तुला पाहते रे - भाग 17

Love story

तुला पाहते रे - भाग 17 

त्या दिवशी डॉ जोशींना भेटून बाहेर पडल्यावर मिहिरने सईच्या सरांना फोन केला आणि त्यांना भेटायला गेला. त्याने सगळी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. त्यामुळे तेही त्याच्या मदतीसाठी तयार झाले. चार दिवसांनी त्यांनी त्यासाठीच सईला फोन केला होता आणि तिला घरून काम करून द्यायला सांगितलं.सरांचा फोन आल्यापासून सईला काही सुचत नव्हतं. कारण इतक्या दिवसात तिने कोणतंच काम केलं नव्हतं. त्यामुळे तिला थोडीशी धाकधूक होतीच. पण मिहिरने तिच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे तिला जरा हायसं वाटलं. मग तिचं काम सुरू होण्याआधी मिहिरने तिच्यासाठी एक टेबल आणलं. हॉल मध्येच एका खिडकीजवळ त्याने ते टेबल ठेऊन तिला थोडासा ऑफिस सारखा सेटअप करून दिला. तिला अगदीच कंटाळा आला तर खिडकी उघडून ती जरा बाहेरचं जग बघत राहील असं त्याला वाटलं. त्याने त्यावर पेन स्टँड , डॉक्युमेंट ठेवायला फोल्डर, पेपरवेट, प्रिंटर, लॅपटॉपच्या कनेक्शनसाठी जवळच प्लग बसवुन घेतला. तो तिच्यासाठी हे सगळं उत्साहाने करत होता. पण ती मात्र अजूनही थोडी अस्वस्थ होती. 

" मिहीर मला जमेल ना रे...इतक्या दिवसात मी काहीच केलं नाहीये..." ती म्हणाली

" त्यात काय सई. तू आधीही हे काम करत होतीसच की. जमेल बघ तुला नक्की." तो छान हसून म्हणाला. 

" मी हे काम पूर्ण झालं की जॉब सोडेन. " सई

" का....??? " त्याला आश्चर्य वाटलं. कारण ती असं काही म्हणेल असं त्याला वाटलं नव्हतं.

" उद्या त्यांनी सगळं ऑफिसला येऊन सबमिट करायला सांगितलं तर मला जमणारे का..? त्यापेक्षा माझं पेंडिंग वर्क पूर्ण झालं की मी जॉब सोडेन.." ती म्हणाली.

" ok ....As you wish ....मी तुला फोर्स करणार नाही कोणत्याच बाबतीत..." असं म्हणून मिहीर बाहेर गेला.

मिहिरला माहीत होतं सई कितीही नाही म्हणाली तरी तिला ते काम आवडायचं. सुरवातीला तिला थोडं कठीण जाईल पण एकदा ती त्यात रमली की जॉब सोडायचा विचार तिच्या डोक्यातुन आपोआपच निघून जाईल आणि तसंच झालं देखील...!!!! दुसऱ्या दिवशी कंपनीचा माणूस येऊन तिला सगळं सेटअप करून देऊन गेला. ती काम करायला बसली. मिहिरने मग तिच्याजवळ एक छोटीशी बाप्पाची मूर्ती आणून टेबलवर ठेवली. मुर्ती फार सुरेख होती. बाप्पाकडे बघून तिला बरं वाटलं . तिने हात जोडून त्याला नमस्कार केला आणि ती कामाला लागली. थोड्याच दिवसात ती ऑफिसच्या कामांमध्ये रुळली. अगदीच कंटाळा आला की ती तिथून नीता मावशींसोबत गप्पा मारायला यायची. त्याही तिला आपल्या कामात सामावून घ्यायच्या. कधी भाजी निवडुन द्या , नाहीतर एखादा नवीन पदार्थ सांगा असं करून तिचं मन रमवायच्या. त्यामुळे हळूहळू का होईना तिच्या मनातुन दुबळेपणाची असलेली भावना कमी होऊ लागली. तिच्या वागण्या बोलण्यातून ते जाणवू लागलं होतं.

................................

