तुला पाहते रे - भाग 13

Love story

तुला पाहते रे - भाग 13

" डॉक्टर........!!!! ....माझे...माझे पाय.." सई ओरडली तसे डॉक्टर धावत तिच्या रूम मध्ये आले. पाठोपाठ नलिनीताई आणि राहुल ही आत आले.

" काय झालं.....मिसेस सई तुम्हाला काही त्रास होतोय का...?? " डॉक्टरनी विचारलं.

" डॉक्टर माझ्या पायांना काय झालंय....I mean माझे पाय आहेत ना....?? " तिने अगतिक होऊन विचारलं. 

" Of course.... तुमचे पाय अगदी व्यवस्थित आहेत. In fact ऑपरेशन successful झालंय सो तुम्ही थोड्याच दिवसात तुम्ही चालू शकाल.." डॉक्टर हसत म्हणाले

" पण.......पण डॉक्टर मला गुडघ्याखाली पाय असल्याची जाणीवच होत नाहीये...." ती रडकुंडीला आली होती.

" What......???  कसं शक्य आहे....? मी चेक करतो wait..." असं म्हणून डॉक्टरांनी तिच्या पायावरील पांगरून दूर केलं. 

नर्स कडून त्यांनी छोटा हॅमर घेतला आणि तिच्या गुढघ्याच्या वाटीवर हळूच मारून पाहिलं. पण तिला काहीच संवेदना जाणवत नव्हत्या. पुन्हा त्यांनी पायाच्या घोट्यावर ही मारून पाहिलं तरी तिला काही जाणवलं नाही. शेवटी डॉक्टरनी एक छोटी सुई तिच्या पायाला टोचली. पण सईला काहीच दुखलं नाही. 

" डॉक्टर मला काहीच सेन्सेशन जाणवत नाहीये...." ती आता  बाजूला उभ्या असलेल्या नलिनीताईंना बिलगून रडू लागली. 

" सई..... प्लिज तुम्ही शांत व्हा. आपण पुन्हा एकदा तुमच्या पायाचं ऑपरेशन करून बघू.. सगळं छान होईल. " डॉक्टर तिला धीर देऊन तिथून निघून गेले. 

डॉक्टरांनी सईचे सगळे रिपोर्ट पुन्हा एकदा नव्याने करून ते तपासले. पण रिपोर्ट्स मध्ये त्यांना काहीचं वेगळं जाणवलं नाही. शेवटी त्यांनी पुन्हा ऑपरेशन करायचा निर्णय घेतला.   त्याप्रमाणे त्यांनी पुढच्या दोन तासात तिचं पुन्हा एकदा ऑपरेशन केलं. आता तरी सगळं व्यवस्थित होईल अशी डॉक्टरना आशा होती.  पण पुन्हा तेच घडले. सईला पायाची कोणतीच हालचाल करता येत नव्हती.  ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी राहुल आणि मधूकररावांना केबिन मध्ये बोलावून घेतलं. नलिनीताईंसमोर काही गोष्टी बोलणं बरं नव्हतं कारण त्यांना पुन्हा त्रास होण्याची शक्यता होती. 

" डॉक्टर बोलवलत आम्हाला....?? " राहुलने आत येत विचारलं. त्याच्या मागे मधूकररावही होते. 

" हो ....या बसा. " डॉक्टर समोरची फाईल चाळत म्हणाले.

" डॉक्टर पुन्हा ऑपरेशन करूनही सईला असं का होतंय....?? " राहुलने विचारलं.

" मिस्टर राहुल.....मी त्यांचे सगळे रिपोर्ट्स पुन्हा एकदा चेक केले. त्यांचे रिपोर्ट्स व्यवस्थित आहेत. पण unfortunately..........."  डॉक्टर बोलता बोलता मध्येच थांबले.

" डॉक्टर सांगा काय असेल ते....." मधुकरराव विषादाने म्हणाले.

" मिसेस सई या गाडीत बराच वेळ अडकून पडल्या होत्या. अपघात झाल्यापासून त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत खूप वेळ गेला. Unfortunately.... त्यांच्या पायाचं सेन्सेशन पुर्णतः गेलंय. त्यामुळे यापुढे कधी त्या त्यांच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत..." डॉक्टर म्हणाले.

