त्या म्हणाल्या.
" असुदे गं.... मिहिरला आवड आहे मोठ्या घराची माहितेय ना तुला...आपलं ते घरही किती मोठं आहे त्यात काय एवढं....!!! " बाबा म्हणाले
" हमम.... आज आम्ही आलोय म्हणून तरी येणारे का ग मिहीर घरी लवकर ....?? " आईंनी विचारलं.
" हो येईल थोड्या वेळाने....आज हाफ डे घेणार होता तो तुम्ही येणार म्हणून...." सई म्हणाली.
" हा तसही तुझ्या कडून काय काम व्हायचं नाही....बिचारा माझा मिहीर कसा राहत असेल काय माहीत....कधी एकदा त्याला बघेन असं झालंय..." त्या काहीशा रागाने तिच्याकडे बघत म्हणाल्या. सईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं पण तिने ते जाणवू दिलं नाही.
" नलिनी काही काय बोलतेस.....ती आता अशी अधू झालेय त्यात तिची काय चूक... या आधी ती करतच होती ना सगळं...मग ...? " मधुकर.
" हमम...." त्या जरा नाक मुरडून म्हणाल्या.
सगळी बोलत होती तोपर्यंत नीता ताईंनी टेबलवर सगळ्यांची पान मांडली. थोड्या वेळाने मिहिरही घरी आला. आल्या आल्या त्याने बसलेल्या सईला मिठी मारली आणि दोघेही एकमेकांकडे पाहून छान हसले. नलिनीताई बघतच राहिल्या. त्या काही बोलणार इतक्यात मिहीर आत निघून गेला आणि थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला. मग सगळेचजण जेवायला बसले.. वरण भात, आमटी , बटाट्याची भाजी, पोळ्या , पुरण , चटणी असा सगळा साग्रसंगीत बेत होता. सईने मुद्दाम आज सगळं नीता ताईंकडून करवून घेतलं होतं. जेवताना नलिनीईंनी कसलाच विषय काढला नाही...पण बाबांनी मात्र जेवण छान झाल्याचं आवर्जून सांगितलं. जेवताना देखील मिहीर सईबद्दलच बोलत होता. सई असं करते तसं करते....नलिनीताई मात्र आश्चर्याने आपल्या मुलात झालेला बदल निरखत होत्या.
..............................
आत्याच्या इथे बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर खरंतर तीन महिन्यातच सईच आणि मिहिरचं लग्न ठरलं. पण सई शिकत होती त्यामुळे तिची शेवटची परीक्षा झाल्यावर लग्न करायचं अस ठरवण्यात आलं. तोपर्यंत सई आणि मिहीर फोन वर जेवढ्यास तेवढं बोलायचे. सईला अजूनही वाटत होतं की ज्याला मी ओळ्खत नाही अशा मुलाशी मी का लग्न करू...पण तरीही मिहिरला नकार द्यावा असं तिला वाटलं नाही...तिची परीक्षा संपल्यानंतर दोन्ही घरच्यांच्या संमतीने लग्नाची तारीख ठरवली गेली. त्यानुसार लग्नाची सगळी खरेदी, लग्नाच्या आधीचे विधी, मेहंदी सगळे कार्यक्रम अगदी यथासांग पार पडले. पूजा तर ताईच लग्न म्हणून खूप मिरवत होती. लग्न अगदी छान पार पडलं. सुभाषराव आणि मेधाताईंनी लग्नात काहीच कमी पडू दिलं नाही. त्यांच्या घरातलं हे पहिलंच लग्न होतं. सई सासरी जायला निघाल्यावर मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.पूजाही सईच्या गळ्यात पडून खूप रडली. मिहिरने त्या सगळ्यांना सईची तो काळजी घेईल म्हणून वचन दिलं. जावई चांगला मिळाला याचं सुभाष रावांना अप्रूप वाटलं. मिहीर सईला घेऊन गाडीपर्यंत गेला. दोघेही गाडीत बसले आणि गाडी लिमयांच्या घरापर्यंत आली.. चोफेर नजर टाकत सई मिहीर सोबत दारापर्यंत आली आणि सईचा लिमयांच्या घरात गृहप्रवेश झाला.
