तुला पाहते रे - भाग 15

Love story

तुला पाहते रे - भाग 15

नलिनीताई तावातावाने बडबडत असतानाच मिहीर आत आला. त्याला समोर बघताच त्या भांबावल्या. काय बोलावं त्यांना सुचेना. मिहिरने फक्त त्यांच्याकडे पाहिलं आणि तो खोलीत निघून गेला. मिहिरचं न बोलता जाणं नलिनीताईंच्या लक्षात आलं. ' आपलं बोलणं याने ऐकलं तर नसेल ना ' हा विचार त्यांचं डोकं पोखरत होता. खोलीच्या दाराआड सई नलिनीताईंचं बोलणं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मिहीर आत आला. त्याने पाहिलं तर सई जमिनीकडे नजर लावून बसली होती. डोळे पाण्याने भरलेले....!!! तो गुढघे टेकवून तिच्या समोर बसला. त्याने तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. समोर मिहिरला पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटला. ती त्याला मिठी मारून रडू लागली.

" मिहीर.....मिहीर काय झालं रे हे......एवढं छान चालू होतं सगळं..." ती रडत रडत बोलत होती. मिहिरने तिच्या पाठीवर हात फिरवला.

" सई शांत हो.....सगळं नीट होईल...." तो तिला समजवत म्हणाला.

" कशी शांत होऊ मिहीर....?? माझ्यामुळे किती त्रास होतोय तुम्हाला सगळ्यांना.. माझा काहीच उपयोग नाहीये तुम्हाला. आईंना सगळं करावं लागतंय...." ती अजूनही रडत होती.

" अग काहितरीच काय..... त्रास कसला. आणि आईचं म्हणशील तर मी बोलतो तिच्याशी. तू नको काळजी करू." तो म्हणाला.

थोड्या वेळाने आवरून तो पुन्हा बाहेर गेला. तो घरी आला तेव्हा रात्रीचे आठ वाजत आले होते. तो कोणाशीच काही बोलला नाही. जेवतानाही सगळे गप्पचं होते. जेऊन झाल्यावर मिहीर आणि सई आपल्या खोलीत निघून गेले. नलिनीताईंना राहून राहून काहीतरी चुकतंय याची जाणीव होत होती पण त्या काहीच बोलल्या नाहीत.

..............................

दुसऱ्या दिवशीची सकाळ काही वेगळीच होती. नलिनीताईंनी चहा केला. मिहीर आणि सईला चहा द्यायला त्या त्यांच्या खोलीत आल्या. तर मिहीर केव्हाचाच उठुन तयार झाला होता. त्यांना आश्चर्य वाटलं.

" आज लवकर निघालास का ऑफिसला....? " त्यांनी त्याच्या हातात चहाचा कप देत म्हटलं.

त्यावर तो काहीच बोलला नाही. शांतपणे चहाचे घुटके घेऊन त्याने कप रिकामा केला आणि आईकडे दिला. तशा त्या बाहेर जाऊ लागल्या . एकवार त्यांनी सईकडे कटाक्ष टाकला पण ती अजूनही झोपली होती. त्या तिथून निघून किचन मध्ये आल्या. त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. मिहीरचं वागणं बोलणं बदललं होतं. नक्कीच याने आपलं बोलणं ऐकलं असावं असं त्यांना वाटलं. त्यांना काय करावं सुचेना. मधुकरराव नुकतेच उठून चहासाठी डायनींग टेबलजवळ आले. टेबल खालची खुर्ची ओढून ते पेपर वाचत बसले. त्यांना बघून नलिनीताई पटकन चहा घेऊन आल्या. त्यांना त्यांच्याशी बोलायचं होत त्यामुळे त्या तिथेच गुटमळत होत्या. मधुकररावांच्या ते लक्षात आलं त्यांनी पेपर बाजूला ठेवला.

" नलु तुला काही बोलायचंय का....?? " त्यांनी विचारलं

" हो.........म्हणजे ते मिहीर.......मिहीर काहीच बोलत नाहीये माझ्याशी. " त्यांना काय बोलावं तेच सुचत नव्हतं

" अगं तुला वाटलं असेल तसं. कामाचं टेन्शन असेल त्याला. नसेल बोलला. बोलेल मग थोड्या वेळाने.." ते म्हणाले.

" नाही.. मला वाटतंय त्याने काल माझं बोलणं ऐकलं असावं कदाचित......" त्या असं म्हणेपर्यंत मिहीर सईला व्हीलचेअर वरून घेऊन बाहेर आला.