" काय......?????? " राहुल आणि मधुकरराव जवळजवळ ओरडलेच. 

" डॉक्टर पण असं कसं होऊ शकत....? यावर काही उपाय नाही का....??? " राहुलने विचारलं. 

" अशा केस मध्ये पेशंटला लवकर उपचार मिळणं आवश्यक असतं. पण त्यांना इथे आणायलाच खूप वेळ गेला. मी पूर्ण प्रयन्त केले आहेत. तुम्ही त्यांना दुसऱ्या डॉक्टर्सना दाखवू शकता पण सध्या तरी यावर काही मार्ग दिसत नाहीये..." डॉक्टर म्हणाले.

राहुल आणि मधूकरराव सुन्न होऊन डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर पडले. कसंबसं त्यांनी नलिनीताईंना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. चार दिवसांनी मिहीर आणि सईला घरी सोडण्यात आलं. खंडाळ्याला जाताना बागडणारी सई आज व्हीलचेअर वरून घरी परतली होती. मिहिरच्या ही डोक्याची जखम आता बऱ्यापैकी बरी होत होती. मिहीर आणि सई अजूनही शॉक मध्येच होते. सई तर कोणाशीच बोलत नव्हती. तिला आणून मिहीर आणि सईच्या खोलीत ठेवलं. ती कितीतरी वेळ शुन्यात नजर लावुन बसली होती. मिहीर बरा झाल्यानंतर डिस्चार्ज द्यायच्या आधी डॉक्टरांनी मिहिरला सगळी कल्पना दिली. तिचं मिस्करेज झाल्याचही सांगितलं. मिहीर त्या दिवशी खूप रडला. तो अजूनही या सगळ्या प्रकारासाठी स्वतःला दोष देत होता. आपण जर नीट ड्रायव्हिंग केलं असतं तर आज ही वेळच आली नसती असं त्याला वाटलं. त्याने आपले अश्रू पुसले. कारण या क्षणी सईला सावरण जास्त गरजेचं होतं. तिला अजूनही बाळा बदल काही सांगितलेलं नव्हतं. पण चालु शकत नाही हे मात्र तिला कळलं होतं. ती बाहेर एकटक बघत असतानाच मिहीर आत आला. 

"सई......." त्याने हाक मारली. पण तिचं लक्षच नव्हतं. 

" सई.......!!! " त्याने तिला हात लावून हलवलं आणि ती भानावर आली. 

" मिहीर..........." ती त्याला बिलगुन रडू लागली. इतका वेळ दाबुन ठेवलेला तिचा हुंदका बाहेर पडला. 

" सई शांत हो...... सगळं नीट होईल मी आहे ना..मी तुला चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. तू पुन्हा नक्की चालायला लागशील.." तो तिला समजवत म्हणाला. 

" पण डॉक्टर म्हणाले की मी....मी.... पुन्हा कधीच माझ्या पायावर उभी राहू शकत नाही..." असं म्हणून तिला पुन्हा जोराचा हुंदका आला.

" सई मी आहे ना.....मी काही होऊ देणार नाही तुला. तू शांत हो. आराम कर थोडा वेळ मग बोलू आपण.." असं म्हणून त्याने तिला बेडवर नीट झोपवलं आणि तो बाहेर आला.

बाहेर सईचे आई बाबा त्यांना भेटायला आले होते. मिहिरने त्यांना नमस्कार केला आणि तो ही नलिनीताई आणि मधूकररावांच्या बाजूला येऊन बसला.

" कशी आहे हो....माझी पोर..." मेधा ताईंना हुंदका आवरेना.

" सई बरी आहे...झोपलेय आत्ताच..." मिहीर म्हणाला

" काय झालं हो हे अचानक....हसता खेळता संसार होता तुमचा. कोणाची दृष्ट लागली कळेना.  " त्या अजूनही रडत होत्या. नलिनीताईनी त्यांना जवळ घेतलं आणि थोपटलं तशा त्या थोड्या शांत झाल्या. 

