Feb 24, 2024
स्पर्धा

तुला पाहते रे - भाग 18

Read Later
तुला पाहते रे - भाग 18

तुला पाहते रे - भाग 18


" मिहीर ......मिहीर....प्लिज ऐक माझं...." असं म्हणत सई व्हीलचेअर वरून उठायचा प्रयन्त करते तोच तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. रागाने बाहेर गेलेल्या मिहिरला काहीतरी पडल्याचा आवाज येतो म्हणून तो पुन्हा मागे येतो. बघतो तर सई खाली पडली होती. 

 


" सई......सई.... काय झालं...?? अशी कशी पडलीस तू...?? " त्याने तिला आधी नीट बसवलं. तिला पाणी दिलं. आणि मग तिला उचलून त्याने अलगद तिला आणून बेडवर ठेवलं. 

 


" सॉरी सई.......मी चुकीचं वागलो.. पण.......पण आता तुला काही झालेलं मी नाही बघू शकत गं....!!! " असं म्हणून त्याने तिला मिठी मारली आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सईला जाणवलं की सरप्राईजच्या नादात आपण मिहिरला चुकून का होईना पण दुखवलंय..

 


" मिहीर....शांत हो. काही होणार नाही मला...तू असताना कसं काय होईल मला...." ती त्याच्या पाठीवर थोपटत होती. 

 

" तेव्हाही मी सोबत होतोच की.....तरीही हे सगळं झालंच ना.....!! " तो अजूनही रडत होता. 

 


" असुदे.....माझ्या नशिबात होतं तस घडायचं असं म्हणायचं...त्यामुळेच तर आता माझ्या नवऱ्याचं प्रेम अनुभवायला मिळतंय मला....." ती त्याला शांत करत म्हणाली.

 

" प्रेम काय मी कायमचं करतो तुझ्यावर....." तो थोडा नॉर्मल होत म्हणाला. 

 

त्याने तिला दूर केलं. तसं तिनं त्याच्या गालावर ओघळलेलं पाणी आपल्या हाताने हलकेच पुसलं. तो जरासं हसला. थोडा वेळ शांततेत गेला. दोघंही काही न बोलता एकमेकांसमोर नुसती बसुन होती. जरा शांत झाल्यावर मिहिरने आजूबाजूला पाहिलं तर त्याच्या बेडवर, बाजूच्या भिंतीवर बलुन्स लावले होते. बेडवर देखील फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या.....सुगंधीत कँडल्समुळे वातावरणही छान झालं होतं. ते सगळं बघून त्याचे ओठ आपसूकच रुंदावले. सगळीकडे बघत त्याची नजर समोर बसलेल्या सईवर येऊन स्थिर झाली. एवढ्या वेळात त्याने पहिल्यांदाच तिला नीट पाहिलं तर ती छान मरून कलरची सिल्कची साडी नेसून...त्यावर निळ्या कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज...त्यावर सिल्वर एअररिग्स.... कपाळावर छोटी चंद्रकोर.... गळ्यात डायमंडचं छोटं मंगळसुत्र... हातात हिरव्या बांगड्या घालून तयार झाली होती. तो तिच्याकडे दोन क्षण पाहतच राहिला कारण इतक्या दिवसात नटणं वगरे काही राहीलच नव्हतं. चालू शकत नसल्याने बाहेर जायची वेळच येत नव्हती. फक्त मिहिरला डॉक्टरांकडे न्यायचा तेव्हा ती नलिनीताई आणि आता नीता मावशींच्या मदतीने लेगिन्स टॉप घालायची. पण ती आज कितीतरी दिवसांनी साडी नेसली होती. 

 

" You are looking so beautiful.!!!..." असं म्हणून त्याने पुढे होऊन तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. त्यावर ती गोड लाजली. 

 


" खरचं का.....की उगीच आपलं म्हणायला..." ती जरा नखरे करत म्हणाली.

 

" अगं नाही... खरंच छान दिसतेयस. पण आज साडी कशी नेसलीस.....??? " त्याने उत्सुकतेने विचारलं. 

 

" तुला आवडते ना मी साडी नेसलेली म्हणून.....नीता मावशींनी नेसवली साडी...." सई म्हणाली

 

" मस्तचं...." तो तिच्याकडेच बघत होता. अचानक त्याच्या लक्षात आलं की नीता मावशींनी तर त्याला फोन केला होता मग त्या कुठे गेल्या.

 

" नीता मावशी कुठायत....?? " त्याने न राहवून विचारलं.

 

" आम्ही ही सगळी तयारी केली. रूम सजवली. मग त्या तुला फोन करून घरी गेल्या...." ती हसत म्हणाली. 

 

" हो का.... मी त्यांना सांगितलं होतं. मी आल्याशिवाय जाऊ नका...थांब आता उद्या बघतोच त्यांना आल्यावर..." तो मस्करीत म्हणाला. 

