तुला पाहते रे - भाग 14
नलिनीताईंच्या मैत्रिणी येऊन गेल्या आणि त्या दिवसापासून त्यांचं सईशी वागणं बोलणं बदलत गेलं. सई देखील बाळाचं कळल्यामुळे अपसेट होती. ना ती नीट जेवत होती ना ही तिचं कशात मन रमत नव्हतं. भरीस भर म्हणून नलिनीताई देखील तिच्याशी फटकून वागू लागल्या होत्या. त्यांना वाटायचं की सईमुळेचं ते बाळ गेलं. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यातून या गोष्टीचा राग बाहेर पडू लागला. मधूकररावांनी त्यांना खूपदा समजावून पाहिलं पण त्यांच्यात काहीच फरक पडला नाही. उलट ते सईची बाजू घेत त्यामुळे त्या अजूनच तिचा राग राग करू लागल्या. सई मात्र या सगळ्यात शांत होती. ती अजूनही बाळ गेल्याच्या धक्क्यातून सावरली नव्हती. मिहीर तिला कधीच एकटं वाटू देत नव्हता. पण तरीही तो ऑफिसला गेल्यानंतर बदलणार वातावरण तिला सहन होत नव्हतं. आपण कोणावर तरी ओझं बनून आहोत ही भावनाच आजारी माणसाला चैन पडू देत नसते. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असंच त्यांना वाटतं असतं. आपण काही करू शकत नाही या विचारांनीच ते जास्त खचत जातात. आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वासचं त्यांच्या मनातून हळूहळू लोप पावत जातो. असंच काहीसं सईच्या बाबतीतही झालं होतं. दिवसेंदिवस तिची प्रकृती बिघडत होती. धड खाणं पिणं नाही...शरीराची हालचाल नाही त्यामुळे तिला कंटाळा यायचा. व्हीलचेअर वरून ती सगळीकडे फिरायची पण ते फिरणं बंदिस्त असल्यासारखं तिला वाटे. मिहीर आणि मधूकररावांना देखील नलिनीताईंच्या वागण्यातील बदल जाणवत होता पण त्यावर काय बोलणार असं त्यांना वाटे. दुसरीकडे मिहीर सईच्या ट्रीटमेंट साठी डॉक्टरांकडे फेऱ्या मारायचा. आत्तापर्यंत त्याने तिला बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट साठी फिरवलं होतं. पण कोणाच्याच औषधांचा फरक पडत नव्हता. अशातच त्याला डॉ. जोश्यांबदल कळलं. त्याच्या एका ऑफिस मधल्या फ़्रेंडचे ते नातेवाईक होते. शहरातील सर्जन डॉक्टरांपैकी ते एक होते. आपल्या मित्राच्या सांगण्यावरून तो एकदा त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला.
" May I come in ....? " मिहिरने डॉक्टर जोशींच्या केबिनचं दार उघडत विचारलं.
" yes please...." डॉक्टर जोशी मान ही वर न करताच बोलले. ते कसलीतरी फाईल चाळत होते. नाकावरच्या चष्म्यातून त्यांनी एकवार मिहीरकडे कटाक्ष टाकला आणि पुन्हा ते फाईल चाळू लागले. तोपर्यंत मिहीर शांत बसुन त्यांच्या केबिनच निरीक्षण करत होता. थोडा वेळ शांततेत गेला. डॉ. जोशींनी त्यांचा चष्मा काढून समोरच्या टेबलवर ठेवला आणि ते मिहिरशी बोलू लागले.
" सॉरी ....जरा एका केसची फाईल बघत होतो. सो तुम्हाला थांबावं लागलं. बोला..." डॉ. जोशी म्हणाले.
" It's ok.. मी मिहीर लिमये.." असं म्हणून त्याने वाकून डॉक्टरांशी हात मिळवला आणि तो पुन्हा खुर्चीत बसत म्हणाला, " मी आशिष राजवाडेचा मित्र आहे..."
" Ohh... yess... आशिष बोलला होता मला. बोला काय प्रॉब्लेम आहे.." डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांनी असं विचारल्यावर मिहिरने त्यांना अक्सिडेंट पासूनच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. किती डॉक्टरांकडे नेलं ते त्यांना सगळं सांगितलं आणि बोलता बोलताच सईची फाईल त्यांच्याकडे दिली. डॉक्टरांनी पुन्हा टेबलवरचा चष्मा उचलून डोळ्यांवर चढवला आणि ते फाईल चाळू लागले.