" खरंतर आम्ही सईला घरी न्यायला आलोय......" सुभाषराव म्हणाले.

" घरी म्हणजे.....हे ही तीचंच घर आहे. " मधूकरराव 

" हो.. पण तिच्या अशा अवस्थेत इथे ठेवण्यापेक्षा आम्ही तिला न्यायला तयार आहोत. आम्ही आयुष्यभर सांभाळू तिला.." ते अगतिक होऊन म्हणाले.

" अहो...काहीतरीच काय बोलताय सुभाषराव. सई आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे. आम्ही असं कसं तिला पाठवून देऊ..." मधुकरराव त्यांच्या पाठीवर थोपटत म्हणाले.

" अहो पण.......आता....अशा अवस्थेत ती काहीच करू शकत नाहीये. घरी आली तर तिच्या सोबत पूजा आहे तिच्यासोबत तिचा वेळ ही जाईल. " सुभाषराव

" आम्हाला पटतंय तुमचं म्हणणं . पण तिला राहूदे इथेच. आम्हाला काही ती जड नाही. " मधुकर म्हणाले.

" बाबा....सई माझी बायको आहे.. काही झालं तरी मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. लग्नात आम्ही एकमेकांना वचन दिलंय. सुखदुःखात सोबत राहण्याचं ते काही म्हणण्यापुरत नाही. मी सईला असं सोडून देऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटण स्वाभाविक आहे. पण सई ही माझी जबाबदारी आहे..तुम्ही काळजी करू नका..." मिहीर सुभाषरावांच्या हातावर थोपटत म्हणाला. 

मेधा ताई आणि सुभाषराव त्याच्याकडे पाहतच राहिले. आपली जावयाची निवड चुकली नाही याचं समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होतं. 

..............................................

पुढच्या चार पाच महिन्यात मिहिरने सईला सगळ्या डॉक्टरांकडे फिरवलं होत पण सगळ्याच  डॉक्टरांनी ती पुन्हा उभी राहू       शकत नाही हेच         सांगितल. सईचा ही आता धीर सुटत चालला होता. आपण चालू शकत नाही याहीपेक्षा मिहीर  आणि आई बाबांना आपल्यामुळे त्रास होतोय याची तिच्या मनाला टोचणी लागत होती. शिवाय आपण काही करू शकत नाही त्यामुळे या सगळ्यांवर आपण ओझं बनुन राहिलोय ही भावना दिवसेंदिवस तिच्या मनात बळावत होती. तशातच एकदा नलिनीताईंच्या महिला मंडळातल्या बायका तिला भेटायला आल्या होत्या. तिची विचारपूस करून त्या बाहेर येऊन सोफ्यावर बसल्या. सईच्या अशा अवस्थेमुळे घराची जबाबदारी पुन्हा एकदा नलिनीताईंवर येऊन पडली. जेवण, घरातली कामं, आलेल्या गेलेल्याचं करणं सगळं त्यांनाच बघावं लागे. त्या सगळ्या बायकांसाठी चहा घेऊन आल्या आणि तिथेच त्यांच्यासोबत जरा गप्पा मारत बसल्या.

" काय गं नलु....कसा झाला अक्सिडेंट....?? " एका बाईने विचारलं. त्यावर नलिनीताईंनी त्यांना सगळं सांगितलं.

" पण काय ग....हे पायाचं सेन्सेशन खरचं गेलंय का...?? " दुसरीने विचारलं.

" खरंच का म्हणजे...?? आमच्या समोर डॉक्टरांनी सांगितलं.." नलिनीताई म्हणाल्या. 

" हा मग ठीक आहे. नाहीतर आजकालच्या मुली कामं करायला नको म्हणून काय वाट्टेल ते करतील. फुकटची सेवा करून मिळतेय सासु कडून तर नाही कशाला म्हणा.." पहिली म्हणाली.

" नाही गं..... काहितरीचं काय..!!! सई तशी नाहीये " नलिनीताईंनी सांगितलं.