 

" ए नाही हा....तू काही बोलणार नाहीयेस त्यांना. मी सांगितलं होतं त्यांना जायला." सई.

 

" हम्म. Ok... मग याची शिक्षा तुलाच मिळणार..." तो हळूहळू तिच्या जवळ सरकत होता. 

 

" हट..... का म्हणून. मी माझ्या नवऱ्यासाठी केलं हे सगळं नि वरती मलाच शिक्षा...." तिने गाल फुगवले.

 

" हो मग...." त्याने पटकन तिला गालावर किस केलं. तशी ती शहारली आणि त्याच्या मिठीत शिरली. आज खूप दिवसांनी त्यांच्या प्रेमाचा पारिजात नव्याने बहरला होता...!!!! मिहिर आपल्या प्रेमाच्या फुलांची उधळण सईवर करत होता आणि तीही त्यात न्हाऊन निघाली होती. 

 

..............................

 

दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही डायनींग टेबलजवळ बसून चहा पियत होते. आज मिहीर घरी होता त्यामुळे मग त्याने आज नीता मावशींना सुट्टी दिली होती. चहाचे घोट घेता घेता मिहिरचं पेपर वाचन चालू होतं. इतक्यात त्याला काहीतरी क्लीक झालं. त्याने पेपर बाजूला ठेवला आणि तो सईकडे बघू लागला.

 

" सई.... मला सांग काल तू व्हीलचेअर वरून पडलीस कशी...? " कालच्या सगळ्या प्रकारात हे विचारायचं त्याच्या लक्षातच नव्हतं. 

 


" तू गेलास काल रागारागात बाहेर.....मग काय करू मी... मला भीती वाटली. मी पण पटकन तुझ्या मागे यायला म्हणून उठले आणि पडले धाडकन...." असं म्हणून ती पुन्हा चहा पिऊ लागली.

 

" सई तुला लक्षात येतंय का....काल मी रागात निघून गेलो म्हणून तू मला समजवण्यासाठी माझ्या मागे यायचा प्रयन्त केलास आणि तुझा तोल गेला...." त्याच्या बोलण्यात कमालीचा उत्साह दिसत होता.

 

" हम्म....." ती फक्त चहा पियत बाहेर बघत होती. त्याला काय म्हणायचं आहे याकडे अजूनही तिचं लक्ष नव्हतं.

 

" सई......सई..... अगं काल तू मला समजवण्याच्या नादात का होईना स्वतःहून उठायचा प्रयन्त केलास हे कळलं का तुला.....??? " तो खूप खुश होता.

 


 त्याच्या बोलण्यावर तिने चमकून पाहिलं. काल तिने पहिल्यांदा स्वतः व्हीलचेअर वरून उठायचा प्रयन्त केला होता ही गोष्ट तिच्या लक्षात आली. पायात काहीच संवेदना नसल्याने तिचा तोल गेला. पण निदान अनाहूनपणे का होईना तिने स्वतःच्या सुधारणेसाठी एक पाऊल पुढे टाकलं होतं. तिलाही मग त्यातील वेगळेपणा लक्षात आला आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. 

 

" सई..... सई.... अग मी याच साठी प्रयन्त करत होतो की तू स्वतःहून जिद्दीने उभं राहण्यासाठी प्रयत्न करावेत. पण काल हे सगळं अचानक घडून आलं. Wow....Am so happy sai.....!!!! " त्याच्या चेहऱ्यावर झालेला आनंद स्पष्ट दिसत होता. 

 


" सई तू एकदा बघतेस का पुन्हा उभं राहून....मला धरून उभी राहा.... मी पाडणार नाही तुला..." त्याने तिच्याकडे बघून एक डोळा मारला आणि हात पुढे करून तो उभा राहिला.

 

 

तिनेही त्याच्या हातात हात दिला तसं त्याने तिला कमरेला धरून थोडं वरती उचललं. त्याच्या दोन्ही हातांना घट्ट पकडून तिने उभं राहायचा प्रयन्त केला. तिचा तोल जात होता पण त्याने तिला सावरलं. दोन क्षण शांततेत गेले. ती आज जरा तरी उभी राहिली होती. तेवढ्यात सईचे आई बाबा तिला भेटायला आले. त्यांना असं जवळ उभं राहिलेलं पाहून सुभाषराव जरासं खाकरले तसे सईने दचकून एकदम मिहिरचे हात सोडले. तीचा तोल जात असतानाच मिहिरने तिला पकडलं आणि व्हीलचेअर वरती तिला नीट बसवलं. सुभाषराव आणि मेधाताई हसत आत आले. 

 

" आई , बाबा...... या ना...बसा...." पुढे होऊन मिहिरने त्या दोघांनाही नमस्कार केला. दोघेही मग सोफ्यावर येऊन बसले. सई आपली व्हीलचेअर घेऊन सोफ्याच्या बाजूला येऊन थांबली. लेकीला बघितल्यावर मेधाताईंनी सईला जवळ घेतलं. मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 

 

" कशी आहेस बाळा....?? " मेधाताईंनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विचारलं.