" डॉक्टर प्लिज तुम्ही काहीतरी करा. मला सगळ्या डॉक्टर्सनी हेच सांगितलंय की ती पुन्हा कधीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही. पण......पण मला अजूनही आशा आहे की काहीतरी miracle घडेल आणि ती पुन्हा चालायला लागेल..." मिहीर अगतिक होऊन त्यांना सांगत होता.
" हमम......." डॉ. जोशींनी फाईल बंद केली आणि चष्मा पुन्हा टेबलवर ठेवला. हात टेबलावर ठेवले आणि बोटं एकमेकांत गुंफवून ते मिहीरकडे बघत बोलू लागले.
" मी तुमच्या मिसेसची फाईल बघितली. त्यांच्या आत्ताच्या परिस्थितीनुसार त्या सुधारण्याचे पन्नास टक्के चान्सेस आहेत असं मला वाटतं किंवा अजिबात नाही असंही म्हणता येईल. दोन्ही शक्यता मी तुम्हाला गृहीत धरायला सांगतोय. माझ्या ओळखीचे एक अमेरिकेमध्ये डॉक्टर आहेत. तुमची जर तयारी असेल तर मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला सांगतो.." डॉक्टर म्हणाले.
" हो....हो डॉक्टर काहीच प्रॉब्लेम नाही. सई साठी मी कोणत्याही डॉक्टरांची ट्रीटमेंट करायला तयार आहे..." मिहीर आनंदून म्हणाला. पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर शांतता पसरली.
" पण डॉक्टर ती आता इतकी खचलेय की ती कोणत्याच डॉक्टरांकडे जायला तयार नाहीये. त्याचं अक्सिडेंटमुळे आमचं बाळ........." बोलत बोलता मिहीरचा कंठ दाटून आला होता.
" ओहह ....आय सी...." डॉक्टर
" त्यामुळे ती अजूनही त्याच धक्क्यात आहे. कोणत्याच डॉक्टरांनी केलेल्या ट्रीटमेंटचा फायदा झाला नाही त्यामुळे आता आपण कधीच चालू शकत नाही अशीच तिची समजूत झालेय..." मिहीर काहीसा हताश होऊन म्हणाला.
" हम्मम.... मला कळतंय अशा परिस्थितीत पेशंटची अवस्था फार नाजूक असते. त्यामुळे आपणही त्यांना थोडं सांभाळून घ्यायला हवं. आपण आधी डॉक्टरांशी या विषयावर बोलूया आणि मग मी तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंट बदल सांगेन....रिसेप्शन जवळ तुम्ही तुमच नाव, फोन नंबर आणि इमेल तेवढं द्या. म्हणजे त्या डॉक्टरांचा मेल आला तर मी तुम्हाला तसं कळवीन..." डॉक्टर म्हणाले.
" हो डॉक्टर चालेल..... Thank you so much doctor.. thank you so much for your copretion. तुम्हाला भेटून मला आशेचा एक किरण तरी दिसतोय...." मिहीर हसतमुखाने म्हणाला.
" It's my pleasure...." डॉक्टर मिहिरशी हात मिळवत म्हणाले. त्यांच्याशी बोलून मिहीर त्यांच्या केबिन मधून बाहेर पडला.
मिहिरला आज खूप छान वाटतं होतं. आज कितीतरी दिवसांनी त्याला डॉक्टरांच्या रूपाने एक आशेचा किरण दिसत होता. सई पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहावी असं त्याला वाटत होतं आणि त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती. त्याने त्याच्या ऑफिस मधल्या मित्राला फोन लावून सगळं सांगितलं आणि त्याचे आभारही मानले. कधी एकदा घरी जाऊन सगळं सईला सांगतो असं त्याला झालं होतं. पण घरी मात्र वेगळंच रामायण चालू होतं.
...................................
" मलाच करावं लागतंय घरात सगळं...." नलिनीताई तावातावाने बडबडत होत्या.
" अग पण आम्ही आहोत ना.....आम्हाला सांगत जा कामं....." मधूकरराव म्हणाले.
" तुम्हाला काय करता येतायत का बायकांची कामं.... सगळं घरातल्या बाईलाच बघावं लागतंय....." त्या अजूनही रागातच होत्या.