काहीशी दबकतच ती मिहीरच्या खोलीत आली. तिच्यासाठी सगळंच नवं होतं. तिनं पाहिलं तर मिहीर आरशात बघत शीळ घालत होता आणि हातानेच केस विंचरत उभा होता.. त्याने आरशातूनच ती आलेलं पाहिलं तसा तो मागे वळला.
" या मॅडम........तुमचं स्वागत आहे आपल्या या खोलीत..." तो छान हसुन म्हणाला.
" हो ...Thank you...." तिने सभोवार नजर फिरवली.
मोठा बेड ....त्यावरती फुलांच्या माळा सोडलेल्या.. बेडवरती ही फुलांच्या पाकळ्या होत्या. समोरच दोन मोठी वोर्डरोब.... उजव्या बाजूला गॅलरीच दार होतं. त्याच्या बाजूच्या भिंतीला लागून तिच्यासाठी करुन घेतलेलं ड्रेसिंग टेबल होतं... डाव्या हाताला अटॅचं वॉशरूम....!!! तिला रूम आवडली.
" छान आहे रूम....!! " सई म्हणाली. तसं त्याला बरं वाटलं.
" चल गॅलरीत जाऊ थोडा वेळ....!! " तो असं म्हणून बाहेर जाऊन उभा राहिला. त्याच्या पाठोपाठ साडी सावरत तीही जाऊन उभी राहिली .
" सो..... फायनली आपलं लग्न झालं.... थँक्स... माझी लाईफ पार्टनर झाल्याबद्दल....!!!! " तो तिच्याकडे बघत म्हणाला.
" हो का......आणि मी नाही म्हटलं असतं लग्नाला तर....?? " तिने विचारलं.
" तर काय.... मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं असतं...." मिहीर असं म्हटल्यावर ती जरा तोंड फुगवून बसली. तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला.
" दुसऱ्या मुलीशी केलं असत लग्न ....पण ती तुझ्यासारखी छान असेलच असं नाही...." त्याने तिची हनुवटी आपल्या हातात धरली आणि हलकेच वर केली. त्यावर ती छान लाजली.
" वा हे पण येत होय तुला...." तो तिच्या लाजण्याचं कौतुक करत म्हणाला.
" गप रे....." तिने हलकेच त्याला एक चापट मारली.
" हम्ममम...... आता काय मग सई मॅडम झोपायचं ना ...?? " तो म्हणाला. त्यावर तिला धडधडू लागलं.
" मिहीर ते......म्हणजे मी........" त्याला तिचा अवघडलेपणा समजला...त्याने तिचे हात हातात घेतले.
" हे बघ सई.... आपलं लग्न झालंय म्हणून फक्त आपण एकमेकांजवळ यायला हवं असं काही नाही...तू तुझा वेळ घे....आपण ही एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेऊयात...आणि मगच पुढे जाऊयात...चालेल ना....?? " तो असं म्हणाला आणि तिने मान डोलावली. ' किती विचार करतोय हा माझा...!!!....आमच्या नात्याचा...!!!! " ती मनातच म्हणाली.
" मी सगळ्या बाबतीत कायम तुझ्या सोबत असेन....तुला मी कधीच एकटं सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत.... तू आता माझी जबाबदारी आहेस...." असं म्हणून त्याने हलकेच तिच्या हातावर थोपटलं....आणि दोघेही आत येऊन झोपी गेले...
..............................
