तुला पाहते रे - भाग 19

Love story

तुला पाहते रे - भाग 19 


सईचं बोलणं कानावर पडलं आणि मिहीरला बरं वाटलं. एवढे दिवस तो ज्या गोष्टीसाठी अट्टाहास करत होता ते साध्य झालं होतं. सईमध्ये पुन्हा पूर्वीचा आत्मविश्वास आला होता. त्याने डॉक्टरांना मेल करून सईचे रिपोर्ट्स कळवले. त्यानुसार डॉक्टरनी त्याला औषधांचा कोर्स त्याला पाठवला. आई बाबा आल्याने सई खूप खुश होती. थोड्या वेळाने पूजा सुद्धा त्यांना येऊन जॉईन झाली. छान गप्पा मारत सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. मेधाताईंनी तर सईला भरवलं. त्यामुळे तिलाही खूप बरं वाटलं. लेकीला आपल्याकडे चार दिवस न्यावं असं त्यांना खूप वाटायचं. पण पुन्हा एकदा तिला आपलं ओझं दुसऱ्यावर टाकतोय असं वाटलं असतं म्हणून मेधाताईंनी हा विषय टाळला. जेऊन झाल्यावर सगळ्यांचा पत्त्याचा डाव रंगला. वेळ कसा गेला कोणालाच कळलं नाही. संध्याकाळी मग सुभाषराव, मेधाताई आणि पूजा घरी परतले. ते गेल्यावर मात्र सईला घर सुनसुन वाटू लागलं. ती मग थोडा वेळ ऑफिसचं काम करत बसली. ती करत असलेल्या कामाचा पगार मिलिंद सर तिला वेळेत पोहचता करायचे. त्यामुळे आपण कोणावर तरी अवलंबून आहोत ही तिची भावना हळूहळू कमी होऊ लागली. मिहिरने आणून दिलेल्या पुस्तकांतून तिनं अनेकांच्या कथा वाचल्या त्यामुळे तिचाही गेलेला आत्मविश्वास तिला परत मिळाला. एकप्रकारची मानसिक ऊर्जा तिला त्या पुस्तकातून मिळू लागली. सोबतीला मिहीर आणि बाकी सगळे होतेच. म्हणूनच आता तिच्या मनात पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची जिद्द तग धरू लागली. डॉक्टरांच्या ट्रीटमेंटचा देखील तिच्यावर परिणाम होत होता. त्यामुळे मानसिक बळासोबत तिला उभं राहण्यासाठी लागणार शारीरिक बळ देखील तिला मिळायला लागलं. कसलेही आढेवेढे न घेता ती रेग्युलर औषधं घेऊ लागली. दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे ही भावना तिच्या मनात रेंगाळू लागली. मिहिरला तिच्यातला हा बदल बघून खूप बरं वाटतं होतं. त्याच्या जोडीदारासाठी त्याने केलेले कष्ट सत्यात उतरत असताना बघणं त्याच्यासाठी खूप आल्हाददायक होतं....!!!! 

...............................................


नलिनीताईंना मात्र आता इकडे घर खायला उठलं होत. सुरवातीला मिहीर आणि सई बाहेर पडून गेले तेव्हा त्या रागात होत्या त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं काहीच वाटलं नाही. सुरवातीचे एक दोन महिने असेच गेले. त्यानंतर मग त्यांनी कुंड्यांमध्ये आणि घराच्या बाजूच्या मोकळ्या पॅसेज मध्ये फुलझाडं लावली. त्यांना त्या वेळेवर माती घालायच्या , पाणी घालायच्या त्यामुळे हळूहळू रोपटी वाढू लागली. त्या त्यांना जिवापलीकडे जपायच्या. मिहीर आणि सई गेल्यापासून वाटणारा एकटेपणा त्यांनी फुलांसोबत घालवला होता. पण थोड्याचं दिवसांपूर्वी मिहिरच्या नवीन घरी जाऊन आल्यापासून त्यांचं वागणं बोलणं थोडं बदललं होतं. पण त्यांनी ते कोणालाच जाणवू दिलं नाही. घरी आल्यावरही त्या त्याच विचारात असायच्या. आपलं खरचं काही चुकलं तर नसेल असं वाटून त्या स्वतःच्याच मनाला कोचत होत्या. पण कोणाजवळी मोकळेपणे बोलायची त्यांची हिंमत होत नव्हती. पण त्यांची ही घालमेल मधुकरररावांच्या लक्षात आली. दोन दिवस त्यांनी वाट पाहिली की त्या स्वतःहून येऊन बोलतील. पण तसं काहीच घडलं नाही. शेवटी मग एकदा रात्रीचं जेवताना त्यांनी विषय काढला. 

