तुला पाहते रे - भाग 10

Love story

तुला पाहते रे - भाग 10


मिहीर असा उठून गेलेला बघून सईला काही कळेना. कदाचित खूप दमला असेल, मग बोलू त्याच्याशी निवांत असं तिनं ठरवलं आणि ती रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. जेवायला तिने छान पायनॅपल शिरा केला. मिहिरला आवडतो अगदी तसा...!!! पण जेवताना देखील मिहीर शांत शांतच होता. नलिनीताईंनी देखील सईला खुणेनेच त्याचं काय बिनसलंय ते विचारलं. पण तिने काहीच माहित नसल्याचं त्यांना सांगितलं. जेवण लवकरच आटपून मिहीर वरती खोलीत गेला. त्याला नक्की कसला राग आला होता त्याचं त्यालाच कळत नव्हतं. पण तरीही तो थोडा डिस्टर्ब होता. सईने मग जेऊन झाल्यावर मागचं सगळं आवरलं.उरलेली आमटी , भाजी काढून फ्रीजमध्ये ठेवली. भांडी घासायला म्हणून सिंक मध्ये नेऊन ठेवली. ओटा पुसून लख्ख केला आणि ती वरती रूममध्ये आली. तिनं बघितलं तर लाईट ऑफ करून मिहीर झोपला होता. खरंतर तो जागा होता पण रागात असल्यामुळे त्याने तस दाखवलं नाही. 

" मिहीर.....झोपलास तू...? " तो एवढ्या लवकर झोपल्याचं बघून तिला आश्चर्य वाटलं. तिने मागून येऊन त्याला मिठी मारली तरी मिहीर गप्पच होता. 

" झोपू दे ग...." तो उगीचच म्हणाला.

" काय झोपतोस.....उठ मला बोलायचंय तुझ्याशी..आज इंटरव्ह्यूला काय झालं माहितेय...!!! " ती त्याला उत्साहात सांगू पाहत होती.

" मी ऐकलंय मगाशी सगळं...आता काय तुझा मित्रच आहे तो म्हटल्यावर तो तुलाच जॉब देणार...." तो म्हणाला. अजूनही तो तिच्याकडे पाठ करूनच झोपला होता.

" म्हणजे...?? .....काय म्हणायचंय तुला...?? " तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. त्यावर तो काहीच बोलला नाही. आता तिलाही जरा राग आला होता.

" मिहीर....इकडे बघ माझ्याकडे.. तुला काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोल.." ती त्याला स्वतःकडे वळवत म्हणाली. 

" मला काहीही म्हणायचं नाहीये. तुझा मित्र म्हटल्यावर तो तुलाच जॉब देणार आता. त्या इंटरव्ह्यूला काही अर्थ आहे का आता..." तो अजूनही रागातच होता.

" मिहीर एक मिनिट......तुला नक्की कसला राग आलाय ते सर माझे मित्र आहेत याचा की मला त्यांच्या कंपनीत जॉब लागतोय याचा..." तिचाही आता आवाज चढला होता. 

" हे बघ सई..... मला वाटतं तुझ्या कॅलिबर वर तुला हा जॉब मिळावा. आणि दुसरी गोष्ट ते सरच तुझा मित्र आहेत म्हटल्यावर ते तुला जास्त importance देणार..." तो आता बोलता बोलता उठून बसला . 

" हे बघ मिहिर तू काहीतरी अर्धवट ऐकलंयस आणि गैरसमज करून घेतलायस.... पहिली गोष्ट ही की ते जरी माझे मित्र असले तरी त्यांनी माझा रीतसर इंटरव्ह्यू घेतलाय. उद्या त्यांना माझ्या पेक्षाही चांगला एम्प्लॉयी मिळू शकतो. राहता राहिला प्रश्न त्यांनी मला importance देण्याचा तर कॉलेजला तो मला सिनिअर होता. एका कॅम्पच्या वेळी आमची ओळख झाली या पलीकडे मी त्यांना जास्त ओळखत नाही...खूप दिवसानंतर कॉलेजचं कोणतरी भेटलं सो आम्ही बोललो..." एवढं बोलून ती रागातच बाहेर गॅलरीत आली. 