हे सगळं आठवत सई हॉल मध्येच स्टडी टेबलवर बसली होती.. लॅम्प चालू होता. ती कसलतरी पुस्तक वाचत होती. तेव्हाच्या मिहिरमध्ये आणि आजच्या मिहिरमध्ये काहीच बदल झाला नव्हता..तो आजही तिची तशीच साथ देत होता. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि नकळत एक अश्रूचा थेंबही तिच्या गालावरून ओघळला. इतक्यात कोणीतरी मागून येऊन तिचे डोळे झाकले.
" मिहीर.....!!! " ती त्याचे हात बाजूला करत म्हणाली. मागून गळ्यात आलेल्या हातांवर तिने आपले ओठ टेकवले... तसा तो खुर्ची ओढून तिच्या समोर येऊन बसला.
" काय वाचतेस....बघु तरी...." असं म्हणून त्याने टेबलावरच्या पुस्तकाचं नाव वाचलं...'जावे त्यांच्या देशा ' पू. लं नी देशोदेशीच्या सगळ्या गोष्टींचं केलेलं अप्रतिम वर्णन आहे त्यात...!!!
" मग कुठल्या देशात जायचंय.....? " तो पुस्तकाचं नाव वाचून म्हणाला.
" कुठेच नाही....मला आता कसलाच उत्साह नाही राहिला....माझ्यामुळे तुला अजून त्रास नको..." ती दुसरीकडे बघत म्हणाली.
" ए वेडाबाई.....कोण म्हणालं तुला की मला तुझा त्रास होतोय म्हणून...." तो तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरून तिच्याशी बोलत होता.
" कोणी नाही.....पण मला कळतंय ना. मी ....मी काहीच करू शकत नाहीये....फक्त ओझं बनून राहिलेय तुमच्यावर..." तिच्या डोळ्यात आता पाणी तरळलं होतं. तिने त्याचे हात बाजूला केले.
" अग काहीतरीच काय......आणि ट्रीटमेंट चालू आहे ना.....बघ थोड्याच दिवसात पळायला लागशील तू..." तो आपला तिचा मुड छान व्हावा म्हणून प्रयन्त करत होता.
" नको मिहीर उगीच खोटी आशा लावून ठेऊ मला.....आत्तापर्यंत काय कमी डॉक्टर झाले का....सगळ्यांनीच नकारघंटा वाजवलेय... मी यापुढे कधीही उभी राहू शकत नाही हीच फॅक्ट आहे...." सई
" सई तू प्लिज शांत हो.....होईल सगळं नीट...माझा विश्वास आहे तू पुन्हा तुझ्या पायावर उभी। राहशील..आणि राहिला प्रश्न तू काही न करण्याचा तर त्याचा मला कसलाही त्रास होत नाहीये...सो तू हे डोक्यातून काढून टाक आणि छान आनंदी राहा...." तो तिला समजावत म्हणाला.
" मिहीर तरी पण........." त्याने तिला पुढे बोलू दिल नाही. तिच्या ओठांवर त्याने आपलं बोट ठेऊन तिला गप्प केलं.
" शशशश....... किती ती बडबड....जीव केवढूसा तो नि बडबड किती....." त्याच्या या वाक्यावर मात्र ती जराशी हसली.
त्याने खिशातून एक पुडी काढून तिला दिली. तिने घाईने उघडून पाहिलं..... आणि त्याबरोबर मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरला. तिने तशीच ती सारी फुलं ओंजळीतून आपल्या नाकापाशी नेली आणि एक मोठा श्वास घेतला...खूप छान वाटलं तिला....आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यालाही बरं वाटलं....!!!! तिने खुश होऊन त्याला मिठी मारली. त्यानेही हलकेच तिच्या डोक्यावर थोपटलं.... आज इतक्या दिवसांनी सई अशी का बोलते आहे ते एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं... उद्या काहीही झालं तरी आईशी बोलायचंच असं त्यानं मनाशी ठरवलं...
क्रमशः.....
पाऊस आणि लाईट प्रॉब्लेम मुळे भाग कधी कधी उशिरा पोस्ट होऊ शकतात...या नंतरचे भाग मात्र रेग्युलर पोस्ट होतील.