" अग सगळ्यांना तसंच वाटत असतं. पण खरं तसं असतंच असं नाही.." तिसरी म्हणाली

" हो ना....मागे ती देवधरांची सून हात फ्रॅक्चर आहे सांगून सासू कडून सगळं करुन घ्यायची आणि एकदा हाताचं बँडेज सोडून पाणीपुरीच्या गाडीवर पाणीपुरी खाताना दिसली. तेव्हापासून या सुनांवरचा विश्वासच उडालाय बघ...तू आपली खात्री करून घे हो नलु..." दुसरी म्हणाली.

" नाही ग खरंच तसं काही...." नलिनीताई म्हणाल्या.

" असूदे गं नसेल तर चांगलंच आहे. अगं त्या मोहितेंच्या मुलाला मुलगी झाली. त्यांनी हे पेढे दिलेत तुझ्यासाठी " असं म्हणून त्या बाईनं पेढ्यांची पिशवी नलिनीताईंच्या हातात दिली. त्यावर क्षणभरच त्यांना डॉक्टरांनी सईच्या झालेल्या मिस्करेजचं बोलणं आठवलं आणि डोळ्यात पाणी आलं.  

" काय गं नलु काय झालं......" त्या बायकांपैकी एकीने विचारलं.

" सई आणि मिहीरचा अक्सिडेंट झाला नसता तर आज मी देखील तिचे डोहाळे पुरवत असते...." असं म्हणून त्यांनी तोंडाला पदर लावला.  तेवढ्यात पाण्याच्या भांड्यातलं पाणी संपलं होतं ते आणायला सई व्हीलचेअर वरून बाहेर येत होती. नलिनीताईंचं बोलणं नेमकं तिच्या कानावर पडलं. 

" म्हणजे..... काय झालं काय नक्की....??? " त्या बायकांनी आश्चर्याने विचारलं.

" आमची सई सुद्धा गरोदर होती. पण अक्सिडेंट झाला तेव्हा ती खूप वेळ अडकून पडली होती त्यामुळे ते बाळ गेलं...."  नलिनीताई असं म्हणाल्या आणि पाठून येत असलेल्या सईच्या हातातलं भांड पटकन खाली पडलं. 

तिला खूप धक्का बसला होता. कारण या बाबत तिला कोणीच काही सांगितलं नव्हतं आणि सांगण्यासारखी परिस्थितीही नव्हती. भांड पडलं तसं सगळ्यांनी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिने तिची व्हीलचेअर तशीच मागे वळवली आणि ती खोलीत निघून गेली. तिने खोलीचं दार आतून लावून घेतलं आणि तिला जोराचा हुंदका आला. नलिनीताई आणि बाकीच्या बायकांना काय बोलावं कळेना. आपण उगीच बोललो असं नलिनीताईना वाटलं. 

" ही अशी का निघून गेली..." एक बाई म्हणाली.

" कारण तिला यातलं काहीच माहीत नव्हतं.." नलिनीताईंच्या डोळ्यातही पाणी जमा होत होतं. 

" खरंच माहीत नव्हतं का....?? की उगीच तुम्हाला  दाखवण्यापुरतं ....?? " पहिलीने विचारलं. 

" म्हणजे....?? " नलिनीताईंच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपत नव्हतं. 

" अगं कशावरून तिने आधीच काही केलं नसेल....या हल्लीच्या मुलींचं काही सांगता येत नाही..." दुसरी म्हणाली. 

" हो नाहीतर काय.... तिनं आधीच ते मूल पाडलं असेल आणि मग डॉक्टरांकडून तुम्हाला सांगितलं असेल....अक्सिडेंट मध्ये झालं म्हणून...." पहिली म्हणाली.

नलिनीताई सुन्न होऊन हे सगळं ऐकतच राहिल्या. असं काही असेल असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यांचा सईवर विश्वास होता पण आज त्यांच्या मैत्रिणींनी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्या बुचकळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या मैत्रिणी थोडा वेळ गप्पा मारून निघून गेल्या. पण नलिनीताईंच्या डोक्यातून त्यांचं बोलणं काही जात नव्हतं आणि त्या दिवसापासून त्यांचं सईशी असणारं वागणं बदलत गेलं.....

क्रमशः....

🎭 Series Post

View all