आता मिहिरच्या लक्षात आलं की आपण कुठे माती खाल्ली आहे. खरतर तो तसा पुढारलेल्या विचारांचा होता पण नाही म्हटलं तरी आपली बायको आणि तिचा मित्र जर ऑफिस मध्ये कायम एकत्र काम करणार या विचाराने कुठेतरी त्याला त्याबाबतीत इनसिक्युर वाटलं होतं. पण सईने एवढं बोलल्यावर मात्र त्याचं त्यालाच वाईट वाटलं. तो बेडवर उठून तिच्या जवळ गेला. त्याने मागून येऊन तिला जवळ घेतलं. पण ती रागात असल्यामुळे तिने त्याला झिडकारलं. ती समोर शांतपणे बघत समोरच्या ग्रील वर हात ठेवून उभी होती. मिहीर तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. 

" सॉरी.....!!!." तो तिच्याकडे बघत एवढुस तोंड करून म्हणाला पण तिनं लक्ष दिलं नाही.  

" सॉरी ना...किती रागावणारेस....!! " तो तिला आपल्याकडे वळवत म्हणाला.

" हं.... आधी दुखवायचं आणि मग सॉरी म्हणायचं..सॉरी म्हटलं की झालं सगळं असं वाटतं का तुम्हाला. खरंतर दोष तुमचा नाही सगळ्यांचाच आहे. एखाद्या नवऱ्याची मैत्रीण खूप दिवसांनी भेटली की तुम्ही बोलणार, मेसेज करणार , भेटणार, घरी बोलावणार.... हे सगळं आम्ही समजून घेतो पण तेच बायकोचा एखादा मित्र भेटला की तुम्हाला राग येतो...मग ती काय करतेय कोणाशी बोलतेय हे सगळं तुम्ही बघत असता.. तुमचा लगेच आपल्या बायको वरचा विश्वास उडून जातो...." ती अजूनही रागातच होती. 

" मला तसं म्हणायचं नव्हतं सई..... पण काही वेळेला राग येतोच गं.... सॉरी ना..." तो म्हणाला. 

" मिहीर तुझं असं नाही रे सगळ्यांचीच विचार करायची पद्धत बदलायला हवीय. नवऱ्याची मैत्रीण आम्ही खपवून घेतो पण बायकोचा मित्र तुम्हाला चालत नाही.. जशी तुमची मैत्री असते तशीच त्या बाईचीही निखळ मैत्री असु शकत नाही का....आणि तुझ्या माहिती साठी सांगते आम्ही दोघेही आमच्या लाईफ पार्टनर बद्दलच बोलत होतो. त्या मिलींद सरांना एक मुलगी पण आहे दोन वर्षांची...!!! अजून काही ऐकायचंय का तुला...?? " ती बोलली. 

" सॉरी ना....पुन्हा नाही असं कधीच वागणार.. i promise ....पण अशी रागावू नको माझ्यावर..." तो तिला जवळ घेत म्हणाला.

" हं...." सई

" काय हा....आत जाऊ चल गार वारा सुटलाय बाहेर..." तो म्हणाला तशी ती आत जायला वळली. त्याने पुन्हा तिला आपल्याकडे ओढलं. हातांची पकड जरा घट्ट केली.

" अजूनही राग आहे का नाकावर...." त्याने हसून विचारलं. त्यावर ती मानेनंच हो म्हणाली.

" हो का....मग मी हे नाकचं खाऊन टाकतो.." असं म्हणून त्याने तिचं नाक चिमटीत पकडून उगीचच हातातून तोंडात टाकायची ऍक्शन केली. त्यावर ती हसली.

" अरे बाप रे.....ही बिना नाकाची बायको नको मला..." तो म्हणाला.

" गप रे...." असं म्हणून ती हसून त्याच्या मिठीत शिरली. 

त्याने मग हलकेच तिला उचललं आणि बेडवर आणून झोपवलं.. दोघेही मग गप्पा मारता मारता कधी झोपले कळलंच नाही. 

............................................

सई जॉबला लागून आता जवळजवळ तीन महिने पूर्ण होत आले. ती इंटरव्ह्यू देऊन आली होती त्याच मिलिंद जोगळेकरांच्या फर्म मध्ये जॉबला लागली होती. ती त्यांच्या कंपनी मार्फत कस्टमरच्या घराचं, ऑफिसचं इंटिरियरचं काम करून देऊ लागली.ती बऱ्यापैकी ऑफिसमध्ये रुळली होती. घरचं सगळं काम आटपून ती ऑफिसला जायची. नलिनीताई देखील तिला कामात मदत करायच्या. संध्याकाळी घरी आल्यावर ती त्यांना ऑफिस मध्ये काय काय झालं ते सगळं सांगायची. त्यामुळे तिलाही जरा रिलॅक्स वाटायचं. दिवस हळुहळु पुढे सरकत होते. आता सगळ्यांनाच नवीन वर्षाचे वेध लागले होते. डिसेंबर महिन्याचा तो शेवटचा आठवडा होता. त्यामुळे मग थर्टी फर्स्ट साठी कुठेतरी बाहेर जायचं प्लॅनिंग ठरू लागलं. 