झालं असं की त्यांनी संध्याकाळी खायला म्हणून पोहे केले होते. सई तिच्या रूम मध्येच व्हीलचेअर बसून होती. शुन्यात नजर लावून ती बाहेर बघत होती.तेवढ्यात पोह्यांची प्लेट घेऊन नलिनीताई आत आल्या.
" पोहे केलेत खाऊन घे......" असं म्हणून त्यांनी पोह्यांची प्लेट बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवर ठेवली. पण सईच लक्षच नव्हतं.
" पोहे ठेवलेत इथे.....घ्या खाऊन...." नलिनीताई असं ओरडून बोलल्यावर सईच तिकडे लक्ष गेलं.
" हं......." ती एवढंच म्हणाली आणि पुन्हा बाहेर बघू लागली. खरतर तिचं खण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नसायचं. पण मिहीर ओरडायचा म्हणून ती दोन घास तरी जेवायची. नलिनीताई पोह्यांची प्लेट ठेऊन तिथून निघून गेल्या. थोडया वेळाने सईला तहान लागली म्हणून तिने पाण्याचा ग्लास घ्यायला हात मागे केला आणि टेबलवरची प्लेट खाली पडली. पोहे सगळीकडे सांडले. डिश पडल्याचा आवाज ऐकून नलिनीताई आत आल्या. त्यांनी पाहिलं तर सई व्हीलचेअर वरून वाकून ते पोहे भरायचा प्रयत्न करत होती पण तिला ते जमत नव्हतं.
" राहू दे......मी करते..." असं म्हणून नलिनीताईंनी पोहे गोळा करून भरायला सुरवात केली. पण दुसरीकडे त्यांच्या तोंडाचा पट्टा मात्र चालू होता.
" काय पण भोग आहेत माझे....मला करावं लागतंय सगळं.. माझ्याशिवाय कोणाला काय पडलेय या घराची. बाकीच्यांना आयतं बसून मिळतंय सगळं....." असं बडबडत सईला टोमणे मारत त्या सांडलेले पोहे डिश मध्ये भरून घेऊन आल्या. तेव्हापासून त्या एकट्याच बडबडत होत्या.
" मला तर वाटतय.... नाटकंच करतेय ही...काही होत नसेल हिला. उगीच काम लागतील ना घरातली म्हणून बसलेय व्हीलचेअर धरून...." त्या तोंड वाकड करीत म्हणाल्या.
" नलु......अग झालंय काय तुला....?? का अशी वागतेस त्या पोरीशी....काय बिघडवलंय तिने तुझं...?? " मधूकरराव म्हणाले.
" काय बिघडवलंय..... अहो ज्या वयात सुनेंन सासुच करायला हवं. त्या वयात मला तिचं करायला लागतंय. मला नाही झेपत हे सगळं.. घरातलं करायचं , आलेल्या गेलेल्याचं कळायचं...." त्या सोफ्यावर बसत म्हणाल्या.
" अग पण तू जागेवर होतीस तेव्हा सई सुद्धा सगळं करत होती. पण तिने कधीच कसलीच तक्रार केली नाही. आणि आज तिच्यावर अशी वेळ आली असताना आपण असं वागायचं का तिच्याशी...?? " बाबा अगतिक होऊन म्हणाले.
" माझ्यावेळी तिने केलन हे सून म्हणून तिचं कर्तव्यच होतं. पण आता मला तिची अजून सेवा करणं शक्य नाही.मी तिच्या बाबांना आजच फोन करून सांगणारे तुमच्या मुलीला येऊन घेऊन जा म्हणून ...." त्या रागाने म्हणाल्या.
दाराबाहेर मिहीर हे सगळं ऐकत उभा होता. खरंतर नलिनीताई पोह्यांची प्लेट घेऊन बाहेर आल्या तेव्हाच तो आला होता. पण नलिनीताईंचं बोलणं कानावर पडल्यावर मात्र तो तिथेच थांबला. आई असं काहीतरी बोलत असेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण सगळं त्याच्या समोरच घडत होतं. त्यामुळे मनाशी काहीतरी ठरवून त्यानें घरात पाऊल टाकलं..
क्रमशः.....
आजचा भाग खूप छोटा आहे पण गणपतीमुळे आणि लिहायला थोडा वेळ जातोय. पण i hope की तुम्ही समजून घ्यालं.. पुढील भाग रेग्युलर पोस्ट केले जातील.