तिला हॉल मध्येच सोडून तो पुन्हा आतल्या खोलीत गेला आणि मोठ्या व्हील्सवाल्या बॅग्स घेऊन बाहेर आला. नलिनीताई आणि मधुकरराव अवाक होऊन पाहतच राहिले.

" मिहीर अरे हे काय चाललंय.....?? " बाबांनी न कळून विचारलं.

" बाबा मी आणि सई दुसरीकडे राहायला जातोय..." तो शांतपणे म्हणाला.

" दुसरीकडे कुठे....??? ...आणि हे काय खूळ काढलंयस...?? " नलिनीताई म्हणाल्या.

" खूळ नाही.. गेल्या चार पाच महिन्यात सईने स्वतःला एका वेगळ्याच कोशात अडकवून घेतलंय. त्यात बाळ गेल्याच्या दुःखातून ती अजूनही सावरली नाहीये. मला तिला स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघायचंय..आणि इथे राहून ते शक्य होईल असं मला वाटत नाही...." नलिनीताईंकडे बघत मिहीर म्हणाला. त्यावर त्या भांबावल्या.

" मिहीर पण............इथे राहूनही तिला बरं वाटू शकतं..." त्या अडखळत म्हणाल्या.

" खरचं आई.....??? अगं एवढ्या दिवसात तिच्या चेहऱ्यावर एकदाही हसू दिसलं नाहीये ग मला. आणि इथे राहून काय... ती तिला कसं काहीच करवत नाही...तिचा उपयोगच नाही हेच ऐकायचं का आम्ही....." त्याच्या चेहऱ्यावर आता राग पसरू लागला होता.

" मिहीर पण....दुसरीकडे जायची काय गरज आहे..?? तुम्ही इथेच राहा...काही लागलं तर आम्ही आहोत..." मधुकरराव म्हणाले.

" नको बाबा.. आता इथे राहणं शक्य आहे असं मला वाटतं नाही. माझी बायको कोणावरही ओझं बनुन राहिलेली नाही हे मला सगळ्यांना दाखवून द्यायचंय. उदया समजा तिच्या जागी मला काय झालं असतं तर तुम्ही मला असंच सोडून देणार होतात का...??..नाही ना. मग आता जोपर्यंत सईला मी स्वतःच्या पायावर उभं करत नाही तोपर्यंत मी या घरात पाऊल टाकणार नाही..." तो म्हणाला. त्याने खिशातून एक कार्ड काढून बाबांकडे दिलं.

" यावर आमच्या नवीन घराचा पत्ता आहे..तुम्हाला कधी वाटलं तर या तिकडे. पण याल तेव्हा तरी कृपा करून सईच्या जखमांवर मीठ चोळू नका. आधीच तिने खूप सोसलंय. आता आणखी नको...." नलिनीताईंकडे एक रागीट कटाक्ष टाकत तो सईला घेऊन घराच्या बाहेर पडला. नलिनीताई आणि मधुकरराव अगतिक होऊन फक्त पाहात राहिले....!!! 

.............................

मिहिरने जेव्हा काल आईचं बोलणं ऐकलं तेव्हाच त्याने सईला घेऊन इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला.कारण सईला अमेरिकेच्या डॉक्टरांच्या ट्रिटमेंटसाठी तयार करायचा होतं आणि या अशा वातावरणात ती अजूनच खचत चालली होती. पूर्वीचा तिचा आत्मविश्वास गळून पडला होता आणि तेच मिहिरला नको होतं. त्याला तिचा आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा होता. केवळ ती चालू शकत नव्हती म्हणून ती काहीच करू शकत नाही असं म्हणणं चुकीचं होतं आणि म्हणूनच अशा वातावरणातून तिला जरा वेगळ्या जागी नेलं तर तिच्या तब्येतीत सुधारणा होईल असं त्याला वाटलं. खरतरं सईला असं घर सोडून येणं पटलं नव्हतं. कारण उगीच आई मुलाची ताटातूट केली हे अजून एक खापर तिच्या माथी फोडलं गेलं असतं जे तिला नको होतं. पण तरीही मिहीर ऐकायलाच तयार नव्हता. आणि तिलाही रोजच्या टोचून बोलण्याचा आणि टोमणे ऐकण्याचा वीट आला होता. त्यामुळे तीही त्याच्यासोबत यायला तयार झाली. याचं विचारांच्या तंद्रीत त्यांचं नवीन घर आलं. त्याने आधी उतरून तिची व्हीलचेअर बाहेर काढली आणि मग हळूच तिला उचलून त्यावर बसवलं. त्याने दारावरची बेल वाजवली. एका बाईने दार उघडलं. तिने त्या दोघांनाही ओवाळून आत घेतलं आणि त्यांचं तोंड भरून स्वागत केलं.