" नलु.....तुला बरं वाटत नाहीये का...? " त्यांनी काळजीनं विचारलं.

" छे....!!! मला काय झालंय...? " त्यांनी खांदे उडवले.

" तसं नाही....मिहीरकडे जाऊन आल्यापासून थोडी डिस्टर्ब आहेस म्हणून विचारलं..." 

" नाही तसं काही. मी ठीक आहे." त्यांनी विषय टाळण्यासाठी म्हटलं. पण दुसरीकडे त्यांना बोलावसं पण वाटतं होतं. म्हणून मग त्यांनीच पुन्हा बोलायला सुरुवात केली. 

" तुम्ही म्हणताय ते खरं आहे. तिकडून आल्यापासून मी खरचं विचार करतेय मिहिरच्या बोलण्याचा. माझं चुकलंय का हो खरचं काही.....??? " अजूनही त्या द्विधा मनस्थितीत होत्या. त्यावर मधुकरराव फक्त हसले. 


" नलु.....तुला एक विचारू....?? " 

" हं......" त्या ताटातला घास फिरवत म्हणाल्या. त्यांचं जेवणाकडे लक्षच नव्हतं. 

" तू जेव्हा जिन्यातून पडली होतीस तेव्हा तुला काय वाटतं होतं....?? " त्यांनी विचारलं. त्यावर नलिनीताईंनी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. 

" काही नाही. कंटाळा यायचा मला एकटीला खोलीत. असं वाटायचं की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. माझी अडचण होतेय तुम्हाला. पण सईने मला तसं कधीच जाणवू दिलं नाही. ती माझ्यासाठी पुस्तक घेऊन यायची. जेवणाचा बेत पण काय करायचा म्हणून आवर्जून विचारायला यायची. खरतरं त्याची गरज नसायची पण माझं मन रमायला म्हणून तिचं हे सगळं चाललेलं असायचं. माझ्या मंडळातल्या मैत्रिणींना माझ्याशी गप्पा मारायला म्हणून मुद्दाम बोलवायची...." त्यांच्याही नकळत त्या आज सईबद्दल बोलत होत्या. 


" आणि त्याच मैत्रिणींनी तुझ्या डोक्यात सईबद्दल नाही नाही ते डोक्यात भरवलं. अग ज्या बाळाच्या येण्याची चाहूल सई आणि मिहिरला सुद्धा नव्हती. मग ते आपल्याला कसे सांगणार होते. डॉक्टरांनी आपल्याला जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा तू चक्कर येऊन पडलीस. म्हणून मग डॉक्टरांनी मला सांगितलं की सई फक्त दीड महिन्याची गरोदर होती. त्यामुळे तिला सुद्धा या गोष्टीचा अंदाज नसेल असं डॉक्टर म्हणाले. अगं या गोष्टी कळायला मुलींना थोडा वेळ जातो. आता हे काय मी सांगायला हवं का तुला..एक बाई असून तू हे साधं समजूनही घेतलं नाहीस याचं मला वाईट वाटलं....." ते सद्गतीत होऊन म्हणाले. नलिनीताईंचे देखील डोळे पाणावले होते. 


" खरचं हो....माझं चुकलं. मी कामांमुळे आधीच कंटाळले होते. त्यात मी सासू असून मला सूनेच करावं लागतंय हे मनाला पटत नव्हतं. माझ्या मैत्रिणींनी देखील मला उलट सुलट काय काय सांगितलं आणि मी विश्वास ठेवला त्यावर. खरतरं मीच सगळी विचारपूस करायला हवी होती. खूप त्रास झाला हो सईला माझ्यामुळे....!!! " एवढं बोलून त्या रडू लागल्या. 


" नलु....अजूनही वेळ गेलेली नाही. आपली चूक असेल तर माफी मागितल्याने कोणीही लहान मोठा होत नाही. तू उद्याचं त्यांना फोन कर आणि घरी बोलावं. " 

" हो....." डोळ्यातलं पाणी त्यांनी पदराने पुसलं. 


जेवण आटपून दोघेही मग झोपी गेले. मनावरचं दडपण कमी झाल्याने नलिनीताईंच्या जीवाची होणारी घालमेलही आता कमी झाली होती. दुसऱ्या दिवशी नलिनीताईंनी स्वतःहून मिहिरला फोन केला. 