बघता बघता दोन महिने सरत आले. सई मध्ये बऱ्याच प्रमाणात बदल घडून येत होता. म्हणजे आधी जशी ती एकटक कुठेतरी तंद्री लावून बसलेली असायची किंवा कोणाशी फार बोलणंही नसायचं या दोन्ही गोष्टी आता बदलल्या होत्या. मिहिरलाही ती बोलतेय म्हटल्यावर हायसं वाटायचं. तो डॉक्टरांना रेग्युलर आठ एक दिवसांनी तिचा सगळा रिपोर्ट कळवत होता. त्याने तिच्यासाठी बरीच पुस्तकं वाचायला आणली होती. जेणेकरून तिच्या मनाला एक प्रकारची उभारी मिळेल. आयुष्याकडे नव्याने पाहायला शिकवणारी अरुणिमा सिन्हाची गोष्ट त्याने आवर्जुन तिला वाचायला लावली. एका रात्रीत पन्नास पेक्षा जास्त ट्रेन तिच्या पायावरून गेल्या होत्या. तिचा एक पाय मांडीपासून काढण्यात आला होता तर दुसरा पाय पूर्णतः निकामी झाला होता. तिला कृत्रिम पाय बसवण्यात आले. जखम भरलेली नसतानाच तिने माउंट एव्हरेस्ट सर केलं. सईला ती गोष्ट वाचताना अंगावर काटा आला होता. पण त्या परिस्थितीत तिने दाखवलेली जिद्द वाखाणण्या सारखी होती. सईने देखील त्याचप्रमाणे स्वतःसाठी पेटून उठावं असं मिहिरला वाटतं होतं. पण प्रत्येक डॉक्टरांकडून येणारी नकारघंटा ऐकून तिला आता कंटाळा आला होता. त्यामुळे डॉक्टरांच्या कोणत्याही ट्रीटमेंटसाठी ती तयार नव्हती. तरीदेखील मिहिरच्या डॉक्टर जोशींकडे होत असलेल्या फेऱ्या तिला माहित होत्या. काही रिपोर्ट्स नंतर डॉक्टरनी तिच्यासाठी औषध गोळ्या लिहून दिल्या. स्वतःसाठी नाही पण निदान मिहिरसाठी म्हणून तरी तिनं औषध घ्यायला सुरुवात केली. सगळं छान चालू असतानाच मधुकररावांचा मिहिरला फोन आला. मधुकरराव आणि नलिनीताई दोन दिवस राहायला येणार होते. ते घरी आल्यानंतरही नलिनीताई सईला बोलायची संधी सोडत नव्हत्या. त्यामुळे तिला पुन्हा एकदा  कमजोर आणि आपण अजूनही कोणावर तरी ओझं बनून आहोत असं वाटू लागलं. आई बाबा आल्यानंतरच्या रात्री मिहिरने तिला पुन्हा एकदा समजावलं. तेव्हा कुठे ती शांत झाली. दुसऱ्या दिवशी त्याने नलिनीताईंना सईच्या जॉबबदल सांगितलं.  त्यामुळे ती काहीच कमवत नाही असं म्हणणाऱ्या नलिनीताईंची बोलती बंद झाली होती. दोन दिवस राहून ते दोघेही घरी परतले. 

.............................

आई बाबा येण्याआधी सईने घराचं इंटिरिअरही जरा बदललं होतं. त्यामुळे ती आपल्याच कामावर खुश होती. वर्कर्स कडून तिनं तिला हवं तसं सगळं करून घेतलं. मिहिरलाही काहीतरी सरप्राईज द्यावं असं तिला वाटलं. एवढ्या दिवसात आपण त्याच्याशी धड बोलतही नव्हतो. आपण आपल्याच कोशात स्वतःला बंद करून घेतलं होतं. पण त्याने कायमच आपली साथ निभावली. एक नवरा म्हणून ....एक जोडीदार म्हणून....आणि एक मित्र म्हणून....!!! मग त्याला सरप्राईज देखील तितकंच छान द्यायला हवं असं तिला वाटलं. तिच्या मनात साठलेलं मळभ केवळ मिहिरमुळे दूर होत होतं. एकदा संध्याकाळी मिहीरचा फोन वाजला. 

" हॅलो....हॅलो.....मिहीर दादा मी नीता मावशी बोलतेय.....त्या सई ताई....सई ताई...." पलीकडून नीता मावशी बोलत होत्या.

" सईच काय.....?? नीता मावशी बोला लवकर...." मिहीर आता पॅनिक झाला होता. 