" ए आई....आपण सगळेच जाऊया ना....खूप मजा येईल. दोन दिवस छान फिरू...मजा करू.." मिहीर उत्साहात सांगत होता.

" मिहिर अरे नको....मी आत्ता कुठे फिरायला लागलेय. मला एवढा प्रवास झेपण शक्य नाही....तुम्ही बाबांना घेऊन जा हवं तर...." नलिनीताई म्हणाल्या.

" आता तू नाहीस तर मी कशाला जाऊ त्या दोघांमध्ये...कबाब मे हड्डी उगीचच..." मधुकरराव म्हणाले.

" अहो बाबा काहीतरीच काय..... जाउया ना आपण सगळेच.. आई चला ना तुम्ही पण...." सई म्हणाली.

" नको अग खरंच.. मला त्रास होईल प्रवासाचा. त्यापेक्षा दोन दिवस तुम्हीच फिरून या मस्त..." त्या म्हणाल्या. 

झालं असं की मिहिरच्या ऑफिसमधल्या सगळ्यांनी न्यू इयरच्या पार्टी साठी खंडाळ्याला जायचं ठरवलं. मग प्रत्येकजण आपापल्या फॅमिली सोबत येणार होते. त्यामुळे मग सई आणि मिहीर सुद्धा आई बाबांना यायला मनवत होते पण नलिनीताई ऐकायलाच तयार नाहीत. तेव्हा मात्र मिहीर आणि सईचा नाईलाज झाला. दोन दिवसांनी ते दोघेही आपली गाडी घेऊन खंडाळ्याला जायला निघाले.

" बघा....येताय का अजून पण....मी थांबतो. असतील ते कपडे भरा बॅगेत नि चला. लागले तर घेऊ आपण तिकडे.. " मिहीर म्हणाला. 

" नको म्हटलं ना....जा तुम्ही छान एन्जॉय करा..." नलिनीताई म्हणाल्या.

" आई चला ना....मी भरते हवंतर पटकन बॅग...ड्रेस घाला छान तिकडे..." सई परत आत येत म्हणाली.

" हो नाहीच तर काय आई जीन्स पण घालेल...." असं म्हणून मिहीर पळत गाडीपाशी आला. 

" मिहीर... थांब ..तुझा आगाऊपणा वाढत चाललाय आता...तू ये परत घरी मग तुला सांगते..." नलिनीताई उगीचच रागवत म्हणाल्या. " याला मुलं व्हायची वेळ आली तरी लहान मुलांसारखं वागतो अजून..." असं म्हणून त्यांनी सईला कोपर मारलं. 

" काय मग सई..... आम्हाला कंटाळा आला आता एकमेकांकडे बघून...आता लवकरच नातवंडांना बघायला मिळुदे... म्हणजे त्यांच्या मागे धावून तरी ही जरा बारीक होईल...." शेवटचं वाक्य बाबा जरा हळू म्हणाले तरी नलिनीताईंनी ऐकलंच.. सई मात्र काहीतरी राहिलंय सांगून.. लाजून कधीच आत पळाली होती. 

" काय म्हणालात.....!! " नलिनीताईंनी विचारलं.

" कुठे काय..... ते....हे.....तो बघ मिहीर आला गाडी घेऊन.." ते गाडीकडे बोट दाखवत म्हणाले. 

पाण्याच्या बाटल्या घेऊन सई बाहेर आली. दोघांनीही मग आई बाबांना नमस्कार केला आणि ते गाडीत बसले. गाडी दिसेनाशी होईपर्यंत नलिनीताई आणि मधूकरराव तिथेच  हात हलवत उभे होते. ते बाहेर पडून गेल्यावर अचानक  नलिनीताईंचा डोळा फडफडू लागला. त्यांच्या शरीरातून  एक अनामिक भीतीची लहर सरसरत गेली..!!!

क्रमशः....

🎭 Series Post

View all