" हॅलो मिहीर......" 

" हॅलो......हा आई बोल. कशी आहेस ? " त्याने विचारलं

" मी ठीक आहे. पण तिकडून आल्यापासून माझ्या जीवाला चैन नाहीये..." त्या म्हणाल्या.

" का ग....??? बरं वाटत नाहीये का तुला...? मी येऊ का तिकडे....?? " त्याने काळजीने विचारलं. 

" हो मिहीर मी त्यासाठीच फोन केलाय. मला माझी चूक कळली आहे. मला माफी मागायचेय सईची. " त्या म्हणाल्या.

" अगं आई..काहीतरीच काय.....तुला तुझी चूक कळली यातच सगळं आलं. "

" हो. पण तरीही मला सईची माफी मागायची आहे. मी खूप चुकीचं वागलेय रे तिच्याशी..." त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं.

" आई तू तिच्याशीच बोल...." असं म्हणून मिहिरने सईजवळ फोन दिला. 

" हॅलो....सई बाळा कुठल्या तोंडाने माफी मागू मी तुझी...खरचं चुकलं गं माझं. " नलिनीताई म्हणाल्या. 

" आई अहो...आमच्या चुका झाल्या तर तुम्ही त्या पोटात घालायच्या. मोठ्यांनी कधी लहानांची माफी मागू नये. आणि तुम्ही बोललात आम्हाला म्हणून तर आज मी सगळ्यातून बाहेर पडतेय. मी कोणावर तरी अवलंबून आहे ही माझी भावना संपली. मी पुन्हा एकदा नव्याने जगायला शिकले....त्यामुळे तुम्ही माफी नका मागू. जे होतं ते चांगल्यासाठीच असं म्हणूया आपण...." सई म्हणाली. 


" हो ग बाळा.....पण आता तुम्ही या लवकर घरी मी वाट बघतेय." त्या म्हणाल्या.

" हो आई......" एवढं बोलून सईने फोन ठेवला.

................................

सईने जिद्दीने ठरवलेल्या विचारांचा परिणाम तिच्या प्रकृतीवर होऊ लागला. असं म्हणतात की माणसाची जर आंतरिक इच्छा जबरदस्त असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मग तो अभ्यास असो किंवा मग कोणतीही गोष्ट नव्याने सुरु करणं असो. सईचं देखील असंच होतं होतं. तिने आता मनापासून आपण उभं राहायचंच ठरवलं होतं. आणि त्या दिशेने तिची वाटचालही सुरू झाली होती. डॉक्टरांच्या औषधांचा परिणामही दिसून येत होता. तिच्या पायाला आता थोड्या फार संवेदना जाणवू लागल्या होत्या.  मग ती थोडा वेळ भिंतीला किंवा टेबलाला धरून उभं राहायचा प्रयन्त करू लागली. तिचा तोल जायचा नि ती पडायची पण तिने प्रयन्त सोडले नाहीत. मिहीर आणि नीता मावशी मुद्दाम तिच्या मदतीला जायचे नाहीत. ती पडली तर स्वतःहून ती उठुदे तरंच ती पुन्हा चालू लागेल. आत्ता जर आपण तिच्या पडण्याकडे जास्त लक्ष दिलं तर आपणच तिला अधू करतोय असं होईल त्यामुळे ते फक्त तिच्यावर लांबून लक्ष ठेवायचे. असाच एक महिना गेला . आता ती हळूहळू भिंतीला धरून किंवा मग मिहिरला पकडून हळूहळू पाय टाकायचा प्रयन्त करू लागली. एक पाऊल टाकल्या नंतर दुसरं पाउल टाकायला तिला बराच वेळ जायचा कारण इतक्या महिन्यात पायाची काहीच हालचाल नव्हती. तिला तर आत्ता आत्ता कुठे थोड्या संवेदना जाणवू लागल्या होत्या. त्या दिवशी ती अशीच हळूहळू चालत त्यांच्या रूमजवळ आली. घरी कोणीच नव्हत. त्यामुळे ती स्वतःहूनच उठली होती. पडत धडपडत ती खोलीपर्यंत आली. तिने रूमच दार उघडलं आणि तिच्या  अंगावर अचानक फुलं बरसू लागली....!!!


क्रमशः.....

पुढील भाग परवा रात्री  6-08-2020

🎭 Series Post

View all