 

" मी बरी आहे आई....तुम्ही दोघ कसे आहात...?? आणि पुजू..... तिला का नाही आणलं सोबत....?? " सईने भरभर विचारलं.

 

" आम्ही छान आहोत. पुजा क्लासला गेलेय. येताना येईलच ती इकडून...." मेधाताई म्हणाल्या. 

 


" Ok......पण मग आज जायची घाई करू नका...." सई म्हणाली. 

 


" नाही गं बाई....थांबू आम्ही. मग जाऊ दुपारनंतर." सुभाषराव म्हणाले. 

 


मग सई , तिचे आई, बाबा आणि मिहिरमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. मग थोड्या वेळाने मेधाताई किचनकडे वळल्या. कारण आज नीता मावशींना सुट्टी दिल्याचं बोलता बोलता मिहिरने त्यांना सांगितलं. तशा त्या उठल्या. त्यांच्या मागोमाग मिहिरही किचन मध्ये आला. 

 

" आई....तुम्ही कशाला करताय जेवणाचं..? आपण आज बाहेरून मागवूया ना...." तो म्हणाला.

 

" अहो कशाला.....मी आहे की करायला. आणि तसंही इतक्या दिवसांनी लेक भेटलेय तर तिला जरा काहीतरी करून घालते चांगलंचुंगलं....तुम्ही फक्त मला सांगा कशात काय आहे ते...." त्या म्हणाल्या.

 


" थांबा....तुम्ही सईलाच विचारा... मला कुठे काय माहितेय. ती आणि नीता मावशी ठरवूनच करतात काय ते...." तो पुन्हा हॉल कडे जात म्हणाला. तिकडे सईच्या आणि सुभाषरावांच्या गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या. हॉलकडे जाणारा मिहीर पुन्हा एकदा मागे वळून मेधाताईंजवळ आला.

 

 

" आई  thank you ....तुम्ही आलात खुप बरं वाटलं...." तो हसून म्हणाला. 

 


" अहो, आभार कसले मानताय.. उलट आम्ही कधीपासून इकडे यायचं ठरवत होतो. पण जमलंच नाही. पण तुम्ही बोलवलत आणि वाटलं आता जायला हवं...." त्या म्हणाल्या. 

 

मग मिहिरने सईला हाक मारून किचन जवळ यायला सांगितलं. मेधाताईंना काय हवं नको ते सईने दारातूनच सांगितलं. सगळ्या डब्यांवर तशी लेबल्स लावलेली आहेत त्यामुळे त्यांना तसं सोपं जाणार होत. पण कुठे काय आहे ते सईने न चुकता त्यांना सांगितलं आणि ती पुन्हा बाबांशी गप्पा मारायला सोफ्याजवल आली. मिहीर थोडा वेळ ऑफिसचं काम करत तिथेच डायनींग टेबलजवल बसला होता. खरतरं मिहिरने काल रात्रीच सईच्या नकळत तिच्या आईबाबांना फोन केला होता. कितीतरी दिवसांनी ते सईला भेटायला आले. घरी असताना नलिनीताईंचं चालू असलेलं वागणं बोलणं त्यांच्या कानावर गेलं होतं. पण लेकीच्या संसारात न पडलेलं बरं असं वाटून त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. पण त्यांनी मिहिरला पुन्हा एकदा सईला नेण्याबद्दल सांगितलं होतं. पण तेव्हादेखील मिहिरने त्या गोष्टीला ठाम नकार दिला. अगदीच परिस्थिती हाताबाहेर जात आहे असं वाटून मिहीर सईला घेऊन या नवीन घरात राहायला आला होता. त्यालाही आता चार महिने होत आले. पण नवीन घरात मेधाताई आणि सुभाषरावांचं येणच झालं नव्हतं. त्यामुळे सई आता हळूहळू नॉर्मलला आल्यावर त्याने त्यांना मुद्दाम फोन करून बोलावून घेतलं. आई बाबा आल्यामुळे सई खूप खुश होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मिहीर आपल्या मनात साठवून घेत होता. मेंढताई लेकीसाठी जेवणाचा छान बेत करत होत्या. तिच्या आणि बाबांच्या गप्पा चालू असतानाच तिने काल घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. बाबांना तिची काळजी वाटली. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तोच हात हातात घेऊन सई त्यांच्याशी बोलत होती. 

 

" काहीही झालं तरी आता मी स्वतःच्या पायावर उभी राहाणारचं.....!!!!! "

 

सईचं हे वाक्य खोलीत जाणाऱ्या मिहिरच्या कानावर पडलं आणि  त्याला बरं वाटलं. त्याच आनंदांत तो डॉक्टरांना मेल करायला आत गेला.

 

क्रमशः....

 

भाग पोस्ट करायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.. पुढील भाग उद्या रात्री पोस्ट होईल. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//