" या कोण.....?? " सईने विचारलं.

" या नीता मावशी. इथे जवळच राहतात. त्या आता आपल्याकडे जेवण आणि बाकीचं काम करणार आहेत.." मिहिरने सांगून टाकलं.

" अरे पण कशाला....मी केलं असतं... मला जमेल तसं..." सई म्हणाली.

" हो तुला करायचंच आहे पण त्या आधी तुला बरं व्हायचंय. नीता मावशींची तुला सोबत पण होईल . मी दिवसभर ऑफिसला गेल्यावर तू कंटाळशील. म्हणून त्यांना ठेवलंय..." तो म्हणाला.

" नीता मावशी तुम्ही लिस्ट केली का काय काय लागेल त्याची.....?? " मिहिरने विचारलं.

" हो दादा.... ही घ्या. " असं म्हणून नीता मावशींनी मिहिरच्या हातात एक कागद दिला.

" मी पटकन सगळं सामान घेऊन येतो हा तोपर्यंत तुम्ही घर बघा. " असं सईला म्हणून तो पटकन बाहेर गेला. 


काल रात्री ऑफिसवरून आल्यावर तो जेव्हा पुन्हा बाहेर गेला त्यावेळी तो त्याच्या आणि सईसाठी घर बघायला बाहेर पडला होता. त्याच्या एका ऑफिसच्या माणसाचं ते घर होतं. तो प्रमोशन झाल्यामुळे बंगलोरला शिफ्ट झाला होता. घर तसंच पडून होतं. मिहिरला ही गोष्ट माहीत होती म्हणूनच त्याने त्या व्यक्तीला रिक्वेस्ट करून घर भाड्याने मागितलं होतं. तो ही त्यासाठी आनंदाने तयार झाला. घरात भांडीकुंडी, गॅस ,शेगडी, फ्रीज या गोष्टी होत्या त्यामुळे मिहिरला नव्याने काहीही आणावं लागलं नाही. फक्त जेवणासाठी लागणारा जिन्नस आणायचा होता. म्हणून त्याने नीता मावशींना लिस्ट करायला सांगितली होती आणि तो सामान आणायला बाहेर गेला. 

..........................................


नीता मावशी उद्या पासून कामाला येणार होत्या. त्यामुळे मग मिहीर घरी आल्यावर त्या निघून गेल्या. मिहिरने दुपारचं आणि रात्रीचं जेवण आज बाहेरूनच आणलं. रात्रीचं जेऊन झाल्यावर ते दोघेही बाल्कनीत निवांत बसले होते. कितीतरी दिवसांनी अशी कमालीची शांतता दोघेही अनुभवत होते. समोर चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून अजूनच छान वाटतं होतं. रात्र हळूहळू गडद होऊ लागली तसा एक थंडगार वाऱ्याचा झोत अंगावर आला आणि सई शहारली... नकळत तिचे डोळे मिटले गेले आणि....ओठ रुंदावले .. कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. ती तशीच डोळे मिटुन बसून होती. इतक्यात तिच्या डोक्यावरून खाली घरंगळत .....तिला नाजूक स्पर्श करत मोगऱ्याची फुलं तिच्या ओटीत पडली. तिने डोळे उघडले आणि ती फुलं ओंजळीत पकडली. नाकाजवळ नेऊन तिने मोठा श्वास घेतला आणि मोगऱ्याचा सुगंध मनात साठवून घेतला. तिला खूप बरं वाटलं....!!! मनात एक नवी पालवी फुटल्या सारखी तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसू लागली....!!!! मागून मिहीर तिच्या समोर आला. त्याने गुढघ्यावर बसून तिला आपल्या मिठीत घेतलं. ती थॅंक्यू म्हणायच्या प्रयत्नात होती पण त्या आधीच मिहिरने आपल्या ओठांनी तिचे ओठ बंद केले..ती तशीच त्याच्या मिठीत विसावली. तिचा ताण.... तिला वाटणारं एकटेपण....दुबळेपण...तिच्या विचारांचं काहूर सगळं त्या मिठीत लुप्त होत होतं....!!!! दोघेही तिथेच झोपी गेले. उद्यापासून सईच्या नवीन आयुष्याची सुरवात होणार होती....!!! 


क्रमशः...

🎭 Series Post

View all