" त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय त्या कोणाचंच ऐकत नाहीयेत...तुम्ही...तुम्ही येता का जरा..." त्या घाबरतच म्हणाल्या. 

" हो.....मी आलोच. तुम्ही थांबा मी आल्याशिवाय जाऊ नका प्लिज...मी येतोय.." असं म्हणून जवळजवळ त्याने फोन आपटला आणि सरांना सांगून तो घरी आला. 

घरी येईपर्यंत वाटेत त्याच्या मनात कितीतरी वाईट विचार येऊन गेले. सईने स्वतःच काही बरं वाईट तर केलं नसेल असाही विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. तो धावतच आत आला. त्याने पाहिलं तर घरात सगळीकडे काळोख होता.

" सई...... सई कुठायस तू....?? " तो भांबावल्या सारखा तिला हाका मारत होता. तसाच तो चाचपडत त्याच्या रूम मध्ये गेला. त्याने तिथंही जाऊन सईला हाका मारल्या. पण त्याला काहीच उत्तर मिळालं नाही. त्याच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकायला लागली. खरचं सईला काही झालं तर......??? नुसत्या विचारानेच त्याच्या अंगावर काटा आला....!!! क्षणभर त्याला त्याच्याच विचारांची भीती वाटली. तो बाहेर जायला वळणार इतक्यात रुम्सचे लाईट लागले आणि रूम उजळली. त्याने पाहिलं तर सगळीकडे बलुन्स लावले होते. कागदी फुलं , माळा यांनी रूम सजवली होती. ठिकठिकाणी कँडल ठेवल्या होत्या. 

" आहेस ना...??? तुला काही झालं नाही ना....." असं म्हणून त्याने मागे वळून तिला आपल्या जवळ ओढली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

" मिहीर मी ठीक आहे......" ती त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाली.

" मग नीता मावशींनी फोन केला तो. तू स्वतःला खोलीत बंद करून घेतलंयस म्हणून....." तो तिची मिठी सोडवत म्हणाला. 

" मीच सांगितलं होतं त्यांना.....तुला फोन करायला...बघ कसा आलास धावत...." ती त्याला चिडवत म्हणाली. पण इतका वेळ शांत असलेला मिहीर मात्र दुखावला होता.

" Are you out of mind sai.....???  मी किती धावतपळत आलो तुला माहितेय का....येईपर्यंत माझा जीव थाऱ्यावर नव्हता. कधी एकदा तुला बघेन असं झालं होतं. नको नको ते विचार येऊन गेले डोक्यात. तुला कल्पना तरी आहे का....." मिहीर आज तिच्यावर चांगलाच चिडला होता. 

" मिहीर शांत हो......मी.....मी तुला सरप्राईज द्यायचं म्हणून हे केलं..मला नव्हत माहीत तू एवढा रागावशील ......" तिन खाली मान घातली.

" तुला काय गं..... तू आहेस आपली आरामात घरी. मला घर आणि ऑफिस दोन्ही बघावं लागतंय..ऑफिसला गेलो तरी तुझाच विचार चालु असतो डोक्यात. काय करत असशील काय नाही...डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेतेयस की नाही.. तू स्वतःच्या पायावर उभं राहावंसं म्हणून मी प्रयन्त करतोय... तुला काही आहे का त्याचं...तू स्वतःहून काही प्रयन्त करतेयस का...नाही..फक्त तुला स्वतःच दुःख कवटाळून बसायचंय..." आज कितीतरी दिवसांनी तो असा भडाभडा बोलत होता. सई फक्त सुन्न होऊन ऐकत होती.

" असं काही नाहीये मिहीर.....मी....मी पण प्रयन्त करतेच आहे ........" तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.

" काय प्रयन्त करतेस.....एकही ट्रीटमेंटला तू रिस्पॉन्स देत नाहीयेस....मीच मूर्ख आहे....जाऊदे मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी काही.....!!! " एवढं बोलून मिहीर रागाने निघुन गेला. 

तो बाहेर गेला तसं सईला काय करावं सुचेना. 

" मिहीर ......मिहीर माझं ऐक प्लिज....." असं म्हणून तिने व्हीलचेअर वरून उठायचा प्रयन्त केला....पण ती तोल जाऊन खाली पडली....

क्रमशः.............

🎭 Series Post

View all